Sunday, 28 October 2018

कानवले पुराण !


सीकेपी सुगरणीच्या पाककौशल्याचे आणि खाद्यसंस्कृतीचे वर्णन एकही शब्द न उच्चारता करण्यासाठी जो एकच पदार्थ पुरेसा आहे तो म्हणजे कानवला. तो नाजूकपणा, तो आकार, ती रंगसंगती, ती लयबद्ध मांडणी आणि ज्या साठीच दिवाळी याविषयी जास्त प्रेम वाटते तो मोहक पदार्थ म्हणजेच आपले कानवले - सीकेप्यांचे खाजाचे कानवले.
चकली, चिवडा, बेसन लाडू, रवा लाडू, अनारसे, शंकरपाळे, शेव, कडबोळ्या अशा एकसोएक पदार्थांनी नटलेल्या तरीही रंगाच्या उधळणीची कमी असल्यासारखे वाटणाऱ्या फराळाच्या ताटाचे रूप एका क्षणात पालटण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती सीकेप्यांच्या कानवल्यात. मी आत्ताच 'फराळाचे ताट' म्हणून जो उल्लेख केला ती प्रथा काहींनी जपली असली तरी आता जवळपास संपली. पण अगदी काही वर्षांपूर्वी आमच्या वाडा - आळी संस्कृतीमध्ये दिवाळीत आजूबाजूच्या घरातून फराळाचे ताट आपल्या घरात यायचे आणि आपलेही त्यांच्याकडे जायचे. आलेल्या ताटाकडे ( कधी मिळेल ते ) बघण्याची एक पद्धत असायची. म्हणजे एकतर ज्यानी ते ताट आपल्या घरात आणले ती जाईपर्यन्त त्या ताटावरचे गोलाकार विणकाम केलेले कापड न काढण्याची आणि टक लावून त्या ताटाकडे न बघण्याची ताकीद आधीच दिलेली असायची. 'उगीच हावरटासारखा बघू आणि वागू नकोस हे वाक्य' साधारणपणे आईच्या डोळ्यातूनच ऐकायला यायचे. त्यामुळे ताट घेऊन आलेल्या त्या काकीशी - मावशीशी आपली आई उगीच काहीतरी बोलत बसून आपला फराळाचा वेळ फुकट घालवू नये असे मनोमन वाटायचे - पण शेजारणीच त्या, बोलतच बसायच्या. आमची चकली कशी नरम पडत होती, वाण्याकडून आणलेले पोहे कसे आकसले, रेशनची साखर किती बारीक, वाण्याची साखर किती महाग, तुझ्याकडे रांगोळीचं पुस्तक आणि ठिपक्यांचा कागद आहे का? झाला का साहेबांचा बोनस - मग पाडव्याला पटोला कि कांजीवरम इतक्या नको नको त्या गप्पा करत बसायच्या. मधेच उगीचच माझ्याकडे बघून 'फटाके आणलेस का रे ?' असं बोलायच्या. 'अग बाई, मला जे हवंय ते तू घेऊन आली आहेस ना - मग ठेव ते आणि निघ' हे तोंडावर आलेलं वाक्य हजारदा गिळलंय मी. खरं सांगतो, कधी कधी तर त्या बायकांबरोबर येणारं त्यांचं लहान मूल तर हातात चकली घेऊनच खात खातच यायचं.. पण शिस्तीचे नियम मात्र आपल्यालाच लागू. मात्र एकदा का ती काकी घरातुन गेली रे गेली कि त्या ताटातल्या ठराविक जिनसांचा फडशा पडला म्हणून समजा. त्यात अग्रक्रमाने कानवले, मागोमाग अनारसा, मग एखादी चकली वगैरे वगैरे. कानवले करणाऱ्या, म्हणजे कानवले सुबकतेने करणाऱ्या बायकांचा खूप बोलबाला असायचा, आजही आहे. तेव्हा वाड्याच्या ओसरीवर - ओटीवर बसलेल्या गप्पांमध्ये असायचा आता फेसबुकच्या ग्रुपवरती असतो इतकाच काय तो फरक. माझी मुलुंडची सुमन काकी जे काही कानवले बनवायची त्याला आजही तोड नाही. आमच्याकडे माझी आई नोकरी करत असल्यामुळे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी फराळ बनवण्याचा धडाका असायचा पण कानवले बनलेले मात्र फारसे आठवत नाहीत .. कदाचित न मिळालेल्या पदार्थाचं जास्त कौतुक असतं तसं काहीतरी माझ असावं. आज जसा दिवाळीचा फराळ सर्रासपणे विकत मिळतो ती सोय तेव्हा नव्हती, कदाचीत असल्यास आमच्या पर्यंत पोचणारी किंवा झेपणारीही नव्हती. दिवाळीत फराळाची देवाण घेवाण करताना आलेल्या काही पाकिटात चिवड्याबरोबर कानवला ठेवलेला दिसला कि मात्र राग यायचा.. एकतर त्याचे सगळे पापुद्रे तुटून सगळे सौन्दर्य गेलेला नुसता पंधरा कपडा गुंडाळल्यासारखा तो केविलवाणा कानवला चिवड्यात दडलेला दिसायचा त्यामळे त्याची मजा नाही आणि कानवल्याचा चुरा होऊन तो चिवड्यात मिसळलेला म्हणून त्या तिखट चिवड्याचीही वाट लागलेली असायची. कोण खाणार ते.
पण एकूणच कानवले बनवणे ही एक अनन्यसाधारण कला आहे आणि ती अगदी काहींनाच आत्मसात आहे. नेहेमीचे कानवले, चटईचे कानवले अशा वेगवेगळ्या प्रकारात मोडणाऱ्या त्या कानोल्याचा प्रवास छानशा तयारीने सुरु होतो, त्यातल्या एक एक पदार्थाची खरेदी आणि तयारी इतकी मनापासून होते की काय सांगा. 'या रविवारी आमच्या कडे कानवले' हे वाक्य दिवाळीसणाच्या तयारीची नांदी देणारं असतं. परवा एका कार्यक्रमात, म्हणजे कानवल्याचे प्रात्यक्षिक सुरु होते त्या कार्यक्रमात मी तिथे उपस्थित महिलांशी संवाद साधला तेव्हा त्यांना पाककृती आणि पाककला यांच्यातला फरक सांगितला. सर्व पदार्थ त्या त्या प्रमाणात घेऊन, ठरलेल्या पद्धतीने शिजवून, त्यानंतर त्यावर इतर सोपस्कार करत ठरल्या वेळेत बनवून सादर करणे म्हणजे 'पाककृती'. आणि ही 'पाककृती' करताना तो पदार्थ बनवणार म्हणून मनात निर्माण झालेला आनंद, नंतर त्या पदार्थांची हाताळणी, ती नजाकत, ती शैली, ते लालित्य, तो कमालीचा आत्मविश्वास, तो चेहेऱ्यावरचा प्रसन्न भाव आणि शेवटी त्याची सुंदर व मोहक मांडणी याला म्हणतात 'पाककला'. कानवले बनताना या पाककृतीचा आणि पाककलेचा कस लागतो आणि मग समोर येतो तो तुमच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवणारा खाजाचा -पिठीचा कानवला. बऱ्याचदा एखाद्या खाद्य पदार्थाने एखादा समाज ओळखला जातो. पण सीकेपी घरातल्या अनेक पदार्थानी आणि संपन्न खाद्यसंस्कृतीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यातच गप्पा गप्पांमध्ये कधीतरी कोणा रसिक खव्य्यांकडून 'अरे तुमचे सीकेप्यांचे कानवले फार सुंदर रे' असे शब्द कानावर आले का आपणसुद्धा आनंदाने मनोमन अगदी खुलून जातो - फुलून जातो ... त्या नाजूक रंगीत कानावल्यांच्याच पापुद्रयांसारखे.
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
फोटो सौजन्य - मरूधन स्टोर्स

No comments:

Post a Comment