बघा हं तुम्हाला पटतंय का ते. म्हणजे वाचल्यावर पटेलच पण तरीपण विचारतो. म्हणजे मला सांगा, जेवणात वडीचं सांबार खाल्यानंतर, भातावर चार चार वाट्या ओतून पोटभर जेवल्यानंतरसुद्धा परत स्वयंपाक घरात जाऊन ओट्यावरच्या त्या सांबाराच्या भांड्यावरच झाकण काढून बघता का हो तुम्ही? खरंतर मला 'बघता ना हो तुम्ही' असच म्हणायचं होतं पण थोडं चाचरत असं बोललो. बहुतांशी मंडळींचं उत्तर 'हो' च असेल कारण माझं पण उत्तर तेच आहे. तसं माणसाने स्वत:वरून जगाची परीक्षा करू नये पण या खाण्यापिण्याच्या परीक्षेत माझ्यासारख्या खादाडांची सगळी उत्तरं सारखीच असतात. असो.
तर आपला विषय आहे वडीचं सांबार...नव्हे 'आपलं वडीचं सांबार'.
सीकेपी सिग्नेचर डीशेस मधल्या अग्रक्रमांकावर असणाऱ्या निवडक पदार्थामधली माझी सर्वात आवडती अस म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
कसं आहे, एक तर हे वडीचं सांबार आपल्या घरी रोज रोज बनत नाही, बनलेच तर पुरता पुरत नाही, उरण्याचा प्रश्नच नाही आणि समजा चुकूनमाकून उरलं तर उभ्या उभ्या वाटीभर पिऊन संपवल्याशिवाय आपला आत्मा शांत होत नाही. पटतंय का ? एखादा कांदा, अर्धी वाटी नारळाचं दूध, वेलच्या, दालचिनी, चमचा दोन चमचे चण्याचं पीठ, तिखट मीठ हळद या साध्याशा वाटणाऱ्या साहित्याने जे काही भन्नाट रस्सायन तयार होतं त्याचं नाव वडीचं सांबार. आणि चण्याचं पीठ वापरून केलेल्या काजू कतली च्या आकाराच्या पण जाडसर मोठया अशा वड्या या सांबारात सोडण्याचा एखाद्या सुग्रणीचा जो सोहळा असतो तो अवर्णनीय असतो .. एक तर जेवायला वडीचं सांबार आहे हे ऐकूनच सपाटून भूक लागलेली असते, ताटात कापलेल्या वड्यांवर हात टाकावा तर जेवताना वाटीत कमी मिळण्याची धमकी आधीच दिलेली असते आणि तरीही माझ्यासारखा एखादा उतावळा ताटात भात वाढून घेऊन ते ताट हातात धरूनच बायकोच्या बाजूला उभा असतो. एकदा का ताटात वडीचं सांबार पडलं की मांडी घालून बस्तान बसवायचं आणि वाफाळलेल्या भातावर सांबार ओतून नाकातून पाणी येईस्तोवर मनसोक्त जेवायचं. भुरक्या भुरक्याला अवीट आनंदाची साक्ष देणाऱ्या या वडीच्या सांबाराला पिऊ तेव्हडं कमी. ते पिताना त्यातल्या गरम गरम वड्यांचे सुसह्य आणि हवेहवेसे चटके जिभेला चोचले या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने समजावून सांगतात. आम्हा सीकेप्यांच्या घरात महिन्यातून एकदातरी अवतारणाऱ्या या स्वर्गलोकीच्या व्यंजनाला एक विशेष रंग प्राप्त झालेला असतो.. आणि तुम्हाला सांगतो खरा खवय्या या रंगावरच फिदा होतो. वडीचं सांबार कशाबरोबरही ही खाता येत असलं तरी त्याच्या चवीला योग्य न्याय द्यायला पांढऱ्या भाताशिवाय पर्याय नाही.
वाचताना भूक जागवली गेली असेल तर आजचाच बेत पक्का करा 'आपल्या वडीच्या सांबाराचा' !
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
#sam here #sameergupte.blogspot.com
#ckpfood #delighful #exoticfood

No comments:
Post a Comment