दोबारा यावंसं वाटणार "चौबारा -६०१"
तुम्ही ठाण्याच्या सीकेपी हॉलला अनेकदा भेट दिली असेल. कधी लग्नासाठी तर कधी एखाद्या कार्यक्रमासाठी. तसं दरवर्षी येण्यासाठी एक कारण मी तुम्हाला दिलाय ते म्हणजे आपला सीकेपी फूड फेस्ट. परंतु आता तुम्ही आपल्या मित्र परिवाराबरोबर किंवा आपल्या कुटुंबीयांबरोबर सीकेपी हॉल्सला कधीही येउ शकता. नाही नाही, हे काही कोणत्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही ..हे आंमंत्रण आहे सीकेपी हॉल च्या टेरेस वर सजलेल्या एका पंजाबी चौबाऱ्याचे. अस्सल म्हणजे एकदम अस्सल पंजाबी पद्धतीच्या सजावटीने सुसज्ज आणि पंजाबी चवीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा एक भन्नाट अनुभव म्हणजेच 'चौबारा ६०१''या अस्सल पंजाबी नावाचं एक अस्सल पंजाबी रुफटॉप रेस्टोरेंट.
सीकेपी हॉल च्या मुख्य प्रवेशदारातून आत शिरलात की तुम्हाला नजरेस पडतो दिव्यांनी लखलखणारा एक रंगीत ट्रक. या सेल्फीपॉईंट ला एक सेल्फी काढल्यानंतर लिफ्टमधून टेरेसवर येताना तुम्हाला ''पंजाब कि खुशबूचा" प्रत्यय यायला लागतो. लिफ्टमधून बाहेर पडतानाच रंगीबेरंगी रिबिनी आणि झालरीने मढवलेली एक सायकल आणि तिच्या बाजूला बसलेला मुनीमजी तुम्हाला पंजाबी स्वागताची पहिली सलामी देतो. इतक्या रंगाची उधळण केलेल्या या स्वागतकक्षात तुम्ही काही वेळ थांबणारच. रेस्टोरेंट मध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या तुम्ही सीकेपी हॉल च्या आवारात नसून पंजाबच्या एखाद्या ढाब्यात असल्याची जाणीव तुम्हाला होईल. तिथे वाजत असलेल्या पंजाबी संगीतावर तुमचे पाय थिरकू लागतात न लागतात तेव्हाच एक सरदार तुम्हाला तुमच्या टेबलाजवळ नेतो आणि काय गम्मत .. या टेबलांना नंबर नाहीत तर चक्क नावे दिली आहेत..ती सुद्धा तुमच्या आवडत्या हिरोच्या चित्रपटाची. मी अनेक पंजाबी हॉटेल, धाबे पहिले आहेत पण इथे तुम्हाला थक्क करणारी अनेक आश्चर्य आहेत ..थोडीशी बाकी ठेवतो.
रेस्टोरेंटमध्ये आपण काय फक्त बघायला थोडीच आलोय .. अहो आपण आलोय पंजाबी दावतीचा यथेच्छ समाचार घ्यायला. मुंबईतल्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या टिपिकल पंजाबी पदार्थाना काट देत तुम्हाला खऱ्याखुऱ्या पंजाबी भोजनाचा आनंद देण्यासाठी तुमच्यासमोर अवतरतो एक खास डिझाईन केलेला मेनू आणि मेनू सोबत येतो त्या मेनूचे वर्णन करणारा त्याची माहिती देणारा एक सरदारजी .. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा मेनू डिझाईन करताना या मंडळींनी पंजाबच्या अनेक वाऱ्या केल्यात आणि दिल्लीपासून अमृतसर पर्यंत मिळणाऱ्या पदार्थांची एक मोठी यादी तुमच्या समोर ठेवली आहे. चौबाराचा मुख्य शेफ आपला मराठमोळा हर्षद पाटणकर याच्या देखरेखीत तुम्हाला अनेक पदार्थ सादर केले जातात आणि सुरु होतो तुमचा पंजाबी ढाब्यावरच्या खवय्येगिरीचा एक अफलातून खाद्यप्रवास .
उत्तरेकडे सर्रास मिळणाऱ्या शिकंजी पासून सुरुवात करत, हलकासा तिखट 'पाये का शोरबा' घेत या कार्यक्रमाला सुरुवात करायची. तुमच्यात कोणी शाकाहारी असेल तर चाट प्रकारातील अनेक व्हरायटीज मधें 'आलू के कुल्ले' (हे नाव जरा गमतीशीरच), 'तवा आलू' नक्कीच तरी करा. पंजाब दि भट्टी दा स्वाद अनुभवायचा असेल तर 'छोले पनीर टिकिया' आणि एकदम हटके असे 'दही के कबाब' ला तोड नाही. मांसाहाराची तर विशेष काळजी घेत कस्तुरी मुर्ग कबाब, काकोरी कबाब, बऱरा कबाब हे असले अनोखे कबाब तुमच्या जिभेचा ताबा घेतात. जर तुम्ही तगडे खाणारे असाल तर "रान" हा मटणाचा प्रकार लाजबाब, पण एक कंडिशन आहे- याची ऑर्डर एक दिवस आधी द्यायची. बडी लेहेसुनी आणि छोले पहरगंजी हे तुम्हाला साक्षात दिल्ली गाठल्याची आठवण देतात. जसे आपले खिमा वगैरे पदार्थ स्पेशल या कॅटेगरीत मोडतात ना तसे चौबारा मध्ये मुर्ग कोर्मा, मुर्ग दो रंगा म्हणजे दोन प्रकारच्या रस्श्यात केलेली मुर्ग आणि काही झणझणीत हव असेल तर 'तार कोर्मा' ट्राय कराच. ड्रिंक्स बरोबर खायला मासे हवे असतील तर तंदूर झिंग आणि तंदूर पॉम्फ्रेट हे आहेच आपल्या सेवेला. मी जेव्हा शेफ हर्षद ला विचारलं कि एखादी भन्नाट डिश सजेस्ट कर तर म्हणे ''सर आमचा डाल बुखारा'' ट्राय करा...म्हटलं लेका माझं आडनाव माहित आहे ना तुला. तरी पण त्याच्या आग्रहास्तव ती डिश घेतली .. १६ तास शेगडीवर शिजवलेली उडिदाची डाळ आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली आणि आवडली बाबा. बाकी पंजाब्यांची खासियत असलेले लाछा नान, चुरचुरके नान वगरे अनेक पदार्थांची रेलचेल असलेला हा चौबारा खरोखरीच एक आनंददायी अनुभव ठरतो. जेवल्यानंतर लस्सी, राबडी स्टफ पराठा याबरोबरच 'शीर बिराज' हा एक हटके गॉड पदार्थ चाखून बघाच.. माझं आणि गोडाचं तितकं जवळचं नातं नसल्याने जास्त डिटेल सांगत नाही पण कुछ अलग बात है हे मात्र नक्की.
पराग साठे आणि यश तावडे यांच्या कल्पनेतल्या या चौबाऱ्याला आल्हाद राजे या नामांकित आर्किटेक्ट नी पूर्णपणे न्याय दिला आहे हे तुम्हाला तिथे गेल्यावरच समजेल. पाऊल ठेवल्यापासून ते निघेपर्यंत आपण सीकेपी हाल च्या आवारात आहोत याचाही तुम्हाला विसर पडेल आणि एकदा का तुम्ही इथे आलात की हा ''चौबारा छे सो एक'' तुमचं दोबारा यायचं ठिकाण झालं म्हणून समजा.
या गटारीनिमित्त शनिवारी आणि रविवारी सर्व खवय्यांना आणि ड्रिंक्स ची आवड असणाऱ्यांना एक खास ऑफर आहे ती म्हणजे बिअर ऑन एमआरपी. तुमची गटारीची जागा ठरली नसेल तर आपल्या कुटुंबीयांबरोबर हा सण 'चौबारा ६०१' येथे साजरा करा.. खवय्यांना योग्य ठिकाण दाखवल्याचं पुण्य माझ्या पदरी पडेल.
कुठे - सीकेपी हॉल टेरेस, ठाणे.
वेळ - दररोज साय ७ ते ११
सुट्टी - नाही
दर - अतिशय माफक
बार- बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
sameergupte.blogspot.com









No comments:
Post a Comment