Wednesday, 13 December 2017

नाव नसलेलं, तरीही नाव कमावलेलं - सीकेप्यांचं 'निनावं'


''ए तुम्ही सीकेपी व्हेज खाता का रे ?'' या खोचक (तरीही आम्हाला अभिमानास्पद) प्रश्नाला होकारार्थी उत्तर मिळाल्यानंतर समोरचा माणूस कसला चमकतो सांगू. इतकंच नाही तर आम्ही सीकेपी व्हेज बरोबर गोडधोड पण चवीने खातो हे सांगितल्यावर ही धक्का बसलेली मंडळी सावरण्याआधीच परत कोसळतात. ''हं, ते गोड म्हणजे श्रीखंड वगैरे ना ?'' उगीचच आपल्याला कळतं हे सांगण्याचा अट्टाहास करत परत उभं राहायचा प्रयत्न होतो. पण यालापण निरुत्तर करणारं उत्तर आहेच आपल्याकडे - अहो 'आम्हा सीकेप्यांचं निनावं'. 'निनावं ? हे काय नाव आहे ?' या प्रश्नानंतर आपली सटकते आणि मग सुरु होतं निनावं महात्म्य.
निनावं - सीकेपी सुगरणीच्या पाक कौशल्याला दाद मिळवणाऱ्या ज्या हजारो पदार्थांचा जन्म झालाय त्याच्यात सर्वोच्च शिखरावर असणारा जो 'नावा'जलेला पदार्थ तो म्हणजे निनावं. इतके पदार्थ, इतक्या पाककृती, इतके खाण्यापिण्याचे लाड करत करत हा बिननावाचा पण नामचीन पदार्थ या पृथ्वीतलावर कसा अवतरला याचे मात्र आमच्याकडे उत्तर नाही. कदाचित प्रयोगशील गृहिणीमुळे किंवा कदाचित स्वयंपाकघरातील एखाद्या अपघातामुळे तयार झालेला हा पदार्थ असावा. अनेक पदार्थांचे नामकरण होऊन आता काय नाव ठेवायचे या विवंचनेत असलेल्या त्या भांबावलेल्या गृहिणीने 'निनावं' हे नाव मात्र कल्पकतेनेच ठेवलंय. नुसतच खाण्यात नाही तर खाताना जाणवणाऱ्या एका प्रेमाच्या गोडव्याने निनावं हा गोड पदार्थांमधलं एक अव्वल स्थान प्राप्त करतो. तसं पाहिलं तर फक्त गव्हाच्या आणि चण्याच्या पिठात तूप, गूळ. वेलची, जायफळ आणि त्यावर नारळाचं दूध या साध्याश्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण पदार्थ. कृती पण अतिशय सोप्पी. लहानपणी कोळशाच्या शेगडीवर केला जाणारा आहे पदार्थ आता मात्र गॅस च्या चुलीवर बनतो. पण त्यावेळच्या तव्यावर ठेवलेल्या भांड्याच्या झाकणावर असलेल्या निखाऱ्याच्या धुराचा 'स्मोकी फ्लेवर' अजूनही मनात रुजलाय. दर पाच मिनिटांनी स्वयंपाक खोलीत जाऊन 'झालं का गं निनावं, झालं का गं निनावं' अशी गोड भुणभुण आईच्या मागे लावण्यातला आनंद काय असतो हे कदाचित आजच्या पिढीला कळणार नाही. कदाचित श्रावणात पुजलेल्या जिवतीच्या चित्राजवळ ठेवलेल्या नारळाच्या दूधामुळेच या निनाव्यात आईच्या ममतेचा गोडवा येत असावा. श्रावणाच्या शेवटी दाटा या सणाला पाहिजेच असलेले हे निनावं आणि त्याबरोबर खमंगअळू वडी हे भन्नाट कॉम्बिनेशन करून घरच्यांना देणे हा प्रत्येक सीकेपी गृहिणीचा एक आनंदोत्सव असतो. निनावे बनताना घरात जो सुगंध दरवळत असतो त्याला कोणत्याही सुगंधाची उपमा देणं शक्यच नाही.
निनावं बनल्यानंतर ज्यांच्याकडे खूप म्हणजे खूपच संयम आहे ते त्याच्या लोभस रुपाकडे पहात त्याच्या वड्या वगैरे व्हायची वाट पाहतात. आमच्यासारखे आचरट खादाड निनावंप्रेमी 'जरा बघू थोडंसं' म्हणून भांड खाली उतारताक्षणीच सुरुवात करतात.
काही पदार्थांबद्दल जास्त न बोलता ते फक्त आणि फक्त खाऊन तृप्त होणे या पेक्षा सुख ते काय... निनाव्याचं पण असंच आहे. तुम्ही जितके बोलाल तितकी आठवण येऊन स्वतःलाच त्रास होईल .. त्यापेक्षा आज निनाव्याचा बेतचं करून बघायला काय हरकत आहे. नव्या पिढीला निनावं आवडावं यासाठी 'निनावं मूस केक' यासारखा नाविन्यपूर्ण पदार्थ सीकेपी फूड फेस्ट मध्ये शेफ यशोधन देशमुख ने साकार केल्याचं तुम्ही ऐकलं असेलच. आपण कौतुकाने एखाद्याला निनावे खायला दिल्यानंतर 'हे थोडं मोहनथाळा सारखा लागतं नं' अस जर कोणी बोलला तर त्याच्या हातात उरलेलं निनावं परत घ्यायला क्षणभर पण कचरू नका .. ज्याने आपल्या अस्तित्वासाठी स्वतःच्या नावाचाही कधी हट्ट धरला नाही त्या मोठ्या मनाच्या 'सीकेपी' निनाव्याला मान द्यायला इतकं तर करूच शकतो आपण.. गम्मत म्हणून लिहतोय हो.. नाहीतर खरंच हिसकावून घ्याल. अहो निनावं म्हणजे फक्त सीकेप्यांच्या स्वयंपाक घरातला गोड पदार्थ नाहीये, निनावं म्हणजे आपल्या पाककलेचा आणि पाहुणचाराचा गोडवाच जणू. खाऊ द्या त्यांना निनावं.
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट

Saturday, 4 November 2017

वेध एकवीरेच्या दर्शनाचे, भाग्य सीकेपी समाजाचे !


सीकेपी समाज हा खरंच भाग्यशाली म्हणावा लागेल. म्हणजे कसं आहे नं की काही समाजबांधवांकडे पाहिलं तर कोणत्या कोणत्या कारणासाठी यांचे मेळावे, मोर्चे, उपोषणं, निदर्शनं चालू असलेले दिसतात. यांना एकत्र आणण्यासाठी एखादा नेता किंवा मग एखादा झेंडा याचा आधार घेतलेला आपण पाहतो. परंतु सर्वगुणसंपन्न आणि पुरोगामी विचारांच्या सीकेपी समाजाला एकत्र यायला ना कोणा नेत्याची गरज, ना कोणत्या झेंड्याची आणि ना ही कोणत्या घोषणेची. नोकरीपेशा आणि व्यवसायासाठी देशभर विखुरलेल्या या समाजाला कोणत्याही कारणाशिवाय एकत्र आणण्यासाठी साक्षात कुलस्वामिनी एकवीरा देवी धावून आली आहे तो समाज भाग्यशाली नाही तर काय. बघा ना, एका नवजात संस्थेचा एक कार्यकर्ता आपली संकल्पना मांडतो काय, तीला स्वीकारून ती संस्था त्या संकल्पनेला लोकांसमोर ठेवते काय आणि मग त्याला प्रचंड प्रतिसाद देत समस्त सीकेपी समाज आई एकविरेच्या छत्रछायेखाली एकवटण्याचं ठरवतो काय .. सगळं कसं स्वप्नवत. कल्याणच्या सीकेपी संस्थेने पुढाकार घेऊन केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्व ज्ञातीतर्फे त्यांचे आभार मानावे तितके कमीच परंतू एकविरेच्या कृपेने ज्याने ही कल्पना मांडली त्याचे जाहीर कौतुक केलेच पाहिजे...माझ्या माहितीप्रमाणे डोंबिवलीचा माझा मित्र विजय देशमुख हाच तो ज्ञातिबांधव आहे ज्याच्यामुळे आज आपण सर्व आई एकविरेच्या चरणी तिच्या मुलांसारखे 'एक दिवस कायस्थांचा' ही संकल्पना साकारण्यास एकत्र येत आहोत.
कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने आपण तिच्या कडे जातोय ... काय मागावं बरं तिच्याकडे ? भपकेबाज नोकरी, भरभराटीचा धंदा, आलिशान घर, भली मोठ्ठी गाडी, मुलांची लग्न, नातवंडांची ऍडमिशन, परदेशातल्या आप्तांची खुशाली, आई वडिलांचे आरोग्य, कोर्टकचेऱ्यांमधून सुटका, एक ना दोन अनेक मागण्या अनेक साकडं घालता येतील आपल्याला. पण खरंच गरज आहे का या सगळ्याची. अहो तिच्यामुळेच तर इतकं भरभरून मिळालंय. इतकं की काही वर्षांपूर्वी तिच्या दर्शनाला मळवलीहून बैलगाडीने येणारे आपण आज आपल्या एअर कंडिशन गाडीतून येतोय.
या वेळेला काही वेगळं मागुयात का आपण तिच्याकडे ? म्हणजे असं की आधीच अल्पसंख्यांक असणाऱ्या आपल्या समाजात प्रेम आणि सलोखा नांदू देत, एकमेकाला मदतीचा हात देत वर एकमेकाला वर आणण्याची जाणीव रुजू देत, समाजबांधवांचं दुःख ते आपलं ही मानसिकता वाढू देत, ज्ञातीतील उपेक्षितांच्या गरजेला धावण्याची बुद्धी येऊ देत आणि जमलंच तर छोट्या छोट्या वादांमुळे समाजातील दुरावलेल्या आणि दुभंगलेल्या नात्यांना जोडण्याची क्षमता आपल्या ठायी येऊ देत. यातली एक गोष्ट जरी तिच्या कृपेने आपल्या पदरात पडली तरी या कार्यक्रमाचं सार्थक होईल.
पाहिल्यान्दाच असं एकत्रपणे आईला भेटायला जातोय ... तिलाही काही देऊयात का आपण ? तिला काय देणार म्हणजे .. असच एकोप्याने राहू आणि नित्यनेमाने तुझ्या पायाशी येऊ असं वचन तर नक्कीच देऊ शकू ना आपण. मुलांनी एकत्र राहण्यापेक्षा दुसरं काही नको असतं एका आईला.
मग चला ज्ञातिबांधवांनो.. कार्यक्रम कोणाचा, कोणी ठरवला, आयोजक कोण, संयोजक कोण, ही संस्था कोणाची, श्रेय कोणाला हे सगळे क्षुल्लक प्रश्न मागे टाकून तिच्या भक्तीत तल्लीन होऊन, त्या तेजपुंज दिव्यत्वाला डोळ्यात साठवायला, तिच्या कृपादृष्टी चे धनी व्हायला, वाजत गाजत, हसत खेळत, तिच्या नावाचा जयघोष करत तिचा गड गाठूया. चला ज्ञातिबांधवांनो .. एकत्र येऊया ! एक नवा समाज घडवुया !!
शनिवार ११ नोव्हेंबर २०१७..आम्ही येतोय.. तुम्ही पण नक्की या !
आपलाच,
समीर गुप्ते
विश्वस्त - सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट, ठाणे.
अध्यक्ष - सीकेपी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.
अध्यक्ष - सीकेपी बीडीएफ ठाणे.
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट

साधंसं तरीही असाधारण.. फक्त आपलंच आंबटवरण !


''तू हल्ली हल्ली जरा जास्तच सीकेपी फूड, सीकेपी फूड करत असतोस रे " नाशिकहून परत येताना कल्याणजवळ कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं या विचारात असलेल्या माझ्या मित्राने मला टोकायला सुरुवात केली. तसं काहीच कारण नव्हतं, मी फक्त इतकंच म्हणालो की ''हे तुझं पंजाबी आणि चायनीज वगैरे नको रे आता..खूप कंटाळा आलाय मला' पण साहेब जरा जास्तच खवळले. मी म्हटलं जाऊदे ..गपचूप आपल्या घरी जेऊयात, बघ फोन लावून तुझ्या घरी काय केलंय ते. त्याने बायकोला तडक फोन लावला, काहीतरी बोलला आणि तेव्हढ्याच वेगात कट केला .." साधय रे, मेथीची भाजी आणि भाकरी'' तोंड वाकड करत माझ्याकडे पाहत पुटपुटला. मी म्हटलं जाऊदे माझ्या घरी फोन लाव आणि स्पीकर वर टाक म्हणजे मला गाडी चालवत बायकोशी बोलता येईल. घरचा फोन नेमका आईने उचलला. म्हटलं जेवायला काय आहे गं आज... "काही नाही, साधंच केलंय'' माझ्या आईच्या या उत्तराने त्याचा चेहरा अजूनच पडला. ''साधंच म्हणजे'' मी आपला विषय सुरूच ठेवला.. '' साधं म्हणजे आंबट वरण, भात, काचऱ्या बटाट्याची भाजी आणि मिरची तळलीये... तू येत असशील जेवायला, तर सुकट टाकते तव्यावर''.  ''ओके, मी अर्ध्या तासात येतो'' असं म्हटलं आणि फोन कट  केला. ''चायला, याला साधं जेवण म्हणतात तुमच्याकडे? पाच पाच पदार्थ बोलली तुझी आई'' आश्चर्यचकित होऊन विचारणाऱ्या मित्राकडे बघून मी शांत हसलो .. मेथीची भाजी भाकरी च्या समोर आमच्या घरातलं साधंसं  जेवण सरस ठरलं आणि आम्ही दोघे घरी येऊन मनसोक्त जेवलो.

या साध्याशा जेवणातले दोन सुपरस्टार पदार्थ म्हणजे आंबटवरण आणि काचऱ्या बटाट्याची भाजी. या दोघांना जगात पर्याय नाही. त्यातच सीकेप्यांचं आंबटवरण हे अनेकांना भुरळ घालणारं आहे आणि त्याच्याबरोबर जोडीला असलेली तव्याला चिकटलेली,थोडीशी करपलेली, तेलाच्या लालसर तवंगावर थोडीशी पिवळसर करडी झालेली पातळ कापलेल्या बटाट्याची भाजी म्हणजे केव्हाही लाजबाब. जेव्हा जेव्हा आम्ही आठ दहा दिवसांसाठी बाहेरगावी फिरायला जातो तेव्हा आम्हाला पहिले चार पाच दिवस, किती नवीन पदार्थ खातोय आणि किती नाही असं होतं पण सहावा सातवा दिवस लागला की आपलं आंबटवरण भात कधी खायला मिळतंय अस होऊन जातं. विमानतळावरून '' आज आंबटवरण भात करून ठेव'' असा फोन हमखास घरी जातो. आंबटवरणावरून एक खूप खूप जुनी आठवण झाली. त्यावेळी गडकरी रंगायतन नव्हतं. ठाण्याच्या मो.ह.विद्यालयात( MH High school) रात्रीचे नाटकाचे प्रयोग होत. आमच्या वाडयातल्या मामी, म्हणजे सुमती रणदिवे यांचं आणि त्यांच्या काही सीकेपी मैत्रिणीचं तिथे कॅन्टीन सारखं काहीतरी असायचं आणि नाटक संपल्यावर सर्व कलाकारांना त्यांचंच जेवण असायचं. त्या मलाही त्यांच्या मुलांबरोबर मदतीला न्यायच्या. अनेक दिगग्ज कलाकारांना म्हणजे गोरेपान काशिनाथ घाणेकर, कमलाकर सारंग, श्रीकांत मोघे, निळू फुले, वारणेच्या वाद्यवृंदातील चाळीसएक बालकलाकार आणि त्यांचे खूपच प्रेमळ गुरुजी, गायिका प्रमिला दातार या सर्वाना मी तेव्हा जवळून पाह्यलंय, अगदी मांडी घालून जेवताना पाह्यलंय आणि त्यांना पापड, लिंबू वाढलेत सुद्धा.  त्यावेळी एकदम राजबिंडे दिसणारे अभिनेते श्रीकांत मोघे यांना तर आमच्या मामींनी केलेलं आंबटवरण खूप आवडायचं .. अक्षरशः वाट्या वाट्या प्यायचे. आणि एकूणच त्यांचं जेवण आनंदाने आणि मनसोक्त जेवायचे ... हेच साधंसं जेवण पण त्या सर्वांना मनापासून आवडायचं.

आंबटवरण हा खरंतर सीकेपी जेवणातला एक संपूर्णपणे वेगळा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. आंबटवरणाला ''डाळ वाढा हो'' असं बोलणाऱ्याला परत जेवायला बोलावू नये या मताचा मी आहे.  जेवायच्या आधी आंबटवरणावरच गरम गरम पाणी वाटीभर प्यावं, परत जेवताना भातावर ओतल्यावर वाटीत उरलेले वरण थेट ओठाला लावून परत वाटी भरायला ताटात ठेवावी आणि पोटभर जेवल्यावर सुद्धा उठता उठता पाण्याऐवजी घट्ट राहिलेलं वरण पिऊनच उठावं याला म्हणतात आंबटवरण भाताचं जेवण. इतका अप्रतिम सुगंध असणाऱ्या,लसूण मोहरीच्या फोडणीने अजूनच तडकेदार झालेल्या या आंबटवरणाला 'साधंसं' या सदरात ज्याने कोणी टाकलं असेल त्याचा जाहीर सत्कारच करावा म्हणतो.  आजचं उरलेलं आंबटवरण दुसऱ्यादिवशी सकाळी तापवून आणि आटवून चपातीबरोबर खाताना जो काही आनंद मिळतो तो कोणत्याही शब्दात व्यक्त होऊच शकत नाही. आंबटवरणाबरोबर जगातली कोणतीही भाजी चालून जाते, भाजी नसेल तर सोडे, सुकट, लोणचं, पापड काहीही चालतं. आपल्याकडे आंबटवरणाची गोडी इतकी मोठी आहे की घरात तूरडाळीच्या महागाईची  कडवट चर्चा सुद्धा नसते.

मागचे काही आठवडे मी बघतोय, माझा लेख आवडला तर अनेक महिला आज तोच पदार्थ घरी करणार वगैरे कॉमेन्टमध्ये लिहितात.  बघा आजपण रविवार आहे..पण तुम्हाला नम्र विनंती - आज तुम्ही नेहेमीप्रमाणे मटणाचं जेवणच करा. नाही तर 'अखिल भारतीय तेचतेच खाऊन कंटाळलोय महासंघ' या संघटने मधले काही चिडलेले नवरे माझ्या घरावर मोर्चा आणायचे.

समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.com
#foodblog #delicious #ckpfood #ckpfoodfest
sameer6949@gmail.com.

टीप - माझ्या त्या मित्राचे नांव विचारू नका.. एकशे सत्ताविसाव्यावेळी त्याची बायको रागावून माहेरी गेल्याचे पाप लागेल मला. 

Monday, 30 October 2017

''याचना नही अब रण होगा, संघर्स बडा भीसण होगा''

प्रश्न ठाणे मुंबईत राहणाऱ्या सर्व युपी वाल्यांचा नाहीये बरं का.. शेकडो मित्र आहे माझे. प्रेम करणारे, जीवाला जीव देणारे, मदतीला धावून येणारे. मेहेनतीच्या पैशातून घेतलेल्या अधिकृत घरात राहतात, कर भरतात, प्रामाणिक व्यवसाय करतात, शेजारधर्म आणि नाती सांभाळतात, भूमिपुत्रांवर प्रेम करतात, अदबीने बोलतात, सणासुदीला तुम्ही त्यांना विसराल पण ते न विसरता तुमच्या पाया पडायला येणार आणि गावाहून येताना थोडं का होईना आपल्या शेतातलं काहीतरी घेऊन येणार. यांच्याबद्द्दल बोलतच नाही कोणी. देश माझाही आहे आणि यांचाही. मोठा प्रश्न आहे या स्वभावा विरुद्ध वागणाऱ्या अनधिकृत हरामखोरांचा , शहराची जागा ढापून, आपल्या नागरी सुविधा लुटून, आपल्याशी उर्मट वागणाऱ्या आणि त्यापेक्षाही मोठा त्यांना चिथावणाऱ्या आणि पाठीशी घालणाऱ्या कुत्र्यांचा. कुत्र्या कुत्र्या बोलून कुत्र्यांचा फार अपमान तर करत नाहीये ना मी ? कारण ज्या शहरात आपण मोठे झालो त्या शहराशी अप्रामाणिक राहणारे हे हलकट नेते प्रामाणिक कुत्र्यांची उपमा देण्याच्या लायकीचे नाहीत. काय अवदसा आठवली आणि ह्या भिकारड्याना मोठं केलं अस काही मराठी नेत्यांना नक्कीच वाटत असेल.

''याचना नही अब रण होगा, संघर्स बडा भीसण होगा'' हे वाक्य आहे त्या भिकमाग्या संजय निरूपमच. काँग्रेस पक्षाचा हा उपऱ्या 'सहरअद्यक्स" काय काय बरळतोय. अरे हिम्मत होते कशी याची मुंबईत राहून भोजपुरीत बोलून अनधिकृत फेरीवाल्याना चिथवायची. स्वतःची बायका पोरं गावाला सोडून आलेली ही मंडळी दुसऱ्याच्या बायकांना कोणत्या नजरेने बघतात, रिक्षावाले तर कोणत्या पद्धतीने वागतात हा तर मोठा विषय आहे. माझे शहर स्वतःच्या बापाचे असल्याच्या थाटात वागून जर आमच्या माणसावर हात उचलणार असाल तर हात उखडून टाकायला वेळ नाही आम्हाला. प्रामाणिक मेहेनत करा, कर भरा, शहर स्वच्छ ठेवा, अधिकृत बाजारपेठा वापरा ... कोणाची ना नाही या गोष्टीला. वेगाने वाढणाऱ्या आणि मोठ्या होणाऱ्या शहरामध्ये गरज आहेच या सर्वांची. जे काम करायला आमची मुलं तयार नाहीत ती कामं तुम्ही करताय, तुमची कुटुंब एखाद्या चाळीत सन्मान पूर्वक राहताहेत, तुमची मुलंबाळं चांगलं शिक्षण घेत आहेत, एक चांगलं वातावरण तयार करून तुम्ही सामाजिक स्वास्थ्य जपताय, कौतुकच आहे तुमचं. पण आमच्या नागरी सुखसुविधा ओरबाडणाऱ्या, अनैतिक धंदे करणाऱ्यांना आणि त्यांच्या 'मुलुख' मधली गुंडगिरी आणि गचाळगिरी इथे करू पाहणाऱ्या एकालाही माझ्या माझ्या माणसाकडे वाकड्या नजरेने पाहण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या नेत्यालाही थोबाडायला आम्ही मागेपुढे बघणार नाही.

पक्षभेद विसरून काल मनसेच्या कार्यकर्त्याची विचारपूस करायला गेलेला नितेश राणे मला पहिल्यांदा आवडला. राज ठाकरे साहेबांचा मी चाहता आहे म्हणून नव्हे पण मुंबईतल्या या उपऱ्यांच्या गुंडगिरीला शह देणाऱ्या मनसे ला शिवसेनेकडून या आंदोलनात एखाद्या घोषणेची साथ मीळावी ही माफक अपेक्षा होती. बाळासाहेब नावाचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्यामागे गेला असला तरी आजही डरकाळी ला घाबरण्याची प्रथा आहे..पण डरकाळी न फोडण्यामागची राजकीय गणितं माझ्या बुद्धी पलीकडची आहेत. बाकी मराठी माणसाच्या हितासाठी 'त्या दोघांनी' आतातरी एकत्र यावं असली स्वप्न बघणं आता मराठी माणसांनी सोडून द्यावं.. जर तुम्हाला सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगायचं असेल तर काही असामाजिक शक्तींना ठेचायला तुम्ही स्वतः पुढे सरसावलात तरच ठीक ..नाहीतर नाक्यावरच्या फेरीवाल्याकडे ''ए भैय्या, थोडा जादा देना हं'' हे हिंदीत बोलायची सवय आहेच आपल्याला.

शांतीप्रिय मुंबईला रण करून 'भीषण संघर्ष' करण्याची भाषा करणाऱ्या कुत्र्याला त्याच्या राजकीय अस्तित्वासाठी याचना करायला लावायची हीच वेळ आहे आणि जो पण ते करेल त्याच्या मागे सर्वानी ठामपणे उभे राहायची आजची गरज आहे.

जय महाराष्ट्र !

समीर गुप्ते.

Friday, 27 October 2017

'आपलं वडीचं सांबार'



बघा हं तुम्हाला पटतंय का ते. म्हणजे वाचल्यावर पटेलच पण तरीपण विचारतो. म्हणजे मला सांगा, जेवणात वडीचं सांबार खाल्यानंतर,  भातावर चार चार वाट्या  ओतून पोटभर जेवल्यानंतरसुद्धा परत स्वयंपाक घरात जाऊन ओट्यावरच्या त्या सांबाराच्या भांड्यावरच झाकण काढून बघता का हो तुम्ही?  खरंतर मला 'बघता ना हो तुम्ही' असच म्हणायचं होतं पण थोडं चाचरत असं बोललो. बहुतांशी मंडळींचं उत्तर 'हो' च असेल कारण माझं पण उत्तर तेच आहे. तसं माणसाने  स्वत:वरून जगाची परीक्षा करू नये पण या खाण्यापिण्याच्या परीक्षेत माझ्यासारख्या खादाडांची सगळी उत्तरं सारखीच असतात. असो.
तर आपला विषय आहे वडीचं सांबार...नव्हे 'आपलं वडीचं सांबार'.

सीकेपी सिग्नेचर डीशेस मधल्या अग्रक्रमांकावर असणाऱ्या निवडक पदार्थामधली माझी सर्वात आवडती अस म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

कसं आहे, एक तर हे वडीचं सांबार आपल्या घरी रोज रोज बनत नाही, बनलेच तर पुरता पुरत नाही, उरण्याचा प्रश्नच नाही आणि समजा चुकूनमाकून  उरलं तर उभ्या उभ्या वाटीभर पिऊन संपवल्याशिवाय आपला आत्मा शांत होत नाही. पटतंय का ?  एखादा कांदा, अर्धी वाटी नारळाचं दूध, वेलच्या, दालचिनी, चमचा दोन चमचे चण्याचं पीठ, तिखट मीठ हळद या साध्याशा वाटणाऱ्या साहित्याने जे काही भन्नाट रस्सायन तयार होतं  त्याचं नाव वडीचं सांबार. आणि चण्याचं पीठ वापरून केलेल्या काजू कतली च्या आकाराच्या पण जाडसर मोठया अशा वड्या या सांबारात सोडण्याचा एखाद्या सुग्रणीचा जो सोहळा असतो तो अवर्णनीय असतो .. एक तर जेवायला वडीचं सांबार आहे हे ऐकूनच सपाटून भूक लागलेली असते, ताटात कापलेल्या वड्यांवर हात टाकावा तर जेवताना वाटीत कमी मिळण्याची धमकी आधीच दिलेली असते आणि तरीही माझ्यासारखा एखादा उतावळा ताटात भात वाढून घेऊन ते ताट हातात धरूनच बायकोच्या बाजूला उभा असतो. एकदा का ताटात वडीचं सांबार पडलं की मांडी घालून बस्तान बसवायचं आणि वाफाळलेल्या भातावर सांबार ओतून नाकातून पाणी येईस्तोवर मनसोक्त जेवायचं. भुरक्या भुरक्याला अवीट आनंदाची साक्ष देणाऱ्या या वडीच्या सांबाराला पिऊ तेव्हडं कमी.  ते पिताना त्यातल्या  गरम गरम वड्यांचे सुसह्य आणि हवेहवेसे चटके जिभेला चोचले या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने समजावून सांगतात. आम्हा सीकेप्यांच्या घरात महिन्यातून एकदातरी अवतारणाऱ्या या स्वर्गलोकीच्या व्यंजनाला एक विशेष रंग प्राप्त झालेला असतो.. आणि तुम्हाला सांगतो खरा खवय्या या रंगावरच फिदा होतो. वडीचं सांबार कशाबरोबरही ही खाता येत असलं तरी त्याच्या चवीला योग्य न्याय द्यायला पांढऱ्या भाताशिवाय पर्याय नाही.

वाचताना भूक जागवली गेली असेल तर आजचाच बेत पक्का करा 'आपल्या वडीच्या सांबाराचा' !

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
#sam here #sameergupte.blogspot.com
#ckpfood #delighful #exoticfood

Sunday, 22 October 2017

आंदोलन कोणीही करा पण या अनधिकृत फेरीवाल्याना हाकला.


काल मनसे नी केलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधातल्या आंदोलनानंतर अनेकांना फेरीवाल्यांचा पुळका आल्याचं दिसलं. वास्तविक या मंडळींनाही अनेकवेळा या फेरीवाल्यांचा त्रास होतच असेल पण तिथे बोलण्याची आणि आवाज उठवण्याची यांची हिम्मत नसते. अगदी स्वतःच्या बिल्डिंगच्या गेटवर बसलेल्या फेरीवाल्याला पण 'भाई थोडा सामान बाजूने लेना हं, आने जाने को तक्लिप होता है' असलं काहीतरी मुळमुळीत बोलल्याचं पण पाहायला मिळतं. ज्यांना या आंदोलनाचा राग आला असेल किंवा आंदोलन करणाऱ्या मनसेवर टीका करण्याची संधी साधण्याची हीच योग्य वेळ आहे अस वाटत असेल त्यांनी माझ्या काही मुद्य्यांकडे लक्ष द्यावं.
तूम्हाला फेरीवाल्यांचा इतका कळवळा असेल तर एकदा स्टेशनजवळ किंवा एखाद्या बाजारपेठेत स्वतःच्या पैशाने एक दुकान विकत घेऊन बघा.. नसेल जमत तर भाड्याने घेऊन बघा. पूर्णपणे अधिकृत बांधकाम केलेले दुकान, त्यावर दरवर्षी भरावयाचा कर, सर्व नियमांचे पालन आणि गुमास्ता फी भरल्यानंतर तुमच्या दुकानाबाहेर जेव्हा एखादा फालतू फेरीवाला माल विकून तुमच्याशी स्पर्धा करेल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
स्टेशन जवळ जायच्या यायच्या रस्त्यात तुम्हाला फूटपाथ शोधावा लागतो आणि मग बेफाट रिक्षांच्या गर्दीला छेदत रस्त्यावरून चालत असताना तुम्हाला एखाद्या वाहनाचा जोरदार धक्का लागेल आणि तुमचे आठ दिवस अंथरुणावर कळवळण्यात जातील तेव्हा तुम्हाला हा फेरीवाला नकोसा वाटेल.
स्टेशनच्या पादचारी पुलावरून गाडी पकडायला धावताना जेव्हा एखाद्या फेरीवाल्याच्या मांडलेल्या सामानावर तुमचा पाय पडल्यानंतर तुमच्या आयाबहिणिंचा जो उद्धार तो करेल आणि तुमचा जाहीर अपमान होईल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
कधी तुम्ही तुमच्या लाडक्या कटुंबाबरोबर तुमच्या एसी कारमधून खरेदीला जाल आणि थोड्या वेळासाठी रस्त्याच्या कडेला गाडी पार्क कराल तेव्हा समोरच्या फुटपाथवर अनधीकृतपणे 'सब्जी' विकणारा तुम्हाला अतिशय उद्धटपणे गाडी पुढे घ्यायला सांगेल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांबरोबर जे बिनकामाचे भिकारxx लोक गप्पा मारत बसलेले असतात त्यात काही त्यांचेआश्रयदाते, भाई, दादा पण असतात. हे लोक जेव्हा तुमच्या घरातल्या स्त्री ची छेडखानी किंवा अपमान करतील आणि तुम्ही हतबल असाल तेव्हा तुम्हाला ते नकोसे वाटतील.
संध्याकाळी देवळात जाणाऱ्या तुमच्या म्हाताऱ्या आईबापाला या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे जेव्हा रस्त्यात नीट चालता येणार नाही आणि एखाद्या अडचणीच्या ठिकाणी पडून त्यांचे एखादे हाड मोडेल कदाचित तेव्हा तुम्हाला हे फेरीवाले नकोसे होतील.
स्वच्छतेची काळजी न घेता, हायजिनचे कोणतेही नियम न पाळता विकायला ठेवलेल्या चायनीज भेळ, पाणीपुरी, रंगीत सरबत असल्या टुकार गोष्टी खाऊन तुमच्या लहान मुलांना एखादा आजार होईल तेव्हा तुम्हाला हा रस्त्यावरचा फेरीवाला नकोस होईल.
तुमचे शहर, तुमचे रस्ते, तुमचे फूटपाथ यावर कब्जा करण्यासाठी प्रामाणिक पोलिसांना पण अप्रामाणिक बनण्याची लालूच देणारे आणि गुंडगिरीचा आधार घेणारे हे फेरीवाले कसे सहन होतात तुम्हाला. बरं ' मग त्यांना हटवणाऱ्या राज ठाकरेंनी त्यांना नोकऱ्या द्याव्यात' असलेही मूर्ख मेसेज वाचण्यात आले. मला तर हा मूर्खपणा कळतच नाही. अरे ज्या फेरीवाल्यांनी काही महिन्यांपूर्वीच ड्युटीवर असलेले ठाण्याचे उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती त्या फेरीवाल्यांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. खरं तर यांना लाथ मारून हाकलायचं काम पोलिसांचं आणि प्रशासनाचं. पण तिथूनही काही कारवाई नाही. मग एखाद्याने हे काम केलं तर चुकलं कुठे. आपल्या समक्ष चाललेल्या या गोष्टींकडे डोळेझाक करत स्वतः आंधळ्यासारख जगायचं आणि तुमचा रस्ता मोकळा करणाऱ्याला मात्र गुन्हेगारासारखं पाहायचं हे बरोबर नाही.
ज्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहरात कचरापट्टी वाढते, रोगराई वाढते, अपघात होतात, गुंडगिरी वाढते, भ्रष्टाचार बोकाळतो त्यांना रोखलेलं कधीही चांगलं. इथे मराठी अमराठी हा तर मुद्दाच नाही - अधिकृत आणि अनधिकृत हाच मोठा मुद्दा आहे. लक्षात घ्या, महानगरपालिकेचा योग्य कर भरून, लोकवस्त्यांमध्ये फिरत गाडीवर भाजीपाला विकणाऱ्या किंवा इतर फेरीवाल्यांबद्दल बोलत नाहीये मी.. शहरातले फूटपाथ ढापणाऱ्या आणि शहराचे सौन्दर्य नष्ट करणार्यांबद्दल माझा आक्षेप आहे.
आणि इतका त्रास असतानाही ज्यांना या अनधिकृत फेरीवाल्यांसाठी इतकी सहानुभूती असेल त्यांनी द्यावीत की त्यांना अधिकृत दुकाने घेऊन - एखाद्याला सन्मानपूर्वक जगण्याची दिशा दिल्याचं समाधान तरी तुम्हाला मिळेल.
समीर गुप्ते

Monday, 21 August 2017

ठिकाण फराळाच्या पदार्थांचे - 'मरूधन' कळव्याच्या खारकरांचे !







पूर्वी दिवाळीची खूप वाट पाहायला लागायची. नवीन कपडे, फटाके आणि अर्थातच दिवाळीचा फराळ. पण आता कसं आहे ना की सण नसला तरी सण साजरा करण्याची सोय आहे. म्हणजे आज गरज असो व नसो आपण कपडे विकत घेतो, फटाके म्हणाल तर ते तसे आऊट ऑफ फॅशन झालेत आणि दिवाळी फराळ म्हणाल तर ... काय म्हणता ? दिवाळीसाठी थांबावंच लागेल ?  दादा, आम्ही नाही थांबत आता. मनात आणलं तर पंधराव्या मिनिटाला दिवाळी साजरी करतो आम्ही. कसं म्हणजे ? सोप्पय की. स्कुटर ला किक मारायची आणि कळवा गाठायचं. आता तुमचा पुढचा प्रश्न ..कळवा ???? हो हो कळवा, कळवा नाका, ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि इथे आहे वर्षभरात कधीही दिवाळी साजरी करण्याची सोय. जर अजूनही लक्षात येत नसेल तर सांगतो, खारकर यांचे 'मरूधन' नावाच्या दुकानात जायचं आणि बघायचं. अगदी तुमच्या घरच्या चवीच्या तोडीस तोड असणारी फराळाच्या पदार्थांची रेलचेल तुम्हाला येथे पाहायला मिळेल.  अस्सल सीकेपी पद्धतीचे खाजाचे कानवले, चिवडा, चकली, शंकरपाळ्या, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, शेव अगदी अनारसे सुद्धा...  तुम्हाला जे पाहिजे ते इथे उपलब्ध आहे.

खरं पाहता, श्री पंकज खारकर यांनी नामांकित ब्रॅण्ड्स च्या , म्हणजे चितळ्यांची बाकरवडी वगैरे पदार्थांची एजन्सी अशा स्वरूपाचा व्यवसाय सुरु केला होता. पण लोकांच्या मागणीला मान देत आणि अर्थात काळाची गरज लक्षात घेत त्यांनी या फराळाच्या व्यवसायात येणाचे ठरवले. सीकेपी घरात बनला जाणारा पदार्थ जसाच्यातसा लोकांना मिळू लागला. पत्नी सौ. वैशाली हिने तिच्या पाक कौशल्याने आणि मेहेनतीने पदार्थांच्या दर्जावर लक्ष केंद्रित करून आपल्या सर्व उत्पादनांना जबरदस्त लोकप्रिय केलं. व्यवसाय वाढला की मनुष्यबळ पण वाढतं आणि मग हाताशी लागतं आपल्या घरचं आपलं माणूस.

शालेय जीवन संपतंय न संपतंय तोच त्यांचा मुलगा अथर्व त्यांच्या व्यवसायात रस घेऊ लागला. सीबीसी, सीसीसीआय अशा वेगवेगळ्या उद्योजक संस्थांमध्ये आपले पदार्थ सादर करून अनेकांची वाहवा तर त्याने मिळवलीच पण या व्यवसायाला अजूनही प्रोफेशनल लुक देण्याहेतू त्याने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला. आज अतिशय उच्च दर्जाच्या मशिन्स आणून अथर्व ने या व्यवसायाला फक्त वेग च नव्हे तर एक वेगळेपण ही दिले आहे. दिवाळी फराळाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा, पुऱ्या, पापड्या आणि असे अनेक दर्जेदार पदार्थ अथर्व खारकर याच्या मरुधन या दुकानात उपलब्ध आहेत. जशी दिवाळी नसतानाही तुम्ही दिवाळी साजरी करू शकता तशीच होळी नसतानाही त्यांच्याकडच्या तेलपोळीने (पुरणपोळी) तुम्ही कधीही होळी साजरी करू शकता. मी आयुष्यात कधी तेलपोळी खाल्ली नव्हती, म्हणजे गोडाची आवडच नव्हती परंतु पाहताक्षणी ती तेलपोळी खायचा मोह मला आवरता आला नाही आणि मी तेलपोळी खायला सुरुवात केली. उत्कृष्ट चव, आकर्षक पॅकिंग, योग्य दर आणि घरपोच डिलिव्हरी सुद्धा मरूधन तर्फे दिली जाते. सीकेपी फूड फेस्ट मध्ये तुम्ही जर यांच्या स्टॉल ला भेट दिलीत तर तुमची पिशवी तिथेच भरली म्हणून समजा.

आज अनेक तरुण मंडळी शिक्षणावर अफाट खर्च करून कोणत्यातरी नोकरीच्या मागे धावताना दिसतात. परंतु आपल्या अंगी असलेले उद्योजकाचे सळसळते रक्त, शिक्षणाच्या बरोबरीने व्यवसायाचे आकर्षण आणि व्यवसायात येऊन यशस्वी होत, आपल्या सहज सुंदर स्मित हास्याने समोरच्यावर छाप टाकणारी देहबोली या सर्व गुणांच्या जोरावर या नवतरुणाने आपल्या वयाच्या इतर तरुणांना प्रेरित न केलं तर नवलंच.

आज अथर्व खारकर याचा वाढदिवस आहे.  व्यवसाय करून मैत्री जोपासण्याचे कौशल्य अथर्वने आपल्या अंगी बाणले आहे आणि अशा त्याच्या मित्रमंडळींचा रात्री १२ वाजल्या पासून त्याच्या नुसता धुमाकूळ सुरु आहे. अशा या शुभ दिवशी वयाने मोठ्या होणाऱ्या अथर्व ला कर्तृत्वाने आणि लौकिकाने पण मोठा होण्यासाठी अनेक आशीर्वाद.

मरूधन च्या रुचकर आणि चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेताना अथर्व च्या पाठीवर शाबासकीची थाप मारायला आणि त्याला यशाच्या उत्तुंग भरारी साठी शुभेच्छा द्यायला मात्र विसरू नका.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट. 

Tuesday, 15 August 2017

बाबा नावाचा मित्र !


बाबा.. म्हणजे माझ्यासाठी बाबा आणि बाकी सगळ्यांसाठी मात्र अप्पा गुप्ते ! बाबा हे एक विलक्षण रसायन होतं. काही वेगळीच दृष्टी, कमालीचे आशावादी, प्रचंड मेहेनती, मनमिळाऊ आणि प्रेमळ मित्र. बाबांच्या मित्रमंडळाचा वयोगट ३० वर्षे ते ९० वर्षे हा कायम असायचा. गरज म्हणून काही वर्ष नोकरी केली पण मन कायम व्यवसायाकडे झुकलेलं. कल्पकतेने धंदा केला तरच आपण श्रीमंत होऊ शकतो, नोकरीत राम नाही हे माझ्या कोवळ्या मनावर बिंबवण्यात बाबा यशस्वी झाले होते आणि माझ्या वयाच्या १०/१२ च्या वर्षी त्यांनी मला त्यांच्या मदतीला घेतले होते. अकरावी बारावी च्या सुमारास धंद्याचे पैसे पण ते माझ्याजवळ ठेवण्यास देत. मला पण खूप बरं वाटे. धंद्याची ओढ लागत होती आणि पैशाची किंमतही कळत होती. अप्पाच घर म्हणजे अनेक नातेवाईकांना आपलंस वाटणारी एक जागा होती. रणदिवे वाड्यातल्या अगदी दोन खोल्यांच्या घरात नातेवाईकांचा कायम राबता असायचा. त्यावेळी धंद्याची परिस्थिती एकूणच बेताची म्हणून पैशाची चणचण नेहमीचीच, परंतु बाबाना कधी निराश झालेले पाहिल्याचं आठवत नाही. आज खिशात दहा हजार नसल्यावर जे दडपण येतं ते तेव्हा १० रुपये नसतानादेखील येत नव्हतं. जिगर - पराकाष्ठा - संयम - आशावाद अशा अनेक शब्दांना एकच प्रतिशब्द होता तो म्हणजे बाबा. व्यवसायाबरोबरच मी चित्रपट समीक्षक, लेखक - पत्रकार व्हावं अशी त्यांची इच्छा त्यांनी मला एकदोन वेळा बोलून दाखवली होती. पण माझा कल क्रिएटिव्ह कामात असल्यामुळे मी त्यांचे आवडीचे क्षेत्र प्रिंटिंग हेच माझे क्षेत्र म्हणून निवडलं. परंतु काही वर्षांपूर्वी मी चित्रपट निर्मिती केली तेव्हा ते सुखावले होते. बाबा उत्कृष्ट कंपोझिटर होते ( त्या वेळीस याला खिळे जुळवणे असेही म्हणत). १९७५ ला धंदा तोट्यात गेल्यामुळे भागीदार वेगळे झाले. यासाठी सर्वस्व विकल्यानंतर पुन्हा नव्या उमदीने उभे राहत बाबांनी सर्व पूर्वपदावर आणलं, या साठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती बाबाच्या ठायी ठासून भरली होती. अर्थात आईच्या नोकरीचा त्यांना मोठा आधार होता. अत्यंत बिकट परिस्थितीत पण विनोदबुद्धी जागृत असणं ही त्यांची खासियत होती. सहस्त्रचंद्र पाहिलेल्या (त्यांच्या शब्दात ८० पावसाळे पाहिलेल्या) माझ्या बाबांकडे अशा हजारो गोष्टी होत्या ज्या आजही आम्हाला हसवत ठेवतात, प्रेरणा देतात. कोणत्यातरी नाटकातलं "खिशात दमडी नसेल तरी चालेल पण राहायचं कसं तर अप टू डेट'' हे त्यांचं आवडतं वाक्य. जीवनातले सर्व उतरचढाव बघत, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्याचं कसब बाबांकडे होतं आणि ते आमच्या अंगी बाणवण्यात पण ते यशस्वी ठरले.
गांधीजींना देव मानणारे - गांधीवादी विचारांनी भारलेले, साने गुरुजींवर निस्सीम प्रेम करणारे आणि स्वातंत्रपूर्व काळात राष्ट्र सेवा दलात कार्य केलेले बाबा खऱ्या अर्थाने देशभक्त होते. आज हे सगळं लिहायचं कारण म्हणजे बाबांना जाऊन आज ५ वर्षे झाली. देशावर प्रेम करणाऱ्या माझ्या बाबांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनीच या जगातून स्वतंत्र व्हावे हे आम्हाला अनाकलनीयच आहे.
बाबा, तुमची आठवण आली नाही असा एकही दिवस वगैरे फालतू काही मी लिहिणार नाही.. दोन कारणांसाठी.. एक म्हणजे त्यांच्याच शैलीत सांगायचं तर हे वाचायला ते फेसबुकवर नाहीत आणि दोन .. माझ्या आत खोलवर माझ्या बाबांचे प्रामाणिक विचार, त्यांचे फायटिंग स्पिरिट, त्यांची विनोदबुद्धी आणि अर्थात त्यांच्या प्रेमाचा अंश न अंश भिनलेला आहे.
सांगायला हजारो गोष्टी आहेत पण,
आयुष्यात आलेल्या अंधारातसुद्धा लखलखणारी लाखो स्वप्न पाहायला शिकवणारे माझे बाबा, माझे मित्रही होते आणि गुरुही !

Friday, 21 July 2017

खवय्यांचा लाडका - "अथर्व'ज सीकेपी तडका"






शुक्रवार चा सूर्य मावळला की सोमवारच्या सूर्योदयापर्यंत लागणारे सगळे वार हे खाण्याचेच असतात आणि असा विकेंड जर धो धो पाऊस आणि गटारी सारखा सण घेऊन आला तर विचारता सोय नाही. गटारी हा सण आहे? अहो म्हणजे काय, गटारी हा सणच आहे .. मी तर म्हणतो याला राष्ट्रीय सण घोषित करायला काय हरकत आहे. ज्याची वर्षभर वाट बघायची, एक महिना आधी पासून चर्चा रंगवायची आणि आठवडाभर जय्यत तयारी करायची आणि तो पावन दिवस संपल्यावर पुढची गटारी येईपर्यंत मागच्या गटारीला काय काय मज्जा केली म्हणून आठवण काढायची तो काय साधासुधा दिवस वाटला तुम्हाला....सणच तो.

तर माझा विषय याला अनुसरूनच आहे. तुमची गटारी अगदी मनसोक्त आनंदाच्या साथीनं पार पडावी आणि घरच्या मंडळींना पण फार काम न पडता आनंद लुटता यावा याची एक खास सोय आहे आपल्याकडे. तसं जगात कुठे काय मिळतं ते सांगायला तुमचा मोबाईल-गुगल-झोमॅटो वगैरे आहेच पण तुम्हाला काय आवडेल हे खात्रीपूर्वक सांगायला मी आहे ना ... तुमचा फूड ब्लॉगर.

तर आपल्या विषयावर येतो.. तूम्हाला सांगतो, मी आज ठाण्याच्या लुईसवाडीतल्या, नाचण्यांच्या अथर्व सीकेपी तडका येथे जाऊन हात मारून पोटभर जेवलो आणि माझ्या तीन दिवसीय गटारी महोत्सवाला सुरुवात केली. हे सीकेपी तडकावाले नाचणे म्हणजे आमच्या ठाण्याच्या  सीकेपी फूड फेस्ट चे स्टॉल नं. २१ वाले नाचणे. फेस्टिवलच्या दरम्यान यांच्या स्टॉल वर जाऊन जेवणे म्हणजे दिव्य असतं म्हणून आज त्यांनी सुरु केलेल्या हॉटेलमध्ये धडक दिली. रमजान ला ज्याच्या बरोबर जाऊन ज्याच्या पैशाने खातो त्याची परतफेड करण्याची संधी घेत मित्र अकील शेख ला बरोबर घेऊन गेलो...म्हटलं चल मियाँ, आज आमचं खाऊन बघ, बिर्याणी विसरशील. तसं पाहता मागचे दोन महिने शिरीष नाचणे च्या फेसबूक वरच्या पोस्ट आणि त्याला मिळालेले चांगले वाईट कॉमेंट वाचत होतो .. But you need to experience it to believe it . मेनू वाचताना लक्षात आलं की यांना जगाचे बाजारभाव माहिती नसावेत.. २५० रुपयाला सुरमई थाळी ? अरे आम्ही नुसती तळलेली सुरमई ३५० ला घेतो आणि इथे थाळीचा भाव २५० म्हणजे काहीतरीच. दोन सुरमई थाळी आणि एक महाराजा मटण , अर्थात सीकेपी पद्धतीने बनवलेल्या खिम्यात मटणाचे मोठे खडे (खडे म्हणजे अस्सल सीकेपी शब्द आहे बरंका,आम्ही पीस म्हणून त्याला हलकं नाही करत) अशी ऑर्डर देऊन एकूण मेनूचा अंदाज घेतला. वाचता वाचता सहज दरवाजाकडे लक्ष गेले तर दोन वयस्कर गुजराती माणसं (त्यातला एक माझा मित्रच)आत येत होती. सीकेपी रेस्टोरेंट मा गुजराती माणस ?.. सु वात छे..सॅम खुस थई गयो.  जेवण येईल तेव्हा येईल पण आपण जिंकलो अशा अविर्भावात मी त्यांना जय श्रीकृष्ण  केलं आणि ते देखील विराजमान होत मेनू पाहण्यात गुंग झाले. शिरीष कॊतुकाने त्यांच्याकडे पाहत मला म्हणाला .. अरे समीर, हे काका नेहमी येतात आणि येताना कोणा ना कोणाला बरोबर घेऊन येतात. म्हटलं, जिंकलस भावा !

पाचव्या मिनिटाला प्रांजलीच्या देखरेखीखाली अर्ध ताट व्यापलेली मोठी सुरमई असलेली थाळी समोर आली. हल्ली फोटो काढल्याशिवाय अन्न गोड लागत नाही हो. पहिले फोटो काढले. संपूर्ण ताटावर आपलेच अभिराज्य असल्याच्या आवेशात, गरम गरम तळलेली सुरमई ची तुकडी पण कशी छान पोज देत पहुडली होती. तिच्या सोबतीला ताटात सुकटीची चटणी, सुरमाईचे कालवण, कोंबडीचा रस्सा, भाकरी वगैरे कस सगळं भरगच्च होतं वर प्रांजलीने चाखायला दिलेली तळलेली कोलंबी .. अजून काय पाहिजे हो म्या सिकेप्याला जीवनाचा आनंद लुटायला.  ''दादा ये जबरदस्त होगयेला है, दादा ये टराय करू क्या'' अशा अस्खलित राबोडी उर्दू मध्ये बोलत अकील शेख सीकेपी भोजनाचा आनंद घेत होता. खरं सांगतो, मेनू वरच्या सगळ्या पदार्थांची ऑर्डर द्यायच्या तयारीने आलेलो आम्ही एका थाळीत गारद झालो.

सुमारे वीस माणसं बसू शकतील अशा या छोटेखानी ऐसी रेस्टोरेंट ला आपल्या मेहेनतीने आणि समरसतेने इतक्या अल्पावधीत लोकप्रिय करणं आणि अनेक खवय्यांना खाऊ घालणं 'खायचं' काम नाही. सीकेपी लोकांना इकडची प्रत्येक गोष्ट त्यांच्या घरच्या प्रमाणे वाटेल असं नाही पण अस्सल सीकेपी जेवण म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल अशा जेवणाचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर ठाण्याच्या लुईसवाडीतल्या सीकेपी तडका ला भेट देणं जरुरीचं आहे. शिरीष ची बायको आणि या रेस्टोरंटची मालकीण प्रांजली नाचणे मूळची नागपूरकर - चिटणवीस. त्यामुळे इथे सावजी मटणाची एक डिश ही आपल्यासाठी सादर आहे आणि नागपूरकर असल्याने तिखटावर थोडा हात असावा असं वाटतं.

माझ्या मित्राची म्हणजे अकीलभाई  ची रिऍक्शन मला खूप आवडली. घरी आल्यावर माझ्या आईला सांगताना तो म्हणाला '' अरे अम्मी. दादा के साथ बहुत मझा आया, अभि कलतक आपन सीकेपी होगैयला है".  इतर समाजबांधवांकडून मिळालेली अशी दाद हीच तुमच्या पाककलेची खरी पावती. या गटारीला तर तुम्ही इथे जालच पण एरव्हीही जायला उत्तम आणि खिशाला परवडणारे म्हणून "अथर्व'ज सीकेपी तडका'' चे वर्णन करता येईल.

सौ. प्रांजली आणि प्रिय मित्र शिरीष नाचणे, सर्वत्र सीकेपी रेस्टोरेंट निघावीत या माझ्या स्वप्नाला वास्तवात उतरवत तुम्ही सुरु केलेल्या या चवदार रेस्टोरंटला, या व्यवसायाला माझ्या भरभरून शुभेच्छा !

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट.
#samhere #sameergupte.blogspot.com
sameer6949@gmail.com

Thursday, 20 July 2017

दोबारा यावंसं वाटणारं "चौबारा -६०१" रुफटॉप पंजाबी रेस्टोरेंट








दोबारा यावंसं वाटणार  "चौबारा -६०१"

तुम्ही ठाण्याच्या सीकेपी हॉलला अनेकदा भेट दिली असेल. कधी लग्नासाठी तर कधी एखाद्या कार्यक्रमासाठी. तसं दरवर्षी येण्यासाठी एक कारण मी तुम्हाला दिलाय ते म्हणजे आपला सीकेपी फूड फेस्ट. परंतु आता तुम्ही आपल्या मित्र परिवाराबरोबर किंवा आपल्या कुटुंबीयांबरोबर सीकेपी हॉल्सला कधीही येउ  शकता. नाही नाही, हे काही कोणत्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही ..हे आंमंत्रण आहे सीकेपी हॉल च्या टेरेस वर सजलेल्या एका पंजाबी चौबाऱ्याचे. अस्सल म्हणजे एकदम अस्सल पंजाबी पद्धतीच्या सजावटीने सुसज्ज आणि पंजाबी चवीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा एक भन्नाट अनुभव म्हणजेच 'चौबारा ६०१''या अस्सल पंजाबी नावाचं एक अस्सल पंजाबी रुफटॉप रेस्टोरेंट.

सीकेपी हॉल च्या मुख्य प्रवेशदारातून आत शिरलात की तुम्हाला नजरेस पडतो दिव्यांनी लखलखणारा एक रंगीत ट्रक. या सेल्फीपॉईंट ला एक सेल्फी काढल्यानंतर लिफ्टमधून टेरेसवर येताना तुम्हाला ''पंजाब कि खुशबूचा" प्रत्यय यायला लागतो. लिफ्टमधून बाहेर पडतानाच रंगीबेरंगी रिबिनी आणि झालरीने मढवलेली एक सायकल आणि तिच्या बाजूला बसलेला मुनीमजी तुम्हाला पंजाबी स्वागताची पहिली सलामी देतो. इतक्या रंगाची उधळण केलेल्या या स्वागतकक्षात तुम्ही काही वेळ थांबणारच. रेस्टोरेंट मध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या तुम्ही सीकेपी हॉल च्या आवारात नसून पंजाबच्या एखाद्या ढाब्यात असल्याची जाणीव तुम्हाला होईल. तिथे वाजत असलेल्या पंजाबी संगीतावर तुमचे पाय थिरकू लागतात न लागतात तेव्हाच एक सरदार तुम्हाला तुमच्या टेबलाजवळ नेतो आणि काय गम्मत .. या टेबलांना नंबर नाहीत तर चक्क नावे दिली आहेत..ती सुद्धा तुमच्या आवडत्या हिरोच्या चित्रपटाची. मी अनेक पंजाबी हॉटेल, धाबे पहिले आहेत पण इथे तुम्हाला थक्क करणारी अनेक आश्चर्य आहेत ..थोडीशी बाकी ठेवतो.

रेस्टोरेंटमध्ये आपण काय फक्त बघायला थोडीच आलोय .. अहो आपण आलोय पंजाबी दावतीचा यथेच्छ समाचार घ्यायला. मुंबईतल्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या टिपिकल  पंजाबी पदार्थाना काट देत तुम्हाला खऱ्याखुऱ्या पंजाबी भोजनाचा आनंद देण्यासाठी तुमच्यासमोर अवतरतो एक खास डिझाईन केलेला मेनू आणि मेनू सोबत येतो त्या मेनूचे वर्णन करणारा त्याची माहिती देणारा एक सरदारजी .. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा मेनू डिझाईन करताना या मंडळींनी पंजाबच्या अनेक वाऱ्या केल्यात आणि दिल्लीपासून अमृतसर पर्यंत मिळणाऱ्या पदार्थांची एक मोठी यादी तुमच्या समोर ठेवली आहे. चौबाराचा मुख्य शेफ आपला मराठमोळा हर्षद पाटणकर याच्या देखरेखीत तुम्हाला अनेक पदार्थ सादर केले जातात आणि सुरु होतो तुमचा पंजाबी ढाब्यावरच्या खवय्येगिरीचा एक अफलातून खाद्यप्रवास .

उत्तरेकडे सर्रास मिळणाऱ्या शिकंजी पासून सुरुवात करत, हलकासा तिखट 'पाये का शोरबा' घेत या कार्यक्रमाला सुरुवात करायची. तुमच्यात कोणी  शाकाहारी असेल तर चाट प्रकारातील अनेक व्हरायटीज मधें 'आलू के कुल्ले' (हे नाव जरा गमतीशीरच), 'तवा आलू' नक्कीच तरी करा. पंजाब दि भट्टी दा स्वाद अनुभवायचा असेल तर 'छोले पनीर टिकिया' आणि एकदम हटके असे 'दही के कबाब' ला तोड नाही. मांसाहाराची तर विशेष काळजी घेत कस्तुरी मुर्ग कबाब, काकोरी कबाब, बऱरा कबाब हे असले अनोखे कबाब तुमच्या जिभेचा ताबा घेतात. जर तुम्ही तगडे खाणारे असाल तर "रान" हा मटणाचा प्रकार लाजबाब, पण एक कंडिशन आहे- याची ऑर्डर एक दिवस आधी द्यायची. बडी लेहेसुनी आणि छोले पहरगंजी हे तुम्हाला साक्षात दिल्ली गाठल्याची आठवण देतात. जसे आपले खिमा वगैरे पदार्थ स्पेशल या कॅटेगरीत मोडतात ना तसे चौबारा मध्ये मुर्ग कोर्मा, मुर्ग दो रंगा म्हणजे दोन प्रकारच्या रस्श्यात केलेली मुर्ग आणि काही झणझणीत हव असेल तर 'तार कोर्मा' ट्राय कराच. ड्रिंक्स बरोबर खायला मासे हवे असतील तर तंदूर झिंग आणि तंदूर पॉम्फ्रेट हे आहेच आपल्या सेवेला.  मी जेव्हा शेफ हर्षद ला विचारलं कि एखादी भन्नाट डिश सजेस्ट कर तर म्हणे ''सर आमचा डाल बुखारा'' ट्राय करा...म्हटलं लेका माझं आडनाव माहित आहे ना तुला. तरी पण त्याच्या आग्रहास्तव ती डिश घेतली .. १६ तास शेगडीवर शिजवलेली उडिदाची डाळ आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली आणि आवडली बाबा. बाकी पंजाब्यांची खासियत असलेले लाछा नान, चुरचुरके नान वगरे अनेक पदार्थांची रेलचेल असलेला हा चौबारा खरोखरीच एक आनंददायी अनुभव ठरतो. जेवल्यानंतर लस्सी, राबडी स्टफ पराठा याबरोबरच 'शीर बिराज' हा एक हटके गॉड पदार्थ चाखून बघाच.. माझं आणि गोडाचं तितकं जवळचं नातं नसल्याने जास्त डिटेल सांगत नाही पण कुछ अलग बात है हे मात्र नक्की.

पराग साठे आणि यश तावडे यांच्या कल्पनेतल्या या चौबाऱ्याला आल्हाद राजे या नामांकित आर्किटेक्ट नी पूर्णपणे न्याय दिला आहे हे तुम्हाला तिथे गेल्यावरच समजेल. पाऊल ठेवल्यापासून ते निघेपर्यंत आपण सीकेपी हाल च्या आवारात आहोत याचाही तुम्हाला विसर पडेल आणि एकदा का तुम्ही इथे आलात की हा ''चौबारा छे सो एक''  तुमचं दोबारा यायचं ठिकाण झालं म्हणून समजा.

या गटारीनिमित्त शनिवारी आणि रविवारी सर्व खवय्यांना आणि ड्रिंक्स ची आवड असणाऱ्यांना एक खास ऑफर आहे ती म्हणजे बिअर ऑन एमआरपी. तुमची गटारीची जागा ठरली नसेल तर आपल्या कुटुंबीयांबरोबर हा सण 'चौबारा ६०१' येथे साजरा करा.. खवय्यांना योग्य ठिकाण  दाखवल्याचं पुण्य माझ्या पदरी पडेल.

कुठे - सीकेपी हॉल टेरेस, ठाणे.
वेळ - दररोज साय ७ ते ११
सुट्टी - नाही
दर - अतिशय माफक
बार- बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
sameergupte.blogspot.com    

Sunday, 9 July 2017

गुरु

गुरु .......

गुरु हा मानण्यावर असतो.  तुम्ही ज्याला गुरु मानता तो तुम्हाला शिष्य मानेलच असं जरुरीचं नाही आणि तुम्ही त्याचेच शिष्य आहात असे जगाला ठोकून सांगतोय तो तुमचा गुरु म्हणवून घ्यायला योग्य असेल असेही नाही.

कधी हा निसर्ग तुमचा गुरु असतो तर कधी एखादा प्रसंग. कधी वेळ, कधी नशीब, कधी सन्मान, कधी अपमान, कधी यश, कधी अपयश एक ना दोन हजारो गोष्टीत तुम्ही गुरु शोधू शकता.

तुमच्या आयुष्याला वळण देणारा, गती देणारा आणि त्यामुळे आर्थिक नसली तरी मानसिक समृद्धी देणारा एखादा धाडसी निर्णय देखील तुमचा गुरु असू शकतो.

गुरु मानण्यावर असतो .. तुमच्या आतही तो वसलाय, आहे हे मानण्यावरती सुद्धा !


Saturday, 1 July 2017

आठवणीने पण तोंडाला पाणी सुटणारे 'वालाचे बिरडे'



रात्री जेवायला बिरडं हवं असेल तर गपचूप वाल निवडायला बस.. सांगा बरं तुमच्यातल्या कोणा कोणाच्या लहानपणी तुमच्या आईने हे सांगून तुमच्या कडून वाल सोलून घेतलेत. तसं वाल सोलायचे म्हणजे काही खूप मोठे काम नसे वाटत तेव्हा. वाल निवडता निवडता गप्पा मारणे आणि मध्येच आलेले कुचर कोणालातरी फेकून मारणे हे नित्याचेच. कधी कधी तर दोन्ही हातानी फुल्ल स्पीड मध्ये अर्धा तासात वाल निवडून खेळायला जायचे आणि खेळून आल्यावर हातपाय धुवून शुभंकरोती वगैरे बळेबळे आटपून पाटावर बसायच. चमचमीत बिरडं, भात, कैरीच्या करमटल्या आणि एखादी सांडगी मिरची पानात आली तर पंचपक्वान्नाला पण लाजवेल असे ताट सजलेले दिसायचं. जेवायला सुरुवात करतानाच बिरड्याची वाटी डायरेक्ट ओठाला लावायची आणि नाकात झणझणीत सुगंध भरत एक फुरका मारून मगच भातावर ओतायची तरच त्याची खरी मजा. एप्रिल मे मधल्या बिरड्यात दाताखाली येणाऱ्या वालाबरोबर बिरड्यातल्या कैरीच्या गरम गरम कापा हमखास हव्यातच. बिरडं भाताचं जेवण असलं की जेवण कसं झालय वगैरे सांगायच सुचतच नसे, बस्स जेवतच राहायचं.. त्या तिखट बिरड्याबरोबर किती भात खाल्ला गेला याची गणतीच नसायची. जेवण संपत संपता भांड्याचा आवाज आला की 'हे काय, इतक्यात संपलं पण ?' असे विचारात पुढच्यावेळेस थोडं जास्त कर असे आईला सांगत भोजन समारंभ आटपयाचा. माझ्याच काय तुमच्याही घरात बिरडं भाताच्या जेवणानंतर बिरडं उरल्याचं तुम्हाला आठवत नसेल ..अहो उरलं तर ते बिरडं कसलं. बिरडं भात जेवल्यावर कितीतरी वेळ तुम्ही त्याच्या अविट चवीच्या दुनियेत असता.

तर अस हे स्वर्गीय चवीची अनुभूती देणारं वालाचं बिरडं.. नुसतंच वालाचं नाही नागोठण्याच्या कडव्या वालाचं बिरडं. नागोठणे आणि कडवे वाल हे समीकरण इतकं डोक्यात बसलंय की कोणी नागोठण्याचा नातेवाईक भेटला तर तो नक्कीच वाल विकत असावा असं नेहमी वाटायचं. आमच्या बाहेरगावच्या म्हणजे इंदूर, भोपाळ येथील नातेवाईकांना तिथे हे कडवे वाल मिळत नाहीत. ठाण्याला आल्यावर खूपच कासावीस झाल्यासारखे ते लोक कोणाकोणाला कडवे वाल मिळतील का म्हणून फोन करत असतात. मी पण थोडावेळ गम्मत बघून, मग बघा माझी किती ओळख आहे असे दाखवत पेणच्या झिराळ आळीतल्या देशपांडे ला फोन लावतो आणि त्यांचा वालाचा (जीवनमरणाचा) प्रश्न सोडवल्यासारखे भासवतो आणि मग दुसऱ्या दिवशी घरी आलेल्या पिशवीतले टपटपीत हिरवट सोनेरी वाल पाहिल्यानंतर ही मंडळी काहीतरी जिंकल्याच्या अविर्भावात त्यांच्या निघण्याची तयारी करतात. नागपूरकरांची पण थोडीफार हीच गत असते..तिथे नागपूरमध्ये धरमपेठेतल्या बापट या एकमात्र दुकानात चांगले कडवे वाल मिळतात..थोडे महाग असतात पण मिळतात. एकूणच ठाणे मुंबईकडचे लोक या बाबतीत फारच नशीबवान म्हणावे लागतील.

वालाच्या बिरड्याला वालाची रस्सा भाजी किंवा वालाची आमटी बोलणाऱ्या मंडळींशी मी या विषयावर फार बोलत नाही..म्हणजे काही कारण नाही पण नाही बोलत. बिरड्याच्या जातीतला डाळिंबी हा प्रकार देखील मला आवडतो .. त्याचं एक वेगळेपण आहे. सहसा ब्राह्मण लग्नात किंवा मुंजीत डाळींब्या असतात. परवा तर ठाण्याच्या टिपटॉप मध्ये एका लग्नात 'वालाचं बेर्ड' असा बोर्ड लावून पंजाबी मसाल्यात केलेलं गुजराथी चवीचं 'बेर्ड' खाल्लं..क्षणभर काही सुचेना..कशाला नको ते प्रयत्न करतात हे लोक कळत नाही. कडव्या वालाचा असा क्रिमिनल वेस्ट मला अजिबात सहन होत नाही.

वालाची खिचडी म्हणजे सीकेप्यांचा जेवणातला मानबिंदूच. जेवणात साबुदाणा खिचडीला नसेल इतकी मागणी आणि मान नारळाच्या दुधात शिजवलेल्या वालाच्या खिचडीला असतो. नागपूरच्या सीकेपी फूड फेस्टिवल मध्ये तीन दिवस पुरतील इतके वाल नेऊनसुद्धा ते दुसऱ्याच दिवशी संपले तेव्हा तिथे केटरिंग ची व्यवस्था पाहणाऱ्या गिरीष गुप्ते काकाना रविवारी सकाळी मुंबईहून २५ किलो भिजवलेले वाल 'विमानाने' मागवायला लागले होते..सकाळच्या पहिल्या विमानाने येऊन मोठ्या मानाने ते वाल चिटणवीस सेंटरमध्ये दाखल झाल्याचे अनेक नागपूरकरांना माहित असेलच. अर्थात ते ही कमी पडले. सीकेपी खवय्यांची हृदये काबीज करणाऱ्या बिरड्या बरोबरच पडवळासारख्या लिबलिबीत भाजीला आणि तत्सम दुसऱ्या काही भाज्यांना चटपटीत भाजीचा दर्जा देण्याचे काम फक्त कडवे वालचं करू शकतात.

राजेशाही राजमा आणि पाव इंची पावट्याला कुठच्याकुठे मागे टाकणाऱ्या कडव्या वालाला सीकेपी घरातच काय तर अनेक मराठी घरात मानाचं स्थान आहे. वालाचं बिरडं आठवड्यातून एकदा तरी झालंच पाहिजे अशी अनेक घरं तुम्हाला मिळतील. पण वालाच्या बिरड्याची ही चव, हा वारसा पुढे नेणाऱ्या सुगरणी मात्र कमी होत चालल्या आहेत याची खंत नक्कीच आहे

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
Sameer6949@gmail.com

पाऊस ठरवतो...


पावसाळ्याच्या दिवसात आपण काय खायचं, कधी खायचं, कुठे खायचं हे आपण नाही तर पाऊस ठरवतो. एका तासापूर्वी जेवलेल्या आपल्या पोटातली नसलेली भूक जागृत करण्याचे काम पाऊस व्यवस्थित करत असतो. आज पाऊस जास्त आहे म्हणून ऑफिसमधून लवकर घरी जाण्यासाठी निघाल्यावर बसस्टॉप जवळ कुठेतरी वडे तळल्याचा खमंग वास येतो. तसा तो रोजच येतो, पण पाऊस पडत असताना तो तुमच्या आतपर्यंत भिडतो. मग अगदी धो धो पडणाऱ्या पावसात पण वडापाव च्या गाडीभोवती पडलेल्या गराड्यात घुसून आपल्याकडे जास्तीतजास्त एक सेकंद पाहणाऱ्या त्या गाडीवाल्याला नजरानजर होताच 'वडापाव दे रे एक' अशी ऑर्डर टाकून रटरटणाऱ्या तेलाच्या कढईतला वड्याचा पुढचा लॉट त्या ट्रे मध्ये कधी पडतोय आणि कधी आपल्या हातात येतोय असं आपल्याला होतं. आपल्या मागून आलेला कोणी तरी हात लांब करून आपल्या आधी तर घेणार नाही ना .. वडावाला त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या ओळखीच्या गिऱ्हाईकाला तर मोठ्ठ पार्सल देणार नाही ना, परातीतला आधी उरलेला थंडगार वडा आपल्या नशिबी येणार नाही ना, एक ना दोन अशा अनेक शंका मनात ठेऊन गाडीच्या टपा वरून पडणारे ओघळ पाठीवर घेत आपण आपला गड लढवत असतो. पाठीवर भिजलेल्या कपड्यांची थंडी आणि पुढे धगधगणाऱ्या स्टोव्ह ची गर्मी यांच्या अफलातून जुगलबंदीत वरून कोसळणारा पाऊस तुम्हाला फक्त बटाटावडाच खायला प्रवृत्त करतो. तयारच आहे म्हणून परातीमधल्या केविलवाण्या गोळाभजी कडे तुम्ही डुंकूनसुद्धा पाहात नाही.. 'काय मस्त पाऊस आहे ना, चल आज एक मस्त इडली चटणी खाऊ ' असं बोलून गेलात का कधी तुम्ही इडली खायला.. नाही ना...पाऊसच ठरवतो.

पाऊसच ठरवतो तुमची संध्याकाळ ..रविवारची दुपार मटणावर ताव मारण्यात गेलेली असते..जेवण अंगावर आलेलं, त्यामुळे छानशी झोप झालेली आणि संध्याकाळी मस्त पाऊस सुरु. कुठेच नसतं जायचं. फक्त पावसाकडे बघायचं आणि गेल्या पावसाळ्यांच्या आठवणीत रमायचं. आज तिने नाही, तुम्ही काम करायचं. आल्याच्या चहाबरोबर बटाट्याची भजी, असेल घरात एखादं तर चार कापट्या वांग्याच्यापण पिठात बुडवून तळून काढायच्या. गॅलरीत टीपॉय सजवायचा. खुर्चीवर बसल्याबसल्या पाय लांब करून डोळे मिटायचे, परत उघडायचे .. सुखावलेल्या चेहेऱ्यानी तिच्याकडे बघायचं ..नशिबाला मानायचं, एक हातात भजी आणि दुसऱ्या हातात चहा .. पाऊसच ठरवतो, आठवून तर पहा.

पाऊसच ठरवितो तुम्ही जेवणार काय ते ...असो रविवार की मधला कोणताही वार..पावसाळाच तो, सुरु असते संततधार. पन्नास पदार्थ येतात करता तुम्हाला पण कधी कधी जेवायला काय करावं हे सुचतंच नसतं, सुचत नसतं म्हणून ठरत नसतं .. पण पाऊस आहेच की ठरवायला. तोच सुचवतो एखादा साधासा बेत आणि सुरु होते तुमची तयारी. अचानक तुम्हाला मांडणीवरच्या, मागे गेलेल्या एका खास डब्याची आठवण येते. डबा उघडताच त्या अलौकिक सुगंधाचा दरवळ घरभर पसरतो, आज घरात काहीतरी खास शिजणार याची चाहूल सर्वांचं लागते. डब्यातली वस्तू ओट्यावर येते आणि साजरी होऊ लागते पावसाळ्यातली एक खास मेजवानी..हो मेजवानी, गरमागरम भात आणि सीकेप्यांची आवडती काड्यांची मिरवणी. मिरवणी म्हणजे साजूक तुपावर परतवलेल्या सुक्या बोंबलाच्या, म्हणजेच काड्यांच्या जोडीला बटाट्याच्या फोडी आणि मिरी घातलेल्या वाटणात मस्त उकळलेलं कालवण ..बाहेर पावसाचा थयथयाट आणि घरात मिरवणीचा घमघमाट. वाफाळलेल्या पांढऱ्या शुभ्र भातावर हिरवट मिरवणी ओतून घेतलेल्या पहिल्या घासाबरोबरच तुमचे नाक आणि डोळेही या मिरीच्या फणकाऱ्याचा आनंद घेतात, तुपाच्या तवंगाची काड्यांची मिरवणी क्षणात तुमच्या मनाचा ताबा घेते.. वाटी वाटी पिऊन मग जीव असा तृप्त होतो.. ध्यानी मनी नसतानाही बेत कसा फक्कड बनतो..तुम्ही नाही हो ,पाऊसच ठरवतो.

पाऊसच ठरवतो कधी यायचं आणि पाऊसच ठरवतो कधी जायचं. पण या पावसाळ्यात जरा लक्ष ठेऊन बघा ..तोच तुम्हाला सुचवतो काय खायचं आणि काय प्यायचं.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.in
sameer6949@gmail.com

Saturday, 13 May 2017

सीकेपी आणि सोडे - एक अतूट नातं


तुम्ही सीकेपी लोकांनी 'सोडे' या सुक्या बाजाराला थोडं जास्तच "ओव्हर हाईप'' करून ठेवलंय असे बोलणारे काही मित्र व काही मोजकेच ओव्हर हेल्थकॉन्शस ज्ञातीबांधव मला 'बोअर टाईप' वाटतात. ओव्हर हाईप ? अहो हे सोडे म्हणजे काय नुसता खायचा पदार्थ वाटला काय तुम्हाला? की टाकली जाळी, काढला समुद्रातून, वाळवला, शिजवला, खाल्ला आणि झालं. अहो सोडे म्हणजे आमचा जीव की प्राण, आमची अस्मिता - आमची शान, आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक वगैरे वगैरे. या सोड्यांच्या गप्पांवरपण आम्ही तास दोन तास घालवू शकतो. दिवाळीत भेट म्हणून आलेल्या प्रशांत कॉर्नर च्या चमकदार मिठाई च्या बॉक्सकडे जसं प्रेमाने बघतो ना त्या पेक्षा जास्त प्रेमाने टेबलावर आणून ठेवलेल्या सोड्याच्या पिशवीकडे पाहतो आम्ही. आपल्या सीकेपी फुड फेस्ट ला ग्लॅमरस सेलिब्रिटी गेस्ट रेशम टिपणीस भेट देते तेव्हा तिच्याकडे लोक जितक्या कौतुकाने पाहत बसतात त्यापेक्षा जास्त कौतुकाने रेशम स्टॉल वर मांडलेल्या सोड्यांकडे पाहत असल्याचं मी पाह्यलंय, पटत नसेल तर विचारा तिला. जूनपासून ऑगस्टपर्यंत आम्हा सीकेप्यांच्या जेवणाला आणि जिवनाला (दोन्ही एकच असतं)असलेला एकमात्र भक्कम आधार म्हणजेच हे सोडे..उभे सोडे...नुसतेच उभे सोडे नाहीत तर मुरुडचे - दिघीचे उभे सोडे. तसं पाहिलं तर समुद्र हा सगळीकडे सारखाच, पण कोणजाणे असं काय आहे त्या मुरुडच्या समुद्रात की आपल्या जीवावर उदार होत, लांबसडक सोडे बनून, स्वतःचा भाव कमालीचा वाढवत, सीकेपी घरात आणि ताटात पडू इच्छिणाऱ्या कोलंब्या फक्त तिथेच पोहायला जातात. असो.
तर आपले हे लाडके सोडे... हे सोडे बाजारातून आणायचे नसतात बरं का ...ते घरी येतात. तुमच्या घरातले सोडे संपत आले की आपोआप ते येतात. साधारणपणे प्रत्येक सीकेपी घरामागे एक ओळखीचा सोडेवाला फिक्स असतो तो बरोबर वेळेवर ते आणून देतो. जणू एखादा पाहुणा यावा तशी याची उठबस केली जाते. म्हणजे खूप वर्षांपूर्वी आमच्या घरी मुलुंडचे रणदिवे सोडे देत असत, ठाण्यातल्या अनेक घरात प्रधान काका सोडे देत असत, अलीकडल्या काळात नव्या दमाचे ठाण्याचे साई, प्राजक्ता, कौशिक, पुण्याचे देशमुख ही मंडळी फेसबुक आणि फूड फेस्ट मध्ये सोडे विकताना दिसतात. याना नुसतं पाहूनदेखील आपल्याला किती हायसं वाटतं. आपलेच सोडे कसे सर्वात बेस्ट हे तर या सगळ्यांकडून तुम्ही एकदा तरी ऐकावच. इतर काही जण अगदी अतिरेक करत जणू काही त्या लाल गुलाबी कोलंब्याना अंगाखांद्यावर खेळवलंय आणि मगच त्यांचे सोडे करून तुम्हाला दिलेत अशा अविर्भावात,अहो १६०० रुपयाकडे काय बघता .. बाहेर २००० चा भाव सुरु आहे, थोडाच माल शिल्लक आहेत, चला पाव किलो तरी घेऊन टाका, अशा प्रकारे गळेपडू मार्केटिंगपण करतात.
सोडे म्हणजे सीकेपी घरातली एक जीवनावश्यक वस्तूच म्हणा. तूरडाळ एकशे चाळीस ची दोनशे झाली तर महाग महाग म्हणून ओरडणारे आम्ही दोन हजारावर गेलेल्या सोड्याच्या भावाची काळजी नाही हो करत कधी. एकवेळ सणासूदीला घ्यायच्या साड्यांची खरेदी पुढे ढकलू पण मुरुडच्या सोड्यांच्या खरेदीत हयगय नाही. अमेरिकेला मुलाकडे जाताना एक जोड कपडे कमी नेतील पण मुलासाठी २ किलो सोडे वेगळे आणि पाव किलोच्या चार पाच पुड्या तिथल्या मित्रपरिवाराला वाटण्यासाठी वेगळ्या अशी जय्यत तयारी करून आपली मंडळी प्रवासाला निघतात. सकाळच्या नाश्त्याला सोडे घालून पोहे (असं ऐकण्यापेक्षा पोहे घालून सोडे) केलेत अस ऐकायला मिळालं तर त्या दिवसाचं सोनं झालं म्हणून समजा. सोड्याची खिचडी, सोड्याचं लीप्त, सोड्याची चटणी,नुसतेच कुरकुरीत तळलेले सोडे, न खपणाऱ्या भाजीची मागणी चारपट वाढवणारी सोडे घालून केलेली वांग्याची भाजी आणि भातावर ओतण्याआधी वाटीतल्या लालबूंद कालवणावर तरंगणाऱ्या तेलाच्या हलक्याश्या तवंगातून डोकावणाऱ्या गरम बटाट्याचा चटका लाऊन घेत घेत डोळे मिटून मनसोक्त प्यायल जाणारं सोड्याचं झणझणीत कालवण असे अनेक खाद्यपदार्थ आठवड्यातून एकदा तरी सीकेपी घरात बनतातच बनतात. तुम्ही घरी आलेल्या एखाद्या नातेवाईकाला 'सोड्याची खिचडी चालेल का जेवायला?' असं विचारून पहा..कधी एकदा टुणकन उडी मारून पानावर बसतोय असा भाव त्याच्या चेहेऱ्यावर येतो कि नाही बघा. एखाद्या कायस्थ भगिनी मंडळानी कधी ''सोडे घालून केलेले नाविन्यपूर्ण पदार्थ '' अशा संकल्पनेवर आधारित पाककला स्पर्धा जरी आयोजित केली तर त्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळेल...प्रयत्न करून बघा.. परीक्षक म्हणून मी आहेच की.
छे छे... उभ्या सोड्याचा फेस्टिवल वगैरे नाही करायचा मला. पण आडव्या हाताने ताव मारत मटकावायच्या उभ्या सोड्यांशिवाय आपल्या याआयुष्याच्या फूड फेस्ट ला मजा नाही. ओव्हर हाईप्ड तर ओव्हर हाईप्ड पण पानात चार सोडे असलेलं साधसं जेवण सुद्धा माझ्यासाठी एकशेएक टक्के ''सुपर लाइक्ड'' अशी मेजवानी असते. शाकाहारी जेवण कितीही रुचकर आणि चांगलं असलं तरी त्यातल्या एखाद्या भाजीत थोडेतरी सोडे घालायला पाहिजे होते असं नकळत मनात येणं हे माझ्या जिभेचं आणि सोड्यांचं अतूट नातं सांगतं. तुमचं काय सांगा बरं ?
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
sameer6949@gmail.com #samhere #sameergupte.blogspot.in#passionforfood

Tuesday, 2 May 2017

झमझम पुलाव

'झमझम पुलाव'
अकील शेख...तसे ठाण्याच्या पहिल्या राबोडीत माझे असंख्य मुसलमान मित्र आहेत पण या माणसाच्या मैत्रीला तोड नाही. खूप वर्षांपूर्वी जेव्हा याला कळलं की मी फूडी आहे ( खादाड आहे असं बोलण्या पेक्षा फूडी आहे काय मस्त वाटतं ना ) तेव्हा पासून वेगवेगळ्या पद्धतीच्या बिर्याण्या, कबाब, रान,तंदूर, काली मिरी भेजा, जबान का सूप असले पदार्थ खाऊ घालण्यासाठी अनेकदा मला कुठे कुठे घेऊन जात असतो. त्याच्याबरोबर असताना काही नियम आहेत .. म्हणजे ऑर्डर तोच देणार, आपण किती (दाबून) खायचं हे तोच ठरवणार, त्या हॉटेलमध्ये तो कितीवेळा आलाय आणि अजून काय काय खाल्लं पाहिजे हे तोच बोलत राहणार आणि अर्थात बिलाच्या वेळेला 'दादा, इधर चूप रैनेका' म्हणून बिलही तोच भरणार हा प्रकार काही वर्ष सुरु आहे. रमजान सुरु झाला की याचे फोन सुरु होतात आणि अस्सल मोगलाई पदार्थांचे मुंबई आणि कौसा येथील गल्लीबोळातील अड्डे पाहण्याचे बेत रचले जातात. अकील ला ओळखणारे माझे अनेक मित्र याला फोन करून बिर्याणीची ऑर्डर देतात - अनेकांनी त्याचा मोबाईल पण अकील बिर्याणीवाला म्हणून सेव्ह करून ठेवला आहे. वास्तविक याचा धंदा छपाईचा आहे पण हा पण माझे नाव सांगून कोणी फोन केला कि बिर्याणी त्याच्या घरी पोचेपर्यंत इस्माईल बिर्याणीवाल्याच्या मागे असतो. हा अकील खाणे आणि खिलवणे या बाबतीत इतका उत्साही आहे की माझ्या मुलीच्या लग्नात मेनू काय असणार हे त्याने माझी मुलगी पाच वर्षाची असताना ठरवलंय. खरंच सांगतो, भविष्यात माझ्या मुलीच्या लग्नात तुम्हाला "अरे अयुब अम्मीको बिर्याणी दे, युसूफ वो अपा के थाली मे सालन डाल, उस्मान जल्दी टिक्के लेके आजा - मैमान चिल्ला रईले है .. अशा आरोळ्या ऐकायला आल्या तर चमकून जाऊ नका.. हा काहीही करू शकतो.
या साहेबाचं लग्न झालंय, सुग्रण आणि प्रेमळ बायको अंजुम, मुलगा अर्शान आणि मुलगी अरिबा असा छोटासा परिवार आहे. परवा माझ्या ऑफिसमध्ये याला बसल्या बसल्या काय झालं कोणासठाऊक पण याने बायकोला फोन केला .. "कल छुट्टी है .. देख अपने दादा को झमझम पुलाव खाना है.. कल बना दे , सारी तयारी मै लेके आऊंगा". मी काही बोलायच्या आताच ' दादा कल तू ये चीज खाके देख.. मेरेको याद करेगा" असा म्हणून निघून गेला आणि खरोखर दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता गरमागरम डबा घेऊन हजर झाला. एक तर रविवारी त्या सोडेवाल्या साई कुळकर्णी च्या मुलाच्या मुंजीत आमरस पुरीचे जेवण पोटभर जेऊन मी घरी आलो होतो पण पिशवीतून डोकावणारा तो स्टील चा डबा बघून मला राहवेना. तुम्हाला सांगतो, पोट फुटेस्तोवर जेवल्यानंतरही असे ज्याला होते त्या खादाडालाच 'फूडी' म्हणतात बरंका. हं तर मी डबा उघडला आणि उघडताच त्या पुलावाची सजावट पाहून कधी नाही ते मला फोटो काढावेसे वाटले . झाकण उघडताच दरवळत येणाऱ्या त्या मोगलाई सुगंधाने अस्सल कायस्थ मनाचा ताबा घेतला .. ज्या प्रकारे डबा सजवला होता ते पाहून तर डब्यात चमचा घालायची पण इच्छा होत नव्हती पण शेवटी न राहवून पुलाव ताटात घेत मी पुन्हा एकदा मनसोक्त जेवलो. पानात चमचमीत झमझम पुलाव .. कधीही न ऐकलेला - न पाहिलेला - न चाखलेला - एका शब्दात सांगायचं तर केवळ लाजबाब ! नेहेमीच्या साध्या तांदुळाचा केलेला, मटण, कलेजी, चिकन घातलेला, वर खिमा कोफ्ते आणि अंडी लावून सजवलेला आणि खाताक्षणी अस्सल मोगलाई जायक्याचा साक्षात्कार होणारा हा झमझम पुलाव म्हणजे अकील ने दिलेली एक भन्नाट भेट.
मैत्रीचे बंध जोपासण्याचे अनेक फायदे असतात - झमझम पुलाव खायला मिळाला म्हणून नाही पण आपल्या घरात आपल्या पद्धतीची एक खासियत बनवून आपल्या मित्राला द्यावी या विचाराची पण दाद द्यावीशी वाटते. खाल्यानंतर त्याला आभार मानायला फोन केला तर 'दादा, अल्लाने तेरा नाम लिखके भेजा था, तेरे तक पहुंचा दिया बस्स'' आणि नंतर जोरात ओरडून " अरे देख, दादा और अम्मी तेरेको दुआ दे रैली है' असे बायकोला सांगू लागला . हे कौतुक वाचण्यासाठी अकील आणि अंजुम दोघेही व्हाट्सअप आणि फेसबुक वर नाहीत, नाहीत म्हणजे फेसबुक च्या १०-१२ मैल आसपास पण नाहीत .. पण ओतप्रोत प्रेमाने बनवलेल्या झमझम पुलावाच्या स्वादाने माझ्या फेस वर एक समाधानाची दिलखुष स्माईली आणण्यात यांचा हातखंडा आहे. तुम्हाला झमझम पुलावची ओळख करून देणारा आजचा हा लेख , तो बनवणाऱ्या अंजुम भाभीला आणि धाकट्या भावासारख्या असलेल्या प्रिय अकील यास प्रेमपूर्वक समर्पित. जमल्यास याची रेसिपी नक्कीच शेअर करीन.
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.in#loveforfood