Thursday, 27 December 2018

मुद्रणकला - पारंपरिक व आधुनिक

जे मी लिहितोय आणि जे तुम्ही वाचताय ते केवळ दोन गोष्टीमुळे शक्य झालय. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे मुद्रण. मुद्रण हा शब्द नव्या पिढीला फारसा जवळचा किंवा वापरातला नसला तरी आताच्या या घडीला या मुद्रणाशिवाय त्यांचं पानही हालत नसावं... अगदी पेपरलेसच्या जमान्यात सुद्धा. आज तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या पण कदाचित तुम्हाला फारसं परिचित नसलेल्या या मुद्र्णक्षेत्रविषयी म्हणजेच प्रिंटिंग (आता कसं ओळखीचं वाटलं ना  ) या विषयाची थोडी ओळख करून देतो. बालपणी जेव्हा पहिल्यांदा पुस्तक हातात आलं तिथूनच तुमचं आणि प्रिंटिंग च नातं जुळलंय. तुम्हाला शिकवायला, तुम्हाला प्रगत व्हायला आणि नंतर तुम्हाला प्रशस्तिपत्रकाद्वारे शाबासकी द्यायला सुद्धा प्रिंटिंगच लागतं. 

जोहान्स गुटेनबर्ग या जर्मनीमधल्या लोहाराने (हा सोनार होता असेही बोलले जाते)  या आधुनिक प्रिंटिंगचा शोध लावलाय हे सांगूनही खरं वाटणार नाही. तत्पूर्वी चीन मध्ये लाकडाचे ठसे बनवून छपाई चालत असे. परंतु शिसे वापरून बनवलेले टाईप, ज्याला फार पूर्वी मुद्रणातील खिळे ही म्हटले जायचे ते बनवून प्रथम बायबल छापण्याचे काम करून आधुनिक मुद्रणाचा जनक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला तो जोहान्स गुटेनबर्ग. साधारण १०० ते १५० वर्षे याच तंत्राने छपाई केल्यानंतर, जगभरातून येत असलेल्या वाढत्या मागणीला अनुसरून पुढे यातलेच लिथो ऑफसेट सुरु झाले. लिथोप्रेस म्हणजे अक्षरशः एका मोठ्या लादीवर प्रकाशाच्या व रसायनांच्या साहाय्याने उमटवलेल्या भल्यामोठ्या ठश्यातून निर्माण होणारी छपाई. त्यानंतर च्या काळात तलम कापड ताणून बसवलेल्या लाकडी चौकटीच्या साहाय्याने करता येणारी स्क्रीन प्रिंटिंग हे अनेकांना उपयोगी सिद्ध होऊ लागले. आजकाल वेगवेगळे मेसेज लिहिलेले टी शर्ट्स जे आपण पाहतो ते या स्क्रीन प्रिंटिंगमुळेच.  त्यानंतर  एका दिवसात लाखो कागद छापून तयार करणाऱ्या ऑफसेट मशीनचा अविष्कार झाला. मोठमोठाली पुस्तके, कादंबऱ्या काही दिवसात तयार होऊ लागली ती केवळ या तंत्रज्ञानामुळेच. वर्तमान पत्र छापणाऱ्या भल्या मोठ्या रोटरी मशिन्सही ठिकठिकाणी आपले रूप बदलत होत्या. एका बाजूने कागदाचा रोल लावल्यावर दुसऱ्या बाजूने संपूर्णपाने छापून ५०/६० पानांचा अगदी सुरेख घडी घातलेलं वर्तमानपत्र मिनिटाला हजार या वेगाने बाहेर येणारे तंत्रज्ञान आज जुने झाले आहे. आज डिजिटल प्रिंटिंग चा जमाना आहे. संगणक तर घरोघरी आले आहेत. तुमच्या संगणकावरून केली जाणारी कामे, डिझाईन तात्काळ छापायची असलेया आज आपल्याला प्रिंटरकडे म्हणजेच मुद्रकाकडेसुद्ध जायला नको. एक क्लिकवर सुंदर रंगीबेरंगी छपाई ची सोय आता आपल्या  घरातच उपलब्ध झाली आहे. आज बाहेर पडताच दिसणारे शेकडो जाहिरात फलक सुद्धा काही मिनिटातच फ्लेक्स मशीनद्वारे तयार होतात.  तुमचे स्वतःचे चित्र तुमच्या टी शर्ट वर छापण्यासाठी एका कागदावरून तुमच्या टी शर्टवर घेता येते याला सबलीमेशन प्रिंटिंग तंत्रज्ञान असे नाव आहे. भविष्यातच कशाला तर आज अनेक देशात थ्री डी प्रिंटिंग म्हणजेच दिलेल्या डिझाइननुसार वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या प्रकारात कोणताही साचा न वापरता अनेक वस्तू बनवता येतात  नव्हे छापता येतील अशीही सोय आहे ..अगदी तुमच्या पायातले बूट सुद्धा. देशाच्या चलनी नोटा, स्टॅम्प पेपर आणि इतर शासकीय मुद्रण सामुग्री छापण्यासाठी आपल्या देशाची सिक्युरिटी प्रेस आहे. वेगळ्या कागदावर खास तयार केलेल्या शाईने या सर्व गोष्टी छापल्या जातात. सध्याच एक नवीन ट्रेंड आपण पहिला असेलच ... वाढदिवसाच्या केक वरती एखादे छान चित्र किंवा ज्याचा वाढदिवस असतो त्याचेच चित्र असते. म्हणजे खाण्यायोग्य शाईने ही छपाईदेखील आता शक्य झाली आहे. 


 वेळ  बदलली, गरज बदलल्या. कागदच नव्हेतर इतर अनेक माध्यमांवर उतरलेल्या मुद्रणाच्या अनेक कलाविष्कारामधें आपल्या ओळखीच्या हजारो वस्तू मिळू लागल्या.  प्रथमतः फक्त शैक्षणिक आणि माहिती पुरवणे या उपयोगासाठी प्रचलित असलेले प्रिंटिंग आज आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनले आहे.
तुमच्या घराला लावलेला जो आकर्षक वॉलपेपर असतो तो तर या मुद्रणातूनच निर्माण झालेला आहे.  तुमचा संगणक, त्याचा की बोर्ड,   तुमचा टीवी, तुमचे घड्याळ तुमचा मोबाईल सुद्धा प्रिंटिंगमुळेच तयार होतो हे सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही. प्रिय व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्यांवर, तुमच्या दातांवर, तुमच्या नखांवर तुमच्या शरीरावरसुद्धा छपाई होऊ शकते. दागिन्यासारखे मिरवत येईल अशा डोळ्यावर लावण्याच्या छापील सोनेरी लेन्सेस काही दिवसांपूर्वीच पहिल्या. 

अन्न, हवा व पाणी याबरोबरच आजच्या युगातील जीवन  जगण्यासाठी छपाईची गरज आहे हे म्हणणे सुद्धा गैर ठरणार नाही. मुद्रण हे शास्त्र आहे आणि कलासुद्धा. अनेकदा याचा उपयोग द्वेष पसरवणारे संदेश पाठविण्यासाठी केला जातो. परंतु हीच कला, हेच शास्त्र आनंददायी आणि विधायक कार्यासाठी वापरले तर जगाच्या प्रगतीचा वेग अजूनही वाढेल यात शंका नाही.

समीर गुप्ते
कीर्ती प्रिण्टलिंक्स - ठाणे
अध्यक्ष - इम्पॅक्ट प्रिंटर्स असोसिएशन, ठाणे


( DNS Bank  डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या २०१९ च्या कॅलेंडर्स वरील माहितीपर लेखांमध्ये प्रकाशित झालेला आधुनिक प्रिंटिंग या विषयावर मी लिहिलेला हा लेख)


Wednesday, 26 December 2018

से नो टू ड्रग्स - बाईक रॅली By Wake Up Thane Foundation


वेक अप ठाणे फाउंडेशन तर्फे ठाणेकरांना खडखडून जाग आणणारी से नो टू ड्रग्स बाईक रविवार दिनांक २३ डिसेम्बर २०१८ रोजी ठाणे येथे पार पडली. ठाण्याच्या घोडबंदर रोड वरील कासारवडवली येथील ट्रॉपिकल लगून येथून सकाळी १० वाजत सुरु झालेली ही बाईक रॅली हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, मानपाडा, टिकुजिनी वाडी जवळील कोठारी कंपाउंड, ग्लाडीस अल्वारीस रोड वरून काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, लोक उपवन, वसंत विहार, देवदया नगर, शात्री नगर, वर्तक नगर, समता नगर - सिंघानिया स्कुल, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, ठाणे महानगर पालिका, अल्मेडा रोड, चरई नाका, गजानन महाराज चौक, राममारुती रॊड, गडकरी रंगायतन, जांभळी नाका, टेम्बी नाका, कोर्ट नाका या मुख्य रस्त्यांवर फिरून ठीक १२ वाजता सीकेपी हॉल ठाणे येथे संपन्न झाली. ठाण्यातील व बाहेरून आलेल्या सुमारे ३५० बायकर्स व त्याचे बरोबर असलेल्या तितक्याच नागरिकांनी या रॅलीत सुरुवातीपासूनच सहभाग घेतला. जशी जशी रॅली पुढे जात होती तसे तसे अधिकाधिक बायकर्स दुचाकीधारक या रॅलीत सहभागी होत होते.

या रॅलीची का गरज पडली असा प्रश मला जेव्हा काही मंडळींनी विचारला तेव्हा 'ठाणेकरांचे डोळे उघडण्यासाठी' असे उत्तर सारखे मनात येत होते. आज ठाण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात तरुणांना आणि भावी पिढीला चुकीच्या दिशेला नेणारी अनेक व्यसन देखील फोफावत आहेत. ठाण्याच्या उच्चभ्रू वस्तीत तर ड्रग्स सारख्या नशेच्या आहारी जाणारी युवापिढी कधी कधी तर जस्ट फन या नावाखाली या नशेच्या आहारी जातात आणि सुरु होते त्या कुटुंबाची वाताहात.नुसती नशा नाही तर त्या नशेसाठी घरातून सुरु होणाऱ्या छोट्या चोऱ्या आणि हळूहळू त्या नशेच्या अमलाखाली स्वभावात भिनणारी गुन्हेगारी या मुलांना एका विध्वंसक मार्गावर नेऊन ठेवते. अशा वेळेला आपण पोलीस आणि प्रशासनावर टीका करून मोकळे होतो. कुठेतरी आपली चूक असते, दुर्लक्ष असते, आपल्या मुलांबरोबर घडणार संवाद हा अपुरा असतो म्हणूनच इथे आपल्यातच जागरूकता निर्माण करणे गरजेचे होते. ही रॅली पोलीस आणि गुन्हेगार याच्याविरुद्ध नसून आपल्या स्वतःच्या जागृकतेविषयीची होती - सम्जम्हणून आपण या क्षाराचे काही देणे लागतो ही जाणीव निर्माण करणारी  होती.

आणि अशा एखाद्या हाकेला प्रतिसाद देणारी शेकडो माणसे पहिली की आपण योग्य विषयाला हात घातला आहे याचे समाधान होते. ही रॅली संपूर्णपणे वेक अप ठाणे फाउंडेशनच्या माध्यमातूनच आयोजित केली होती आणि कोणत्याही राजकीय सहभाग आणि हस्तक्षेपही नव्हता. असे असूनसुद्धा आपली राजकीय पदे बाजूला ठेऊन नगरसेवक मित्र सुहास देसाई, नगरसेविका परीषा सरनाईक,नगरसेविका सौ. आमरे, शिवसेना युवा नेते श्री केदार दिघे सहभागी झाले. याबरोबरच शौर्य फाउंडेशन, हालाई लोहाणा फाउंडेशन ट्रस्ट, इम्पॅक्ट प्रिंटर्स असोसिएशन, सीकेपी चेम्बर ऑफ कॉमर्स,  अभिनय कट्टाचे सर्वेसर्वा श्री किरण नाकती, ठाणे एन्फिल्ड क्लब आणि ऑल इंडिया विंटेज ग्रुप चे अनेक सदस्य बायकर्स, प्रिय मित्र श्री अमोल मथुरे, अम्बर जोशी, श्रीलाल माधवन, निलेश धवन यांच्यासारखे शेकडो मित्र या रॅलीत सहभागी झाले. श्री कमलेश सतीश प्रधान यांच्या ज्ञानसाधना महाविद्यालयातून जवळपास ३० मोटारसायकलस्वार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन या उपक्रमास साथ दिली. जितो या सेवाभावी संस्थेचे पियुष शहा आणि त्यांच्या सहकार्यांनी सुद्धा शेवटपर्यत साथ देत रॅलीचे व्यवस्थापनास मदत केली.  अनेक तरुणी सुद्धा मोठ्या हिरहिरीने त्यांच्या स्कुटी घेऊन या रॅलीत सहभागी झालेल्या पहिल्या. या रॅलीसाठी पोलीस प्रशासनाने संपूर्ण सहकार्य दिले. ट्रॅफिक उपायुक्त श्री अमित काळे साहेबांपासून सुरूझालेले सहकार्य ठाणे शहराच्या प्रत्येक पोलीस स्टेशनकडून मिळाले.  यात माझे मित्र व पोलीस अधिकारी श्री स्वप्नील प्रधान यांचा उल्लेख करणे गरजेचे आहे कारण नुसतीच परवानगी साठी मदत नाही तर प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होऊन या विषयावर त्यांचा अनुभव कथन करून त्यांनी उपस्थितांचे मने जिंकली.
रॅली समाप्तीनंतर एक मोठ्या फलकावर सर्व बायकर्स नी आपली स्वाक्षरी करून *से नो टू ड्रग्स* या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली.

वेक अप ठाणे फाउंडेशन तर्फे या रॅलीच्या आयोजनात फाउंडेशन च्या अनेक सदस्यांनी आणि मित्रांनी मोलाची मदत केली. यात चेतन चिटणीस,केतन ठक्कर, अमोघ मथुरे, दिलीप सत्रा, बिसलेरी चे विभागीय विक्री व्यवस्थापक राहुल लिखिते,  मुबीन खान, कौशिक प्रधान, सलील होशिंग, निलेश गुप्ते, विनीत ठक्कर, रेडिओ सिटी चे अभिजित मोकाशी, सुबोध वैद्य, शशांक गडकरी, अस्मिता वढावकर, योगिनी चौबळ, विनय चौबळ, स्नेहा भोपटकर आणि महेंद्र वाघमारे या सर्वांचा मोलाचा वाटा होता. वेक अप ठाणे फाउंडेशन तर्फे एका संवेदनशील विषयावर आयोजित या रॅलीला आणि या फाउंडेशनच्या पहिल्याच उपक्रमाला मिळालेला भव्य प्रतिसाद बघून ठाणेकर नक्कीच जागरूक होतील अशी आशा आहे. भविष्यात नागरिकांचा सहभाग असलेले आणि शहराच्या प्रश्नांवर तोडगा शोधणारे अनेक कार्यक्रम करताना ठाण्यातील सुजाण नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे नम्र आवाहन देखील आम्ही करत आहोत. अधिक माहितीसाठी वेक अप ठाणे फेसबुक ग्रुप वर जॉईन व्हा आणि आमचे पेज https://www.facebook.com/Wake-Up-Thane-485941875226291/?modal=admin_todo_tour नक्कीच लाईक करा.

Thursday, 6 December 2018

सीकेपी बँक बचाव - गरज सीकेपी समाजाने मैदानात उतरण्याची.



गेली ४ वर्षे सीकेपी बँक पुन्हा सुरु करण्यासाठी बँकेचे संचालक श्री राजेंद्र फणसे यांची लढत आपणापैकी अनेकांच्या कानावर आली असेलच. जुन्या संचालक मंडळातील काही भ्रष्ट सदस्यांनी या बँकेला अक्षरशः ओरबाडलंय. त्यांचे पराक्रम पाहिलेत तर 'बँकेला लुटण्याचे शास्त्र' त्यांना किती अवगत आहे याची आपल्याला कल्पना येते. परतफेडीची सुतराम शक्यता नसलेल्या लोकांच्या नावे दिलेली भरमसाठ थकलेली कर्ज  आणि त्यांचे तितकेच फसवे जामीनदार यांच्या सुरस कथा फणसे यांच्या तोंडूनच ऐकाव्यात. अतिशय निगरगट्ट आणि राजकीय लागेबांधे असलेले ही मंडळी अनेक नोटिसा बजावूनसुद्धा जेव्हा दाद देईनात तेव्हा पोलिसांत तक्रार करून त्यांना वठणीवर आणण्याखेरीज काही पर्याय नाही हे फणसे यांनी जाणले आणि अक्षरशः भल्याभल्यानां वठणीवर आणले.

तसं पाहता राजेंद्र फणसे यांचे सीकेपी बँकेत कोणतेही फिक्स डिपॉजिट नाही किंवा त्यांनी कोणतेही कर्जदेखील घेतले नाही. परंतु जेव्हा आयुष्याची सर्व पुंजी बँकेत ठेवून आज अक्षरशः रडकुंडीला आलेल्या  हजारो हतबल जेष्ठ नागरिकांना बँकेचे दार ठोठावताना पहिले तेव्हा मात्र न राहवून फणसे यांनी या लढ्यात उडी घेतली. जवळपास २०० कोटींच्यावर असलेली थकीत कर्जे वसूल करण्यासाठी त्यांनी, सद्य संचालक मंडळाने आणि कर्मचारी वर्गाने जीवाचे रान केले आणि जी कधीच बंद होणार होती त्या बँकेला रिजर्व बँकेकडून आजवर जीवदान मिळवत आणले. सीकेपी बँक आजही सुरूआहे ती केवळ फणसे आणि त्यांच्या धडाडीच्या सहकाऱ्यांच्या  प्रयत्नांमुळेच. सीकेपी बँक डिपॉजिटर्स फोरम सुरु करून त्यांनी हजारो ठेवीदारांच्या मनात एक आशा पल्लवित केली आहे आहे ते सर्व ठेवीदार विशेष करून जेष्ठ नागरिक त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने लक्ष ठेऊन आहेत.

सीकेपी बँक बंद होणे म्हणजे नुसतीच एखादी वित्तसंस्था बंद होणे नाही तर आपल्या सीकेपी समाजाच्या नावाला कायमचा कलंक लागेल हे मनात ठेऊन राजेंद्र फणसे यांनी आता सीकेपी समाजाकडे मदतीची साद घातली आहे. आज सीकेपी बँकेच्या संचालक मंडळात श्री राजेंद्र फणसे हे एकमात्र सीकेपी  संचालक आहेत आणि त्यांच्या मदतीला चार्टर्ड अकाउंटंट श्री सागर जयवंत हे तज्न्य  संचालक म्हणून कारभार पाहत आहेत. आज बँकेला वाचवण्यासाठी प्रत्येक  सीकेपी समाजबांधवाने  शेअर्स घेऊन या लढ्यात सहभागी होणे ही केवळ गरजच नाही तर प्रत्येक सीकेपी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कदाचित आपल्याला डिव्हिडंड मिळण्यास काही अवधी जरूर लागेल परंतु यानिमित्ताने सीकेपी समाजाचा जास्तीत जास्त सहभाग हा भविष्यात या बँकेला तारक ठरेल आणि सीकेपी या नावाची प्रतिष्ठा उंचावण्यास मदतच करेल.

रुपये एक हजार किंवा त्या पटीत शेअर्स घेऊन आपण आपला सहभाग आणि अर्थातच भविष्यात मतदानाचा हक्क प्राप्त करू शकता. चला एकत्र येऊन आपल्या बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ... सीकेपी म्हणजे निष्ठा - सीकेपी म्हणजे विश्वास हे पुन्हा एकदा सिद्ध करू.

समीर जयंत गुप्ते
विश्वस्त - सिकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट, ठाणे.
अध्यक्ष - सीकेपी चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ठाणे - मुंबई -पुणे
अध्यक्ष - सीकेपी बिजनेस डेव्हलपमेंट फोरम, ठाणे.
अध्यक्ष - इम्पॅक्ट प्रिंटर्स असोसिएशन ठाणे
उपाध्यक्ष - सौ. मंगला कर्णिक एज्युकेशन सोसायटी, पुणे.
संस्थापक - द सीकेपी फूड फेस्ट.
संस्थापक - द स्पेशल वुमन एक्स्पो.
संस्थापक - वेकअप ठाणे फाउंडेशन
फोन - ९८२०४९२९०५
ई-मेल - sameer6949@gmail.com
कार्यालय -
रामकृष्ण अपार्टमेंट्स,
सीकेपी हॉल समोर,
खारकर आळी, ठाणे (प) ४००६०१.

Sunday, 28 October 2018

कानवले पुराण !


सीकेपी सुगरणीच्या पाककौशल्याचे आणि खाद्यसंस्कृतीचे वर्णन एकही शब्द न उच्चारता करण्यासाठी जो एकच पदार्थ पुरेसा आहे तो म्हणजे कानवला. तो नाजूकपणा, तो आकार, ती रंगसंगती, ती लयबद्ध मांडणी आणि ज्या साठीच दिवाळी याविषयी जास्त प्रेम वाटते तो मोहक पदार्थ म्हणजेच आपले कानवले - सीकेप्यांचे खाजाचे कानवले.
चकली, चिवडा, बेसन लाडू, रवा लाडू, अनारसे, शंकरपाळे, शेव, कडबोळ्या अशा एकसोएक पदार्थांनी नटलेल्या तरीही रंगाच्या उधळणीची कमी असल्यासारखे वाटणाऱ्या फराळाच्या ताटाचे रूप एका क्षणात पालटण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती सीकेप्यांच्या कानवल्यात. मी आत्ताच 'फराळाचे ताट' म्हणून जो उल्लेख केला ती प्रथा काहींनी जपली असली तरी आता जवळपास संपली. पण अगदी काही वर्षांपूर्वी आमच्या वाडा - आळी संस्कृतीमध्ये दिवाळीत आजूबाजूच्या घरातून फराळाचे ताट आपल्या घरात यायचे आणि आपलेही त्यांच्याकडे जायचे. आलेल्या ताटाकडे ( कधी मिळेल ते ) बघण्याची एक पद्धत असायची. म्हणजे एकतर ज्यानी ते ताट आपल्या घरात आणले ती जाईपर्यन्त त्या ताटावरचे गोलाकार विणकाम केलेले कापड न काढण्याची आणि टक लावून त्या ताटाकडे न बघण्याची ताकीद आधीच दिलेली असायची. 'उगीच हावरटासारखा बघू आणि वागू नकोस हे वाक्य' साधारणपणे आईच्या डोळ्यातूनच ऐकायला यायचे. त्यामुळे ताट घेऊन आलेल्या त्या काकीशी - मावशीशी आपली आई उगीच काहीतरी बोलत बसून आपला फराळाचा वेळ फुकट घालवू नये असे मनोमन वाटायचे - पण शेजारणीच त्या, बोलतच बसायच्या. आमची चकली कशी नरम पडत होती, वाण्याकडून आणलेले पोहे कसे आकसले, रेशनची साखर किती बारीक, वाण्याची साखर किती महाग, तुझ्याकडे रांगोळीचं पुस्तक आणि ठिपक्यांचा कागद आहे का? झाला का साहेबांचा बोनस - मग पाडव्याला पटोला कि कांजीवरम इतक्या नको नको त्या गप्पा करत बसायच्या. मधेच उगीचच माझ्याकडे बघून 'फटाके आणलेस का रे ?' असं बोलायच्या. 'अग बाई, मला जे हवंय ते तू घेऊन आली आहेस ना - मग ठेव ते आणि निघ' हे तोंडावर आलेलं वाक्य हजारदा गिळलंय मी. खरं सांगतो, कधी कधी तर त्या बायकांबरोबर येणारं त्यांचं लहान मूल तर हातात चकली घेऊनच खात खातच यायचं.. पण शिस्तीचे नियम मात्र आपल्यालाच लागू. मात्र एकदा का ती काकी घरातुन गेली रे गेली कि त्या ताटातल्या ठराविक जिनसांचा फडशा पडला म्हणून समजा. त्यात अग्रक्रमाने कानवले, मागोमाग अनारसा, मग एखादी चकली वगैरे वगैरे. कानवले करणाऱ्या, म्हणजे कानवले सुबकतेने करणाऱ्या बायकांचा खूप बोलबाला असायचा, आजही आहे. तेव्हा वाड्याच्या ओसरीवर - ओटीवर बसलेल्या गप्पांमध्ये असायचा आता फेसबुकच्या ग्रुपवरती असतो इतकाच काय तो फरक. माझी मुलुंडची सुमन काकी जे काही कानवले बनवायची त्याला आजही तोड नाही. आमच्याकडे माझी आई नोकरी करत असल्यामुळे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी फराळ बनवण्याचा धडाका असायचा पण कानवले बनलेले मात्र फारसे आठवत नाहीत .. कदाचित न मिळालेल्या पदार्थाचं जास्त कौतुक असतं तसं काहीतरी माझ असावं. आज जसा दिवाळीचा फराळ सर्रासपणे विकत मिळतो ती सोय तेव्हा नव्हती, कदाचीत असल्यास आमच्या पर्यंत पोचणारी किंवा झेपणारीही नव्हती. दिवाळीत फराळाची देवाण घेवाण करताना आलेल्या काही पाकिटात चिवड्याबरोबर कानवला ठेवलेला दिसला कि मात्र राग यायचा.. एकतर त्याचे सगळे पापुद्रे तुटून सगळे सौन्दर्य गेलेला नुसता पंधरा कपडा गुंडाळल्यासारखा तो केविलवाणा कानवला चिवड्यात दडलेला दिसायचा त्यामळे त्याची मजा नाही आणि कानवल्याचा चुरा होऊन तो चिवड्यात मिसळलेला म्हणून त्या तिखट चिवड्याचीही वाट लागलेली असायची. कोण खाणार ते.
पण एकूणच कानवले बनवणे ही एक अनन्यसाधारण कला आहे आणि ती अगदी काहींनाच आत्मसात आहे. नेहेमीचे कानवले, चटईचे कानवले अशा वेगवेगळ्या प्रकारात मोडणाऱ्या त्या कानोल्याचा प्रवास छानशा तयारीने सुरु होतो, त्यातल्या एक एक पदार्थाची खरेदी आणि तयारी इतकी मनापासून होते की काय सांगा. 'या रविवारी आमच्या कडे कानवले' हे वाक्य दिवाळीसणाच्या तयारीची नांदी देणारं असतं. परवा एका कार्यक्रमात, म्हणजे कानवल्याचे प्रात्यक्षिक सुरु होते त्या कार्यक्रमात मी तिथे उपस्थित महिलांशी संवाद साधला तेव्हा त्यांना पाककृती आणि पाककला यांच्यातला फरक सांगितला. सर्व पदार्थ त्या त्या प्रमाणात घेऊन, ठरलेल्या पद्धतीने शिजवून, त्यानंतर त्यावर इतर सोपस्कार करत ठरल्या वेळेत बनवून सादर करणे म्हणजे 'पाककृती'. आणि ही 'पाककृती' करताना तो पदार्थ बनवणार म्हणून मनात निर्माण झालेला आनंद, नंतर त्या पदार्थांची हाताळणी, ती नजाकत, ती शैली, ते लालित्य, तो कमालीचा आत्मविश्वास, तो चेहेऱ्यावरचा प्रसन्न भाव आणि शेवटी त्याची सुंदर व मोहक मांडणी याला म्हणतात 'पाककला'. कानवले बनताना या पाककृतीचा आणि पाककलेचा कस लागतो आणि मग समोर येतो तो तुमच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवणारा खाजाचा -पिठीचा कानवला. बऱ्याचदा एखाद्या खाद्य पदार्थाने एखादा समाज ओळखला जातो. पण सीकेपी घरातल्या अनेक पदार्थानी आणि संपन्न खाद्यसंस्कृतीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यातच गप्पा गप्पांमध्ये कधीतरी कोणा रसिक खव्य्यांकडून 'अरे तुमचे सीकेप्यांचे कानवले फार सुंदर रे' असे शब्द कानावर आले का आपणसुद्धा आनंदाने मनोमन अगदी खुलून जातो - फुलून जातो ... त्या नाजूक रंगीत कानावल्यांच्याच पापुद्रयांसारखे.
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
फोटो सौजन्य - मरूधन स्टोर्स

Sunday, 9 September 2018

फिटनेसप्रेमी खवय्यांना दिलासा - शेफ यशोधन चे "कॅफे सोलासा"










काही लोकांची बिजनेस करण्याची पद्धत वेगळीच असते. म्हणजे काहीजण आधी सॅम्पल देऊन ता काही फक्त डेमो देऊन आपापली उत्पादने विकतात. पण जगात अशी काही हुशार माणसेआहेत जी तुम्हाला पूर्णपणे एखाद्या वस्तूच्याआहारी घालवतात आणि मग त्यातून मुक्त कसं व्हायचे याचे शिक्षण देतात अर्थात त्यासाठी त्याच्याकडे पुन्हा आहारी जाण्यासारख्या वस्तू असतातच.  कसं आहे ना, की एखाद्याला घरी बोलावून चिकन गलोटी कवाब,  पिकनिकला गेल्यावर रान मसाला, तंदूर मुर्ग, सीकेपी  फूड फेस्ट मध्ये  कोलंबी बाकरवडी,  क्रॅब बटर गार्लिक, चिंबोरी काढा वगरे खायला घालून वेडं करायचं आणि एखाद्याने  पुन्हा कधी त्या जिनसा मागितल्या तर आपल्या नवीन धंद्याचं कार्ड द्यायचं - गिल्ट फ्री इंडलजन्स वगैरे - काय अर्थ आहे हो याला. हे सर्व मी बोलतोय एका नावारूपाला आलेल्या शेफ बद्दल आणि अतिशय जबाबदारीने बोलतोय. शेवटी जाहीर आरोप करतोय मी याच्यावर. होय, मी बोलतोय सीकेपी फूड फेस्ट मधून कमालीचा लोकप्रिय झालेला आणि आता  स्टार प्रवाह च्या सुगरण या कार्यक्रमातील शेफ यशोधन देशमुख बद्दल.  एक तर जन्माने सीकेपी, त्यात खवय्येधर्मात हौशी, त्यात स्वतः शेफ आणि भरीस घालायला खादाड मित्रांचा गोतावळा असं  सर्व असल्यावर मित्रांच्या जिभेच्या मागण्या पुरवणारे शेकडो पदार्थ तसेही बनत असत. पण अचानक एक दिवस समोर येऊन, "समीरभाऊ आता आपण तुमच्या फिटनेस साठी ( माझ्या पोटाकडे बघत ) एक नवीन कॉन्सेप्ट आणतोय ..  हे माझं निमंत्रण - सोलासा कॅफे, विलेपार्ले ....भाऊ नक्की या बरंका. तुम्हाला आवडेल. एक्दम ते फॅट फ्री, हाय प्रोटीन, शुगर फ्री पदार्थांची रेलचेल असलेला असा आपला मेनू आहे. या नक्की !  येताय ना ?"  मला खरं तर हे सगळं ऐकवत नव्हतं. आपल्या जिभेचे मनसोक्त चोचले पुरवणारा माणूस, 'कठोर' पणे आपल्या पोटाकडे बघून बोलत होता. काही सुचत नव्हतं - चमचमीत चंगळीच्या असंख्य अनुभवांच्या अविस्मरणीय आठवणींचे जग  इथेच संपल्याची भावना स्पर्शून जात  होती - स्वतःला सावरलं - मनाला आवरलं आणि निमंत्रणानुसार पार्ला गाठलं.

प्रथम उदघाटनाला, त्यानंतर तिथेच आयोजित सीकेपी चेम्बर्स च्या मीटिंग करता आणि नंतर एका मित्राबरोबर असे आजवर तीनदा मी सोलासा कॅफे ला भेट दिली आहे. तीनही वेळा वेगवेगळ्या प्रयोगातून निर्माण केलेल्या काही अद्भुत पदार्थांचा आस्वाद मी घेतला.  रसगुल्ला, कलाकंद, गुलाबजाम  वगैरे देऊन माझं स्वागत झालं. गोड पण शुगरलेस बरं का. अहो  मिठाईत साखरच नाही टाकत हा माणूस तर गोडवा  कुठून येतो हे समजायला मार्ग नव्हता. अर्थात त्याच ते ट्रेड सिक्रेट असल्यामुळे मीसुद्धा फार विचारलं नाही.   प्रत्येक पदार्थ खाताना "सांग बरं काय आहे यात?" या प्रश्नच उत्तर मी हमखास चुकीचे दिलं. काहीच कळत नव्हतं. असो. सोलासा कॅफे हे प्रबोधनकार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विलेपार्ले च्या आवारात असल्यामुळे तिथे फिटनेस गुरु आणि अनेक खेळाडूंचा वावर असतो.  सर्वसाधारणपणे एखाद्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या कॅंटीनमध्ये बटाटा वडा, मिसळ, कांदा भजी अशा 'माझ्यामते पौष्टिक आहाराचा' अंतर्भाव असतो पण उत्तम शरीरयष्टीसाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी पडू नये म्हणून अनेक पौष्टिक आणि तितक्याच चविष्ट पदार्थाच्या मेनू ची आखणी शेफ यशोधन याने केली आहे.

पण सध्या सोलासां प्रसिद्धीस येतंय ते तिथे मिळणाऱ्या अनोख्या मिठाईच्या नावीन्यपूर्ण  प्रयोगासाठी.  साधारणपणे मिठाई म्हटलं की डोळ्या समोर साखर आणि त्याचे होणारे दुष्परिणाम झटकन समोर येतात. डायबेटीस वगैरे आसपास नसलं तरी माझ्यासारखे उगीचच घाबरून या गोडधोड मामल्यापासून थोडंसं अंतर ठेऊनच राहतात.  पण आता इथे तर गुलाबजाम पासून रसमलाई पर्यंत आणि कलाकंद पासून जिलेबी पर्यंत सगळेच भारतीय मिष्टान्न आता सुगरफ्री पण पूर्णपणे नैसर्गिक रित्या नैसर्गिक स्वीट चा वापर करून तयार केलेली आहेत.  तसेच प्रत्येकाच्या आहारातील एक मुख्य घटक म्हणजेच प्रोटीन. प्रोटिन्स चा समावेश या मिठाई मध्ये केलेला असल्याने पूर्णपणे एक आहार म्हणून या मिठाई कडे बघता येते. याबाबत यशोधन कडून थोडी माहिती घेतली तर कळलं की साधारणपणे एका गुलाबजाम मध्ये १७० पर्यंत कॅलरीज असतात पण सोल्लासा गुलाबजाम मध्ये फक्त ५० कॅलरीज असून प्रोटीन चे प्रमाण ही दुप्पट आहे ते सुद्धा जराही चवीचा फरक न येता...तसेच कलाकंद आणि रसमलाई १०० ग्रॅम कलाकंद मध्ये १४ ग्रॅम प्रोटीन आणि फक्त २११ कॅलरीज.  म्हणजे आता व्यायाम करणाऱ्यांनी आणि डायट करणाऱ्यांनी वजन कमी करण्यासाठी खुशाल याचा वापर करता येईल हे तर नक्कीच...म्हणूनच इथे 'डेझर्ट डाएट' सुद्धा उपलब्ध आहे.  डेझर्ट डाएट ???? काय चाललंय या जगात ... कोणी विश्वास तरी ठेवला असतात का की दहा दिवस मिठाई खाऊन आपलं वजन ३ किलोने कमी होऊ शकतं  म्हणून. ''दादा  तुम्ही करता का डेझर्ट डाएट ?"  या यशोधनच्या प्रश्नाला ठाम नकार देत माझ्यासाठी एक्झॉटिक व्हेज पिझ्झा आणि एक जंगली सॅन्डविच मागवले. नॉन वेज नाही तर नाही पण घास तरी घेतल्यासारखा वाटलं पाहिजे ना  म्हणून मिळणार नाही हे माहित असूनसुद्धा थोडं तिखट कर रे बाबा अशी विनंती केली. एकूण काय तर शेफ यशोधनने सुरु केलेला हा कॅफे म्हणजे गोडघाश्यांसाठी एक पर्वणीच असावी. यशोधन ज्या साठी प्रसिद्ध आहे ते पाहता आमचं मन थोडं खट्टू झालं पण सीकेपी फूड फेस्ट लवकरचं येतच आहेत तिथे आडव्या हाताने सगळ्याचा समाचार घेऊ असे मनात आणून मिळाले ते गोड़ मानले आणि सोल्लासा च्या दर्जेदार पदार्थांचं आस्वाद घेतला. सध्या लोकसत्ता, मिड डे  या सर्व वृत्तपत्रांमध्ये या देशमुख साहेबांच्या मुलाखती आणि लेख सुरु आहेत ते पाहून अभिमान वाटतो. खरंच सांगतो मंडळी हे सोल्लासाचं जगच थोडं वेगळं आहे आणि महत्वाचं म्हणजे हे कॅलरी कॉन्शस मंडळींसाठी तर वरदान आहे.

सोल्लासा चे इंटिरियर डिझायनिंग देवांगीं  लाड या तरुण आणि हुन्नरी डेकोरेटर ने अतिशय सुंदर रित्या केलं आहे. सोल्लासाच्या या प्रवासात मिठाईच्या दुकानाला साजेसा एक हसरा आणि तुकतुकीत चेहेरा म्हणजे निखिल मथुरे आपल्या शेफ च्या मदतीला उभा आहे. धावण्याच्या मैदानावर आपल्या क्रीडा कौशल्याने मोठाले पुरस्कार जिंकणाऱ्या याच्या पत्नीच्या, म्हणजेच शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या अमृता च्या प्रवासासारखाच सोल्लासा या त्याच्या कॅफेचा वेग वाढत राहो हीच  शेफ यशोधनला शुभेच्छा देता देता कलाकंद चा एक मोठ्ठाला पीस तोंडात कोंबला आणि नेहेमीच्या मसालेदार जगात परत आलो !

समीर गुप्ते

Tuesday, 21 August 2018

Tasting Big @ BIG M's Pune.








Categorizing myself as a lover of authentic Indian or rather authentic CKP food came to halt when I choose to visit one of the newly opened restaurant  for a business meeting at Pune. I come from a typical Marathi household where we love cozy environments and good food, usually Indian. A place meant for the Yo crowd was something I never tried, which came out to be one of the best joints.   Aundh can be said as the rising zone for happening food joints and this restaurant is also one of the fast popularity-gaining  joints undoubtedly for its wide menu and some varied flavors ... Big M's is the place I am talking about. 

I remember renowned hotelier Vithhal Kamath Sir's statement for what 3 factors responsible to make the restaurant more successful are - its Location, Location and Location. Well, perfectly located in the business zone of this happening city, the Big M's is a neatly decorated and impressively designed restaurant that makes you bit more comfortable at its Menu. I didn't try much of it but  having some good suggestions by the real big owner of Big M's himself I choose to order some Meat loaded nachos,Tandoori chicken pizza and to pamper my curiosity added Crispy chicken burger. Wohhhmygodddd type expression emerged effortlessly when the nachos landed on the table. Don't know if the shades of yellow or the combination of colors add to the wow factor of the dish. The Tandoori Chicken Pizza was lavishly prepared in a thin crust base with  tandoori masala and mayo mixed mozzarella cheese  giving a Bhook Bhagaao feeling was much above of what i was looking for.  Finally came the lip smacking crispy chicken burger that made my lunch complete. 

This young guy from a food loving CKP Family, Mihir Deshmukh, an IHM Mumbai graduate,  choose to be an entrepreneur have nicely designed the menu with all his experience. The walls, the stairs, the sitting is so well designed to give a soothing experience once you are in. Big M's, I believe are here with some Big plans for Pune and soon bee seen in some more happening areas of this cultural capital. For those who wish to give it a try, well, its worth it. 

The Big M's
Shop no A8 chaitraban residency 
Hotel sarja lane
Opposite aundh croma
Pune 411007
9881331115

Sameer Gupte
#Samhere #sameergupte.blogspot.com 
#foodie #foodlover #pune 

Saturday, 18 August 2018

राजेशाही खवय्येगिरीची रॉयल मजा - बिंदास बेगम रॉकीन राजा !




एखाद्या ऐतिहासिक वास्तूला विशेष करून एखाद्या राजवाड्याला भेट दिल्यावर तिथल्या अनेक गोष्टी पाहताना आपण हरखून जातो. त्यांचे महाल, त्यांचे दिवाणखाने, त्यांचे शयनगृह, त्यांचे स्नानगृह  आणि जमल्यास त्यांचे पाकगृह पाहताना 'काय नं मजा या  महालात राहणाऱ्या राजाराणीची'' असं नकळत पुटपुटतो. बरोबरच्या गाईड मुळे ते कसे राहिले असतील याची तर आपल्याला कल्पना येते परंतु त्या राजघराण्यातील खाद्यपरंपरेची विशेष माहिती देणारा सहसा कोणी नसतो, प्रसंगी मागायलाही आपण विसरतो.

शेकडो राजघराण्यांनी समृद्ध असलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यात असणारी अनेक राजघराणी आपल्या प्रतिष्ठेला जपणाऱ्या मानमर्तबाबरोबरच एका राजेशाही खाद्य परंपरेला जपत आली आणि त्यातून जन्माला आली एक उंची, एक संपन्न, एक तंत्रशुद्ध, अनोखी खाद्यशैली... राजा महाराजांची राजेशाही खाद्यसंस्कृती.  प्रामाणिक पणे सांगा बरं, नव्हता ना कधी विचार केला तुम्ही या राजेशाही खवय्येगिरीचा. खरं सांगू, मी पण नव्हता केला. पण मुलुंड च्या रुणवाल ग्रीन्स येथील आर गॅलेरीया येथे नुकत्याच उघडलेल्या 'बिंदास बेगम रॉकींन राजा' या नावाला साजेश्या झगमगत्या, भव्यदिव्य आणि राजेशाही वैभवाच्या खाद्ययात्रेचा महिमा सांगणाऱ्या या रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर मला एका वेगळ्याच अनुभवाची प्रचिती आली.  रेस्टोरेंट मध्ये पाय ठेवताना अतिभव्य राजवाड्यातील एका अफाट दालनात शिरल्याची खात्री पटते आणि मेनू कार्ड पाहताना वेटर नव्हे तर एखादा खानसामा तुम्हाला काहीतरी सुचवायला उभा आहे असच काहीसं वाटतं. सांगा बरं काय काय मागवाल तुम्ही जेवायला? अहो मंडळी, भारतभर प्रवास करून, इतिहासकाराच्या मदतीने, प्रत्येक राजघराण्यातील व्यक्तीशी संवाद  साधत, त्यांच्या पाककलेच्या अनेक रहस्यांना जाणून घेत त्याच्या पाकखान्यातील खानसाम्यांच्या तोंडून ऐकलेल्या जवळपास दोन हजार राजेशाही पदार्थांच्या यादीतील निवडक अशा दोनशे पन्नास पदार्थांची रेलचेल असलेला हा लाजबाब मेनू तुम्हाला काही वेळ खिळवून ठेवतो.

तुम्ही शाकाहारी असाल तर इथल्या टोमॅटो सार ने सुरुवात करा पण जर मांसाहारी असाल तर मात्र हलकंसं तिखट पाया सूप मागवलंच पाहिजे. बडोद्याच्या  संस्थानिकांच्या रसोड्यामधली 'पात्रानी कोंबडी' म्हणजेच आपल्या अळुवडीत भरलेली लुसलुशीत कोंबडी, काश्मीरी शाही आनंदाची झलक देणारा 'कबर्गा' म्हणजेच दुधात शिजवलेला आणि मग बेसनाच्या आवरणात तळलेला मटण चॉप, अस्सल मराठमोळ्या राजघराण्याचे 'सावंतवाडी चिकन सुख्खा' असे अनेकविध पदार्थ तुम्हाला राजदरबारी साकारलेल्या एका भव्य मेजवानीची ओळख करून द्यायला सुरुवात करतात.  गुजराथेतील 'गिरनारी खिचडी' पासून ते ओडिशा मधील खांदपरा संस्थानाच्या स्वयंपाक घरातील मातीच्या भांड्यात शिजवलेली 'झिंगा खांदपारा', मुर्शिदाबादच्या निजामाच्या बावर्चीखान्यातील बिर्याणीपासून अवध च्या निजामाकडचे डोरा कवाब, राजपिपला संस्थानाच्या भटारखान्यातील 'राजपिपला चिकन करी' पासून आपल्या कोल्हापूरच्या राज घराण्यातील 'मटणाचे झणझणीत लोणचे' अशा शेकडो शाही पाहुणचार करणाऱ्या पदार्थामधून आपले ताट सजवणे म्हणजे दिव्यच. 'मटण रेल्वे करी'  ही  नावामुळे लक्ष वेधणारी डिश म्हणजे  राजे महाराजांना प्रवासादरम्यान देण्यात येणारे चमचमीत रस्सावाले मटण. एकूणच माझा कल थोडा, म्हणजे थोडा जास्तच, हा मांसाहाराकडे असल्याने, शुद्ध शाकाहारी असलेल्या माझ्या बायकोच्या समोरील तंदुरी कुंभ, डाल कबिला, पिंडी छोले, अफगाणी नान हे पदार्थ तिच्या आग्रहास्तव थोडेफार  चाखले-  मग ते आवडले - पण आपला मांसाहारी धर्म संकटात येऊ नये म्हणून परत या सर्व दरबारी नॉन व्हेज पदार्थावर मन केंद्रीत  केले आणि एका राजेशाही थाटामाटाचा अनुभव घेत हा महा राजभोजनोत्सव आटोपता घेतला.

गोडाचं आणि माझं फार काही देणंघेणं नाही, पण या रेस्टोरंन्टचा एक्झिक्युटिव्ह शेफ निलेश लिमये याने एक खीर समोर ठेवली. अगदी त्याचा मान राखण्यासाठी चाखलेली ही खीर म्हणजे काहीतरी भन्नाट प्रकार होता. 'नको,नको,अजिबात नको पासून आईशप्पथ काय सॉलिड रे' कडे गेलेल्या माझ्या चेहेऱ्यावरच्या एक्स्प्रेशन कडे बघणारी मंडळी आता मला या खिरीचे नाव सांगून गारद करतील असे वाटतही नसताना 'कशी काय वाटली आमची लसूणी खीर' हा सवाल करत होती. खिरीत लसूण ? होय, कारण त्याकाळच्या राण्या किंवा बेगम या  कदाचित उग्र वासामुळे लसूणच्या सेवन करण्यास नकार देत, पण औषधी गुणधम असलेला लसूण त्यांच्या पोटात जावा म्हणून राजवैद्याने खानसाम्याला हाताशी धरून केलेला हा गोड कारनामा असल्याचे समजले. ऐकावं ते नवलंच.

अनेक सीकेपी मंडळी आता रेस्टोरंट व्यवसायात येत आहेत आणि त्यात भर टाकणारं हे आलिशान रेस्टोरेंट आहे माझा मित्र प्रसाद गुप्ते याची पत्नी अनुजा गुप्ते हिचं आणि अनुभवी रेस्टोरेंट उद्योजक जितेंद्र सोनार या तिच्या भागीदाराचं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची तपशीलवार आणि अधिकृत माहिती घेऊन, भारताच्या कानाकोपऱ्यातील राजघराणी आणि संस्थानिकांकडून महत्प्रयासाने माहिती घेत, तुमच्यामाझ्यासारख्या पट्टीच्या खवय्यांना  एकाच छत्राखाली अनेक राजेशाही थाटाच्या खाद्यपरंपरेची थेट आणि रुचकर ओळख करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

भारताच्या इतिहासातील एका वैभवशाली काळाच्या राजेशाही परंपरेच्या खाद्यसंस्कृतीची साक्ष पटवणारे हे जबरदस्त रेस्टोरेंट 'बिन्दास बेगम - रॉकीन राजा'. आपल्या बेगम ला खुश करून राजासारख रॉकिंग आयुष्य घालवायचं असेल तर हे एकदा आवर्जून भेट देण्यासारखेच.

माझे रेटिंग ? - काय विचारताय .. या राजेमहाराजांना रेटिंग द्यायची काय बिशाद माझी. तुम्ही आणि तुमच्या बेगमलाच ठरवू दे ते सगळं.

Bindaas Begum Rockin Raja
G 42, R Galleria, Runwal Greens,
Mulund Goregaon Link Road,
Mulund West, Mumbai 80
Contact : +91 7711999920

- समीर गुप्ते 

Thursday, 26 July 2018

मी खुल्या वर्गाचा, मी खुल्या दिलाचा !

मी खुल्या वर्गाचा,
मी खुल्या दिलाचा,
याचना न रक्तात माझ्या,
समर्थ मी....दणकट मनगटाचा !

सीकेपी घरात, पर्यायाने एका सूशीक्षित, सुसंस्कारी, सुविचारी आणि खऱ्या अर्थाने पुरोगामी समाजात जन्माला आल्याचा मला यथार्थ अभिमान आहे. विषमता निर्माण करणारी जात पात वर्ण भेद न मानता माणुसकी हाच धर्म मानण्याची शिकवण घेत झालेल्या संस्कारांना अभिमानाने मिरवत स्वकर्तृत्वावर  ज्ञानप्राप्ती आणि धनप्राप्ती करून जीवन साजरे करणारे आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. अडचणी, अपेष्टा आणि अनेक संकटाना सामोरे जाण्याची शक्ती आणि मानसिकता नसानसांत भिनलेला हा सीकेपी समाज कोणत्याही जातीच्या निकषांवर कधीही झोळी पसरवणार नाही. स्वार्थासाठी कोणी काय मागावे आणि कसे जगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ते करताना सामाजिक नाती कलुषित करण्याचा डाव खेळणाऱ्यांना आणि समाजासमाजात दरी निर्माण करणाऱ्यांना माझ्या विचारांचे समाजबांधव  कदापि माफ करणार नाहीत. मी आधी मराठी आहे, नंतर सीकेपी आहे. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या प्रत्येक मराठी माणसाला, मग तो कोणत्याही जातीचा असो, स्वाभिमानाने जगण्यासाठी  मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत या मताचा मी आहे. ज्यादिवशी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज रस्त्यावर उतरेल त्या मोर्चात माझ्यासारखे हजारो सहभागी होतील.  जय महाराष्ट्र !
समीर गुप्ते, ठाणे.

Wednesday, 4 July 2018

बिअर प्रेमींचा नवा स्पॉट - बिअरबक कॅफे, ठाणे.





ए उद्या आपण ड्रिंक घेऊ बरंका अस म्हणून बिअर प्यायला जाणे आणि चल यार, छान ठिकाणी बसून दोन बिअर मारू या दोन्ही वाक्यात बिअर पिणे जरी असले तरी त्याचा मोड आणि मूड संपूर्णपणे वेगळा आहे. बीअर पिणे हे सर्वस्वी बाहेरच्या तापमानावर आणि आपल्या मनावर अवलंबून असतं. बिअरसाठी समोर समुद्र जरी नसला तरी एक छान माहोल लागतो, एखादा छान विषय लागतो, लाईकमाईंडेड मित्रांचा गोतावळा लागतो, त्यात एखादा बकराही लागतो आणि जिथे जाऊन बिअर प्यायची तो स्पॉटही तसाच लागतो. सहा मित्र या टेबलवर दाटीवाटीने, दोन पलीकडे अस नको ... जिवलगांचा गठ्ठा एकत्र बसला पाहिजे, अड्डा चांगला लागला पाहिजे.
सध्या ठाण्याचे स्मार्ट होण्यासाठी जे उत्खनन सुरु आहे ते पाहता कॅस्टल मिल नाका हा शक्यतो टाळावा असे जरी मी सुचवत असलो तरी तिथेच कदापि न टाळण्यासारखी एक जागा असेल तर ती म्हणजे माझ्या विचारांच्या बिअर प्रेमी मित्रांचा हक्काचा अड्डा ...'बिअरबक कॅफे'. जिथे फक्त बीअर आणि उत्कृष्ट वाईन सर्व्ह केली जाते असे हे रेस्टोरेंट फेमस आहे तिथे मिळणाऱ्या फ्लेवर्ड बिअर मुळे. बिअर मध्ये कसले आले फ्लेवर असा विचार कराल तर तर मित्रांनो तुम्ही नक्कीच काहीतरी मिस कराल. तुमच्या आवडत्या फ्लेवर्स मध्ये बिअर ब्लेंड करून तुमच्या समोर येताच एक नाविन्यपूर्ण पेय पिण्याचे कुतूहल तुमच्यात निर्माण होते. मला पण पहिल्यांदा हा काय कशाला नको तो प्रयोग करतोय असं झालं होतच पण कुतूहल नक्कीच होतं. बिअर बकचे मेनू कार्ड आपल्याला काही वेळ खिळवून ठेवते. त्याच्या कल्पक फोल्ड्स आणि मेनू डिझाईन मुळेच आपला पुढचा एक्सपीरिअन्स जबरदस्त होणार याची जाणीव होते. बसायला नेहेमीचे टेबलखुर्ची -सोफा व्यतिरिक्त मित्रांचा किंवा कुटुंबीयांचा मस्त अड्डा जमवण्यासाठी भारतीय बैठकीची सोय इथे उपलब्ध आहे. थोडंसं ट्रेंडी, थोडंसं ऑफ-बीट वॉल डेकोर तुम्हाला काही वेळ गुंतवून ठेवणारच....अर्थात टेबलवर दिलेली ऑर्डर येई पर्यंतच. नंतर तुम्ही निवडलेल्या फ्लेवरचा आस्वाद घेत तिथे मिळणाऱ्या अनोख्या व्यंजनांचा आस्वाद घ्यायचा...विषयांची कमी तर असल्या ठिकाणी कधीच नसते. रेग्युलर आणि फ्लेवर्ड बिअर बरोबरच, एक मोठ्या काचेच्या जार मध्ये अनेक फळांच्या फोडी आणि त्यावरच्या बर्फात ओतलेली रेड/ व्हाईट वाईन मधलं 'सांग्रिया' हे असाधारण वाईन कॉकटेल, याबरोबर इतरही मला माहित नसलेली (जी कालांतराने मला माहित होतीलच) अशी अनेक मॉकटेल्स असलेले हे कॅफे एक वेगळ्या अनुभवाची ओळख करून देते यात वाद नाही. बिअरबक 'कॅफे' हे नाव याने का ठेवले असावे हे मात्र मला अद्यापही कळले नाही. कदाचित बार मध्ये जाऊन पिऊन आल्याचा गिल्ट ग्राहकांना नको, घरी गेल्यावर 'कॅफे' मधून आलो असं ताठ मानेने सांगू शकतो या उदात्त भावनेतून हे नाव ठेवले असावे.
इथे उपलब्ध असलेल्या अनेक स्टार्टर्स मध्ये कॉर्न रॉक्स विथ चिमिचुरी सॉस ( हा शब्द मी तिथे बसून पाठ केलाय ), कॉम्बिनेशन चिकन, क्रॅकर जॅक चिकन, पेपर क्रस्टेड प्रॉन्स इन ऑयस्टर सॉस अशा भन्नाट पदार्थांच्या सानिध्यात तुमची पुढची बिअर कधी सर्व्ह झाली हे तुम्हाला कळतही नाही. खाण्याच्या अनेक पदार्थामध्ये तरुण वर्गाला आकर्षित करणाऱ्या वेगवेगळ्या पिझ्झा, पास्ता या पदार्थांची सुद्धा लयलूट आहे. पदार्थांचा दर्जा आणि सादरीकरण यावर विशेष लक्ष देत नाविन्यपूर्ण चवींचा शोध घेत खवय्यांना तृप्त करण्याचं काम बिअर बाक चा तरुण मालक अजिंक्य पालकर त्याच्या वडिलांच्या म्हणजेच मिलिंद पालकरांच्या मदतीने करत आहे. अजिंक्य कडे पाहून याने सर्व बिअर स्वतः टेस्ट केल्याचे तुम्हाला जाणवते. सीकेपी मालक असूनसुद्धा मेनूवरती एकही सीकेपी पदार्थ नसल्याने मी थोडा नाराज असलो तरी सीकेपी मंडळींच्या आवडीच्या पेयांवर विशेष लक्ष दिल्याने बिअर बक च्या पालकर पितापुत्रा विषयी मनात 'मोठ्ठा' आदर आहे. हा झाला गमतीचा भाग. पण आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांना एकदातरी या कॅफे मध्ये घेऊन जाऊन या अनोख्या कॉम्बिनेशन्स चा आस्वाद घ्यायला हरकत नाही. नक्की जा !
बिअर बक साठी माझे रेटिंग - ४.५ स्टार
Beerbuck Cafe
Shop No 1 & 2, Vikas Shopping Complex,
Meenatai Thakrey Chowk,
Castle mill naka, Thane West,
Phone 022 2574 3393

Tuesday, 3 July 2018

बेजबाबदार सत्ता - बेपर्वा जनता !


पुन्हा एकदा रेल्वेचा पूल कोसळला आणि पुन्हा एकदा जबाबदारी कोणाची यावर राजकारण सुरु झाले. इथे माणसे जखमी झाली, प्रवासाला निघालेली मधेच अडकली, धावणारी मुंबई जागेवरच थांबली त्याचे काही नाही, उलट आपण कसे जबाबदार नाही हे सांगण्यात धन्यता मानणारे नेते पहिले. मुंबईची जनता पण मुंबईचे स्पिरिट कसे जबरदस्त आहे, ट्रॅकवर उतरून अर्धा किलोमीटर चालून कशी धावती बस पकडली आणि कसा लटकतऑफिसला पोचलो अशा मसालेदार कथा सांगत मुंबई कशी सहनशील आहे, मुंबईकर कसा मार्ग शोधतो हे सांगण्यातच आनंदी असतो. अरे अशा वेळीस ऑफिसला जाच पण त्या जबाबदार अधिकाऱ्याच्या ऑफिसला जा आणि विचार जाब त्या हरामखोराला. कोणीही यायचं टपली मारायची असा प्रकार झालाय मुंबईचा.  सभ्यतेची आणि  गळपटल्यासारखी ततपप ची भाषा सोडा आणि फैलावर घ्या या भडव्यांना. तेव्हा कुठे भानावर येऊन ही मंडळी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळतील.  तुम्ही इतकं बेपर्वा राहिलात तर अजून मोठ्या दुर्घटना समोर उभ्या राहतील. एखाद्या चालत्या लोकलवर भर दिवसा पूल पडला असता तर आज तुमच्या माझ्या माहितीतला एक तरी माणूस मेला म्हणून बातमी आली असती. नशिबानं संकट टळलंय.

या कर्तबगार नेत्यांना, जबाबदार अधिकाऱ्यांना आणि अभ्यासू मंत्र्यांना एक सूचना आहे. आता उभ्या असलेल्या सर्व सार्वजनिक बांधकामांवर आणि भविष्यात होणाऱ्या  प्रत्येक सार्वजनिक बांधकामाच्या उदघाटनाला त्या बांधकामाच्या देखभालीची जबाबदारी कोणाची ते पण दगडावर कोरून घ्या.  म्हणजे आमचा माणूस नक्की कोणामुळे मेला हे तरी कळेल.

Tuesday, 5 June 2018

फटकेबाज फिल्लमबाजीच्या चमचमीत कणेकरीची पंचाहत्तरी - हॅपी बर्थडे शिरीष कणेकर साहेब


शिरीष कणेकर मला नावाने ओळखतात ही फुशारकी मारताना एक भलताच आनंद मिळतो. कदाचित अमिताभ बच्चन मला ओळखतो हे सांगताना सुद्धा इतका वाटणार नाही इतका अभिमान मला कणेकरांबद्दल वाटतो याला हजार कारणं आहेत.  माझी फिल्लमबाजी आणि माझी फटकेबाजी या दोन प्रचंड लोकप्रिय स्टॅन्ड अप शो च्या अगोदर लोकसत्ता मधली कणेकरी हजारदा वाचून मोठ्या झालेल्या पिढीचा मी प्रतिनिधी. स्टॅन्ड अप शो ? होय , शिरीष कणेकर हे मराठीतलेच नव्हेत तर भारतातील पहिले स्टॅन्ड अप शो करणारे विनोदी लेखक असावेत. शिरीष कणेकरांच्या रविवारी येणाऱ्या लेखाची मटणाच्या जेवणापेक्षा  आतुरतेने वाट बघणारी जी पिढी होती त्यातला मी एक. त्यांच्या लेखात भारतभूषण, प्रदीपकुमार, महिपाल, आय एस जोहर, अचला सचदेव यांच्यावर केलेल्या भाष्याने अक्षरशः हसून हसून डोळ्यात पाणी यायचं. थोडी खोचक, थोडी तिरकस तरीही वाचकांवर आणि प्रेक्षकांवर पक्कड घेणारी स्वतःची एक शैली, ज्याला पुढे कणेकरी हे नाव पडलं, असणाऱ्या या कलाकाराचे फॅन फॉलोइंग आजपर्यंत तितकंच जबरदस्त राहिलंय.  पु.ल.देशपांडे यांच्या नंतर शब्दाच्या कोट्या करत वाचकांना खदखदून हसवणारा लेखक कोण असेल तर तो म्हणजे शिरीष कणेकर. राजेश खन्ना आणि ऋषी कपूर हे त्यांचे प्रिय कलाकार असावेत.राजेश खन्नाविषयी बोलताना शिरीषजी अक्षरशः तो प्रसंग समोर उभा करतात. चित्रपटातील अनेक डायलॉग्स, अनेक घटना यांच्या तोंडून ऐकताना हसूनहसून मुरकुंडी वळते. माझ्याबतीत सांगायचं तर कधी खूप स्ट्रेस्ड असलो की यांचं एखाद पुस्तक घ्यायचं आणि कुठूनही वाचायला सुरुवात करायची, पाचव्या मिनिटाला हा स्ट्रेस पाच मैल दूर गेला म्हणून समजा. माझ्या लेखनावर, विशेषकरून माझ्या सीकेपी खाद्यपदार्थावरच्या (फूड ब्लॉग्स) लेखनावर शिरीषजींच्या शैलीचा प्रभाव आहे हे मला अनेकांनी सांगितलंय.  

काही दिवसांपूर्वी  सीकेपी साहित्य संमेलनाच्या वेळी त्यांच्यासाठी माझ्या रेस्टोरेंट मधून आलेली चपाती खाताक्षणी 'वाह .. मऊसूत' आणि वालाचे बिरडे चाखताच 'अप्रतिम ' असे उद्गार काढून उत्तम जेवणाची पावती देणारा हा माणूस नुसताच खवय्या नाही तर खऱ्या अर्थाने दर्दी खवय्या आहे. चवीची उत्तम जाण असणारे कणेकर सीकेपी जेवणाबद्दलही खूप छान लिहितातआणि बोलतातही  (मी आधी 'जेवणावर' छान बोलतात असं लिहिलं होतं, त्यांच्या भीतीने शब्द बदलला. मी त्यांना घाबरतो हे मी त्यांना आधीच सांगितलंय)   ठाण्याच्या पहिल्या सीकेपी फूड फेस्ट ला आल्यानंतर त्यांनी जे वर्णन लिहिले आहे ते आजही व्हाट्सअपवर फिरताना दिसतं. 'सीकेपी लोकं नुसते खाणारे नसतात तर चवीने खाणारे असतात' असे एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगताना सीकेपी असल्याचं कौतुक त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होतं. सीकेपी फेस्ट ला आल्यावर माईक हातात घेऊन, तिथे आलेल्या खाण्यात दंग असणाऱ्या लोकांना थोडा वेळ खायचे थांबवण्याची ताकद मी ज्यांच्यामध्ये पहिली ते म्हणजे राजसाहेब ठाकरे, अवधूत गुप्ते आणि शिरीष कणेकर साहेब. एरव्ही तिथे असलेल्या खवय्यांना स्टेजवर कोण सेलेब्रिटी उभा आहे हे पाहायची पण फुरसत नसते.

शिरीष कणेकरांचं माझ्या केसांवर विशेष प्रेम आहे. खरंच सांगतोय. एकदा कल्याणच्या एका कार्यक्रमात स्टेजवरून बोलताना ते म्हणाले  की " या समीर गुप्ते कडे पाहिल्यावर शाहरुख खानचीच आठवण येते हो "  या वाक्यानंतर आता माझं काही खरं नाही हे मी समजून चुकलो होतो. तरीही धीराने त्यांचे पुढचे वाक्य ऐकले ''हो बघाना, समीर गुप्ते च्या आणि शाहरुख खानच्या वाढलेल्या केसांकडे पाहिल्यावर मी या दोघांना पुढून बघतोय की मागून बघतोय हेच कळत नाही" प्रेक्षकांच्या हशा आणि टाळ्या ऐकताना कणेकर माझे कौतुक करतायत की चंपी करतायत हेच कळत नव्हतं. एकदा ठाण्याच्या कार्यक्रमातही ''त्याच्या उंचीची आणि त्याच्याएवढी दिसणारी डॉक्टर असलेली मुलगी असताना हा माणूस कपाळावरचं कोणतं पाप घेऊन फिरतो बरं" या वाक्याने प्रेक्षकांमधे धमाल उडवून दिली होती.''तुम्ही याला केस कापायला नाही का हो सांगत" असे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या माझ्या आईला सांगताना घेतलेला पॉज आणि माझ्या आईचा चेहेरा मला आजही आठवतो.  कल्याणच्या त्या कार्यक्रमाहून परत येताना गाडीमध्ये  शिरीष कणेकर, राज-उद्धव यांचे मामा श्री चंदूमामा वैद्य, मित्र दीपक कर्णिक, श्री मिलिंद अधिकारी आणि मी अशी मंडळी होतो. त्या तासभराच्या प्रवासातल्या त्यांच्या धमाल गप्पा ऐकणे म्हणजे एक अविस्मरणीय आठवणच.

आज हे लिहिण्याचं कारण म्हणजे आज श्री शिरीष कणेकर यांचा ७५वा वाढदिवस आहे. चित्रपट, क्रिकेट आणि खवय्येगिरीवर लेखन करून गेली पन्नास वर्षे मनमुराद कसलं, पोट  फुटेस्तव हसवणाऱ्या, एकला बोलो रे, एक्केचाळीस, गाये चला जा, गोली मार भेजेमें, गोतावळा, कुरापत, मखलाशी, यादोंकी बारात, टिवल्याबावल्या, डॉलरच्या देशा अशा अनेक पुस्तकांच्या या असामान्य लेखकाला आणि उत्तुंग कलाकाराला त्यांच्या  ७५व्या वाढदिवसाच्या आणि उदंड आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा ! आपली प्रकृती कायम ठणठणीत राहो आणि आम्हा रसिकांना आपल्या हास्य विनोदाच्या कार्यक्रमांची मेजवानी सतत मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्हा सर्व साहित्य रसिकांकडून आणि खवय्यांकडुन आपणास 'हॅपी बर्थडे' !  

समीर गुप्ते
#samhere #sameer6949@gmail.com

Saturday, 19 May 2018

पावसाळी रानभाज्यांची राणी - शेवळाची कणी

कॉलेजला असताना वर्गात एखादी सुंदर दिसणारी नवीन मुलगी आली तरी इतका आनंद झाला नसेल जितका 'बाजारात शेवळं आली' या माझ्या काल परवाच्या एफबी पोस्टने सीकेपी पुरुषांना झाला असेल. मला सोडा हो, पण माझ्या रेस्टोरंन्टवरही फोन करून समीर ने शेवळं ठाण्याच्या बाजारात कुठे पहिली ही  विचारणा झाली , देवाशप्पथ खरं सांगतोय.  शेवळं आली रे आली की आपण कधी बाजारात जाऊन ती आणतोय असं वाटलं नाही असा सीकेपी विरळाच. तुला शंभरला सहा दिल्या ? मी तर घासाघीस करून शंभरला ला आठ घेतल्या हे सांगण्यात जो आनंद आहे तो चारशे ची सुरमई दोनशे ला घेतली हे सांगण्यातही  नाही. खरंतर त्या बिचाऱ्या भाजीवालीला धंदा करताच येत नाही असं नेहेमी मला वाटतं. शंभराला सहा काय, हिने शंभराला तीन दिल्या तरी निमूटपणे घेऊन जायची तयारी असलेले अनेक सीकेपी या जगात असतील. भाजीवालीची शेवळाने भरलेली टोपली इकडे तिकडे बघत आपल्या पिशवीत रीती करताना जे सुख असतं त्याचे वर्णन शब्दात करणं अशक्य. पिशवी भरली की थेट घर गाठायचं आणि परातीत रिकामी करून समस्त शेवळाच्या सौन्दर्याचं प्रदर्शन मांडायचं ही परंपराच. लागलीच फोटो काढून सीकेपी खवय्ये आणि सीकेपी फूड या फेसबुक ग्रुपवर टाकण्याची प्रथा गेल्या ५ वर्षांपासून आली पण त्या आधी आख्या प्रभू आळीला सांगण्याची परंपरा होतीच ..अजूनही असेल.

कदाचीत वर्षातून एकदाच दर्शन देणारी म्हणून  किंवा कदाचित चवदार अस्तित्वामुळे मला नेहेमीच आकर्षित करणारी शेवळं ही  पावसाळी भाज्यांमधली रूपगर्वीता म्हटली जावी अशीअतिशय सौन्दर्यवान भाजी आहे असे मला कायम वाटतं. सोलून झाल्यावर तीचं देखणं रूप, तो सडपातळ बांधा आणि रंगाची उधळण केलेले रंगीबेरंगी कोंब तुम्हाला शेवळाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहू देत नाही. मे च्या १५ तारखेपासून मनाला गारवा देणारी आणि जून च्या अखेरीस 'जून' झाली तरी हवीहवीशी वाटणारी शेवळाची भाजी सीकेपी स्वयंपाकाच्या अदाकारीची  एक आगळी ओळख म्हणून लोकमान्य आहे.

शेवळाची भाजी- शेवळाची कणी- शेवळाच्या वड्या अशा वेगवेगळ्या पदार्थांमधल्या सोडे घालून, सुकट घालून, कोलंबी घालून, खिमा घालून या उपलब्ध पर्यायांमधल्या एका पर्यायावर शिक्कामोर्तब होऊन एक अलौकिक चवीची अमृततुल्य भाजी आपल्या चुलीवर साकारताना सुगरणीचे मन मात्र थोडे अस्थिर असते. म्हणजे भाजी खवखवणार तर नाही ना , पुरवठ्यास तर पडेल ना, पटकन मुलीकडे किंवा वेगळा राहणाऱ्या मुलाकडे डबा कोण पोचवेल, मुलांना अमेरिकेत मिळाली तर किती बरं ना पासून 'आज हे असते तर' अशा अनेक विचारांच्या,अनेक भावनांच्या कल्लोळात ही पाककृती साकारते.

कोणी बरं या भाजीचा शोध लावला असेल ? हे वाक्य माझ्या लहानपणी घरात हमखास बोललं जायचं. याच उत्तर आजवर सापडलं नाही. परंतु सीकेपी समाजाबरोबर सोनार समाजातील काही सुगरणी सुद्धा या अदभूत शोधाला योग्य मान देत भाजीवर पाकसंस्कार करत शेवळं या भाजीला अजरामर करतात -त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं.  जरा पटकन  रेसिपी सांगता का असं बोलून या शेवळं पुराणाला धक्का न देता एखाद्या जवळच्या लाडक्या आजीकडून शेवळाची कणी लवकरात लवकर शिकून घेतली तर रानभाज्यांची राणी असलेली ही भाजी अजूनही काही दशकं आपल्या जीवनात आणि आपल्या जेवणात आनंदाने नांदेल हे मात्र नक्की.

समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.com
 #ckpfood #ckpfoodfest
#sameer6949@gmail.com
pic courtesy - Payal Shikarkhane - Panvel

Tuesday, 6 March 2018

#सीकेपी फूड फेस्ट #यशोगाथा #साई कुळकर्णी

सीकेपी फूड फेस्ट मध्ये आपल्या व्यवसायाची सुरुवात करून यशस्वी झालेलं अजून एक व्यक्तिमत्व म्हणजेच साई कुळकर्णी. माझ्या येणाऱ्या पुस्तकात अंतर्भूत असलेल्या यशोगाथेमधील ही अजून एक यशोगाथा.

सीकेपी माणसाला भाजीवाली किंवा वाणी एकवेळ नाही भेटला तरी चालेल पण खाटीक आणि कोळीण यांचं दर्शन आठवड्यातून चारवेळा तरी झालच पाहिजे. कोळी समाज तसा आपल्या खूपच आवडीचा समाज. आपला सीकेपी माणूस अनेकदा कोळ्यांमध्ये रमताना दिसेल पण मला एक सांगा तुम्ही सीकेप्यांमध्ये एखादा कोळी पाहिलाय का हो ? नाही ? पण मला विचारलंत तर मी नक्की सांगेन कि सीकेप्यांमध्ये एक कोळी मी नक्कीच पाहिलाय. आडनावाने कोळी नसला तरीपण कुळकर्णी नाव धारण केलेला या सीकेपी कोळ्याच नाव आहे साईप्रकाश उर्फ साई. अहो खरं सांगतोय मी. तुम्हाला डोळे बांधून याच्या घरी नेले तर हा साई कुळकर्णी कोळीवाड्यात राहत असावा असे तुम्हाला वाटेल.
ठाण्याच्या २०१४ साली पहिल्या सीकेपी फूड फेस्ट मध्ये मी त्या वेळच्या १०-१२ स्टॉल धारकांना सूचना देत असताना एक पाच फूट उंचीचा बोंबीलसदृष्य माणूस माझ्या जवळ आला आणि तुमच्या मामाने तुम्हाला भेटायला सांगितलंय असे म्हणाला. कशासाठी ? असे विचारताच .. "सर आय सप्लाय फ्रेश फिश - आय एम साई कुळकर्णी" त्याची उंची, त्याचे वजन, त्याची देहबोली आणि त्यावर त्याचे फाडफाड इंग्लिश बोलणे ऐकून क्षणभर काही न सुचल्याने मी त्याला माझ्या बाजूला बसायला सांगितले आणि विचारले या सर्वाना मच्छी सप्लाय करशील का ? ओह येस्स ऑफ कोर्स ..बाय ऑल मीन्स .. आय मीन व्हॉट एव्हर दे वॉन्ट...फ्रेश फिश फ्रॉम वॉटर्स ऑफ श्रीवर्धन ! च्यामारी... हे पोरगं मराठी बोलायलाच तयार नव्हतं. मिटिंग संपताच याने त्याच्या मच्छीचे भाव सांगितले आणि जवळपास सर्वानी या साई कडून मच्छी खरेदी केली.
२०१२ मध्ये एक सुप्रसिद्ध मीडिया हाऊस मध्ये काम करणाऱ्या साईने त्या क्षेत्रातील अनिश्चितता पाहून त्या नोकरीला राम राम ठोकला. काही तरी व्यवसाय करावा या विचाराने पछाडलेल्या साईला कशी कोणासठाऊक पण मच्छी विकण्याची इच्छा झाली. असं म्हणतात कि त्याच्या बायकोला म्हणजे वैशालीला त्याने ही भन्नाट कल्पना सांगताच तिला त्याच्या उंचीपेक्षा मोठे असे प्रश्नचिन्ह पडले. पण साई वर असलेल्या अगाध श्रद्धेमुळे तिने याला मान्यता दिली आणि तत्क्षणी एक कायस्थांचे कोळ्यात रूपांतर झाले. सुरुवातीच्या काळात घरोघरी जाऊन ताजी मच्छी पोचवणारा साई आता सीकेपी घरात एक हवाहवासा माणूस वाटू लागला होता. हा माणूस जर तुमच्याशी फोनवर बोलून तुमच्या घरी आला तर कदाचित तुम्ही हाच तो आहे यावर विश्वास ठेवणार नाहीत इतका अस्खलित इंग्रजी बोलून हा ऑर्डर घेतो. सीकेपी फूड फेस्ट करताना मी ज्या माशांची नावे ही ऐकली नसतील इतके मासे तो फोनवर एका दमात विकतो.
ओल्या मच्छीला गजाली , तुंगा यासारख्या हॉटेलमध्ये पुरवठा करण्याच्या संधीचे त्याने सोने केले. ओली मच्छी विकत नावारूपाला आलेल्या साइने काही दिवसातच आपला मोर्चा आता अस्सल सीकेप्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोडे व इतर सुकी मच्छीकडे वळवला होता. मधल्या काळात माझ्याबरोबर सीकेपी फूड फेस्ट निमित्त ठाणे, नागपूर, पुणे , मुंबई आणि नाशिककरांनी देखील त्याच्या ताज्या मच्छीला प्रथम पसंती दिली. नागपूर च्या सीकेपी फेस्टिवलला साई ने सतरा लाख रुपयांची मच्छी दिली होती. ज्या ट्रेन मधून ही मच्छी गेली त्या ट्रेन मध्ये मी स्वतः होतो. प्लॅटफॉर्म वर माल उतरावल्यानंर नागपूरकरांनी त्या खोक्यांना गराडा घातलेले मी पाह्यलंय. आज चार वर्षे या व्यवसायात स्थिरसावर होऊन साईने श्रीवर्धन येथे जवळपास २७ बोटी घेऊन कोळी बांधवांच्या मदतीने आपल्या व्यवसायात जम बसवत अनेक एक्स्पोर्ट हाऊसेस आणि क्रॉफर्ड मार्केट मधील होलसेलर्स यांनाही पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
हे करताना अनेक कठीण प्रसंगांना पण त्याला तोंड द्यावे लागले. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसलेल्या उदयोन्मुख व्यावसायिकाला ज्या अडचणी येतात त्याला साई पण अपवाद नव्हता. पण खरोखरीच अर्धांगिनी या शब्दाला सार्थ ठरवत त्याच्या व्यवसायाला लागणाऱ्या भांडवलासाठी पत्नी वैशालीने स्वतःचे दागिने गहाण ठेऊन साईच्या यशाला हातभार लावला. बऱ्याच मंडळींना माहित नसेल पण साईची आई ही आता अमेरिकन नागरिक आहे. साईच्या वडिलांच्या जाण्यानंतर दोन्ही मुलांचे संगोपन करून, त्यांना स्थिरसावर करून ती गेली ७ वर्षे तिच्या डल्लास -अमेरिका येथील बहिणीकडे राहून तिला तिच्या केटरिंग व्यवसायात मदत करत आहे. आईच्या ओळखीने आणि स्वतःच्या मित्रपरिवारामुळे साईच्या व्यवसायात अमेरिकेतील ग्राहकांची यादी खूप मोठी आहे. साईच्या व्यवसायाचे नाव पण आईच्या नावाने म्हणजेच 'शोभना फिशरीज' म्हणून ठेवले आहे.
सीकेपी फूड फेस्ट मध्ये येऊन आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा आलेख आपल्या अफाट जिद्दीने आणि मेहेनतीने वाढविणारा हा साईप्रकाश कुळकर्णी म्हणजे माझ्यासाठी अजून एक विलक्षण यशोगाथा आहे. त्याची शारीरिक उंची जरी नगण्य असली तरी त्याची व्यावसायिक उंची आता आकाशाला गवसणी घातल्याशिवाय थांबणार नाही हे मात्र नक्की.
माझ्याकडून आणि सीकेपी फूड फेस्ट कडून साई ला भरभरून शुभेच्छा

Monday, 26 February 2018

Dare and You are there !





Whenever you see hard work, passion and belief go hand in hand, be sure they are on their journey to Success. A small sized business of dry fish four years back has converted into a big sized fast growing business of fresh fish...just with a strong wish. I am extremely happy and proud to see my friend and a dynamic associate of CKP Chamber of Commerce and Industry Sai Kulkarni who now owns a Fishing Boat named Jai Malhar and which has got a permission to sail in the waters of Mumbai. With a team of nearly 15 hard working and wonderful fishermen Sai is creating a new history. 'Dare and you are there' seems the winning formula of Sai.
Today I was the first fortunate from his friends list to be on his boat and it was a special occasion too...it was his Birthday and we celebrated it by sailing around... an amazing experience of piloting the boat.
Cheers Sai..you made us proud ! God Bless You in Abundance !!

श्रीदेवी आणि मी

श्रीदेवी आणि मी.
लेखाचं टायटल संपूर्णपणे मिसलिडिंग आहे असं तुम्हाला क्षणभर वाटेलही परंतु माझ्या आयुष्यातल्या १० अविस्मरणीय मिनिटांसाठी 'रूप की रानी' श्रीदेवी, होय खुद्द श्रीदेवी माझ्या बाजूला उभी होती. आज हे माझ्या चित्रपटातल्या टीम शिवाय कोणालाही खरं वाटणार नाही. तशी ती मला ओळखतही नव्हती. मी मात्र तिच्या लाखो करोडो चाहत्यांमधला एक. तिचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहिलेला. 'लम्हे' पाहायला तर बायको आणि आईला घेऊन मेट्रो पर्यंत गेलो. तेव्हा नीता लुल्लाने त्या चित्रपटातल्या मोरनी गाण्यासाठी बनवलेली घागरा चोळी एका काचेच्या बॉक्स मध्ये प्रदर्शनार्थ ठेवली होती. 'श्री' इतकी स्लिम आहे ? हा प्रश्न तो ड्रेस पाहणाऱ्या सर्वांनाच पडला असेल. खूप वर्षांपूर्वी माझ्या ऑफिसला श्रीदेवीचा जपानी गेशा च्या वेशभूषेत असलेला व्हिडीओकॉन च्या कॅलेंडर वरचा फोटो होता. युट्युब नसलेल्या जमान्यात 'चांदनी' आणि 'लम्हे' ची शिवहरी ने संगीतबद्ध केलेली गाणी कॅसेट प्लेअर वर ऐकताना डोळ्यासमोर तिचा प्रत्येक हावभाव आपसूकच यायचा. सदमा चित्रपटातील तिचं लाडीकपणे कुत्र्याला 'हलीप्रशाद' हाक मारणं, चांदनी मधलं तिच्या आवाजतलं, चांदनी, मै तेरी चांदनी हे गाणं, लम्हे चित्रपटातलं 'मेरी बिंदिया तेरी निंदिया ' या गाण्यातलं तीच नटणं सवरणं, चालबाज मधलं 'ना जाने वो कहांसे आता है', इंग्लिश विंग्लिश मधल्या नवराई गाण्यातलं 'आखोंमे इसके, इशारे' या तीन चार ओळीत ओतलेला जीव सगळं कसं हजारवेळा पाहावंसं. अभिनय, नृत्य, संवादाची फेक, टायमिंग आणि न लपवता येणारं तिचं दाक्षिणात्य शैलीतलं लाजणं आणि रडणं हे केवळ लाजवाब. लम्हे या चित्रपटात वहिदा रहेमान आणि श्रीदेवी या दोघीही माझ्या लाडक्या अभिनेत्री, हा चित्रपट युट्युब वर मी अनेकदा पाहतो.
२०१० साली मकरंद अनासपुरे, ज्योती जोशी, शीतल शुक्ल, प्रकाश धोत्रे आणि भूषण कडू यांना घेऊन मी, माझा मित्र महेंद्र वाघमारेच्या साथीने 'बत्ती गुल पॉवरफुल' या आमच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचा प्रीव्ह्यू अंधेरीच्या फन रिपब्लिक च्या सातव्या मजल्यावरच्या मिनी थिएटर मध्ये ठेवला होता. संध्याकाळी ७ चा शो होता. अनेक मित्र,तंत्रज्ञ्, कलाकार आणि काही डिस्ट्रिब्युटर यांच्यासाठी हा शो आयोजित केला होता. मी गोरेगावच्या फिल्म लॅब मधून प्रिंट घेऊन तिथे पोचलो तेव्हा तिथे सलमान खान च्या 'वॉन्टेड' या चित्रपटाचा खासगी शो सुरु होता. तसा वॉन्टेड रिलीज होऊन १५ दिवस झाले होते. माझ्या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक दिलबर चौहान काका, त्यांची सहकारी शारदा जगताप, नितल वढावकर, अभिनेत्री शीतल शुक्ल हे बाहेरच उभे होते. ''समीर सर, आतमध्ये श्रीदेवी आहे, तिच्या मुली आणि मैत्रिणींना घेऊन वॉन्टेड बघते आहे" असं शारदा म्हणाली. 'तू पाहिलंस तिला ?' मी विचारलं. ''पाहिलं काय, ती आम्हा सर्वांशी गप्पा मारून गेली.'' शारदा खूप कौतुकाने सांगत होती आणि तिथे असेलेले माझे सहकारी श्रीदेवीशी बोलल्यामुळे मोठ्या आनंदात होते. मी एकदा स्वतःकडे बघितलं. प्रिंट्स आणताना माझ्या कपड्यांवर खूप डाग पडले होते, चेहेरा घामाने डबडबलेला होता, केस नेहेमीप्रमाणे विस्कटलेले होते. चित्रपट संपल्यावर ती बाहेर आली कि एखादा फोटो काढू, तो पर्यंत जरा रेडी होऊ असा विचार करतोय तोच थिएटर चा दरवाजा उघडून साक्षात श्रीदेवी बाहेर आली. दिसायला अतिशय सडपातळ, हलकासा मेकअप, पांढराशुभ्र असा एम्ब्रॉयडर्ड फ्रॉक, उंच टाचेच्या सँडल्स, अतिशय स्लिम पट्ट्याच घड्याळ, बोटात एकदोन अंगठ्या आणि लक्ष मोबाईलकडे. क्षणभर विश्वास बसत नव्हता. आज देव पावला होता आणि साक्षात देवी दर्शन देत होती. जिच्या रूपावर, अभिनयावर आणि चित्रपटांवर जीवापाड प्रेम केलं ती देवी, श्रीदेवी माझ्या रोखाने चालत येत होती. लॉबी च्या ज्या भिंतीला टेकून मी उभा होतो तिथे येऊन ती माझ्या बाजूला उभी राहिली आणि अतिशय हळू आवाजात 'टेन मिनिट्स स्टील' असं काहीतरी म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं खरं पण तिचं ते साधेपणातलं सौन्दर्य पाहून मी स्तब्ध झालो. तिच्या चित्रपटातलं लूक आणि प्रत्यक्षातली तफावत मला जाणवत होती. कसलाही बडेजाव नाही, आपण कोणीतरी आहोत हे सांगणारी देहबोली नाही, आपल्या मुलांना पिक्चर दाखवायला घेऊन आलेली आई इतकंच. काही वेळात त्याच थिएटर मधून सुधीर मिश्रा बाहेर पडला, बहुदा बॉनी कपूरच्या निमंत्रणावरून आला असावा, पण निघताना श्रीदेवीकडे न पाहताच सरळ लिफ्ट मध्ये गेला. दहा मिनिटात चित्रपट संपला, तिच्या मुली आणि त्यांच्या सात आठ मैत्रिणी बाहेर आल्या आणि श्रीदेवी त्यां
ना घेऊन लिफ्टमधून निघून गेली. श्रीदेवी आणि मी जवळपास दहा मिनिटं बाजूबाजूला उभे होतो. या सगळ्यात तिच्याबरोबर फोटो काढणं हे मला सुचलंही नाही. श्रीदेवी दिसताच एरव्ही हुशारी मारणाऱ्याची बोलती कशी बंद झाली याची चर्चा मात्र आमच्या टीम मध्ये सुरु होती.
श्रीदेवी पुन्हा एकदा गेली, कायमचीच. आज श्रीदेवी परत कधीही दिसणार नाही याचे दुःख जास्त आहे. मी ट्विटरवर तिला आणि गौरी शिंदेला फॉलो करत होतो. उत्तर मिळणं सोडा, पण ती माझे शब्द कदापि वाचुही शकणार नाही हे माहीत असून देखील काल ती गेल्यावर मी तिला एक शेवटचं ट्विट केलं.
"@श्रीदेवी, आतापर्यंत तू कोणताही चित्रपट अर्धवट सोडल्याचं ऐकलं नाही .. मग आयुष्य का !'

Saturday, 24 February 2018

सीकेपी म्हणजे, रविवारचं मटण


सीकेपी म्हणजे बोम्बलाचं कालवण,
सीकेपी म्हणजे रविवारचं मटण,
सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा रस्सा,
सीकेपी म्हणजे रुचकर हातांचा चवदार वारसा ...
या ओळींमधला महत्वाचा भाग म्हणजे रविवारचं मटण. सीकेपी म्हणजे मटण हे समीकरणच आहे आणि सीकेप्यांचा रविवार हा सहसा 'मटण भात'  या आठवडाभराची शक्ती देणाऱ्या संपूर्ण आहाराशिवाय साजराच होऊ शकत नाही या वाक्यावर मी ठाम आहे.  एखाद्या रविवारी जर का चतुर्थी वगैरे येऊन घात झाला तर अनेक कायस्थांचा आठवडा खूप अशक्तपणा आल्यासारखा जातो ही वस्तुस्थिती आहे ..अगदी माझ्या बाबतीतही हे असच घडतं. जर का माझा एखादा रविवार हुकला तर सोमवारचा सत्यानाश झालाच म्हणून समजा..एक तर कारण नसताना उगीच चिडचिड सुरु होते, कामात लक्ष लागत नाही, आपण उगीचच सोमवार पाळतो - आपल्याला कुठे चांगला नवरा शोधायचाय वगैरे विचार मनात येऊ लागतात. अलीकडे मी हे दिवस आणि वार पाळणे सोडून दिलंय .. देवाने नाही फरक केला वारांमध्ये, च्यायला आपण कोण मोठे लागून गेलोय?

हं, तर आपलं मटण.  मटण हा सीकेप्यांच्या घरातला एक न ठरवलेला पण यथाशक्ती यथाभक्ती साजरा होणारा इव्हेंट असतो. शनिवार संपत आला की रविवारच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होते. एरव्ही बायकोला काडीचीही मदत न करणारे सीकेपी पुरुष रविवारी मात्र मस्त तयार होऊन, हाफ पॅन्ट - टीशर्ट घालून, चांगलीशी पिशवी घेऊन बाजाराकडे कूच करतात. (या वाक्यावर शिव्या खायला मी तयार आहे, पण सत्य आहे ते सत्य आहे). यातच सीकेपी बालकांवर खाद्यसंस्कार चांगले व्हावेत म्हणून घरातल्या ५ वर्षाच्या मुलाला पण बाईकवर बसवून बाजार दाखवण्याची पद्धत रूढ आहे. 'बाबा, आपण कुठे जातोय' हे विचारल्यावर त्या छोट्याला, डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताने काहीतरी ठोकून कापल्यासारखे दाखवून, आपण मटण आणायला जातोय हे सांगितलं जातं. ते मूल पण बिच्चारं नळीबाऊ च्या लालसेने टुणकन तयार होऊन बाईकवर बसतं.  आता मटण आणायला हे उत्साही लोक कुठे जातील याचा कोणी विचारपण  करू शकणारं नाही. ठाण्याच्या चरईतला एखादा सीकेपी आता घोडबंदरला हिरानंदानी मध्ये शिफ्ट झाला असेल तरीदेखील मटणासाठी हा ठाण्याच्या गर्दीच्या मार्केटमधल्या अनिल गाढवे कडेच येणार. पोखरण रोडवरचा एखादा लोढा मध्ये शिफ्ट झाला असेल तरी तो त्या उपवनच्या अश्फाककडेच जाणार. मखमलीच्या शोएबचा पण तितकाच बोलबाला. खूप वर्षांपूर्वी ठाण्याचे अनेक लोक कळवा आणि मुंब्रा येथे मटण आणायला जायचे.. ताजं ही मिळायचं आणि स्वस्तही. गुडलक, जॉली, वेलकम, महाराष्ट्र, दिलखुष ही सर्वसाधारण पणे या  मटणाच्या दुकानांची नावं. एरव्ही अतिशय घाईत जगणारे अनेक मोठे लोक मटणाच्या लाईनमध्ये अतिशय शांत आणि मनापासून उभे असतात. इथे एक किलो मटण घेणारा फुल वट दाखवत जरा सीना टाक, चाप टाक, गर्दन टाक वगैरे ऑर्डर देत असतो. त्याच्या मागे उभा असलेला एखादा पाव किलो मटण  घेणारा निमूटपणे, मटणवाला जे काही देईल ते घेऊन समाधान मानतो. पण जर कधी याने मांडीचा भाग वगैरे मागितला तर ' पाव किलोत तुझ्या काकानी ठेवलीये का रे मांडी' असा अपमान झालाच समजा. मटण वाला हा एकमात्र माणूस असा असावा की जो जाहिररीत्या तुमची इज्जत काढू शकतो .. तुम्ही कोणीही असा.  मटणाबरोबर कलेजी, खिमा, भेजा वगैरे पाहिजे असल्यास थांबायची तयारी ठेऊन आलेली मंडळी फार पूर्वी त्या मटण वाल्याकडे असलेले नयी दुनिया, इन्कलाब, अपना मसल्लक  किंवा नवाकाळ असले १ रुपयात मिळणारे पेपर वाचायचे, आता  मात्र मोबाईलवर चेक इन टाकत असतात. मटण घेताना मटण वाला आपल्याला चहा पाजतो हे म्हणजे तुम्ही त्याला खूप जवळ असल्याचं सूचक. मटणाला गेलं की गल्लीतले अनेक जुने मित्र पण भेटतात. तरुणपणी बाजारात न जाता रविवारी क्रिकेट खेळून महिलावर्गात लोकप्रिय झालेले हे मित्र आता मात्र घर गृहस्थीमध्ये आणि विशेषकरून घरच्या महिलेमध्ये रमल्याचे दिसतात.  "कायरे आज मटण का ?" हा मूर्ख वाटणारा प्रश्न पण १० मिनिटे गप्पा मारायला पुरेसा असतो. मटण ते मटण, मटणाची सर चिकनला नाही पासून देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा त्या निसरड्या लादीवर उभे राहूनच केला जातो.

मटणबरोबर घ्यायच्या इतर अनेक महत्वाच्या वस्तूं मध्ये दोन चिल्ड बिअर किंवा एखादी चपटी घेणे हेही क्रमप्राप्तच. एकदा का मटणाची पिशवी हॅण्डलला लावली के तुमचे पाय आपोआप स्वर्गलोकिच्या सुखाला गवसणी घालणाऱ्या ब्लू हेवन वाईन्स, शंकर वाईन्स वगैरे दुकानाकडे वळतात. मित्र तिथेही भेटतात  पण काळ्या पिशवीतल्या मटनामुळे घरची ओढ आज जरा जास्तच असल्याने ही मंडळी किक मारून घर गाठतात. इतक्या गर्दीत कसा नंबर लागला, वजन झाल्यावर कशी वरून जास्त चरबी टाकून घेतली अश्या विजयी सूरात पिशवी अर्धांगिनीकडे सोपवली जाते आणि नंतर  मटणाबरोबर आणलेल्या आनंददायी पेयाचा आस्वाद घेणं सुरु होतं. या कार्यक्रमामुळे पिशवी दिल्यापासून  ते शिजलेले ताट पुढे येईपर्यंत वेळ कसा जातो ते कळतच नाही..

स्वयंपाक खोलीच्या ओट्यापासून ते बाहेरच्या खोलीत दरवळणाऱ्या, तुमच्या नकळत नाकात शिरलेल्या त्या तिखट वासापाठोपाठ (सुगंध वगैरे काही नाही, वासच म्हणतो आम्ही) तुमच्या समोर हसऱ्या चेहेऱ्याने, आटपला का कार्यक्रम, कितीहो तुम्हाला घाई वगैरे शब्दांच्या सजावटीत ते सजलेलं ताट अवतरतं. मटणासाठीच राखीव असलेल्या भांड्यातलं रटरटणारं गरमागरम मटण वाटीत येऊन स्थिरावतं. एखाद्या खुर्चीत बसून टेबलावर ताणून पाय ठेवल्यासारखी वाटीतून फुशारकी मारणारी ती नळी, ताटात उजव्या बाजूला ती काळपट हिरवट छटा असलेली तव्यावरची कलेजी, सुगरणीचा मूड असेल तर एखादा अंड लेपून तळलेला चॉप, साधा सोप्पा कापलेला लाल कांदा, लिंबाची फोड, एखादी चपाती आणि ताटभर पसरलेला वाफाळलेला पांढरा शुभ्र भात .. यालाच म्हणतात सीकेप्यांचा रविवार.

असा रविवार साजरा झाला तर पुढचा आठवडा कडक गेलाच म्हणून समजा.

काही दिवसांपूर्वी एक गमतीदार पण पटणारी पोस्ट पहिली होती. 'सीकेपी समाज एकमात्र आहे की तो फक्त श्रद्धा पाळतो आणि मनमुराद जेवतो. पेन्शन हातात आल्यावर तो पहिला रविवार मासे आणि मटण, दुसरा रविवार फक्त मटण, तिसरा रविवार मटणात  बटाटे, चौथा रविवार बटाट्यात मटण आणि नंतर पेन्शनची वाट पाहतो' अशी,रविवार साजरा करायला मटण पाहिजेच हे सांगणारी ही पोस्ट होती.

सीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं 'स्टेपल फूड' आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट 

Thursday, 22 February 2018

फेस ऑफ्फ ऑन फेसबुक


सध्या फेसबुकवर जे काही सुरु आहे ना ते पाहता लोक कामधंदे सोडून या ना त्या ऍप वर क्लिक करत बसतील असं वाटतंय.

म्हणजे, कोणती आहे तुमच्या मरणाची तारीख आणि कारण? ... की लागले सगळे बघायला..किती ते कुतूहल आपल्या मरणाची तारीख बघायचं. उत्तर - तुमचे मरण २०६४ साली मोटार अपघातात.. अरे वा ..इतका जगणार मी ? आणि आजपासून ४६ वर्षांनी जेव्हा मी ९८ वर्षांचा असेन तेव्हा डोळयांच्या खाचा झाल्याने मोटारखाली येऊन मेलो तरच.... पहा बॉलीवूडची कोणती हिरोईन तुम्हाला साजेशी आहे? .. डोंबल..इथे गल्लीतल्या लेंगा टेलर ची पोरगी पटवताना जीव मेटाकुटीस आला होता आणि इथे काय दिसत तर उघड्या पाठीचा डिझायनर टॉप घातलेली कॅटरिना कैफ आपल्याला साजेशी .. उगीच क्लिक करून जीवाला त्रास करून घेणे दुसरं काय..अज्जीबात झोप नाही लागली त्या रात्री काय सांगू....  'तुम्ही स्त्री असतात तर कसे दिसला असतात?' .. अरे हे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे. काही वर्षांपूर्वी त्या फडकेच्या वाढदिवसाला सगळ्या प्रिंटिंग इंडस्ट्री नी पाह्यलंय मला स्त्रीरूपात .. कडक माल दिसत होतो असे पण काही मित्र म्हणाले...ते जाधव आणि पाटील तर अतिशय बोचऱ्या आणि वाईट नजरेने बघत होते माझ्याकडे. शप्पथ कुठून शोधतात या ऍप्स काही कळत नाही....  जाणून घ्या कोणती महान व्यक्ती होतात तुम्ही गेल्या जन्मी ??  उत्तर येतं जीजस क्राईस्ट ... बापरे ..फाईलला लावलेल्या कागदावरची टाचणी टोचली बोटाला तरी जीव जातो इथे आणि मागच्या जन्मी मी खिळे ठोकलेला जीजस क्राईस्ट.. काहीही...तसं एकदा माझा वाढदिवस ईस्टर संडे ला आला होता.....जाऊदे    दुसरं काय तर ' सांगा बरं ई.स.२०२४ साली तुम्ही काय करत असाल?' ... वेडे रे वेडे ... २०२४ साली आम्ही २०२९ ला कोणत्या युतीचं सरकार येणार याच्यावर नेहेमीप्रमाणे काथ्याकूट करत भांडत असू आणि तुम्ही काय दाखवता की मी चार आंग्ल बायकांबरोबर सोफ्यावर .. छे छे .. म्हणजे मनातून कितीही आवडलं असलं तरी शक्य नाही.. अति होतंय हे सगळं.  मी परवाच दुसरं कोणीतरी केलं म्हणून एका लिंकवर  क्लिक केलं .. 'लोक तुम्हाला पाहून काय विचार करत असतील?'  साधारणपणे .. हा खूप फुगलाय ना पिऊन, हल्ली कामधंदा करतो की फेसबुकवरच असतो, हा आता पहिल्यासारखा नाही राहिला वगैरे उत्तरं अपेक्षित होती पण उत्तर काय आलं की ' ही इज व्हेरी हँडसम, आय वूड ब्रोक विथ माय बॉयफ्रेंड फॉर हिम'.. आयला वाचून  काय लाजलो सांगू मी.  चारही बाजूने वाहणाऱ्या माझ्या सारख्या सुटलेल्या देहाच्या पुरुषासाठी ही तिचा सिक्स पॅक बॉय फ्रेंड सोडणार ..वा वा वा ..डोळ्याचं पारणं फिटलं, मोबाईलकडे लक्ष गेलं, बायकोचा फोन खणखणत होता, फेस बूक बंद केलं, साला आपलं बरं चाललंय.. ते उगीच ब्रोक व्हायचं, नकोच ते. पण चुकून, म्हणजे तितकं ही चुकून नाही पण ते फेस बुक वर पोस्ट झालं. तसा मी सुखरूप आहे अजून म्हणा.  बरं अजून एक गमतीदार लिंक, कोणत्या राजकीय व्यक्तिमत्वाचा चेहेरा तुमच्या चेहेऱ्याशी साम्य ठेवतो? हे ऍप तर शहाण्याने कधीही क्लिक करू नये .. दोनच पर्याय येतात .. दुसऱ्यांच्या वाटेला नेहेरू आणि माझ्या नशिबी राहुल गांधी. अरे आमचे बाळासाहेब, राज ठाकरे, ज्योतिरादित्य सिंदिया, शशी थरूर, राजीव गांधी वगैरे देखणे पर्याय पण ठेवा की, पण नाही.

भविष्यात हे फेसबुक वाले,  उद्या सकाळी तुमच्या दारात वसुली साठी कोण येणार ? उद्या तुमची बायको तुमच्यापुढे काय विषय काढणार? येत्या दिवाळसणाला सासुरवाडीहून कोणती भेट मिळणार ? २०१९ मध्ये तुमच्या वाढलेल्या पोटाचा घेर किती असेल ? २०२४ मध्ये तुमच्या बिल्डिंगच्या नळाला २४ तास पाणी (महिन्याला) येईल का? अशा ऍप्स आणि लिंक्स ही काढतील.असो.

एक मात्र नक्की, वातानुकूलित ऑफिसमधल्या गुबगुबीत खुर्चीवर कामाच्या वेळांत व्यतीत होणाऱ्या अतिशय खडतर आयुष्यात, कुठेतरी जीव रमवण्याच्या प्रयत्नात केलेल्या  एका क्लिकवर क्षणिक सुखाचा आनंद देणाऱ्या या ऍप्स आणि लिंक्स तुम्हाला स्वप्नांच्या जादुई दुनियेत नेऊन ठेवतात .. फक्त ते राहुल गांधी सोडून बरका.

Saturday, 13 January 2018

दारू..म्हटलं तर नशा, म्हटलं तर मैत्रीची वाहती भाषा


सॅम, यार तू नेहेमी खाण्यावर लिहितोस कधी आपल्या पिण्यावर पण लिहून काढ ना.. माझ्या दोन व्हाट्सअप ग्रुप च्या मित्रांनी मला केलेली  विनंती ऐकून घसा कासावीस झाला. तसं पाहता मी काही सलीम दुराणी काका सारखा पब्लिक डिमांड वर सिक्सर मारणारा गडी नाही तरीही मी हे चॅलेंज घेतलंय.(बाय द वे, सलीम दुराणी काकांना पण बिअरचा ग्लास भरून देणारा भाग्यवान आहे मी)  तर काय म्हणत होतो मी, घसा कासावीस झाला.  सर्व साधारण अशा मागणीने मन  भरून येतं.  पण या ग्रुप ची नावं ऐकलीत तर तुम्हालाही कळेल मनामध्ये काय काय भरून येतं ते. एका ग्रुपचं नाव आहे 'चिअर्स' आणि दुसरा ग्रुप आहे 'गोवा चलो'. काय कल्पकतेनी नाव ठेवतात ही मंडळी.  नावातच फसफसणारी बिअर आणि समुद्रावरच्या धुंदीचा आनंद दडलाय. बरं तसं पाहिलं तर मी पण पितो, नाही असं नाही, पण म्हणून डायरेक्ट पिण्यावर लिहायचं म्हणजे थोडं जोखमीचं काम. म्हणजे एक तर मी लिहिलेलं त्या मद्यरसिक मित्रांना आवडलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे मी  लिहिलेलं बऱ्याच जणांच्या पचनी पडणार नाही, ते बोंबाबोंब करतीलच याची भीती. खरं पाहता ते पण पितात पण गपचूप, लपून, दुसऱ्याच्या पार्टीत, बाहेरगावी, बायको  गेली की वगैरे. पण आम्हा पट्टीच्या पिणाऱ्यांचं तस नाही. प्यायची तर राजरोस पण दररोज नव्हे.  प्यायची तर आपल्या मित्रांबरोबर, कुटुंबीयांबरोबर,  मर्जीने आणि मनापासून आणि अर्थातच जबाबदारीने. प्यायची तर आनंदाच्या मूडमध्ये, रागात आणि दुःखात नाही.  जसं उत्तम खाण्यासारख सुख नाही तसच उंची दारू पिण्यासारखा आनंद नाही. दारू,जरी स्कॉच किंवा सिंगल माल्ट जरी असली तरी तिचा उल्लेख पिताना दारू म्हणूनच जे करतात तेच खरे मद्यपी. मला तर हा मद्यपी शब्द पण खूप आवडतो .. त्या शब्दातच 'मद्य पी' असा आग्रह आहे. चल ड्रिंक घेऊ या असे बोलून घेतलेल्या द्रव्यात ती मजा नाही..नुसतं औपचारिक वाटतं. असो.

दारू पिताना माणूस नको इतका प्रामाणिक, प्रांजळ, प्रेमळ आणि दिलदार असतो. एक दोन पेग नंतर तर जगातली कोणतीही गोष्ट तो आपल्या मित्रांसाठी देऊ शकतो, नव्हे, उद्याच्या उद्याच द्यायची त्याची तयारी असते. जगाच्या पाठीवर चाललेल्या सर्व घडामोडींवर येथे साधकबाधक चर्चा होते इतकंच नव्हे तर त्याची सोल्युशन्स पण त्या टेबलवर तयार असतात .. दुर्दैवाने ट्रम्प, पुतीन वगैरे मंडळी वेळेअभावी या गुत्त्यांवर येऊ ना शकल्यामुळे जग फार चांगल्या चांगल्या सूचनांना मुकत असावं. इथे कोणी शत्रुत्व घेऊन प्यायला बसत नाही, इथे मिळत फक्त आणि फक्त प्रेम. आणि आग्रह ?, तो तर विचारूच नका राव. तुमच्या सासुरवाडीच्या लोकांनी पहिल्या सणाला पण केला नसेल असा आग्रह तुम्हाला फक्त दारूच्या टेबलवरच केला जातो.. आणि खरं सांगायचं तर हा आग्रह नुसता फॉर्मॅलिटी असतो..आग्रहाच्या आधीच ग्लास भरलेला असतो. बिअर ही दारू नसते, वाईन चढत नाही, वोडका बटाट्यापासून बनते आणि ते म्हणजे रशियाचं राष्ट्रीय पेय आहे, जीन फक्त लेडीज पितात, सिंगल माल्ट मध्ये सोडा घालणारे महामूर्ख हे सर्व ज्ञान तुम्हाला इथेच मिळते. इथे दिल्या जाणाऱ्या शिव्या कोणालाही कुठेही लागत नाहीत.. प्रत्येक घोटा बरोबर शिव्यांचा चाखणा नसेल तर काय मजा.

दारू पिताना अनेक विषयांचे,अनुभवलेल्या घटनांचे आणि नको असलेल्या  ज्ञानाचे पाट वाहात असतात. शेजारच्या बिल्डिंगमधल्या भाभीपासून ते सनी लिओनी पर्यंत, एखाद्या नगरसेवकापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल, टुकार टेलिव्हिजन शो पासून ते अमिताभच्या मानधनाबद्दल  तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळतात. त्यातच, आपण कसे सगळ्यांना क्लोज आहोत, आपण त्या त्या  प्रसंगी कसे वागलो, नाकाबंदी वाल्या पोलिसांना कसे पटवले, एखाद्या मित्राला घरी सोडायला गेलो असता त्याच्या बायकोने काय राडा घातला याच्या सुरस कथा तुम्हाला फक्त आणि फक्त दारूच्या टेबलावरच ऐकायला मिळतात. रामजी, कृष्णा, मीरा, शंकर, गणेश, भक्तिमंदिर, हृषीकेश, गंगा, अमृत अशा पावन नावांनी चालणाऱ्या या बार्स मध्ये पापी माणसाला पण शुद्ध करण्याची क्षमता असते.  ढसाढसा ढोसल्यानंतर ढसाढसा रडून आपल्या चुकांची कबुली देणारे अनेक मित्र आणि मोठ्या मनाने त्यांना माफ करणारे त्यांचे खरे मित्र तुम्हाला येथेच मिळतात. दर ग्रुपमध्ये एकजण तरी असा असतो की त्याची एखाद्या वेटरशी किंवा बार मालकाशी चांगली ओळख असते (किंवा असे भासवले जाते) साधारणपणे इथे सर्व ऑर्डर हाच देत असतो. याच ग्रुपमधला एक जण न पिता नुसता थम्सअप वगैरे पीत इतरांची मजा बघत असतो. नंतर इक्वल काँट्रीब्युशन करताना याची मजा बघण्यासारखी असते ..बघा तुम्ही. यातलाच  एखादा सगळ्या पिणाऱ्यांची जबाबदारी घेणारा असतोच असतो.. बस्स कर रे, तुला जास्त झालीय, त्रास होईल वगैरे हाच माणूस फुल्ल तऱ्हाट मोड मध्ये बोलत असतो. एखादा मित्र दारू पिऊन आऊट झाल्यानंतर त्याला परत शुद्धीत आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात पाहायला मिळणार नाहीत. लिंबू काय, पाव काय, डोक्यावर सोडा ओतणे काय किंवा त्याचे केस ओढणे काय सगळं कस शास्रोक्तपणे करतात. मुख्य म्हणजे या प्रसंगी बारमधले सर्व च्या सर्व तुमच्या मदतीला येऊन अजून काही उपाय करता येईल या याचापण विचार करतात. तो मित्र ओकला तरी त्याला फार गिल्टी वाटून न देण्याचं कसब इतरांकडे आपोआप येतं. एकूण काय, तर जगातल्या सर्व कटकटींपासून दूर नेणारी ही दारू म्हणजे तमाम मित्रमंडळांना सुखदुःख वाटायची एक छान संधी देते...खरं पाहता दारूच्या नशेपेक्षा मैत्रीचा बहर जास्त चढलेला असतो.

ठाण्याच्या एका बारमध्ये मी आणि एका मोठ्या कंपनीच्या उच्च पदावर असलेला माझा मित्र आपल्या देशाच्या एव्हिएशन इंडस्ट्री साठी इम्पोर्ट पॉलिसिज वर गहन चर्चा करत असता आमच्याच टेबलवर बसलेल्या दोन मित्रांचे बोलणे ऐकले.( हो,हो. काही बारमध्ये तुमच्या बाजूला दुसरे पण येऊन बसू शकतात, त्यांचं बिल आणि विषय वेगळे असतात तरीही पहिल्या आलेल्या ग्राहकाला त्रास होत नाही, ही आपलेपणाची भावना फक्त बारमध्येच पाहायला मिळते) हं तर आम्ही काही कोटीच्या गप्पा मारत असताना त्या दोघांमध्ये रिक्षाचा सायलेन्सर फाटल्यावर गण्या मेकॅनिक बेस्ट आहे कि सुलेमान बेस्ट आहे या विषयावर वर गंभीर चर्चा सुरु होती.ते ऐकून आम्ही धन्य झालो.  त्या दोन्ही रिक्षावाल्यानी नकळत आमचं विमान जमिनीवर आणून ठेवलं होतं. एक ना दोन अशा अनेक घटना तुम्हाला फक्त बार मधेच पाहायला आणि ऐकायला मिळतात.

माझा हा लेख दारू ला लोकप्रिय करणे किंवा दारूचे उदात्तीकरण करणे या उद्देशाने लिहिलेला नसून,माझी बोली भाषा समृद्ध करणाऱ्या त्याच टेबलावरच्या माझ्या मित्रांच्या विनंतीला मान देऊन लिहिण्यात आलेला आहे याची टीकाकारांनी नोंद घ्यावी. जास्त जहरी टीका केल्यास, तुमच्या टीकेला उत्तर द्यायला वरीलपैकी कुठेही तुम्हाला आमंत्रित केले जाईल याचीही तयारी ठेवा.  

शेवटची दोन वाक्य माझ्या आणि एकूणच दारू या विषयाचा आनंद घेणाऱ्या मंडळींसाठी.
दूर गेलेल्या नात्यांना जोडते ती दारू, मात्र जोडलेली नाती दुरावण्यास ती कारणीभूत होऊन देऊ नका आणि जेव्हा कधी प्यायला बसाल  तेव्हा या पीण्याशिवाय, "घरची ओढ" नावाची एक जगावेगळी नशा आहे हे विसरू नका.