भाषा... म्हणजे मराठी भाषा कशी टिकवावी हा एक मोठा प्रश्न आहे. काही प्रसंगी ऐकूनच बेशुद्ध पडू अशी भाषा आपल्याच माणसांकडून आणि आपल्यासमोरच सर्रास बोलली जाते.
प्रसंग एक -
स्थळ : माझेच घर ..
साधारण १० वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी मुलगी शाळेतून घरी आली. मी, माझी बायको, आई - बाबा असे सर्व तिची वाट पाहत बसायचो तसे त्या दिवशी पण बसलो होतो. ही आली आणि दप्तर सोफ्यावर भिरकावले. "मम्मा,आजपासून नवीन टीचर आली आहे - आमची सगळ्यांची फुल फाटलीये " असा बोलून ती धपकन सोफ्यावर बसली. हे वाक्य ऐकल्यानंतर मी आणि बाबा माझ्या मुलीकडे, बायको माझ्या आईकडे आणि आणि आई माझ्याकडे पाहू लागली. घरात पूर्ण सन्नाटा. मी आईकडे पाहताच आईने स्वतःला स्थिर ठेवत, शक्य तेवढ्या शांतपणे "तिला फाटली या शब्दाच्या मागे कोणता शब्द आहे ते समजावून सांग मग तिला कळेल" अस म्हणताच "आजी, हे काय सांगणार मला, टीचर इतकी डेंजर आहे कि हे शाळेत आले तर यांची पण फाटेल". आता मात्र कमाल झाली. कस या मुलीला समजावू कि हे सगळं बोलणं चांगलं नाही..कुठे शिकली हे सर्व.
प्रसंग दोन -
स्थळ : माझी माजी बँक..
कुठल्यातरी तरी कर्जासाठी लागणारा महत्वाचा कागद घेऊन मी बँकेत गेलो होतो. केबिन मध्ये पाहिलं तर व्यवस्थापक साहेब काही लोकांबरोबर बोलत हॊते. त्यांना व्यत्यय नको म्हणून कर्ज विभागातल्या एक जुनिअर क्लार्क असलेल्या मुलीच्या हातात कागद देऊन आठवणीने साहेबांच्या सुपूर्त करावयास सांगितला. इतक्यात काहीही कारण नसताना बाजूच्या टेबलावरून एक सिनिअर मुलगी काम करता करता तिला म्हणाली ' ए बाई, विसरू नकोस मागच्यासारखी.. नाहीतर साहेब परत चढतील तुझ्यावर"... पुन्हा एक सन्नाटा...पण या वेळी फक्त माझ्या मनात .. त्या दोघीनांही यात आपण काही वेगळं बोलतोय याची सुतराम जाणीव नव्हती...'चिडतील' या शब्दाची जागा 'चढतील' या शब्दाने घेतली होती ... मी वळून साहेबांकडे पाहिलं...काही न बोलता बँकेतून बाहेर पडलो.
मराठी भाषेवरच्या इंग्रजी आक्रमणामुळे तर जे काही ऐकायला मिळतं काय सांगू. 'तुझ्या पॅंटीवर डाग लागलाय, शर्टाला व्हाईटनेसपणा पाहिजे ,तापामुळे खूप विकनेसपणा आलाय, मॉर्निगवॉक साठी चालायला गेलेत, केटरिंगची मोठी ऑर्डर मारली, वयामुळे आईच्या डोळ्यांची साईट वीक झालीये, उगीच डोक्याला हेडेक नको, पुढे जाऊन डावीकडे लेफ्ट घ्या, मोबाईल चा रिचार्ज मारला' हे नवजात शब्दसंच तर इतके अंगवळणी पडलेत कि ते आपल्या भाषेचाच एक भाग आहेत असा वाटायला लागलंय. कोकणातल्या काही घरात तर झोपताना 'दिवा विझव' म्हणण्या ऐवजी 'लाईट काढ' असं बोलताना मी स्वतः ऐकलंय. एक ना दोन ..अनेक प्रसंग, अनेक शब्द असे आठवतात की जर भाषेला आत्मा असेल तर तर त्याचा पण थरकाप उडेल.
मुंबईत राहणाऱ्या अमराठी लोकांची मराठी हा एक वेगळा विषय आहे. अतिशय प्रयत्नपूर्वक मराठी बोलून ते व्यवसाय करतात हे कौतुकास्पद आहे. पण कधी कधी मोठे विनोदही घडतात.
माझ्या ओळखीतले एक कन्नड गृहस्थ 'अचानक' हा शब्द इतक्यावेळा आणि इतक्याठिकाणी वापरतात काय सांगू. म्हणजे "उद्या संध्याकाळी ५ वाजता तुम्ही अचानक माझ्या ऑफिसला या. चहा पाणी पिल्ला कि आपण इंजिनीअर ला कळवून अचानक साईटवर जाऊ आणि गाडी पार्किंगमध्ये ठेवा, येतेवेळी तुम्हाला खाली सोडून मी अचानक वर जाईन." हे संभाषण जर कोणी ऐकलं तर त्याला अचानक काहीतरी व्हायचं. हा कन्नड माणूस मराठी इतकं चांगल बोलतो म्हणून कौतुक करावं की मराठीची 'अचानक' वाट लावतो म्हणून झोडून काढावं कळत नाही.
जवळपास अमराठी वस्ती असलेल्या घाटकोपर, मालाड इथे राहणाऱ्या गुजराती माणसांनी पूर्ण शिकल्याशिवाय मराठी बोलूच नये या मताचा मी आहे. मी राहतो तिथे म्हणजे खारकर आळीत हा समाज खूप मोठ्या संख्येने आहे. अस्सल मराठी वस्तीत राहिल्यामुळे त्यांच्यावर मराठीचे संस्कार चांगले आहेत. तरीपण दुसऱ्या गुजराती माणसाला माझी ओळख करून देताना काय सांगतात माहीत आहे "हे लै मोठा मानूस हाय..हेचा लै मोठ्ठा होल हाय - फुल्ली ऐरकंडिसन - चार पाच से माणस आरामसुन मावते .. सोरी एक नाय हा सोरी.. ४-५ होल हाय''...अरे कशाला...त्याला गुजराती मध्ये सांग ना. एकाच वेळी माझी, मराठीची आणि इंग्रजीची का वाट लावतोस. पण उत्साह दांडगा मराठी बोलण्याचा.
याच्या बरोब्बर विरुद्ध ठाण्याच्या हरी निवास सर्कलवरचा क्वालिटी पेंटवाला सरदारजी - माझा मित्र परमजीत. इतकं सहज, सोप्प आणि अस्खलित मराठी बोलतो कि तुम्हाला वाटावं हा दाढी वाढवून फेटा बांधलेला गोडबोले किंवा केळकर आहे. माझा अनुभव हा आहे की एकूणच मुंबई पुण्यातली ही सरदार मंडळी मराठी उत्कृष्ट बोलतात.
एक मात्र नक्की..या सर्व मंडळींनी आपल्या मराठी भाषेला जवळ करून भाषेला नसलं तरी मराठी मैत्रीला समृद्ध केलंय. भाषा टिकवायला ती चलनात असणं गरजेचं आणि भाषा जपायला ती वापरणाऱ्या सर्वांचं कौतुक करत आपण त्यांचं करेक्शन करणं महत्वाचं.
समीर गुप्ते
samhere#sameergupte.blogspot.com#sameer6949@gmail.com
No comments:
Post a Comment