शिरीष कणेकर मला नावाने ओळखतात ही फुशारकी मारताना एक भलताच आनंद मिळतो. कदाचित अमिताभ बच्चन मला ओळखतो हे सांगताना सुद्धा इतका वाटणार नाही इतका अभिमान मला कणेकरांबद्दल वाटतो याला हजार कारणं आहेत. माझी फिल्लमबाजी आणि माझी फटकेबाजी या दोन प्रचंड लोकप्रिय स्टॅन्ड अप शो च्या अगोदर लोकसत्ता मधली कणेकरी हजारदा वाचून मोठ्या झालेल्या पिढीचा मी प्रतिनिधी. स्टॅन्ड अप शो ? होय , शिरीष कणेकर हे मराठीतलेच नव्हेत तर भारतातील पहिले स्टॅन्ड अप शो करणारे विनोदी लेखक असावेत. शिरीष कणेकरांच्या रविवारी येणाऱ्या लेखाची मटणाच्या जेवणापेक्षा आतुरतेने वाट बघणारी जी पिढी होती त्यातला मी एक. त्यांच्या लेखात भारतभूषण, प्रदीपकुमार, महिपाल, आय एस जोहर, अचला सचदेव यांच्यावर केलेल्या भाष्याने अक्षरशः हसून हसून डोळ्यात पाणी यायचं. थोडी खोचक, थोडी तिरकस तरीही वाचकांवर आणि प्रेक्षकांवर पक्कड घेणारी स्वतःची एक शैली, ज्याला पुढे कणेकरी हे नाव पडलं, असणाऱ्या या कलाकाराचे फॅन फॉलोइंग आजपर्यंत तितकंच जबरदस्त राहिलंय. पु.ल.देशपांडे यांच्या नंतर शब्दाच्या कोट्या करत वाचकांना खदखदून हसवणारा लेखक कोण असेल तर तो म्हणजे शिरीष कणेकर. राजेश खन्ना आणि ऋषी कपूर हे त्यांचे प्रिय कलाकार असावेत.राजेश खन्नाविषयी बोलताना शिरीषजी अक्षरशः तो प्रसंग समोर उभा करतात. चित्रपटातील अनेक डायलॉग्स, अनेक घटना यांच्या तोंडून ऐकताना हसूनहसून मुरकुंडी वळते. माझ्याबतीत सांगायचं तर कधी खूप स्ट्रेस्ड असलो की यांचं एखाद पुस्तक घ्यायचं आणि कुठूनही वाचायला सुरुवात करायची, पाचव्या मिनिटाला हा स्ट्रेस पाच मैल दूर गेला म्हणून समजा. माझ्या लेखनावर, विशेषकरून माझ्या सीकेपी खाद्यपदार्थावरच्या (फूड ब्लॉग्स) लेखनावर शिरीषजींच्या शैलीचा प्रभाव आहे हे मला अनेकांनी सांगितलंय.
काही दिवसांपूर्वी सीकेपी साहित्य संमेलनाच्या वेळी त्यांच्यासाठी माझ्या रेस्टोरेंट मधून आलेली चपाती खाताक्षणी 'वाह .. मऊसूत' आणि वालाचे बिरडे चाखताच 'अप्रतिम ' असे उद्गार काढून उत्तम जेवणाची पावती देणारा हा माणूस नुसताच खवय्या नाही तर खऱ्या अर्थाने दर्दी खवय्या आहे. चवीची उत्तम जाण असणारे कणेकर सीकेपी जेवणाबद्दलही खूप छान लिहितातआणि बोलतातही (मी आधी 'जेवणावर' छान बोलतात असं लिहिलं होतं, त्यांच्या भीतीने शब्द बदलला. मी त्यांना घाबरतो हे मी त्यांना आधीच सांगितलंय) ठाण्याच्या पहिल्या सीकेपी फूड फेस्ट ला आल्यानंतर त्यांनी जे वर्णन लिहिले आहे ते आजही व्हाट्सअपवर फिरताना दिसतं. 'सीकेपी लोकं नुसते खाणारे नसतात तर चवीने खाणारे असतात' असे एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगताना सीकेपी असल्याचं कौतुक त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होतं. सीकेपी फेस्ट ला आल्यावर माईक हातात घेऊन, तिथे आलेल्या खाण्यात दंग असणाऱ्या लोकांना थोडा वेळ खायचे थांबवण्याची ताकद मी ज्यांच्यामध्ये पहिली ते म्हणजे राजसाहेब ठाकरे, अवधूत गुप्ते आणि शिरीष कणेकर साहेब. एरव्ही तिथे असलेल्या खवय्यांना स्टेजवर कोण सेलेब्रिटी उभा आहे हे पाहायची पण फुरसत नसते.
शिरीष कणेकरांचं माझ्या केसांवर विशेष प्रेम आहे. खरंच सांगतोय. एकदा कल्याणच्या एका कार्यक्रमात स्टेजवरून बोलताना ते म्हणाले की " या समीर गुप्ते कडे पाहिल्यावर शाहरुख खानचीच आठवण येते हो " या वाक्यानंतर आता माझं काही खरं नाही हे मी समजून चुकलो होतो. तरीही धीराने त्यांचे पुढचे वाक्य ऐकले ''हो बघाना, समीर गुप्ते च्या आणि शाहरुख खानच्या वाढलेल्या केसांकडे पाहिल्यावर मी या दोघांना पुढून बघतोय की मागून बघतोय हेच कळत नाही" प्रेक्षकांच्या हशा आणि टाळ्या ऐकताना कणेकर माझे कौतुक करतायत की चंपी करतायत हेच कळत नव्हतं. एकदा ठाण्याच्या कार्यक्रमातही ''त्याच्या उंचीची आणि त्याच्याएवढी दिसणारी डॉक्टर असलेली मुलगी असताना हा माणूस कपाळावरचं कोणतं पाप घेऊन फिरतो बरं" या वाक्याने प्रेक्षकांमधे धमाल उडवून दिली होती.''तुम्ही याला केस कापायला नाही का हो सांगत" असे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या माझ्या आईला सांगताना घेतलेला पॉज आणि माझ्या आईचा चेहेरा मला आजही आठवतो. कल्याणच्या त्या कार्यक्रमाहून परत येताना गाडीमध्ये शिरीष कणेकर, राज-उद्धव यांचे मामा श्री चंदूमामा वैद्य, मित्र दीपक कर्णिक, श्री मिलिंद अधिकारी आणि मी अशी मंडळी होतो. त्या तासभराच्या प्रवासातल्या त्यांच्या धमाल गप्पा ऐकणे म्हणजे एक अविस्मरणीय आठवणच.
आज हे लिहिण्याचं कारण म्हणजे आज श्री शिरीष कणेकर यांचा ७५वा वाढदिवस आहे. चित्रपट, क्रिकेट आणि खवय्येगिरीवर लेखन करून गेली पन्नास वर्षे मनमुराद कसलं, पोट फुटेस्तव हसवणाऱ्या, एकला बोलो रे, एक्केचाळीस, गाये चला जा, गोली मार भेजेमें, गोतावळा, कुरापत, मखलाशी, यादोंकी बारात, टिवल्याबावल्या, डॉलरच्या देशा अशा अनेक पुस्तकांच्या या असामान्य लेखकाला आणि उत्तुंग कलाकाराला त्यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या आणि उदंड आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा ! आपली प्रकृती कायम ठणठणीत राहो आणि आम्हा रसिकांना आपल्या हास्य विनोदाच्या कार्यक्रमांची मेजवानी सतत मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्हा सर्व साहित्य रसिकांकडून आणि खवय्यांकडुन आपणास 'हॅपी बर्थडे' !
समीर गुप्ते
#samhere #sameer6949@gmail.com

No comments:
Post a Comment