Friday, 11 November 2016

# My मराठी



भाषा... म्हणजे मराठी भाषा कशी टिकवावी हा एक मोठा प्रश्न आहे. काही प्रसंगी ऐकूनच बेशुद्ध पडू अशी भाषा आपल्याच माणसांकडून आणि आपल्यासमोरच सर्रास बोलली जाते.

प्रसंग एक -
स्थळ : माझेच घर ..
साधारण १० वर्षांपूर्वीची गोष्ट.  माझी मुलगी शाळेतून घरी आली. मी, माझी बायको, आई - बाबा असे सर्व तिची वाट पाहत बसायचो तसे त्या दिवशी पण बसलो होतो. ही आली आणि दप्तर सोफ्यावर भिरकावले. "मम्मा,आजपासून नवीन टीचर आली आहे - आमची सगळ्यांची फुल फाटलीये " असा बोलून ती धपकन सोफ्यावर बसली. हे वाक्य ऐकल्यानंतर मी आणि बाबा माझ्या मुलीकडे, बायको माझ्या आईकडे आणि आणि आई माझ्याकडे पाहू लागली. घरात पूर्ण सन्नाटा. मी आईकडे पाहताच आईने स्वतःला स्थिर ठेवत, शक्य तेवढ्या शांतपणे  "तिला फाटली या शब्दाच्या मागे कोणता शब्द आहे ते समजावून सांग मग तिला कळेल" अस म्हणताच "आजी, हे काय सांगणार मला, टीचर इतकी डेंजर आहे कि हे शाळेत आले तर यांची पण फाटेल". आता मात्र कमाल झाली. कस या मुलीला समजावू कि हे सगळं बोलणं चांगलं नाही..कुठे शिकली हे सर्व.

प्रसंग दोन -
स्थळ : माझी माजी बँक..
कुठल्यातरी तरी कर्जासाठी लागणारा महत्वाचा कागद घेऊन मी बँकेत गेलो होतो. केबिन मध्ये पाहिलं तर व्यवस्थापक साहेब काही लोकांबरोबर बोलत हॊते. त्यांना व्यत्यय नको म्हणून कर्ज विभागातल्या एक जुनिअर क्लार्क असलेल्या मुलीच्या हातात कागद देऊन आठवणीने साहेबांच्या सुपूर्त करावयास सांगितला. इतक्यात काहीही कारण नसताना बाजूच्या टेबलावरून एक सिनिअर मुलगी काम करता करता तिला म्हणाली ' ए बाई, विसरू नकोस मागच्यासारखी.. नाहीतर साहेब परत चढतील तुझ्यावर"... पुन्हा एक सन्नाटा...पण या वेळी फक्त माझ्या मनात .. त्या दोघीनांही यात आपण काही वेगळं बोलतोय याची सुतराम जाणीव नव्हती...'चिडतील' या शब्दाची जागा 'चढतील' या शब्दाने घेतली होती ... मी वळून साहेबांकडे पाहिलं...काही न बोलता बँकेतून बाहेर पडलो.

मराठी भाषेवरच्या इंग्रजी आक्रमणामुळे तर जे काही ऐकायला मिळतं काय सांगू.  'तुझ्या पॅंटीवर डाग लागलाय, शर्टाला व्हाईटनेसपणा पाहिजे ,तापामुळे खूप विकनेसपणा आलाय, मॉर्निगवॉक साठी चालायला गेलेत, केटरिंगची मोठी ऑर्डर मारली, वयामुळे आईच्या डोळ्यांची साईट वीक झालीये, उगीच डोक्याला हेडेक नको, पुढे जाऊन डावीकडे लेफ्ट घ्या, मोबाईल चा रिचार्ज मारला' हे नवजात शब्दसंच तर इतके अंगवळणी पडलेत कि ते आपल्या भाषेचाच एक भाग आहेत असा वाटायला लागलंय. कोकणातल्या काही घरात तर झोपताना  'दिवा विझव' म्हणण्या ऐवजी 'लाईट काढ' असं बोलताना मी स्वतः ऐकलंय. एक ना दोन ..अनेक प्रसंग, अनेक शब्द असे आठवतात की जर भाषेला आत्मा असेल तर तर त्याचा पण थरकाप उडेल.

मुंबईत राहणाऱ्या अमराठी लोकांची मराठी हा एक वेगळा विषय आहे. अतिशय प्रयत्नपूर्वक मराठी बोलून ते व्यवसाय करतात हे कौतुकास्पद आहे. पण कधी कधी मोठे विनोदही घडतात.

माझ्या ओळखीतले एक कन्नड गृहस्थ 'अचानक' हा शब्द इतक्यावेळा आणि इतक्याठिकाणी वापरतात काय सांगू. म्हणजे "उद्या संध्याकाळी ५ वाजता तुम्ही अचानक माझ्या ऑफिसला या. चहा पाणी पिल्ला कि आपण इंजिनीअर ला कळवून अचानक साईटवर जाऊ आणि गाडी पार्किंगमध्ये ठेवा, येतेवेळी तुम्हाला  खाली सोडून मी अचानक वर जाईन." हे संभाषण जर कोणी ऐकलं तर त्याला अचानक काहीतरी व्हायचं. हा कन्नड माणूस मराठी इतकं चांगल बोलतो म्हणून कौतुक करावं की मराठीची 'अचानक' वाट लावतो म्हणून झोडून काढावं कळत नाही.

जवळपास अमराठी वस्ती असलेल्या घाटकोपर, मालाड इथे राहणाऱ्या गुजराती माणसांनी पूर्ण शिकल्याशिवाय मराठी बोलूच नये या मताचा मी आहे. मी राहतो तिथे म्हणजे खारकर आळीत हा समाज खूप मोठ्या संख्येने आहे. अस्सल मराठी वस्तीत राहिल्यामुळे त्यांच्यावर मराठीचे संस्कार चांगले आहेत. तरीपण  दुसऱ्या गुजराती माणसाला माझी ओळख करून देताना काय सांगतात माहीत आहे "हे लै मोठा मानूस हाय..हेचा लै मोठ्ठा होल हाय - फुल्ली ऐरकंडिसन - चार पाच से माणस आरामसुन मावते .. सोरी एक नाय हा सोरी..  ४-५ होल हाय''...अरे कशाला...त्याला गुजराती मध्ये सांग ना. एकाच वेळी माझी, मराठीची आणि इंग्रजीची का वाट लावतोस. पण उत्साह दांडगा  मराठी बोलण्याचा.
 
याच्या बरोब्बर विरुद्ध ठाण्याच्या हरी निवास सर्कलवरचा क्वालिटी पेंटवाला सरदारजी - माझा मित्र परमजीत. इतकं सहज, सोप्प आणि अस्खलित मराठी बोलतो कि तुम्हाला वाटावं हा दाढी वाढवून फेटा बांधलेला गोडबोले किंवा केळकर आहे. माझा अनुभव हा आहे की एकूणच मुंबई पुण्यातली ही सरदार मंडळी मराठी उत्कृष्ट बोलतात.

एक मात्र नक्की..या सर्व मंडळींनी आपल्या मराठी भाषेला जवळ करून भाषेला नसलं तरी मराठी मैत्रीला समृद्ध केलंय. भाषा टिकवायला ती चलनात असणं गरजेचं आणि भाषा जपायला ती वापरणाऱ्या सर्वांचं कौतुक करत आपण त्यांचं करेक्शन करणं महत्वाचं.

समीर गुप्ते
samhere#sameergupte.blogspot.com#sameer6949@gmail.com

Wednesday, 2 November 2016

"सीकेपी म्हणजे ....."

सीकेपी म्हणजे फक्त खाणारे पिणारे असे समजणाऱ्या मंडळींसाठी सीकेपी समाजाची थोडीशी ओळख !

"सीकेपी म्हणजे ....."

या एक दोन महिन्यातील वेगवेगळ्या मोर्चांच्या वातावरणामुळे हल्ली लोक खूप चौकशी करू लागलेत हो. म्हणजे,तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही सीकेपी सीकेपी म्हणजे नक्की कोण वगैरे. उत्तरादाखल मी सांगतोच की आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी. साधारणपणे ठाणे मुंबई बाहेरच्या लोकांना हा प्रश्न पडतो. "अच्छा म्हणजे तुम्ही मच्छी खाणारे ब्राह्मण का ?" हे ऐकून तर मला गंमतच वाटते. अहो मच्छी खाणाऱ्या काही ब्राह्मणांनी आम्हाला कधीच मागे टाकलंय. आम्ही सोमवार गुरुवार तरी पाळतो. पण आमचे हे दाते, कुलकर्णी, रिसबूड,जोशी, देशपांडे या आडनावांचे घट्टमित्र तर सगळेच वार सारखेच म्हणत आम्हा सीकेप्यांनाच कुठे काय 'बेस्ट' मिळतं हे सांगतात. म्हणून वाटलं कि या चौकस मंडळींना थोडं आपल्याविषयी सांगावं. खरंतर जातीपातीचे दिवस आपल्या दृष्टीने काही दशकांपूर्वीच संपले असले तरी आपली ओळख देताना काही गोष्टी सांगणे गरजेचं. बघा तुम्हाला पटतंय का... सीकेपी म्हणजे .....

सीकेपी म्हणजे बाजीप्रभूंचा आवेश,
सीकेपी म्हणजे बाळासाहेबांचा आदेश,
सीकेपी म्हणजे गडकऱ्यांचे प्याले,
सीकेपी म्हणजे आमचे खळे काका आणि मोहिले

सीकेपी म्हणजे अवधूतच गाणं,
सीकेपी म्हणजे दिलखुलास जगणं,
सीकेपी म्हणजे नितांत सौंदर्याच लेणं,
सीकेपी म्हणजे बुद्धिमत्तेच खणखणीत नाणं

सीकेपी म्हणजे रविवारच मटण,
सीकेपी म्हणजे बोम्बलाच कालवण,
सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा घट्ट रस्सा,
सीकेपी म्हणजे चवदार हातांचा रुचकर वारसा

सीकेपी म्हणजे निष्ठा ,
सीकेपी म्हणजे विश्वास,
सीकेपी म्हणजे भरवसा,
सीकेपी म्हणजे प्रगत समाजाचा खराखुरा आरसा

सीकेपी म्हणजे नितिमत्ता,
सीकेपी म्हणजे गुणवत्ता,
सिकेपी म्हणजे सीडीं ची विद्वत्ता,
सीकेपी म्हणजे क्रांतिकारी विचारांची सुबत्ता,

सीकेपी म्हणजे धैर्य,
सीकेपी म्हणजे शौर्य ,
सीकेपी म्हणजे संकटांशी दोन हात,
सीकेपी म्हणजे ताठ मानेने जगणाऱ्यांची जात

देशाच्या उभारणीत हिरहिरीने भाग घेणारा,कला क्रीडा मनोरंजन क्षेत्रात आपली अनोखी छाप पाडणारा, सरकारी प्रशासकीय सेवेत सदैव अग्रस्थानी असलेला पुरोगामी विचारांचा सुशिक्षितांचा हा समाज. स्वाभिमान आणि देशाभिमानापेक्षा जगात काहीही मोठं नाही हे जन्मापासूनच मनावर बिंबवलेला हा आमचा समाज. अल्पसंख्यांक असूनही आरक्षणापेक्षा देश रक्षणासाठी लढणारा आमचा हा समाज. आपल्या संभाषण चातुर्याने, बुद्धिवादाने आणि अर्थातच पाककौशल्याने इतर सर्व समाजबांधवांची हृदये काबीज करणारा हा आमचा समाज. खऱ्या अर्थाने नाती जोडून मैत्रीचे बंध दृढ करणारा आणि या देशाच्या इतिहासात अनेक गौरवास्पद पदे भूषविलेल्या दिग्गजांचा हा समाज. सर्वात महत्वाचे म्हणजे... तुमची जात, तुमचा धर्म कोणताही असो, चांगल्या कामासाठी आजही तुमच्यासाठी आणि तुमच्यापाठी भक्कमपणे उभा राहणारा, तुमच्या दुःखात हळहळणारा आणि सुखात समरस होणारा आमचा हा समाज. अजून काय सांगू.

एक लाख नसू कदाचित..पण लाखात एक नक्कीच आहोत!

माझ्या सर्वधर्मीय समाजबांधवांना, मित्र परिवाराला आणि तमाम देशबांधवांना आम्हा सर्व सीकेपी समाजबांधवां तर्फे हार्दिक शुभेच्छा.

समीर गुप्ते, ठाणे.
samhere#sameergupte.blogspot.in#sameer6949@gmail.com
( आवडलं तर फॉरवर्ड करा ...माझ्या नावासहित केलं तर मला पण आवडेल)

Thursday, 22 September 2016

ग्रँड मराठा

माझ्या तमाम मराठा समाजबांधवांचं मनस्वी अभिनंदन !
समाजबांधव यासाठी म्हणालो कि मी जरी जन्माने सीकेपी असलो तरी  भारतातल्या अमराठी राज्यात माझी ओळख महाराष्ट्रातील मराठा म्हणूनच असते. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या आलिशान अशा ' ITC ग्रँड मराठा' या हॉटेलमध्ये पाय ठेवल्यावर का कोणासठाऊक पण अभिमानाने त्या नावाकडे  परत परत पाहावेसे वाटते. वडील आवर्जून 'मराठा' नावाचे वर्तमानपत्र वाचत असत.घरी टीव्ही आल्यापासून गणतंत्र दिवस परेड मध्ये मराठा लाईट इन्फ्रंटरी चे करारी जवान पहिले कि आपल्यातलाच कोणीतरी सैन्यात असल्याचा अभिमान वाटायचा. जन्माने नसलो तरी मनाने तुमच्या समाजाशी खोलवर जुळल्याची भावना अजूनही तितकीच दृढ आहे. अभिनंदन तुमच्या शिस्तबद्ध आणि शांतता पूर्वक मोर्चासाठी. तुमच्यातलेच काही इतर पक्षांच्या मोर्चांमधे सहभागी होताना फारच बेशिस्त आणि अहिंसक वागतात हे कटू सत्य आहे पण याला छेद देत तुम्ही राष्ट्रीय संपत्तीचं कोणताही नुकसान न करता काढलेला मूक मोर्चा कौतुकास्पदच आहे..इतरांनीही निश्चितच शिकण्यासारखा आहे. असो.

वर वर पाहता अनेक मागण्या आहेत तुमच्या, पण नीट पाहता हा लढा आणि विषय तुमच्या आरक्षणाचा आहे. तो मांडा तुम्ही. आम्ही कोण नाही म्हणणारे. कदाचित काही क्षुल्लक मतांसाठी राज्यकर्ते तुम्हाला आरक्षण देतीलही आणि त्या नंतर तुम्ही आमच्यापेक्षा थोडे वेगळे असाल.  आपल्या वाट्याचं अजून काही तरी हिरावून घेतल्याची भावना आमच्या खुल्या वर्गातल्या उगवत्या पिढीला येईलच... पण समजूत काढू आम्ही त्यांची. या सर्व गडबडीत नाही म्हटलं तरी थोडा दुरावा येईलच आपल्या मैत्रीत पण तुम्ही मनाची तयारी ठेऊनच उतरला असाल या आरक्षणाच्या लढाईत. मैत्रीचं काय मोठं.  

खरं तर तुम्हा लढवय्यांची खरी ओळख आरक्षणापेक्षा संरक्षणाच्या लढाईसाठी होती,आहे आणि अखंड राहील. आमच्यासारख्या पिढीजात सरकार दरबारी इमाने इतबारे तुमची चाकरी करणाऱ्या मंडळींनी मराठा समाजाला कायम राज्यकर्ते म्हणूनच पाहिलंय. आमचे राज्यकर्ते,आमचे पालनकर्ते, आमचे शासनकर्ते, आमचे रक्षणकर्ते कधी तरी उठून आरक्षण मागतील हे स्वप्नातही नव्हते. पण ठीक आहे .. स्पर्धेच्या या युगात प्रत्येकाला स्वतःचे भविष्य घडवायचा अधिकार आहे आणि त्यासाठी कोणता मार्ग निवडावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आरक्षण मिळाल्यावर खरं पाहता तुमच्यातल्या अगदी थोडक्यानाच त्याचा लाभ होणार आहे पण त्यासाठी लढा तुम्ही सर्वच एकजुटीने  उभारताय हि पण साधी गोष्ट नाही.

लहानपणी पाहिलेला भालजी पेंढारकरांच्या छत्रपती शिवाजी या चित्रपटातील एक सिन आठवला. राजे पन्हाळ्यावरुन निसटले. घोडखिंडीत आल्यावर बाजीप्रभूंनी त्यांच्या निग्रही शब्दात महाराजांना विशाळगडाकडे निघायला सांगितले. राजे सर्व मावळ्यानिशी जोहरचा सैन्याचा मुकाबला करू इच्छित होते पण बाजी प्रभू देशपांड्यांच्या '' विजापुरी सेनेचा लोंढा खिंडिपार झाला तर सारी मराठेशाही  वाहून जाईल, या नोकराच्या इमानाची तमा बाळगा आणि विशाळगडावर सुखरूप पोहचा '' या आदेशरूपी विनंतीला मान देत त्यांनी पुढे जायचे ठरवले. भावविवश होऊन बाजी प्रभू चा निरोप घेतं असताना महाराजांच्या तोंडी स्मरणात राहणार एक वाक्य आहे "बाजी, मराठेशाहीचे मंदिर तुमच्या सारख्यांनी बांधलं " पुढे जे घडलं ते केवळ ऐतिहासिक आणि रोमांचकच. अतिशय अटीतटीच्या त्या लढाईत बाजी प्रभु देशपांडे यांनी स्वतःला त्या घोडखिंडीत "आरक्षित" करून स्वतःच्या प्राणाची आहुती देत महाराजांना आणि पर्यायाने मराठेशाहीला "सुरक्षित" ठेवले. चित्रपटात महाराजांच्या तोंडी  टाकलेल्या या वाक्याने,माझ्या समाजाचे स्फूर्तिस्थान असलेल्या बाजीप्रभूंसाठी असलेला आदर कमालीचा वाढून माझी छाती फुलून गेली. इथे या प्रसंगात बाजीप्रभू देशपांडे जन्माने कायस्थ असले तरी कर्माने मराठा होते. तुमचं आमच नातं इथून सुरु होतं मित्रानो.

असो, इतिहासतल्या गोष्टी ह्या शिकून मार्क मिळवण्यासाठी असतात, समाज जोडण्यासाठी नसतील बहुदा. आम्ही सीकेपी, बाजीं प्रभूंचे वंशज, संख्येने अल्प जरी असलो तरी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणारे नक्कीच नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर, कौशल्यावर आणि बुद्धीच्या बळावर फक्त आपल्याच नाही तर इतर समाज बांधवांचाही आणि आधुनिक मराठेशाहीचा - अर्थात महाराष्ट्राचा उत्कर्ष करण्याची स्वप्ने आम्ही पाहतो. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगत 'मर्द मराठा' असे बिरुद अभिमानाने मिरवणारी भोसले, जाधव, म्हात्रे, घोरपडे, मालुसरे अशी अनेक नावे आमच्याच काय तर मराठी मातीत जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या हृदयात कायमस्वरूपी सन्मानाने 'आरक्षित' आहेत ... ती सरकारी कागदपत्रावर नोंदवून घेण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !

इतिहासात तुमची ओळख लढवय्ये म्हणूनच आहे ...लढा कसला का असेना ... जिंकलंच पाहिजे तुम्हाला.. हरणारा आपला असला तरी काय फरक पडतो ?

राजकारणाला बाजूला ठेऊन लिहिलेला हा लेख  क्षणभर राजकारणाच्या पलीकडे जाऊन वाचाल ही अपेक्षा

जय महाराष्ट्र !

Monday, 19 September 2016

बायको !


गेले दोन तीन दिवस पाहतोय. तुम्ही पण पहिली असेल. फेसबुक आणि व्हाट्सअप वर एक पोस्ट खूप फिरतेय. हिरव्या , पिवळ्या, लाल, लवंगी, ढोबऱ्या अशा  वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचा असलेला एक फोटो आहे आणि त्या खाली लिहिलंय ..'शोधा पाहू यातली आपली बायको कोणती आणि मिळवा मोठे बक्षीस' वगैरे. मला पण पाहताना खूप मजा आली आणि शोधू लागलो आपली बायको कोणती ते. हं हो, तीच ती जी जाडसर आणि पिवळट दिसते ती.... का ती लाल भडक तेज दिसते ती...कोणती म्हणायची ? काहीच  ठरवता येईना. म्हणून मोबाइल बाजूला ठेवला आणि विचार करू लागलो. विचार हाच कि काय मूर्खासारखा विचार करतोय मी.. बायकोची तुलना डायरेक्ट मिरचीशी ? बरं मिरचीचं असेल तर जाड पिवळी ढोबरी का ? लग्न करून घरी आणली तेव्हा तर नाजूक, सडपातळ, हिरवीगार ,टवटवीत तर होती ती. चायला आपणच तर नाही ना तिला लाल पिवळी ढोबरी आणि अशी कोमेजलेली बनवली. एक ना दोन ..अनेक विचार.

कसं आहे ना , कि बायको हा बऱ्याच जणांच्या थट्टेचा आणि मित्रमंडळींच्या बैठकीतील हमखास निघणारा विनोदाचा विषय असतोच असतो. आपली बायको कशी वेंधळी आहे, इतक्या वेळा सांगून पण अजून बावळटपणा जात नाही, इतकी शिकलीये पण अक्कल काडीची नाही, तिच्या मैत्रिणी कशा मॉडर्न आहेत, बावळट दिसणारी मेव्हणी  काय हुशार निघाली रे पण हि बया तशीच आणि  तिला न सांगताच कसं आजच्या पार्टीला आलो - आता बसली असेल वाट बघत हे सर्व रंगवून सांगण्यात धन्यता मानणारा एक मोठा वर्ग आहे. हा मिरच्यांचा फोटो पण याच वर्गातून , याच मानसिकतेतून आलाय हे नक्की.

'हि बायको नसती तर'  ह्या विषयावर निबंध लिहायची वेळ आली तर कदाचित शंभर पानी वही पण कमी पडेल तुम्हाला. खरंच खूप काही लिहावं लागेल हो. हिच्याशीच लग्न जमवण्यासाठी केलेली खटपट, लग्न जमल्यानंतरच्या भेटी गाठी, तिचा रागवा रुसवा, लाडाने तिची केलेली मनधरणी, लग्नासाठी तिच्या आवडी निवडी पाहून केली खरेदी, तिच्या येण्यासाठी आतुरलेले तुमचे घर, तिला आवडणाऱ्या रंगसंगतीचे पडदे, तुमच्या बजेट च्या पलीकडे जाऊनहि निवडलेले तिच्या आवडीचे हनिमून डेस्टिनेशन हे सगळं नक्कीच आठवेल बघा. घराची जमवाजमव करताना तिची पसंद, आपल्या घरच्यांना लावलेला लळा, आपलया मित्रमंडळींच्या आग्रहाखातर तिने बनवलेल्या काही खास पाककृती, अगदी तुमच्या कपड्यांमध्ये, केसांच्या ठेवणीमध्ये झालेला फरक, तुमच्या खाण्यापिण्याचे सांभाळलेले चोचले हे तर नोंदवावे लागतीलच त्या वहीत. कामावरून आल्यानंतर तुमच्या कानात सांगितलेली  ती गोड़ बातमी,  तुमच्या घरात येणाऱ्या  नवीन पाहुण्यासाठी केलेली जय्यत ती तयारी आणि तो आल्यानंतर त्याच्याकडे  पाहणारी तिची कैवल्यपूर्ण नजर, ते बाळ मोठ होत असताना त्याच्याकडे वटारलेले डोळे आणि तुमच्या त्या राजपुत्राने मिळवलेल्या भव्य यशानंतर तिच्या डोळ्यातले ते कृतार्थ भाव पण तर लिहावे लागतील त्या निबंधात. प्रपंच वाढताना केलेल्या परिश्रमांची आणि तडजोडींची मोजदाद तर ठेवलीच असेल तुम्ही .. नवीन घराच्या साठी दागिने दिले असतील तिने डोळ्यातले पाणी लपवत, लेकाला अमेरिकेला पाठवताना राहिल्या असतील अनेक पैठण्या दुकानाच्या शोकेसमध्येच, तिच्या आईसाठी नसेल पण तिच्या रक्ताचं नातं नसलेल्या तुमच्या आईसाठी तर नक्कीच जागली असेल अनेक रात्री हॉस्पिटलच्या बाकड्यावर... जागा आहे ना वहीत ..खूप लिहावं लागेल अजून.

अनेक लग्नसमारंभांना गेला असाल ना तुम्ही दोघे. मित्रांच्या कोंडाळ्यात बसून पहिले असेल तुम्ही तिला रुखवताकडे पाहताना. कशी वेगळीच दिसत होती हो  ती.  किती प्रेमाने सांगत होती सगळ्यांना तुम्ही भेट दिलेल्या त्या साडीबद्दल. साधी मोत्याची माळ तर घातली होती तिने पण सगळ्या गर्दीत आज कशी उठून दिसत होती.  श्रावणातल्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेत तुमच्या बाजूला बसून पदर डोक्यावर घेऊन तुळशीची ची पाने वाहताना तुमच्या हाताला केलेला स्पर्श आठवतो  का...झर्र्कन एक वीज स्पर्शून गेल्यासारखा. गाडीच्या प्रवासात न विसरता थर्मासमध्ये भरून घेतलेला तुमच्या आवडीचा मसालेदार चहा तुम्हाला भरून देताना किती कौतुकाने पाहत हॊतात हो तुम्ही तिच्याकडे. तुमची पहिली स्कुटर घेतली तेव्हा मागे बसून थोडीशी तुमच्यावर रेलून, तुमच्या उजव्या खांद्यावर हळुवार हात ठेऊन तुम्ही स्कुटर चालवताना छान दिसता हे सांगणारी हीच तर होती ... काही पाने या गुलाबी आठवणींची पण लिहाल तुम्ही.

पण याबरोबरच अकारण प्रगट झालेला तुमचा राग, तुमचा संताप, तुमची  बोलणी, तुमची चिडचिड, प्रसंगी तुमची अपमानास्पद हाडहूड सहन करत सुद्धा तिने स्वतःच्या स्वाभिमानाला आणि अस्तित्वाला विसरून घरातील सर्व वातावरण सुरळीत पूर्वपदावर आणलेले क्षण शब्दांत मांडाल का हो या निबंधात. राहू द्या, नाही जमणार तुम्हाला.

शोधा परत त्या मिरचांच्या फोटोमध्ये तुमच्या बायकोला ..नक्की तिथेच मिळेल ती.. आयुष्यात वाटेला आलेला सर्व तिखटपणा शोषत तुमचा संसार गोड करणारी...मग लाल, पिवळी, ढोबरी आणि जाड का असेना.

समीर गुप्ते.

Sunday, 11 September 2016

स्वप्न मराठमोळी !

"चवदार मराठा" या आलिशान अस्सल मराठी  रेस्टोरेंट कम बार मधून काल रात्री पार्टी केल्यावर घरी येऊन छान झोपलो होतो. कधी सकाळ झाली कळलंच नाही. सकाळी सकाळी दारावरची बेल वाजली ... कामधेनू डेअरीचे मालक गायकवाड काका स्वतः दुधाची पिशवी ठेऊन लिफ्ट मध्ये शिरताना दिसले. काका आज तुम्ही ? ''हो रे, गणपती आहे ना, आज एक मुलगा नाही आला " असे म्हणत ते लिफ्ट मध्ये शिरले.  मी पुन्हा झोपायला गेलो. पुन्हा बेल वाजली .. वरच्या मजल्यावरचे तांबे..आज त्यांच्या मोबाईल शोरूम च्या उदघाटनाची आठवण देण्यासाठी सगळ्यांची बेल मारत उतरत होते. काही मिनिटे जातायत न जातायत तोवर पुन्हा बेल घणाणली ... चायला आता कोण असे म्हणून दार उघडले तर नाना पाटलाचा म्हणजे आमच्या इस्त्रीवाल्याचा धाकटा मुलगा हातात कपडे घेऊन समोर उभा .. काय कामाला लावतो हो नाना या लहान मुलांना. आता दरवाजा हलकेच ओढून मी तयारीला लागलो. घरात पण सणानिमित्त काम काढले होते. आमच्या जाधवमामानी...म्हणजे वयाने फार मोठा नाही हा जाधव पण याला सगळे मामाच म्हणतात..सुतार कामाचे म्हणजेच फर्निचरचे काम सुरु केले होते. तो पसारा कमी कि काय म्हणून  परममित्र उम्या देशमुख नि  पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन घराच्या भिंती खरवडायलापण सुरुवात केली होती. कामाला  जायचा तसा मूड नव्हता पण आमचे सारथी (ड्रायव्हरला खुश करणारा समानार्थी शब्द हो) जोशी काका चावी घेऊन खाली गेलेत हे कळलं होतं. काही महत्वाच्या कामासाठी  ऑफिसला जायलाच हवे होते. बायकोला टाटा करून निघताच ''दरवाजा उघडाच ठेव, प्रकाश मच्छीवाला यायची वेळ झाली आहे' असे म्हणाली. इमारतीच्या खाली उतरताच सिक्युरिटी वाल्या शिंदेनि कडक सलाम ठोकला... दसरा दिवाळी जवळ आली कि हि मंडळी जरा जास्तच जवळीक साधतात.

गाडीत बसून निघालो.. नेहेमीप्रमाणे मुंडे  पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून गाडी परळ कडे निघाली. मुंबईच्या ट्रॅफिक ला तोंड देत ऑफिसाला पोहोचतो तर काय ... रात्री झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिसिटी नाही आणि फ्लक्चुएशनमुळे एसी बिघडलाय. बोंबला. आता बोलवा दामले इलेक्ट्रेशनला आणि मकु ला .. म्हणजे मराठे कुलींग्सला.  आज निघताना डब्बा मुद्दामच नव्हता घेतला.. ऑफिससमोरच्या आचरेकरांच्या 'रस्सा' या मालवणी  रेस्टोरेंट मध्ये फिश थाळी छान मिळते असा ऐकून होतो..म्हटलं आज ट्राय करूयात. तसही  विजेअभावी ऑफिसमध्ये काम होत नव्हत, स्टाफ बसूनच होता..दिवस फुकटच गेला म्हणायचा. जेऊन परतीची वाट धरली. येताना वाटेवरच दादर च्या चित्रा टॉकीज जवळ भिसे हलवाई चे फेमस दुकान दिसले . मुलांसाठी साठी काहीतरी घेऊ म्हणून जोशींना गाडी बाजूला लावायला सांगितली. पाहतो तर काय दुकानात आडसुळे बिल्डर्स चे मॅनेजर रहेजा साहेब पण मिठाई घ्यायला आलेले. मला पाहून रहेजा पण खुश झाले. समोरच्या  टी शॉपी  कडे बोट दाखवत म्हणाले चला साहेब चहा घेऊ. "कडक चहा - एकदा पिऊन तर पहा " अशी मस्त पाटी लिहिलेल्या दुकानाचा मालक समोर हसतच उभा होता. बैसक्या ??? साल्या तुझा कॅफ्फे आहे हा ? अस मी बोलताच रहेजा  म्हणाले ..केफे नका बोलू साहेब ..बैसकर  पिसाळतो...टी शॉपी बोला. चहाच्या पुड्या विकणाऱ्या श्रीपाद बैसकर ने  'बेस्टि' नावाचं प्रशस्त टी पार्लर थाटलं होतं.  मस्त गप्पा मारता मारता कडक चहा चा एक कप झाल्यानंतर कुठूनतरी जोरजोरात बायकोचा आवाज कानावर आला .. उठतोय्स ना ... चहा ओतलाय केव्हाचा ... उठ चहा गार होईल... च्या मारी स्वप्न  होतं हे सगळं? ... कमाल आहे यार,स्वप्न पण अशी काही मराठमोळी पडतात ना हल्ली काय सांगू. पहाटेची साकार होतात असे म्हणतात, पण सकाळची ?

जाऊदे स्वप्नात काय गुंतायचं ... ही  म्हणते चहा तयार आहे म्हणजे बनवारीलाल वेळेवर दूध टाकून गेलाय आणि पांडे ड्रायवर तर आलाच असेल खाली, हिरापरसाद ला  फोन करतो म्हणजे झटपट कपडे पाठवेल इस्त्रीचे.  बिस्वकर्मा कार्पेंटर आणि घनस्याम पेंटरची माणसं यायच्या आत मी आंघोळ उरकून घेतली. सिक्युरिटी वाल्या चौरासिया ला जयरामजीकी करून गाडीत बसलो. पल्ला मोठा आहे. मुंदडा पट्रोलपंपावरून पेट्रोल भरून पुढे परळ ..छे छे..  अप्पर वरली ला जायचंय ..आणि हो..आजचा लंच हिलसा मध्ये आहे..बंगाली स्टाईल तेही रहेजा बिल्डर कडे काम करणाऱ्या अडसुळे साहेबांबरोबर...या  जमलं तर आज माझ्या ऑफिसला  - 'बरिस्ता' मध्ये बसून 'आपला माणूस कुठे मागे पडतो' या विषयावर गप्पा मारत मारत छान कॉफी घेऊयात.

समीर गुप्ते


सूचना-यालेखाचाकोणत्याहीराजकीयघटनेशीसंबंधनाही.खात्रीसाठीसत्यपरिस्थितीआणिवास्तवतपासूनपहा.हालेखलहानसहानव्यवसायालातुच्छसमजणाऱ्याकाही मराठीबांधवानाआणिमुंबईतयेऊनकोणतेहीकामकरूनस्वतःचेभविष्यघडवणाऱ्यादेशबांधवालासमर्पितआहे.जयमहाराष्ट्र!

Wednesday, 7 September 2016

गणपती - माझा आणि तुमचा


त्याच्या मूर्तीकडे कितीही वेळा पाहून  किंवा एकटक न्याहाळून समाधान झालंय असं सहसा घडत नाही. डोळे भरून पाहतच बसावं असं ते लोभस रूप, दिव्यत्वाची साक्ष देणारे ते ओजस्वी डोळे, भान हरपून जाईल असे  तेजोवलय, नीटनेटकी ठेवलेली वळणदार सोंड, क्षणार्धात तुमच्या संकटांना हमखास नाहीसं करण्याची हमी देणारं ते स्मित, उदंड आशीर्वादाची उधळण करणारा तो गुबगुबीत हात आणि लहान मुलासारखा मोदकासाठी पुढे केलेला नाजूक हात, लाललाल  मखमली पितांबर आणि मऊशार गादी.  एका दृष्टिक्षेपातच 'सुखकर्ता' या विशेषणाला शंभर टक्के न्याय देणारा आणि संकटसमयी देवाचं नाव घ्यायचं झालंच तर डोळ्यासमोर सर्वप्रथम येणारा 'दुःखहर्ता', चौसष्ठ कलांचा अधिपती म्हणजेच माझा आणि तुमचा गणपती. त्याच्या मूर्तीरुपी अस्तित्वाने  भारलेलं आणि मंगलमय झालेलं वातावरण म्हणजे आपल्या घरातला गणेशोत्सव.

हा गणपती आपल्या मराठी लोकांच्या फारच जवळचा असल्यासारखं मला नेहेमी वाटतं. बघा न, बोलता येऊ लागल्यावर ज्या पध्दतीने लहान मुलाला  'गंपती' बोलायला शिकवल्यापासून ते मोठे झाल्यावरसुद्धा आपणही कधी याला अहो जाहो केल्याचं आठवत नाही. तुमच्याकडे गणपती आणला का रे पासून त्याला वेळेवर नैवेद्य दाखव वगैरे सर्व एकेरीत. माझ्या माहितीप्रमाणे भारतातील इतर भाषिक गणपतीला गणेशजी, गणेश महाराज, श्रीगणेश असे संबोधतात. आपणच जणू गणपती हा आपल्या रोजच्या बैठकीतला असल्यासारखे अरेतुरे करत असतो. गणपती कधी आहे रे? याचा अर्थ गणेशोत्सव कधी आहे, गणपतीला कपडे शिवायचेत - म्हणजे या सणानिमित्त आपल्याला कपडे घ्यायचेत, गणपतीला रंग लावायचाय - म्हणजे घरी रंगकाम करावयाचे आहे, गणपतीची साफसफाई चाललीये - म्हणजे घर धुवायला काढलंय,  गणपतीचं बुकिंग केल का? म्हणजे गावाला जायची तिकिटं काढली का हे सर्व अर्थ मराठी घरात अध्याहृतच असतात. काही दिवसांपूर्वी माझ्या ऑफिस मधले कामगार एकत्र पणे  समोर येऊन ' सर, गणपतीला सुट्टी पाहिजे' असे म्हणताच ' घेऊन दे कि त्याला सुट्टी, गणपतीचं तो, मी कोण अडवणार' असला फालतू विनोद मी केल्याचं मला आठवतंय.

हिंदुस्थानात एकही चित्रकार असा नसेल कि ज्याला गणपतीचे नेहेमीपेक्षा वेगळे रूप चितारायचा मोह झाला नसेल. रझा नावाच्या एक मुस्लिम चित्रकाराने आपली बोटे रंगात बुडवून तबल्याच्या तालावर काढलेल गणपतीचं चित्र माझ्या घरी आहे. अगणित रंगाची उधळण करत काढलेली चित्रे असोत व कुंचल्याच्या एक फटकाऱ्याने काढलेले चित्र असोत पाहताक्षणी प्रेमात पडावे असे  त्याचे रूप त्या कागदावर नक्कीच उमटलेले असते. सध्या काही उत्साही कलाकार तुमच्या नावाच्या किंवा आडनावाच्या अक्षरांनी गणपतीचे चित्र काढतात. मान खूपच तिरकी करून आणि अक्षरं जुळवत तुम्हाला ती वाचावी लागतात.   "पै" किंवा जोंधळेगावकर अशा आडनावांचा गणपती कसा बनेल हा विषय माझ्या कुतूहलाचा आहे.

सार्वजनिक गणपतीची वेशभूषा हा एक वेगळा विषय. या गणेशोत्सवानिमित्त कोणत्यातरी  देवाच्या किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या रूपात गणपतीची मूर्ती बनवणारे आणि ती बनवून घेणारे भक्त पण अति उत्साहीच म्हणावेत. कृष्ण आणि रामाच्या रूपात ठीक आहे हो, पण साईबाबांच्या रूपात अंगावर त्यांच्यासारखे कपडे घातलेला, स्वामी समर्थांच्या रुपातला  बसलेला गणपती  किंवा अण्णा हजारे सारखा दिसणारा टोपी घातलेला गणपती असले भयानक प्रयत्न केल्याचे मी याचीडोळे पहिले आहे आहे. या वर्षी अजूनही 'पर्शा' च्या रुपातला सैराट गणपती दिसण्यात आला नाही हे माझ्यासारख्या भक्ताचे नशीबच म्हणावे. सार्वजनिक मंडळांसाठी घडवलेला शंकराच्या रुपातला रागीट  गणपती तुम्ही फेसबुकवर पाहिलाय का ? नसेल तर शोधून पहा . दणकट असे आठ हात, प्रत्येक हातात एक धारदार शस्त्र घेतलेला , त्वेषात उभा राहिलेला असा काही भयानक आणि रागारागानं पाहणारा बनवलाय कि विचारता सोय नाही. शत्रूंच्या नायनाट करणारा वगैरे असला तरी इतक्या रौद्र रुपातला बाप्पा नाही पाहावत आम्हाला. नवसाला पावणारा सार्वजनिक गणपती हा तर एक मोठा विनोद आहे. खरंच नवसाला पावत असेल तर लालबागच्या परिसरात चाळीत राहणारा माणूस आज बंगल्यात दिसला असता आणि तो गणपतीपण विसर्जनाच्या त्रासातून वाचला असता...नवसाला पावतो तर कायमस्वरूपी  देऊळच बांधा की.  काहीही करून व्हीआयपी पास मिळवून अशा गणपतीचे दर्शन घायचे हे फ्याड वाढत चाललंय हल्ली ...जाऊदे , सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने याच्या वर अधिक न बोलणेच चांगले.

काही असो, गणपतीचा कोप होतो हे फारसे  ऐकिवात नाही म्हणून किंवा गणपतीने मुबलक स्वातंत्र दिलय म्हणून त्याच्या रूपाचं काहीही  करायचं हे मनाला पटत नाही. गणपती हा तोच आणि तस्साच असावा, लहानपणी गोष्टीत वाचलेला, शंकर पार्वतीने जन्माला घातलेला आणि आपल्या आजी आजोबानी आपल्या समोर मांडलेला, गुबगुबीत गादीवर लोड पाठीशी घेऊन मांडी ठोकून  बसलेला, केविलवाणा चेहेरा करून मागणीची भली मोठी यादी मनात घेऊन नमस्कार करणाऱ्या भक्ताकडे पण मोहकपणे हसणारा, म्हटलं तर निरागस बाळासारखा आणि म्हटलं तर घरातल्या ज्येष्ठ पुरुषासारखा.

गणपतीच्या चरणी लीन होत, त्याच्या भक्तीत तल्लीन होत, त्याच्या रूपात एकरूप होत, त्याच्या ठायी असलेला एकतरी गुण आपल्याला स्पर्शून जावा आणि आपल्या  सर्वांच्या आयुष्याचे सार्थक व्हावे या पेक्षा दुसरं काय मागू याच्याकडे ?

समीर गुप्ते 

Sunday, 28 August 2016

चवीची अनुभूती

बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो .. बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ.. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.

कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम. बाजारातून आणलेल्या जिन्नसांच सोडा पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवित बदल करण्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं. उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागते. कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ?. नाही ना , कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते. एरवी बघताक्षणीच फस्त होणारा पिठलं भात घरात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगा नंतर खाताना कुठे चवदार लागतो सांगा बरं. एखाद्याच्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तूम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.

कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते...किती धांदल असते तिची .. काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही ...इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते. कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणीक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते.. टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.

भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते , चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते. चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी ती चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते. पटतंय ना तुम्हाला.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट.
#SameerGupte#ckpfoodfest#SamHere#chavdaar#funwriting#enjoyreading#sameergupte.blogspot.in#sameer6949@gmail.com

Tuesday, 23 August 2016

गोवा



असं नाही कि मुंबईत प्यायला मिळत नाही म्हणून आम्ही गोव्याला दारू प्यायला जातो. गोवा हे नावारूपालाच आलं या स्वस्तात मिळणाऱ्या दारूमुळे आणि सागर किनाऱ्यावरच्या बिन्धास संस्कृती मुळे. अफाट निसर्ग सौंदर्य , सुंदर निळेशार स्वच्छ समुद्र किनारे, त्यावर फिरणारे रंगी बेरंगी फिरंगी, गोव्यात हमखास मिळणारी मच्छी, म्हापशाचा तो आठवडा बाजार, पणजीतली सलग दारूची दुकाने, देवळांची प्रशस्त आवार, अजूनही पोर्तुगीझपणा लेऊन मिरवणाऱ्या जुन्या इमारती, चर्च आणि भडक रंगवलेले बंगले, सौझा लोबो सारखी इंग्लिश गाणी ऐकवत दारू सर्व्ह करणारी किनाऱ्यावरची अनेक रेस्टोरेंट्स, नदीत नांगर टाकून स्थिरावलेले कॅसिनो ... सारं कसं वेगळंच. देशात असूनही परदेशात फिरायला गेल्यासाखं वाटणारं. एरवी पुण्या मुंबईत शिस्तबद्ध जगणाऱ्याला चार दिवस बेफिकीर, बेशिस्त जगण्याची मुभा असल्यासारखं वाटावं अस वातावरण...आणि खूप काही महागडं वगैरे असं पण नाही. म्हणून गोवा म्हणजे बेफाट तरुणाईचंच नाही तर अनेकांचं श्रद्धास्थान.
आता अचानक समुद्रावर दारू प्यायची नाही असा कायदा तिथे गोवा सरकार ने केल्याचं समजतंय. अहो बंद करायच्या अनेक गोष्टी राजरोस तिथे समुद्र किनाऱ्यावर चालत आहेत त्याचं काय. ते बंद करा आधी. उगीच काहीतरी फालतू कायदा आणायचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या नावाने पोलिसांनी टुरिस्ट कडून पैसे उकळायचा तर हा मार्ग नाही ना. जेथे पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय आहे तिथे तरी असला मूर्खपणा करू नये हि माझ्यासारख्या गोव्यावर प्रेम करणाऱ्या आणि अर्थातच तिथे जाऊन यथेच्छ दारू पिणाऱ्या रसिक आणि जबाबदार पर्यटकाची अपेक्षा... काही चुकीचं तर नाही ना बोलत मी.

पंगतीचं जेवण आणि वाढणी - एक लोप पावणारी परंपरा

तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का हो कि घरच्या सत्यनारायणाच्या जेवणावळीत अथवा एखाद्या लग्नातील जेवणाच्या पंगतीत तुम्ही मस्त जेवताय आणि जेवण वाढणाऱ्याने पानाच्या डावीकडे भाजी वाढली, गोडाची वाटी उजवीकडे किंवा सरळ पानाबाहेर ठेवली किंवा लोणचं मधेच कुठेतरी वाढलंय. माझ्या बाबतीत असं घडलं तर असा राग येतो त्या माणसाचा मग तो कोणी का असेना. अरे एक पद्धत असते जेवण वाढण्याची. जेवताना आपला हात तसा चालत असतो ना.
अहो अप्रतिम जेवण बनवणे हे जशी कला आहे तसे ते जेवण शास्त्रोक्त पद्धतीने वाढणे हि पण एक कलाच आहे. पण झालय असं कि बुफे या पाश्चिमात्य भोजन पद्धती मुळे आपली अस्सल महाराष्ट्रीयन पंगत परंपरा लोप पावत गेली आणि जेवणाची लयबद्ध वाढणी विस्मरणात जाऊ लागली. याला दाक्षिणात्य मंडळी मात्र अपवाद आहेत. आजही त्यांच्या अनेक जेवणावळी या हिरव्यागार केळ्याच्या पानावर पारंपरिक पद्धतीने वाढलेल्या भोजनाने संपन्न होतात.
काय फरक पडतो आमटी डावीकडे वाढलीतर ?..पोटातच तर जाणार आहे .. असे विचार असलेल्या काही तरुण मंडळींबद्दल न बोललेलं बरं. कोण सांगणार याना पंगतीतल्या छान वाढलेल्या पानाबद्दल आणि त्यात मिळणाऱ्या आनंदाबद्दल. माझ्या लहानपणीच्या आठवणीतल्या लग्नातल्या पंगतीत तर काय मजा असायची. शे दीडशे लोकांची एक पंगत. एक एक पदार्थ वाढणारी अनेक वेगवेगळी लोकं आणि वाढपी काय लगबगीने ताट वाढायचे आणि मग सर्व पदार्थानी सजलेलं भरलेलं ताट पाहून जेवायला सुरुवात व्हायची. डावीकडे पिवळ्या रंगाच्या केशर मिरवणाऱ्या गरमा गरम जिलब्या, मठ्ठा, समोर लिंबू, मीठ, लोणचं, कोशिंबीर, पापड, कांदा बटाटा भजी, मसुऱ्याची आमटी, बटाट्याची सुकी भाजी, मधोमध पांढरी शुभ्र भाताची मूद, त्यावर हलकेसे वरण आणि हळुवार सोडलेले साजूक तूप ... मूद फोडली रे फोडली कि एकजण गरम गरम वरणाचे भांडं घेऊन समोर हजर. पानातील भात संपत आला कि पुरी, वडे आणि मागोमाग मसालेभात आलाच म्हणून समजा. बरं , या सगळ्या गडबडीत प्रत्येक पदार्थ मात्र न चुकता न सांगता योग्य ठिकाणीच वाढला जायचा. सुदंर मांडणी असलेल्या या चमचमीत जेवणाला आग्रहाची जोड तर हमखास असायचीच आणि त्या आग्रहानिमित्त संवाद पण घडायचे. लांबच्या नात्यातली एखादी काकी जिलबीचं ताट घेऊन पंगतीत बसलेल्या कोणाशी तरी बोलत बोलत, हसतच समोर यायची..मी नको नको म्हणतानाच "तू कांताचा ना रे.. मग घे गपचूप " अस म्हणत दोन जिलब्या वाढून जायची. मी कांताचा मुलगा असणं आणि दोन जिलब्यांचा काय संबंध हे मला आजतागायत कळले नाही पण त्या अनोळखी काकीच्या चेहेऱ्यावरचा प्रेमळ भाव आणि जिलब्यांपेक्षाही तिच्या आग्रहातला गोडवा आजही मनात जपला गेलाय.
जेवण वाढताना पण काय शब्द वापरले जातात हे पण महत्वाचे ... माझी मैत्रीण स्मिता कारखानिस एकदा एक कौटुंबिक समारंभात मा. राज साहेबाना जेवण वाढत असता इतर वाढणाऱ्या महिलांप्रमाणेच, थोडी भाजी घालू का असं म्हणाली. त्यावर राजसाहेबांनी तिला " घालू म्हणजे काय , सीकेपी आहेस ना तू, वाढू का विचार" असे त्यांच्या शैलीत म्हटल्याचे (हाणल्याचे) ऐकिवात आहे. जेवणाच्या सौन्दर्याबद्दल बोलताना सुप्रसिद्ध शेफ श्री. विष्णू मनोहर सीकेपी फेस्ट ला आले असता मला सांगत होते कि एक जेवण हे तीनदा जेवायचे .... म्हणजे असं कि पहिल्यांदा जेवणाचे ताट डोळ्याने भरभरून पाहून जेवायचे असते, नंतर नाकावाटे त्या जेवणाचा सुगंध आत सामावत जेवायचे आणि नंतर मुखाद्वारे त्या चवदार भोजनाचा मनमुराद आस्वाद घेत खऱ्या अर्थाने जेवायचे.
नुसतं जेवण पारंपरीक असून नाही चालत हो... त्या परंपरेत शास्त्रोक्तपणे सजवलेल्या ताटात आपापल्या जागी स्थानापन्न झालेल्या पदार्थांची सजावट असणे महत्वाचे आणि त्याहून अधीक महत्वाचे म्हणजे तुमच्या सारख्या जुन्या जाणत्या खवय्ये मंडळींनी हि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे.
माझा श्रावण कधीच सम्पलाय पण तुमचा अजून सुरू असेल तर बघा येत्या सोमवारी हिरव्यागार केळ्याच्या पानावर परंपरागत वाढलेल्या जेवणाचा आस्वाद घेऊन. थोडं पुण्य नक्कीच लागेल आपली भोजन परंपरा जोपासल्याचं.
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट

बॅनर बॉईझ



दहीहंडी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निमित्त आणि येणाऱ्या सणानिमित्त शहराची वाट लावण्यासाठी ऊत आल्यासारखी  बॅनरबाजीची सर्वपक्षीय जय्यत तयारी  महाराष्ट्रभर सुरु असेलच. त्यातच  "गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना शुभेच्छा" वगैरे बॅनर ची पण आता सुरुवात झाली आहे.
आणि एरव्हीपण काय एकेक बॅनर असतात मित्रानो ! म्हणजे ज्यांच्या साठी बॅनर बनवले जातात ते नेते सोडा पण जे डिझायनर ते बनवतात त्यांचा पण शिवाजी पार्क वर भव्य सत्कार करावा अस कधी कधी वाटतं .

काही वर्षांपूर्वी  एका गावात एक लहान मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. घटना खरंच दुःखद होती. ९-१० हे काही वय नाही मरायचं पण ईश्वर इच्छा प्रबळ होती. नेमका हा मुलगा एका स्थानिक नेत्याच्या नात्यातला असल्याने  त्याच्या  शोकाकुल परिवाराचे  सांत्वन करणारी अनेक बॅनर उत्साही कार्यकर्त्यांकडून  गावभर लावली गेली. पण बॅनर वरचा मजकूर वाचाल तर वेडेच व्हाल. बघा काय लिहितात हे डिझायनर ...
"झिजलास तू चंदनापरी, माया केलीस आम्हावरी,
जाणवेल पोकळी क्षणोक्षणी, कृपा राहावी सर्वांवरी ."
तो बिचारा मुलगा १० वर्षाचा.. आणि "झिजलास" तू चंदनापरी ?.... कृपा राहावी सर्वांवरी?.... चायला काय लिहितात, काय छापतात , कशी अक्कल नसते याना?

मागे नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर लावलेल्या बॅनर वर हयात आणि ठणठणीत असलेल्या मॉर्गन फ्रीमन या सुप्रसिद्ध  हॉलिवूड अभिनेत्याचे  फोटो छापल्याची बातमी पण फोटोसहित फेसबुक वर पहिलेली आठवतेय. काय गरज आहे या नसत्या उठाठेवींची  ?

दुसरी चीड आणणारी बॅनर म्हणजे नियुक्तीची...कोण काढतं हि महान पदं. नुकत्याच मिसरुड  फुटलेल्या मुलाच्या फोटोसहित कार्यसम्राट श्री अमुक तमुक  याची वॉर्ड क्र. १७८ च्या उपसचिव पदी  नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन. कार्यसम्राट ? कशाला ?

मधल्या काळात "बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय भावानं ", " कसाबसा पास झाला म्हणून", " पहिली दाढी केली म्हणून", "ऐपत नसतानापण गर्लफ्रेंड ला फिरवायला  ७०,०००/- ची गाडी घेतली म्हणून " ," काम नानांच्या घरच, होऊ दे खर्च "  अशा टाईप चे बॅनर लावायची क्रेझ आली होती.  आधी लोकांना पण गम्मत वाटायची पण नंतर अतिरेक झाला.

राजकारण्यांच्या वाढदिवसाच्या बॅनर ची तर कहाणीच वेगळी.  आदरणीय दादा, भाई, साहेब, भाऊ, बॉस, वॉर्डाचे भाग्यविधाते, समाजाचे आधारस्तंभ,  काही ठिकाणी तर जांणता राजा वगैरे हास्यास्पद.असली विशेषणे लावून त्या नेत्याचा वाढदिवस अक्षरशः  तुमच्या माथी मारला जातो.  या बॅनर खाली वॉर्डातले अनेक चेहेरे मिळतील तसे छापलेले. शेंडुंग फाट्याजवळ एक बॅनर तुम्ही नक्की पहा. त्यावर इतके फोटो असतात कि तुम्हाला वाटेल आता मतदाराचे फोटो पण बॅनर वर  छापण्याची फॅशन आलीये का. जवळपास शंभर सव्वाशे फोटो.

या वर कहर म्हणजे या "बर्थडे बॉय" ची पोझ ... असे काही चमत्कारिक फोटो काढतात ही मंडळी कि काही विचारता सोय नाही. तुम्ही जर एकटक या फोटोकडे पाहाल ना तर अनेक एक्सप्रेसशन्स तुम्हाला दिसतील.  म्हणजे काहीजण अतिशय आश्चर्य झाल्यासारखे, काहीजण " अरेच्या तू इथे कुठं? " अशी पोझ देऊन, काही हातात फाईल घेऊन अतिशय  महत्वाच्या कामाला निघाल्यासारखे ,काही हसत हसत फोनवर शुभेच्छा घेतायत असे दाखवणारे,  काही त्यांच्या नेत्यांसारखे आकाशात  बोट दाखवून काहीतरी उडणारी वस्तू वगैरे दाखवणारे, काही अभ्यासात किंवा विचारात मग्न तर काही भलतेच खुश होऊन हसत पाहणारे, तर काही सिहासनावर बसून दरबार चालवत आहेत अशा गमतीदार वेगवेगळ्या पोझेस देत बॅनर वर झळकतात.

खरंच, समाजोपयोगी काम करून लोकाभिमुख होण्यापेक्षा बॅनर वर येऊन झटपट लोकप्रिय होता येतं या गोड  गैरसमजात वावरणारे  हे नव नेते भविष्यात काय दिवे लावणार असच वाटतं.

आणि या किळसवाण्या बँनरबाजीने तुमच्या शहराची वाट लावत 'कणभर' नेतृत्व गुण नसताना " कणखर नेतृत्व"  लिहिणारी हि मंडळी भविष्यात तुमच्या शहरावर राज्य करण्याचे स्वप्न पाहत आहेत या पेक्षा तुमची वाईट चेष्टा ती कोणती. 

पावसाळी रानभाज्या


जेव्हा पावसाळा येतो ना तेव्हा माझ्या लहानपणी आमच्या घरात केल्या जाणाऱ्या अनेक पावसाळी भाज्यांची आठवण येते. माझं घर ठाण्याच्या खारकर आळीतलं... सीकेप्यांची खारकर आळी. कारखानीस, प्रधान, गुप्ते, चिटणीस, कुळकर्णी, रणदिवे, देशमुख, देशपांडे, खारकर, भिसे, वढावकर, मोकाशी, कोतवाल,नाचणे,फणसे,कर्णिक, पत्की, पोतनीस अशी अनेक सीकेपी घरं आणि या घरात बनल्या जाणाऱ्या अनेक खास आणि वेगवेगळ्या पाककृती. नुसतंच खाणं नाही तर केलेल्या पदार्थांवर भरभरून बोलणं ही पण सीकेप्यांची खासियत. बहुदा या कट्टर सीकेपी संस्कृतीमध्ये वाढल्यामुळेच माझ्यावर हे '' कायस्थी पाकसंस्कार'' जरा जास्तच झाले असावेत.असो.

गेला आठवडा भर फेसबुक आणि व्हॉट्सअप वर शेवळाच्या भाजीच्या "स्वागताच्या" पोस्ट येत होत्या आणि यायलाच पाहिजेत. कारण पावसाळ्यात येणारी आणि सीकेपी घरात आवर्जून केली जाणारी ती पावसाळी भाज्यांची राणीच आहे. एखादा सण साजरा व्हावा अशा प्रकारचे वातावरण शेवळं घरात आणल्यावर असतं. या भाजीची चव केवळ स्वर्गीय. वालाच्या बिरड्या प्रमाणेच शेवळाची भाजी कितीही केली तरी उरत नाही किंबहुना पुरत नाही. या शेवळाच्या बरोबरच पावसाळ्यात इतर अनेक भाज्या आपल्याला एक वेगळ्याच चवीची अनुभूती देण्यास प्रगट होतात. बाजारात शेवळं यायला लागली किंवा एखादी चांगली भाजी आली की खारकर आळीत जवळपास सर्वाना (मोबाईल नसतानाही) ती माहित व्हायची. स्टेशन रोड वरील २ नंबर पॊलिस चौकीजवळ बसणाऱ्या कातकरणी बायकांकडे या भाज्या हमखास मिळत. नव्या पिढीने ऐकलीही नसतील अशी वेगवेगळी नावे आणि प्रत्येक भाजीची चवही वेगळीच असायची.


पावसाळा आल्यावर काही दिवसातच आमच्या रणदिवे वाड्यात टाकळा उगवायचा. हिरव्यागार टाकळ्याची पाने तोडताना खूप मजा यायची. टाकळा हा जवळपास सर्वत्र उगवत असल्याने बाजारात कमी दिसायचा. परवाच एक भगिनीने शेवग्याच्या पानांची आणि फुलांची भाजी फेसबुक वर पोस्ट केली होती. आमच्या वाड्यातही शेवग्याची ( शेकटाची) अनेक झाडे असल्यामुळे पावसाळ्यात त्या भाजीचाही मनमुराद आनंद मी लुटलाय. पावसाळा सुरू होऊन साधारण १०/१२ दिवस झाले की कोरळ, भारंगी, बाफळी या भाज्या बाजारात येत. आमच्याकडे कोरळाची भाजी वाल किंवा हरबरे टाकून बनली जायची. साधारण कैरी सारखी दिसणारी मोदडी ची भाजी (जवळा घालून), साईचा मोर, कुडाच्या( अतिशय कडवट) शेंगा, अबई च्या हिरव्यागार शेंगा, लाल माठाचे दांडे, बटाट्यासाखे दिसणारे आणि चवीला अंड्यासारखे लागणारे भुईफोड, खडशिंग ,अळू, कंटोली .... एक ना अनेक भाज्या महिनाभर ताटात असायच्या. या व्यतिरिक्त एक वेगळीच अशी ''खारा माचुळ'' नावाची भाजी अंबाडी सुकट घालून आणि मीठ न घालता केली जायची. खरंतर मी यातील काही भाज्यांचे फोटो गुगल वर शोधण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. जमल्यास उद्या बाजारात जाऊन फोटो काढून नक्की पोस्ट करीन. आपणही आपल्या घरांत अजूनही काही पावसाळी भाज्या केल्या जात असतील तर कृपया त्याचीही माहिती शेअर करा.


"तुम्ही सीकेपी म्हणजे फक्त मटण मच्छी खाणारे" अशी ख्याती असणारे आपण शाकाहारी जेवणातही कितीतरी पट समृद्ध आहोत आणि प्रत्येक ऋतू बरोबर येणाऱ्या या सर्व भाज्यांचाही आपण तितक्याच प्रेमाने आस्वाद घेतो. उद्या रविवार आहे. जमल्यास मटण घेतल्यानंतर बाजारात फेरफटका मारून यातली एखादी भाजी आणून पहा आणि जर तुमच्या घरात तुमची आजी असेल तर तिला एक झकास पावसाळी सरप्राईझ द्या. तिला पण बरं वाटेल हो आपली नातवंड सीकेपी खाद्य परंपरा जपतात हे पाहून.


समीर गुप्ते 

सीकेपी फूड फेस्ट

पोतनीसांच्या एकवीरा खानावळिस भेट - दिवे आगार



काल काही कामानिमित्त मित्रासोबत दिवे आगार ला जाण्याचा योग आला. काम संपता संपता जेवणाची वेळही टळून गेली होती. ४ वाजले असल्यामुळे दिवे आगारातील व्यवहारही थंडावले होते … सगळं कसं एकदम शांत. इथे काही मिळेल याची शाश्वती नव्हती पण फेसबुक च्या माध्यमातून संतोष पोतनीसांच्या एकवीरा खानावळी बद्दल ऐकून होतो. गावात थोडी चौकशी करून त्यांचा पत्ता मिळवला आणि पोतनीसांच्या घरगुती खानावळीवर थडकलो. पोतनीस पण तसे स्लीप मोड वरच होते. पण मला पाहताच त्यांनी ओळखले आणि … अरे वा गुप्ते… या या…. बसा असे मस्त स्वागत केले. थोडा (फारच ) उशीर झाला असल्याने मी जर चाचरतच जेवण मिळेल का असे विचारले. काल संकष्टी होती … त्याच प्रश्नाबरोबर "संकष्टीला करता का हो?" हा पण प्रश्न विचारून मोकळा झालो. "मी गणपतीच्या पहिल्या दिवशी पण करतो '' असे ठाम उत्तर देऊन पोतनीस कामाला पण लागले. स्वतः तयारी ला मदत करून परत आमच्याबरोबर गप्पागोष्टी करत होते. 

१९०० साली बांधलेल्या यांच्या तीन मजली वाड्याच्या अंगणात बसल्यावर अनेकांना आपल्या जुन्या घरांची आठवण येत असेल . पाचव्या मिनिटालाच आपण सीकेपी माणसाच्या अंगणात बसलोय याची प्रचीती देणारा एक खमंग वास आला आणि काही मिनिटातच दोन दणदणीत सीकेपी ताटे आमच्या समोर आली. समुद्रातून नुकतीच आली आहेत इतक्या ताज्या पापलेट चे आंबट तिखट कालवण , अस्सल सीकेपी स्वयंपाक घरातील मसाल्यांचे संस्कार घेऊन ताटात विराजमान झालेले आख्खे तळलेले पापलेट, तांदळाच्या भाकऱ्या आणि गरमागरम भात, सोबत सोलकडी …. आम्ही गारद झालो ना. पुढची दहा मिनिटे एकही शब्द न बोलता समोर आलेल्या ताटाचा समाचार घेत जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. संकष्टी असल्याची आठवण मध्ये मध्ये होत होती पण मन ताटाभोवतिच गुंतले होते. पोतनीसांच्या मनातील 'अतिथी देवो भवः' आणि माझ्या मनातील ' अन्नदाता सुखी भवः' या दोन भावनांचा समेट घडवत आमचे जेवण पार पडले. जेवल्यानंतर पोतनीस वहिनीनी केलेल्या चहाचा आस्वाद घेत घेत गप्पांच्या ओघात अनेक गोष्टीची माहिती संतोष पोतनीस यांनी दिली. दिवे आगारात सिकेप्यांची फक्त पाच घरं. १८ वर्षांपासून पर्यटकांना अस्सल सीकेपी जेवण देण्याची सुरुवात पोतनीस कुटुंबानेच केली. वर्षभर मिळणाऱ्या आणि मासेमारी बंद असताना पावसाळ्यात मिळणाऱ्या अनेक माशांची सीकेपी पद्धतीची कालवणं, आमट्या यांचा समावेश असलेले जेवण मुंबई पुण्याच्या अनेक पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे हे सांगायलाच नको. विशेष म्हणजे संतोष पोतनीस यांच्या पत्नी आणि वाहिनी या दोघी स्वतः सर्व पदार्थ बनवतात. पोतानिसांचे घरी तयार केलेले सीकेपी मसालेही अतिशय उत्कृष्ट. मुंबई ठाण्यातील अनेक मंडळी यांना दरवर्षी वर्षभराच्या मसाल्याची ऑर्डर देतात.

दिवे आगारचा सुप्रसिद्ध सोन्याचा गणपती लवकरच त्याच्या देवळात पुन्हा स्थानापन्न होणार आहे. त्याचे दर्शन घेण्यास आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या सुंदर, सुरक्षित समुद्र किनाऱ्यावर सहलीला जाल तेव्हा न चुकता एक नंबर शाळेसमोरील पोतनीसांच्या एकवीरा खानावळिस नक्की भेट द्या. जेवण झाल्यावर तृप्तीचा ढेकर द्याल ना तेव्हा माझी नक्कीच आठवण काढाल. आणि जाताना संकष्टी वगैरे बघून जा बरं का … मन लावून मनसोक्त जेवता आलं पाहिजे.
समीर गुप्ते 
सीकेपी फूड फेस्ट

फीडबॅक फॉर्म

झाली असतील पांच सहा वर्षे या गोष्टीला. पवई च्या रेनिसांस या पंचतारांकित हॉटेलच्या लेक व्ह्यू कॅफ्फे मध्ये मित्रांसह (पिउन) जेवल्यानंतर फीड बैक फ़ॉर्म भरत होतो. एक चांगली सवय आहे मला ( मित्र याला खाज पण म्हणतात ) या हॉटेलवाल्या लोकांना सीकेपी जेवणाची माहिती करून द्यायची. म्हणून सगळे पॉइण्ट्स मार्क केल्यावर लिहिलं कि सीकेपी पदार्थ असते मेनूवर तर आवडल असतं. उद्देश इतकाच होता कि हा फॉर्म जेव्हा कोणी एन्ट्री करताना वाचेल तेव्हा कुतूहल तरी चाळवेल त्याचे कि काय प्रकार आहे हा. पण रेनिसंस च्या कर्मचाऱ्यांचे कौतुक म्हणजे त्यातला एक जण तत्परतेने विचारू लागला कि सीकेपी फूड म्हणजे काय. तो अमराठी असल्याने मी त्याला आपल्याबद्दल सांगितले…वालाचे बिरडे , सोड्याची खिचडी असले दोन चार टिपिकल सीकेपी पदार्थ सांगितले. त्यालाही थोडी माहिती मिळाली आणि मलाही थोडं बर वाटलं. त्या नंतर सहा सात महिने लोटले आणि मला त्यांच्या कडून एका महाराष्ट्रीयन फूड फेस्टिवल चे आमंत्रण आले. असे काही न काही सप्ताह - कार्यक्रम तिथे सुरूच असतात. मी या वेळी सहकुटुंब , माझ्या आई वडिलांना पण घेऊन गेलो. अस्सल मराठी वेशभूषेतील वेटर्स , सगळ्या होस्टेस पण नऊ वारी मध्ये आणि विशेष म्हणजे सगळे प्रयत्नपूर्वक मराठी बोलत होते … कसं एकदम मस्त मराठमोळे वातावरण. नेहमीप्रमाणे काय मेनू आहे म्हणून पाहायला गेलो आणि पाहताच मागे वळून आईला हाक मारली. जे दिसलं ते पाहून माझ्या इतकी ती हि आश्चर्यचकित झाली. शेफिंग डिश मध्ये 'सोडे घालून केलेली वांगी बटाट्याची भाजी' आणि 'वालाचे बिरडे'… आणि ते देखील आपल्या घरगुती चवीचे. मुंबईतल्या एखाद्या पंचतारांकित हॉटेल मध्ये मराठी जेवणाचा बफेट असणे आणि त्यात सीकेपी जेवणाचा अंतर्भाव असणे हे बघूनच मी आणि आई खुश झालो होतो. कदाचित माझ्या आणि माझ्यासारख्याच कुणाच्या अभिप्रयाबरोबर लिहिलेल्या सूचनेचा त्यांनी विचार केला असावा. समोरच काचेआड एक सरदार शेफ उभा होता … हातवारे करूनच मी त्याचे आभार मानले. जेवण्यापूर्वीच जेवणाची स्तुती करणारा माणूस पाहून तो हि अचंबित झाला असावा.
सांगायचं इतकच कि सीकेपी किवा कोणत्याही खाद्य संस्कृतीचा प्रसार करायचा असेल तर त्याची मागणी पण करायला लागा. डिमांड असेल तर सप्लाय पण मिळेल. तुम्हाला काय हवंय याची काळजी जर रेनिसांस सारखे फाईव स्टार हॉटेल घेत असेल तर इतरही नक्कीच घेतील.
प्रयत्न तर करूयात …. कदाचित लवकरच मुंबईच्या अनेक रेस्टॉरेण्ट्स च्या मेनू वर तुम्हाला अनेक सीकेपी पदार्थ दिसतील आणि आपल्यासारख्या अनेक खवय्यांना पण त्याचा आस्वाद घेत येईल !
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट.

Saturday, 20 August 2016

Welcome to my Blog...SamHere

Hey Friends

Cheers and Greetings !

I take pleasure welcoming you all to my blog SamHere.

This is one more way to get connected to you all and express my heart. SamHere ... made up up of two words Sameer and Here but carrying the one message that connects the feeling of two people "same here" 

Though i am known to write passionately on food , i will also be covering few more subjects of social and cultural importance. Marathi, the language so closed to me, will more be the language of my blogs as i can express myself more as the words comes from within. 

Hope You all will enjoy this from me. Feel free to react and respond in the words you would love to use for a close friend.

Happy Reading ! 

Sameer Gupte