गेले दोन तीन दिवस पाहतोय. तुम्ही पण पहिली असेल. फेसबुक आणि व्हाट्सअप वर एक पोस्ट खूप फिरतेय. हिरव्या , पिवळ्या, लाल, लवंगी, ढोबऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचा असलेला एक फोटो आहे आणि त्या खाली लिहिलंय ..'शोधा पाहू यातली आपली बायको कोणती आणि मिळवा मोठे बक्षीस' वगैरे. मला पण पाहताना खूप मजा आली आणि शोधू लागलो आपली बायको कोणती ते. हं हो, तीच ती जी जाडसर आणि पिवळट दिसते ती.... का ती लाल भडक तेज दिसते ती...कोणती म्हणायची ? काहीच ठरवता येईना. म्हणून मोबाइल बाजूला ठेवला आणि विचार करू लागलो. विचार हाच कि काय मूर्खासारखा विचार करतोय मी.. बायकोची तुलना डायरेक्ट मिरचीशी ? बरं मिरचीचं असेल तर जाड पिवळी ढोबरी का ? लग्न करून घरी आणली तेव्हा तर नाजूक, सडपातळ, हिरवीगार ,टवटवीत तर होती ती. चायला आपणच तर नाही ना तिला लाल पिवळी ढोबरी आणि अशी कोमेजलेली बनवली. एक ना दोन ..अनेक विचार.
कसं आहे ना , कि बायको हा बऱ्याच जणांच्या थट्टेचा आणि मित्रमंडळींच्या बैठकीतील हमखास निघणारा विनोदाचा विषय असतोच असतो. आपली बायको कशी वेंधळी आहे, इतक्या वेळा सांगून पण अजून बावळटपणा जात नाही, इतकी शिकलीये पण अक्कल काडीची नाही, तिच्या मैत्रिणी कशा मॉडर्न आहेत, बावळट दिसणारी मेव्हणी काय हुशार निघाली रे पण हि बया तशीच आणि तिला न सांगताच कसं आजच्या पार्टीला आलो - आता बसली असेल वाट बघत हे सर्व रंगवून सांगण्यात धन्यता मानणारा एक मोठा वर्ग आहे. हा मिरच्यांचा फोटो पण याच वर्गातून , याच मानसिकतेतून आलाय हे नक्की.
'हि बायको नसती तर' ह्या विषयावर निबंध लिहायची वेळ आली तर कदाचित शंभर पानी वही पण कमी पडेल तुम्हाला. खरंच खूप काही लिहावं लागेल हो. हिच्याशीच लग्न जमवण्यासाठी केलेली खटपट, लग्न जमल्यानंतरच्या भेटी गाठी, तिचा रागवा रुसवा, लाडाने तिची केलेली मनधरणी, लग्नासाठी तिच्या आवडी निवडी पाहून केली खरेदी, तिच्या येण्यासाठी आतुरलेले तुमचे घर, तिला आवडणाऱ्या रंगसंगतीचे पडदे, तुमच्या बजेट च्या पलीकडे जाऊनहि निवडलेले तिच्या आवडीचे हनिमून डेस्टिनेशन हे सगळं नक्कीच आठवेल बघा. घराची जमवाजमव करताना तिची पसंद, आपल्या घरच्यांना लावलेला लळा, आपलया मित्रमंडळींच्या आग्रहाखातर तिने बनवलेल्या काही खास पाककृती, अगदी तुमच्या कपड्यांमध्ये, केसांच्या ठेवणीमध्ये झालेला फरक, तुमच्या खाण्यापिण्याचे सांभाळलेले चोचले हे तर नोंदवावे लागतीलच त्या वहीत. कामावरून आल्यानंतर तुमच्या कानात सांगितलेली ती गोड़ बातमी, तुमच्या घरात येणाऱ्या नवीन पाहुण्यासाठी केलेली जय्यत ती तयारी आणि तो आल्यानंतर त्याच्याकडे पाहणारी तिची कैवल्यपूर्ण नजर, ते बाळ मोठ होत असताना त्याच्याकडे वटारलेले डोळे आणि तुमच्या त्या राजपुत्राने मिळवलेल्या भव्य यशानंतर तिच्या डोळ्यातले ते कृतार्थ भाव पण तर लिहावे लागतील त्या निबंधात. प्रपंच वाढताना केलेल्या परिश्रमांची आणि तडजोडींची मोजदाद तर ठेवलीच असेल तुम्ही .. नवीन घराच्या साठी दागिने दिले असतील तिने डोळ्यातले पाणी लपवत, लेकाला अमेरिकेला पाठवताना राहिल्या असतील अनेक पैठण्या दुकानाच्या शोकेसमध्येच, तिच्या आईसाठी नसेल पण तिच्या रक्ताचं नातं नसलेल्या तुमच्या आईसाठी तर नक्कीच जागली असेल अनेक रात्री हॉस्पिटलच्या बाकड्यावर... जागा आहे ना वहीत ..खूप लिहावं लागेल अजून.
अनेक लग्नसमारंभांना गेला असाल ना तुम्ही दोघे. मित्रांच्या कोंडाळ्यात बसून पहिले असेल तुम्ही तिला रुखवताकडे पाहताना. कशी वेगळीच दिसत होती हो ती. किती प्रेमाने सांगत होती सगळ्यांना तुम्ही भेट दिलेल्या त्या साडीबद्दल. साधी मोत्याची माळ तर घातली होती तिने पण सगळ्या गर्दीत आज कशी उठून दिसत होती. श्रावणातल्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेत तुमच्या बाजूला बसून पदर डोक्यावर घेऊन तुळशीची ची पाने वाहताना तुमच्या हाताला केलेला स्पर्श आठवतो का...झर्र्कन एक वीज स्पर्शून गेल्यासारखा. गाडीच्या प्रवासात न विसरता थर्मासमध्ये भरून घेतलेला तुमच्या आवडीचा मसालेदार चहा तुम्हाला भरून देताना किती कौतुकाने पाहत हॊतात हो तुम्ही तिच्याकडे. तुमची पहिली स्कुटर घेतली तेव्हा मागे बसून थोडीशी तुमच्यावर रेलून, तुमच्या उजव्या खांद्यावर हळुवार हात ठेऊन तुम्ही स्कुटर चालवताना छान दिसता हे सांगणारी हीच तर होती ... काही पाने या गुलाबी आठवणींची पण लिहाल तुम्ही.
पण याबरोबरच अकारण प्रगट झालेला तुमचा राग, तुमचा संताप, तुमची बोलणी, तुमची चिडचिड, प्रसंगी तुमची अपमानास्पद हाडहूड सहन करत सुद्धा तिने स्वतःच्या स्वाभिमानाला आणि अस्तित्वाला विसरून घरातील सर्व वातावरण सुरळीत पूर्वपदावर आणलेले क्षण शब्दांत मांडाल का हो या निबंधात. राहू द्या, नाही जमणार तुम्हाला.
शोधा परत त्या मिरचांच्या फोटोमध्ये तुमच्या बायकोला ..नक्की तिथेच मिळेल ती.. आयुष्यात वाटेला आलेला सर्व तिखटपणा शोषत तुमचा संसार गोड करणारी...मग लाल, पिवळी, ढोबरी आणि जाड का असेना.
समीर गुप्ते.

Khoop chhan lihilay
ReplyDelete