''तू हल्ली हल्ली जरा जास्तच सीकेपी फूड, सीकेपी फूड करत असतोस रे " नाशिकहून परत येताना कल्याणजवळ कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं या विचारात असलेल्या माझ्या मित्राने मला टोकायला सुरुवात केली. तसं काहीच कारण नव्हतं, मी फक्त इतकंच म्हणालो की ''हे तुझं पंजाबी आणि चायनीज वगैरे नको रे आता..खूप कंटाळा आलाय मला' पण साहेब जरा जास्तच खवळले. मी म्हटलं जाऊदे ..गपचूप आपल्या घरी जेऊयात, बघ फोन लावून तुझ्या घरी काय केलंय ते. त्याने बायकोला तडक फोन लावला, काहीतरी बोलला आणि तेव्हढ्याच वेगात कट केला .." साधय रे, मेथीची भाजी आणि भाकरी'' तोंड वाकड करत माझ्याकडे पाहत पुटपुटला. मी म्हटलं जाऊदे माझ्या घरी फोन लाव आणि स्पीकर वर टाक म्हणजे मला गाडी चालवत बायकोशी बोलता येईल. घरचा फोन नेमका आईने उचलला. म्हटलं जेवायला काय आहे गं आज... "काही नाही, साधंच केलंय'' माझ्या आईच्या या उत्तराने त्याचा चेहरा अजूनच पडला. ''साधंच म्हणजे'' मी आपला विषय सुरूच ठेवला.. '' साधं म्हणजे आंबट वरण, भात, काचऱ्या बटाट्याची भाजी आणि मिरची तळलीये... तू येत असशील जेवायला, तर सुकट टाकते तव्यावर''. ''ओके, मी अर्ध्या तासात येतो'' असं म्हटलं आणि फोन कट केला. ''चायला, याला साधं जेवण म्हणतात तुमच्याकडे? पाच पाच पदार्थ बोलली तुझी आई'' आश्चर्यचकित होऊन विचारणाऱ्या मित्राकडे बघून मी शांत हसलो .. मेथीची भाजी भाकरी च्या समोर आमच्या घरातलं साधंसं जेवण सरस ठरलं आणि आम्ही दोघे घरी येऊन मनसोक्त जेवलो.
या साध्याशा जेवणातले दोन सुपरस्टार पदार्थ म्हणजे आंबटवरण आणि काचऱ्या बटाट्याची भाजी. या दोघांना जगात पर्याय नाही. त्यातच सीकेप्यांचं आंबटवरण हे अनेकांना भुरळ घालणारं आहे आणि त्याच्याबरोबर जोडीला असलेली तव्याला चिकटलेली,थोडीशी करपलेली, तेलाच्या लालसर तवंगावर थोडीशी पिवळसर करडी झालेली पातळ कापलेल्या बटाट्याची भाजी म्हणजे केव्हाही लाजबाब. जेव्हा जेव्हा आम्ही आठ दहा दिवसांसाठी बाहेरगावी फिरायला जातो तेव्हा आम्हाला पहिले चार पाच दिवस, किती नवीन पदार्थ खातोय आणि किती नाही असं होतं पण सहावा सातवा दिवस लागला की आपलं आंबटवरण भात कधी खायला मिळतंय अस होऊन जातं. विमानतळावरून '' आज आंबटवरण भात करून ठेव'' असा फोन हमखास घरी जातो. आंबटवरणावरून एक खूप खूप जुनी आठवण झाली. त्यावेळी गडकरी रंगायतन नव्हतं. ठाण्याच्या मो.ह.विद्यालयात( MH High school) रात्रीचे नाटकाचे प्रयोग होत. आमच्या वाडयातल्या मामी, म्हणजे सुमती रणदिवे यांचं आणि त्यांच्या काही सीकेपी मैत्रिणीचं तिथे कॅन्टीन सारखं काहीतरी असायचं आणि नाटक संपल्यावर सर्व कलाकारांना त्यांचंच जेवण असायचं. त्या मलाही त्यांच्या मुलांबरोबर मदतीला न्यायच्या. अनेक दिगग्ज कलाकारांना म्हणजे गोरेपान काशिनाथ घाणेकर, कमलाकर सारंग, श्रीकांत मोघे, निळू फुले, वारणेच्या वाद्यवृंदातील चाळीसएक बालकलाकार आणि त्यांचे खूपच प्रेमळ गुरुजी, गायिका प्रमिला दातार या सर्वाना मी तेव्हा जवळून पाह्यलंय, अगदी मांडी घालून जेवताना पाह्यलंय आणि त्यांना पापड, लिंबू वाढलेत सुद्धा. त्यावेळी एकदम राजबिंडे दिसणारे अभिनेते श्रीकांत मोघे यांना तर आमच्या मामींनी केलेलं आंबटवरण खूप आवडायचं .. अक्षरशः वाट्या वाट्या प्यायचे. आणि एकूणच त्यांचं जेवण आनंदाने आणि मनसोक्त जेवायचे ... हेच साधंसं जेवण पण त्या सर्वांना मनापासून आवडायचं.
आंबटवरण हा खरंतर सीकेपी जेवणातला एक संपूर्णपणे वेगळा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. आंबटवरणाला ''डाळ वाढा हो'' असं बोलणाऱ्याला परत जेवायला बोलावू नये या मताचा मी आहे. जेवायच्या आधी आंबटवरणावरच गरम गरम पाणी वाटीभर प्यावं, परत जेवताना भातावर ओतल्यावर वाटीत उरलेले वरण थेट ओठाला लावून परत वाटी भरायला ताटात ठेवावी आणि पोटभर जेवल्यावर सुद्धा उठता उठता पाण्याऐवजी घट्ट राहिलेलं वरण पिऊनच उठावं याला म्हणतात आंबटवरण भाताचं जेवण. इतका अप्रतिम सुगंध असणाऱ्या,लसूण मोहरीच्या फोडणीने अजूनच तडकेदार झालेल्या या आंबटवरणाला 'साधंसं' या सदरात ज्याने कोणी टाकलं असेल त्याचा जाहीर सत्कारच करावा म्हणतो. आजचं उरलेलं आंबटवरण दुसऱ्यादिवशी सकाळी तापवून आणि आटवून चपातीबरोबर खाताना जो काही आनंद मिळतो तो कोणत्याही शब्दात व्यक्त होऊच शकत नाही. आंबटवरणाबरोबर जगातली कोणतीही भाजी चालून जाते, भाजी नसेल तर सोडे, सुकट, लोणचं, पापड काहीही चालतं. आपल्याकडे आंबटवरणाची गोडी इतकी मोठी आहे की घरात तूरडाळीच्या महागाईची कडवट चर्चा सुद्धा नसते.
मागचे काही आठवडे मी बघतोय, माझा लेख आवडला तर अनेक महिला आज तोच पदार्थ घरी करणार वगैरे कॉमेन्टमध्ये लिहितात. बघा आजपण रविवार आहे..पण तुम्हाला नम्र विनंती - आज तुम्ही नेहेमीप्रमाणे मटणाचं जेवणच करा. नाही तर 'अखिल भारतीय तेचतेच खाऊन कंटाळलोय महासंघ' या संघटने मधले काही चिडलेले नवरे माझ्या घरावर मोर्चा आणायचे.
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.com
#foodblog #delicious #ckpfood #ckpfoodfest
sameer6949@gmail.com.
टीप - माझ्या त्या मित्राचे नांव विचारू नका.. एकशे सत्ताविसाव्यावेळी त्याची बायको रागावून माहेरी गेल्याचे पाप लागेल मला.
No comments:
Post a Comment