काही लोकांची बिजनेस करण्याची पद्धत वेगळीच असते. म्हणजे काहीजण आधी सॅम्पल देऊन ता काही फक्त डेमो देऊन आपापली उत्पादने विकतात. पण जगात अशी काही हुशार माणसेआहेत जी तुम्हाला पूर्णपणे एखाद्या वस्तूच्याआहारी घालवतात आणि मग त्यातून मुक्त कसं व्हायचे याचे शिक्षण देतात अर्थात त्यासाठी त्याच्याकडे पुन्हा आहारी जाण्यासारख्या वस्तू असतातच. कसं आहे ना, की एखाद्याला घरी बोलावून चिकन गलोटी कवाब, पिकनिकला गेल्यावर रान मसाला, तंदूर मुर्ग, सीकेपी फूड फेस्ट मध्ये कोलंबी बाकरवडी, क्रॅब बटर गार्लिक, चिंबोरी काढा वगरे खायला घालून वेडं करायचं आणि एखाद्याने पुन्हा कधी त्या जिनसा मागितल्या तर आपल्या नवीन धंद्याचं कार्ड द्यायचं - गिल्ट फ्री इंडलजन्स वगैरे - काय अर्थ आहे हो याला. हे सर्व मी बोलतोय एका नावारूपाला आलेल्या शेफ बद्दल आणि अतिशय जबाबदारीने बोलतोय. शेवटी जाहीर आरोप करतोय मी याच्यावर. होय, मी बोलतोय सीकेपी फूड फेस्ट मधून कमालीचा लोकप्रिय झालेला आणि आता स्टार प्रवाह च्या सुगरण या कार्यक्रमातील शेफ यशोधन देशमुख बद्दल. एक तर जन्माने सीकेपी, त्यात खवय्येधर्मात हौशी, त्यात स्वतः शेफ आणि भरीस घालायला खादाड मित्रांचा गोतावळा असं सर्व असल्यावर मित्रांच्या जिभेच्या मागण्या पुरवणारे शेकडो पदार्थ तसेही बनत असत. पण अचानक एक दिवस समोर येऊन, "समीरभाऊ आता आपण तुमच्या फिटनेस साठी ( माझ्या पोटाकडे बघत ) एक नवीन कॉन्सेप्ट आणतोय .. हे माझं निमंत्रण - सोलासा कॅफे, विलेपार्ले ....भाऊ नक्की या बरंका. तुम्हाला आवडेल. एक्दम ते फॅट फ्री, हाय प्रोटीन, शुगर फ्री पदार्थांची रेलचेल असलेला असा आपला मेनू आहे. या नक्की ! येताय ना ?" मला खरं तर हे सगळं ऐकवत नव्हतं. आपल्या जिभेचे मनसोक्त चोचले पुरवणारा माणूस, 'कठोर' पणे आपल्या पोटाकडे बघून बोलत होता. काही सुचत नव्हतं - चमचमीत चंगळीच्या असंख्य अनुभवांच्या अविस्मरणीय आठवणींचे जग इथेच संपल्याची भावना स्पर्शून जात होती - स्वतःला सावरलं - मनाला आवरलं आणि निमंत्रणानुसार पार्ला गाठलं.
प्रथम उदघाटनाला, त्यानंतर तिथेच आयोजित सीकेपी चेम्बर्स च्या मीटिंग करता आणि नंतर एका मित्राबरोबर असे आजवर तीनदा मी सोलासा कॅफे ला भेट दिली आहे. तीनही वेळा वेगवेगळ्या प्रयोगातून निर्माण केलेल्या काही अद्भुत पदार्थांचा आस्वाद मी घेतला. रसगुल्ला, कलाकंद, गुलाबजाम वगैरे देऊन माझं स्वागत झालं. गोड पण शुगरलेस बरं का. अहो मिठाईत साखरच नाही टाकत हा माणूस तर गोडवा कुठून येतो हे समजायला मार्ग नव्हता. अर्थात त्याच ते ट्रेड सिक्रेट असल्यामुळे मीसुद्धा फार विचारलं नाही. प्रत्येक पदार्थ खाताना "सांग बरं काय आहे यात?" या प्रश्नच उत्तर मी हमखास चुकीचे दिलं. काहीच कळत नव्हतं. असो. सोलासा कॅफे हे प्रबोधनकार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विलेपार्ले च्या आवारात असल्यामुळे तिथे फिटनेस गुरु आणि अनेक खेळाडूंचा वावर असतो. सर्वसाधारणपणे एखाद्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या कॅंटीनमध्ये बटाटा वडा, मिसळ, कांदा भजी अशा 'माझ्यामते पौष्टिक आहाराचा' अंतर्भाव असतो पण उत्तम शरीरयष्टीसाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी पडू नये म्हणून अनेक पौष्टिक आणि तितक्याच चविष्ट पदार्थाच्या मेनू ची आखणी शेफ यशोधन याने केली आहे.
पण सध्या सोलासां प्रसिद्धीस येतंय ते तिथे मिळणाऱ्या अनोख्या मिठाईच्या नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी. साधारणपणे मिठाई म्हटलं की डोळ्या समोर साखर आणि त्याचे होणारे दुष्परिणाम झटकन समोर येतात. डायबेटीस वगैरे आसपास नसलं तरी माझ्यासारखे उगीचच घाबरून या गोडधोड मामल्यापासून थोडंसं अंतर ठेऊनच राहतात. पण आता इथे तर गुलाबजाम पासून रसमलाई पर्यंत आणि कलाकंद पासून जिलेबी पर्यंत सगळेच भारतीय मिष्टान्न आता सुगरफ्री पण पूर्णपणे नैसर्गिक रित्या नैसर्गिक स्वीट चा वापर करून तयार केलेली आहेत. तसेच प्रत्येकाच्या आहारातील एक मुख्य घटक म्हणजेच प्रोटीन. प्रोटिन्स चा समावेश या मिठाई मध्ये केलेला असल्याने पूर्णपणे एक आहार म्हणून या मिठाई कडे बघता येते. याबाबत यशोधन कडून थोडी माहिती घेतली तर कळलं की साधारणपणे एका गुलाबजाम मध्ये १७० पर्यंत कॅलरीज असतात पण सोल्लासा गुलाबजाम मध्ये फक्त ५० कॅलरीज असून प्रोटीन चे प्रमाण ही दुप्पट आहे ते सुद्धा जराही चवीचा फरक न येता...तसेच कलाकंद आणि रसमलाई १०० ग्रॅम कलाकंद मध्ये १४ ग्रॅम प्रोटीन आणि फक्त २११ कॅलरीज. म्हणजे आता व्यायाम करणाऱ्यांनी आणि डायट करणाऱ्यांनी वजन कमी करण्यासाठी खुशाल याचा वापर करता येईल हे तर नक्कीच...म्हणूनच इथे 'डेझर्ट डाएट' सुद्धा उपलब्ध आहे. डेझर्ट डाएट ???? काय चाललंय या जगात ... कोणी विश्वास तरी ठेवला असतात का की दहा दिवस मिठाई खाऊन आपलं वजन ३ किलोने कमी होऊ शकतं म्हणून. ''दादा तुम्ही करता का डेझर्ट डाएट ?" या यशोधनच्या प्रश्नाला ठाम नकार देत माझ्यासाठी एक्झॉटिक व्हेज पिझ्झा आणि एक जंगली सॅन्डविच मागवले. नॉन वेज नाही तर नाही पण घास तरी घेतल्यासारखा वाटलं पाहिजे ना म्हणून मिळणार नाही हे माहित असूनसुद्धा थोडं तिखट कर रे बाबा अशी विनंती केली. एकूण काय तर शेफ यशोधनने सुरु केलेला हा कॅफे म्हणजे गोडघाश्यांसाठी एक पर्वणीच असावी. यशोधन ज्या साठी प्रसिद्ध आहे ते पाहता आमचं मन थोडं खट्टू झालं पण सीकेपी फूड फेस्ट लवकरचं येतच आहेत तिथे आडव्या हाताने सगळ्याचा समाचार घेऊ असे मनात आणून मिळाले ते गोड़ मानले आणि सोल्लासा च्या दर्जेदार पदार्थांचं आस्वाद घेतला. सध्या लोकसत्ता, मिड डे या सर्व वृत्तपत्रांमध्ये या देशमुख साहेबांच्या मुलाखती आणि लेख सुरु आहेत ते पाहून अभिमान वाटतो. खरंच सांगतो मंडळी हे सोल्लासाचं जगच थोडं वेगळं आहे आणि महत्वाचं म्हणजे हे कॅलरी कॉन्शस मंडळींसाठी तर वरदान आहे.
सोल्लासा चे इंटिरियर डिझायनिंग देवांगीं लाड या तरुण आणि हुन्नरी डेकोरेटर ने अतिशय सुंदर रित्या केलं आहे. सोल्लासाच्या या प्रवासात मिठाईच्या दुकानाला साजेसा एक हसरा आणि तुकतुकीत चेहेरा म्हणजे निखिल मथुरे आपल्या शेफ च्या मदतीला उभा आहे. धावण्याच्या मैदानावर आपल्या क्रीडा कौशल्याने मोठाले पुरस्कार जिंकणाऱ्या याच्या पत्नीच्या, म्हणजेच शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या अमृता च्या प्रवासासारखाच सोल्लासा या त्याच्या कॅफेचा वेग वाढत राहो हीच शेफ यशोधनला शुभेच्छा देता देता कलाकंद चा एक मोठ्ठाला पीस तोंडात कोंबला आणि नेहेमीच्या मसालेदार जगात परत आलो !
समीर गुप्ते









No comments:
Post a Comment