
दहीहंडी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निमित्त आणि येणाऱ्या सणानिमित्त शहराची वाट लावण्यासाठी ऊत आल्यासारखी बॅनरबाजीची सर्वपक्षीय जय्यत तयारी महाराष्ट्रभर सुरु असेलच. त्यातच "गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना शुभेच्छा" वगैरे बॅनर ची पण आता सुरुवात झाली आहे.
आणि एरव्हीपण काय एकेक बॅनर असतात मित्रानो ! म्हणजे ज्यांच्या साठी बॅनर बनवले जातात ते नेते सोडा पण जे डिझायनर ते बनवतात त्यांचा पण शिवाजी पार्क वर भव्य सत्कार करावा अस कधी कधी वाटतं .
काही वर्षांपूर्वी एका गावात एक लहान मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. घटना खरंच दुःखद होती. ९-१० हे काही वय नाही मरायचं पण ईश्वर इच्छा प्रबळ होती. नेमका हा मुलगा एका स्थानिक नेत्याच्या नात्यातला असल्याने त्याच्या शोकाकुल परिवाराचे सांत्वन करणारी अनेक बॅनर उत्साही कार्यकर्त्यांकडून गावभर लावली गेली. पण बॅनर वरचा मजकूर वाचाल तर वेडेच व्हाल. बघा काय लिहितात हे डिझायनर ...
"झिजलास तू चंदनापरी, माया केलीस आम्हावरी,
जाणवेल पोकळी क्षणोक्षणी, कृपा राहावी सर्वांवरी ."
तो बिचारा मुलगा १० वर्षाचा.. आणि "झिजलास" तू चंदनापरी ?.... कृपा राहावी सर्वांवरी?.... चायला काय लिहितात, काय छापतात , कशी अक्कल नसते याना?
मागे नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर लावलेल्या बॅनर वर हयात आणि ठणठणीत असलेल्या मॉर्गन फ्रीमन या सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचे फोटो छापल्याची बातमी पण फोटोसहित फेसबुक वर पहिलेली आठवतेय. काय गरज आहे या नसत्या उठाठेवींची ?
दुसरी चीड आणणारी बॅनर म्हणजे नियुक्तीची...कोण काढतं हि महान पदं. नुकत्याच मिसरुड फुटलेल्या मुलाच्या फोटोसहित कार्यसम्राट श्री अमुक तमुक याची वॉर्ड क्र. १७८ च्या उपसचिव पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन. कार्यसम्राट ? कशाला ?
मधल्या काळात "बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय भावानं ", " कसाबसा पास झाला म्हणून", " पहिली दाढी केली म्हणून", "ऐपत नसतानापण गर्लफ्रेंड ला फिरवायला ७०,०००/- ची गाडी घेतली म्हणून " ," काम नानांच्या घरच, होऊ दे खर्च " अशा टाईप चे बॅनर लावायची क्रेझ आली होती. आधी लोकांना पण गम्मत वाटायची पण नंतर अतिरेक झाला.
राजकारण्यांच्या वाढदिवसाच्या बॅनर ची तर कहाणीच वेगळी. आदरणीय दादा, भाई, साहेब, भाऊ, बॉस, वॉर्डाचे भाग्यविधाते, समाजाचे आधारस्तंभ, काही ठिकाणी तर जांणता राजा वगैरे हास्यास्पद.असली विशेषणे लावून त्या नेत्याचा वाढदिवस अक्षरशः तुमच्या माथी मारला जातो. या बॅनर खाली वॉर्डातले अनेक चेहेरे मिळतील तसे छापलेले. शेंडुंग फाट्याजवळ एक बॅनर तुम्ही नक्की पहा. त्यावर इतके फोटो असतात कि तुम्हाला वाटेल आता मतदाराचे फोटो पण बॅनर वर छापण्याची फॅशन आलीये का. जवळपास शंभर सव्वाशे फोटो.
या वर कहर म्हणजे या "बर्थडे बॉय" ची पोझ ... असे काही चमत्कारिक फोटो काढतात ही मंडळी कि काही विचारता सोय नाही. तुम्ही जर एकटक या फोटोकडे पाहाल ना तर अनेक एक्सप्रेसशन्स तुम्हाला दिसतील. म्हणजे काहीजण अतिशय आश्चर्य झाल्यासारखे, काहीजण " अरेच्या तू इथे कुठं? " अशी पोझ देऊन, काही हातात फाईल घेऊन अतिशय महत्वाच्या कामाला निघाल्यासारखे ,काही हसत हसत फोनवर शुभेच्छा घेतायत असे दाखवणारे, काही त्यांच्या नेत्यांसारखे आकाशात बोट दाखवून काहीतरी उडणारी वस्तू वगैरे दाखवणारे, काही अभ्यासात किंवा विचारात मग्न तर काही भलतेच खुश होऊन हसत पाहणारे, तर काही सिहासनावर बसून दरबार चालवत आहेत अशा गमतीदार वेगवेगळ्या पोझेस देत बॅनर वर झळकतात.
खरंच, समाजोपयोगी काम करून लोकाभिमुख होण्यापेक्षा बॅनर वर येऊन झटपट लोकप्रिय होता येतं या गोड गैरसमजात वावरणारे हे नव नेते भविष्यात काय दिवे लावणार असच वाटतं.
आणि या किळसवाण्या बँनरबाजीने तुमच्या शहराची वाट लावत 'कणभर' नेतृत्व गुण नसताना " कणखर नेतृत्व" लिहिणारी हि मंडळी भविष्यात तुमच्या शहरावर राज्य करण्याचे स्वप्न पाहत आहेत या पेक्षा तुमची वाईट चेष्टा ती कोणती.
No comments:
Post a Comment