Thursday, 26 July 2018

मी खुल्या वर्गाचा, मी खुल्या दिलाचा !

मी खुल्या वर्गाचा,
मी खुल्या दिलाचा,
याचना न रक्तात माझ्या,
समर्थ मी....दणकट मनगटाचा !

सीकेपी घरात, पर्यायाने एका सूशीक्षित, सुसंस्कारी, सुविचारी आणि खऱ्या अर्थाने पुरोगामी समाजात जन्माला आल्याचा मला यथार्थ अभिमान आहे. विषमता निर्माण करणारी जात पात वर्ण भेद न मानता माणुसकी हाच धर्म मानण्याची शिकवण घेत झालेल्या संस्कारांना अभिमानाने मिरवत स्वकर्तृत्वावर  ज्ञानप्राप्ती आणि धनप्राप्ती करून जीवन साजरे करणारे आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. अडचणी, अपेष्टा आणि अनेक संकटाना सामोरे जाण्याची शक्ती आणि मानसिकता नसानसांत भिनलेला हा सीकेपी समाज कोणत्याही जातीच्या निकषांवर कधीही झोळी पसरवणार नाही. स्वार्थासाठी कोणी काय मागावे आणि कसे जगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ते करताना सामाजिक नाती कलुषित करण्याचा डाव खेळणाऱ्यांना आणि समाजासमाजात दरी निर्माण करणाऱ्यांना माझ्या विचारांचे समाजबांधव  कदापि माफ करणार नाहीत. मी आधी मराठी आहे, नंतर सीकेपी आहे. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या प्रत्येक मराठी माणसाला, मग तो कोणत्याही जातीचा असो, स्वाभिमानाने जगण्यासाठी  मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत या मताचा मी आहे. ज्यादिवशी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज रस्त्यावर उतरेल त्या मोर्चात माझ्यासारखे हजारो सहभागी होतील.  जय महाराष्ट्र !
समीर गुप्ते, ठाणे.

Wednesday, 4 July 2018

बिअर प्रेमींचा नवा स्पॉट - बिअरबक कॅफे, ठाणे.





ए उद्या आपण ड्रिंक घेऊ बरंका अस म्हणून बिअर प्यायला जाणे आणि चल यार, छान ठिकाणी बसून दोन बिअर मारू या दोन्ही वाक्यात बिअर पिणे जरी असले तरी त्याचा मोड आणि मूड संपूर्णपणे वेगळा आहे. बीअर पिणे हे सर्वस्वी बाहेरच्या तापमानावर आणि आपल्या मनावर अवलंबून असतं. बिअरसाठी समोर समुद्र जरी नसला तरी एक छान माहोल लागतो, एखादा छान विषय लागतो, लाईकमाईंडेड मित्रांचा गोतावळा लागतो, त्यात एखादा बकराही लागतो आणि जिथे जाऊन बिअर प्यायची तो स्पॉटही तसाच लागतो. सहा मित्र या टेबलवर दाटीवाटीने, दोन पलीकडे अस नको ... जिवलगांचा गठ्ठा एकत्र बसला पाहिजे, अड्डा चांगला लागला पाहिजे.
सध्या ठाण्याचे स्मार्ट होण्यासाठी जे उत्खनन सुरु आहे ते पाहता कॅस्टल मिल नाका हा शक्यतो टाळावा असे जरी मी सुचवत असलो तरी तिथेच कदापि न टाळण्यासारखी एक जागा असेल तर ती म्हणजे माझ्या विचारांच्या बिअर प्रेमी मित्रांचा हक्काचा अड्डा ...'बिअरबक कॅफे'. जिथे फक्त बीअर आणि उत्कृष्ट वाईन सर्व्ह केली जाते असे हे रेस्टोरेंट फेमस आहे तिथे मिळणाऱ्या फ्लेवर्ड बिअर मुळे. बिअर मध्ये कसले आले फ्लेवर असा विचार कराल तर तर मित्रांनो तुम्ही नक्कीच काहीतरी मिस कराल. तुमच्या आवडत्या फ्लेवर्स मध्ये बिअर ब्लेंड करून तुमच्या समोर येताच एक नाविन्यपूर्ण पेय पिण्याचे कुतूहल तुमच्यात निर्माण होते. मला पण पहिल्यांदा हा काय कशाला नको तो प्रयोग करतोय असं झालं होतच पण कुतूहल नक्कीच होतं. बिअर बकचे मेनू कार्ड आपल्याला काही वेळ खिळवून ठेवते. त्याच्या कल्पक फोल्ड्स आणि मेनू डिझाईन मुळेच आपला पुढचा एक्सपीरिअन्स जबरदस्त होणार याची जाणीव होते. बसायला नेहेमीचे टेबलखुर्ची -सोफा व्यतिरिक्त मित्रांचा किंवा कुटुंबीयांचा मस्त अड्डा जमवण्यासाठी भारतीय बैठकीची सोय इथे उपलब्ध आहे. थोडंसं ट्रेंडी, थोडंसं ऑफ-बीट वॉल डेकोर तुम्हाला काही वेळ गुंतवून ठेवणारच....अर्थात टेबलवर दिलेली ऑर्डर येई पर्यंतच. नंतर तुम्ही निवडलेल्या फ्लेवरचा आस्वाद घेत तिथे मिळणाऱ्या अनोख्या व्यंजनांचा आस्वाद घ्यायचा...विषयांची कमी तर असल्या ठिकाणी कधीच नसते. रेग्युलर आणि फ्लेवर्ड बिअर बरोबरच, एक मोठ्या काचेच्या जार मध्ये अनेक फळांच्या फोडी आणि त्यावरच्या बर्फात ओतलेली रेड/ व्हाईट वाईन मधलं 'सांग्रिया' हे असाधारण वाईन कॉकटेल, याबरोबर इतरही मला माहित नसलेली (जी कालांतराने मला माहित होतीलच) अशी अनेक मॉकटेल्स असलेले हे कॅफे एक वेगळ्या अनुभवाची ओळख करून देते यात वाद नाही. बिअरबक 'कॅफे' हे नाव याने का ठेवले असावे हे मात्र मला अद्यापही कळले नाही. कदाचित बार मध्ये जाऊन पिऊन आल्याचा गिल्ट ग्राहकांना नको, घरी गेल्यावर 'कॅफे' मधून आलो असं ताठ मानेने सांगू शकतो या उदात्त भावनेतून हे नाव ठेवले असावे.
इथे उपलब्ध असलेल्या अनेक स्टार्टर्स मध्ये कॉर्न रॉक्स विथ चिमिचुरी सॉस ( हा शब्द मी तिथे बसून पाठ केलाय ), कॉम्बिनेशन चिकन, क्रॅकर जॅक चिकन, पेपर क्रस्टेड प्रॉन्स इन ऑयस्टर सॉस अशा भन्नाट पदार्थांच्या सानिध्यात तुमची पुढची बिअर कधी सर्व्ह झाली हे तुम्हाला कळतही नाही. खाण्याच्या अनेक पदार्थामध्ये तरुण वर्गाला आकर्षित करणाऱ्या वेगवेगळ्या पिझ्झा, पास्ता या पदार्थांची सुद्धा लयलूट आहे. पदार्थांचा दर्जा आणि सादरीकरण यावर विशेष लक्ष देत नाविन्यपूर्ण चवींचा शोध घेत खवय्यांना तृप्त करण्याचं काम बिअर बाक चा तरुण मालक अजिंक्य पालकर त्याच्या वडिलांच्या म्हणजेच मिलिंद पालकरांच्या मदतीने करत आहे. अजिंक्य कडे पाहून याने सर्व बिअर स्वतः टेस्ट केल्याचे तुम्हाला जाणवते. सीकेपी मालक असूनसुद्धा मेनूवरती एकही सीकेपी पदार्थ नसल्याने मी थोडा नाराज असलो तरी सीकेपी मंडळींच्या आवडीच्या पेयांवर विशेष लक्ष दिल्याने बिअर बक च्या पालकर पितापुत्रा विषयी मनात 'मोठ्ठा' आदर आहे. हा झाला गमतीचा भाग. पण आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांना एकदातरी या कॅफे मध्ये घेऊन जाऊन या अनोख्या कॉम्बिनेशन्स चा आस्वाद घ्यायला हरकत नाही. नक्की जा !
बिअर बक साठी माझे रेटिंग - ४.५ स्टार
Beerbuck Cafe
Shop No 1 & 2, Vikas Shopping Complex,
Meenatai Thakrey Chowk,
Castle mill naka, Thane West,
Phone 022 2574 3393

Tuesday, 3 July 2018

बेजबाबदार सत्ता - बेपर्वा जनता !


पुन्हा एकदा रेल्वेचा पूल कोसळला आणि पुन्हा एकदा जबाबदारी कोणाची यावर राजकारण सुरु झाले. इथे माणसे जखमी झाली, प्रवासाला निघालेली मधेच अडकली, धावणारी मुंबई जागेवरच थांबली त्याचे काही नाही, उलट आपण कसे जबाबदार नाही हे सांगण्यात धन्यता मानणारे नेते पहिले. मुंबईची जनता पण मुंबईचे स्पिरिट कसे जबरदस्त आहे, ट्रॅकवर उतरून अर्धा किलोमीटर चालून कशी धावती बस पकडली आणि कसा लटकतऑफिसला पोचलो अशा मसालेदार कथा सांगत मुंबई कशी सहनशील आहे, मुंबईकर कसा मार्ग शोधतो हे सांगण्यातच आनंदी असतो. अरे अशा वेळीस ऑफिसला जाच पण त्या जबाबदार अधिकाऱ्याच्या ऑफिसला जा आणि विचार जाब त्या हरामखोराला. कोणीही यायचं टपली मारायची असा प्रकार झालाय मुंबईचा.  सभ्यतेची आणि  गळपटल्यासारखी ततपप ची भाषा सोडा आणि फैलावर घ्या या भडव्यांना. तेव्हा कुठे भानावर येऊन ही मंडळी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळतील.  तुम्ही इतकं बेपर्वा राहिलात तर अजून मोठ्या दुर्घटना समोर उभ्या राहतील. एखाद्या चालत्या लोकलवर भर दिवसा पूल पडला असता तर आज तुमच्या माझ्या माहितीतला एक तरी माणूस मेला म्हणून बातमी आली असती. नशिबानं संकट टळलंय.

या कर्तबगार नेत्यांना, जबाबदार अधिकाऱ्यांना आणि अभ्यासू मंत्र्यांना एक सूचना आहे. आता उभ्या असलेल्या सर्व सार्वजनिक बांधकामांवर आणि भविष्यात होणाऱ्या  प्रत्येक सार्वजनिक बांधकामाच्या उदघाटनाला त्या बांधकामाच्या देखभालीची जबाबदारी कोणाची ते पण दगडावर कोरून घ्या.  म्हणजे आमचा माणूस नक्की कोणामुळे मेला हे तरी कळेल.

Tuesday, 5 June 2018

फटकेबाज फिल्लमबाजीच्या चमचमीत कणेकरीची पंचाहत्तरी - हॅपी बर्थडे शिरीष कणेकर साहेब


शिरीष कणेकर मला नावाने ओळखतात ही फुशारकी मारताना एक भलताच आनंद मिळतो. कदाचित अमिताभ बच्चन मला ओळखतो हे सांगताना सुद्धा इतका वाटणार नाही इतका अभिमान मला कणेकरांबद्दल वाटतो याला हजार कारणं आहेत.  माझी फिल्लमबाजी आणि माझी फटकेबाजी या दोन प्रचंड लोकप्रिय स्टॅन्ड अप शो च्या अगोदर लोकसत्ता मधली कणेकरी हजारदा वाचून मोठ्या झालेल्या पिढीचा मी प्रतिनिधी. स्टॅन्ड अप शो ? होय , शिरीष कणेकर हे मराठीतलेच नव्हेत तर भारतातील पहिले स्टॅन्ड अप शो करणारे विनोदी लेखक असावेत. शिरीष कणेकरांच्या रविवारी येणाऱ्या लेखाची मटणाच्या जेवणापेक्षा  आतुरतेने वाट बघणारी जी पिढी होती त्यातला मी एक. त्यांच्या लेखात भारतभूषण, प्रदीपकुमार, महिपाल, आय एस जोहर, अचला सचदेव यांच्यावर केलेल्या भाष्याने अक्षरशः हसून हसून डोळ्यात पाणी यायचं. थोडी खोचक, थोडी तिरकस तरीही वाचकांवर आणि प्रेक्षकांवर पक्कड घेणारी स्वतःची एक शैली, ज्याला पुढे कणेकरी हे नाव पडलं, असणाऱ्या या कलाकाराचे फॅन फॉलोइंग आजपर्यंत तितकंच जबरदस्त राहिलंय.  पु.ल.देशपांडे यांच्या नंतर शब्दाच्या कोट्या करत वाचकांना खदखदून हसवणारा लेखक कोण असेल तर तो म्हणजे शिरीष कणेकर. राजेश खन्ना आणि ऋषी कपूर हे त्यांचे प्रिय कलाकार असावेत.राजेश खन्नाविषयी बोलताना शिरीषजी अक्षरशः तो प्रसंग समोर उभा करतात. चित्रपटातील अनेक डायलॉग्स, अनेक घटना यांच्या तोंडून ऐकताना हसूनहसून मुरकुंडी वळते. माझ्याबतीत सांगायचं तर कधी खूप स्ट्रेस्ड असलो की यांचं एखाद पुस्तक घ्यायचं आणि कुठूनही वाचायला सुरुवात करायची, पाचव्या मिनिटाला हा स्ट्रेस पाच मैल दूर गेला म्हणून समजा. माझ्या लेखनावर, विशेषकरून माझ्या सीकेपी खाद्यपदार्थावरच्या (फूड ब्लॉग्स) लेखनावर शिरीषजींच्या शैलीचा प्रभाव आहे हे मला अनेकांनी सांगितलंय.  

काही दिवसांपूर्वी  सीकेपी साहित्य संमेलनाच्या वेळी त्यांच्यासाठी माझ्या रेस्टोरेंट मधून आलेली चपाती खाताक्षणी 'वाह .. मऊसूत' आणि वालाचे बिरडे चाखताच 'अप्रतिम ' असे उद्गार काढून उत्तम जेवणाची पावती देणारा हा माणूस नुसताच खवय्या नाही तर खऱ्या अर्थाने दर्दी खवय्या आहे. चवीची उत्तम जाण असणारे कणेकर सीकेपी जेवणाबद्दलही खूप छान लिहितातआणि बोलतातही  (मी आधी 'जेवणावर' छान बोलतात असं लिहिलं होतं, त्यांच्या भीतीने शब्द बदलला. मी त्यांना घाबरतो हे मी त्यांना आधीच सांगितलंय)   ठाण्याच्या पहिल्या सीकेपी फूड फेस्ट ला आल्यानंतर त्यांनी जे वर्णन लिहिले आहे ते आजही व्हाट्सअपवर फिरताना दिसतं. 'सीकेपी लोकं नुसते खाणारे नसतात तर चवीने खाणारे असतात' असे एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगताना सीकेपी असल्याचं कौतुक त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होतं. सीकेपी फेस्ट ला आल्यावर माईक हातात घेऊन, तिथे आलेल्या खाण्यात दंग असणाऱ्या लोकांना थोडा वेळ खायचे थांबवण्याची ताकद मी ज्यांच्यामध्ये पहिली ते म्हणजे राजसाहेब ठाकरे, अवधूत गुप्ते आणि शिरीष कणेकर साहेब. एरव्ही तिथे असलेल्या खवय्यांना स्टेजवर कोण सेलेब्रिटी उभा आहे हे पाहायची पण फुरसत नसते.

शिरीष कणेकरांचं माझ्या केसांवर विशेष प्रेम आहे. खरंच सांगतोय. एकदा कल्याणच्या एका कार्यक्रमात स्टेजवरून बोलताना ते म्हणाले  की " या समीर गुप्ते कडे पाहिल्यावर शाहरुख खानचीच आठवण येते हो "  या वाक्यानंतर आता माझं काही खरं नाही हे मी समजून चुकलो होतो. तरीही धीराने त्यांचे पुढचे वाक्य ऐकले ''हो बघाना, समीर गुप्ते च्या आणि शाहरुख खानच्या वाढलेल्या केसांकडे पाहिल्यावर मी या दोघांना पुढून बघतोय की मागून बघतोय हेच कळत नाही" प्रेक्षकांच्या हशा आणि टाळ्या ऐकताना कणेकर माझे कौतुक करतायत की चंपी करतायत हेच कळत नव्हतं. एकदा ठाण्याच्या कार्यक्रमातही ''त्याच्या उंचीची आणि त्याच्याएवढी दिसणारी डॉक्टर असलेली मुलगी असताना हा माणूस कपाळावरचं कोणतं पाप घेऊन फिरतो बरं" या वाक्याने प्रेक्षकांमधे धमाल उडवून दिली होती.''तुम्ही याला केस कापायला नाही का हो सांगत" असे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या माझ्या आईला सांगताना घेतलेला पॉज आणि माझ्या आईचा चेहेरा मला आजही आठवतो.  कल्याणच्या त्या कार्यक्रमाहून परत येताना गाडीमध्ये  शिरीष कणेकर, राज-उद्धव यांचे मामा श्री चंदूमामा वैद्य, मित्र दीपक कर्णिक, श्री मिलिंद अधिकारी आणि मी अशी मंडळी होतो. त्या तासभराच्या प्रवासातल्या त्यांच्या धमाल गप्पा ऐकणे म्हणजे एक अविस्मरणीय आठवणच.

आज हे लिहिण्याचं कारण म्हणजे आज श्री शिरीष कणेकर यांचा ७५वा वाढदिवस आहे. चित्रपट, क्रिकेट आणि खवय्येगिरीवर लेखन करून गेली पन्नास वर्षे मनमुराद कसलं, पोट  फुटेस्तव हसवणाऱ्या, एकला बोलो रे, एक्केचाळीस, गाये चला जा, गोली मार भेजेमें, गोतावळा, कुरापत, मखलाशी, यादोंकी बारात, टिवल्याबावल्या, डॉलरच्या देशा अशा अनेक पुस्तकांच्या या असामान्य लेखकाला आणि उत्तुंग कलाकाराला त्यांच्या  ७५व्या वाढदिवसाच्या आणि उदंड आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा ! आपली प्रकृती कायम ठणठणीत राहो आणि आम्हा रसिकांना आपल्या हास्य विनोदाच्या कार्यक्रमांची मेजवानी सतत मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्हा सर्व साहित्य रसिकांकडून आणि खवय्यांकडुन आपणास 'हॅपी बर्थडे' !  

समीर गुप्ते
#samhere #sameer6949@gmail.com

Saturday, 19 May 2018

पावसाळी रानभाज्यांची राणी - शेवळाची कणी

कॉलेजला असताना वर्गात एखादी सुंदर दिसणारी नवीन मुलगी आली तरी इतका आनंद झाला नसेल जितका 'बाजारात शेवळं आली' या माझ्या काल परवाच्या एफबी पोस्टने सीकेपी पुरुषांना झाला असेल. मला सोडा हो, पण माझ्या रेस्टोरंन्टवरही फोन करून समीर ने शेवळं ठाण्याच्या बाजारात कुठे पहिली ही  विचारणा झाली , देवाशप्पथ खरं सांगतोय.  शेवळं आली रे आली की आपण कधी बाजारात जाऊन ती आणतोय असं वाटलं नाही असा सीकेपी विरळाच. तुला शंभरला सहा दिल्या ? मी तर घासाघीस करून शंभरला ला आठ घेतल्या हे सांगण्यात जो आनंद आहे तो चारशे ची सुरमई दोनशे ला घेतली हे सांगण्यातही  नाही. खरंतर त्या बिचाऱ्या भाजीवालीला धंदा करताच येत नाही असं नेहेमी मला वाटतं. शंभराला सहा काय, हिने शंभराला तीन दिल्या तरी निमूटपणे घेऊन जायची तयारी असलेले अनेक सीकेपी या जगात असतील. भाजीवालीची शेवळाने भरलेली टोपली इकडे तिकडे बघत आपल्या पिशवीत रीती करताना जे सुख असतं त्याचे वर्णन शब्दात करणं अशक्य. पिशवी भरली की थेट घर गाठायचं आणि परातीत रिकामी करून समस्त शेवळाच्या सौन्दर्याचं प्रदर्शन मांडायचं ही परंपराच. लागलीच फोटो काढून सीकेपी खवय्ये आणि सीकेपी फूड या फेसबुक ग्रुपवर टाकण्याची प्रथा गेल्या ५ वर्षांपासून आली पण त्या आधी आख्या प्रभू आळीला सांगण्याची परंपरा होतीच ..अजूनही असेल.

कदाचीत वर्षातून एकदाच दर्शन देणारी म्हणून  किंवा कदाचित चवदार अस्तित्वामुळे मला नेहेमीच आकर्षित करणारी शेवळं ही  पावसाळी भाज्यांमधली रूपगर्वीता म्हटली जावी अशीअतिशय सौन्दर्यवान भाजी आहे असे मला कायम वाटतं. सोलून झाल्यावर तीचं देखणं रूप, तो सडपातळ बांधा आणि रंगाची उधळण केलेले रंगीबेरंगी कोंब तुम्हाला शेवळाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहू देत नाही. मे च्या १५ तारखेपासून मनाला गारवा देणारी आणि जून च्या अखेरीस 'जून' झाली तरी हवीहवीशी वाटणारी शेवळाची भाजी सीकेपी स्वयंपाकाच्या अदाकारीची  एक आगळी ओळख म्हणून लोकमान्य आहे.

शेवळाची भाजी- शेवळाची कणी- शेवळाच्या वड्या अशा वेगवेगळ्या पदार्थांमधल्या सोडे घालून, सुकट घालून, कोलंबी घालून, खिमा घालून या उपलब्ध पर्यायांमधल्या एका पर्यायावर शिक्कामोर्तब होऊन एक अलौकिक चवीची अमृततुल्य भाजी आपल्या चुलीवर साकारताना सुगरणीचे मन मात्र थोडे अस्थिर असते. म्हणजे भाजी खवखवणार तर नाही ना , पुरवठ्यास तर पडेल ना, पटकन मुलीकडे किंवा वेगळा राहणाऱ्या मुलाकडे डबा कोण पोचवेल, मुलांना अमेरिकेत मिळाली तर किती बरं ना पासून 'आज हे असते तर' अशा अनेक विचारांच्या,अनेक भावनांच्या कल्लोळात ही पाककृती साकारते.

कोणी बरं या भाजीचा शोध लावला असेल ? हे वाक्य माझ्या लहानपणी घरात हमखास बोललं जायचं. याच उत्तर आजवर सापडलं नाही. परंतु सीकेपी समाजाबरोबर सोनार समाजातील काही सुगरणी सुद्धा या अदभूत शोधाला योग्य मान देत भाजीवर पाकसंस्कार करत शेवळं या भाजीला अजरामर करतात -त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं.  जरा पटकन  रेसिपी सांगता का असं बोलून या शेवळं पुराणाला धक्का न देता एखाद्या जवळच्या लाडक्या आजीकडून शेवळाची कणी लवकरात लवकर शिकून घेतली तर रानभाज्यांची राणी असलेली ही भाजी अजूनही काही दशकं आपल्या जीवनात आणि आपल्या जेवणात आनंदाने नांदेल हे मात्र नक्की.

समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.com
 #ckpfood #ckpfoodfest
#sameer6949@gmail.com
pic courtesy - Payal Shikarkhane - Panvel

Tuesday, 6 March 2018

#सीकेपी फूड फेस्ट #यशोगाथा #साई कुळकर्णी

सीकेपी फूड फेस्ट मध्ये आपल्या व्यवसायाची सुरुवात करून यशस्वी झालेलं अजून एक व्यक्तिमत्व म्हणजेच साई कुळकर्णी. माझ्या येणाऱ्या पुस्तकात अंतर्भूत असलेल्या यशोगाथेमधील ही अजून एक यशोगाथा.

सीकेपी माणसाला भाजीवाली किंवा वाणी एकवेळ नाही भेटला तरी चालेल पण खाटीक आणि कोळीण यांचं दर्शन आठवड्यातून चारवेळा तरी झालच पाहिजे. कोळी समाज तसा आपल्या खूपच आवडीचा समाज. आपला सीकेपी माणूस अनेकदा कोळ्यांमध्ये रमताना दिसेल पण मला एक सांगा तुम्ही सीकेप्यांमध्ये एखादा कोळी पाहिलाय का हो ? नाही ? पण मला विचारलंत तर मी नक्की सांगेन कि सीकेप्यांमध्ये एक कोळी मी नक्कीच पाहिलाय. आडनावाने कोळी नसला तरीपण कुळकर्णी नाव धारण केलेला या सीकेपी कोळ्याच नाव आहे साईप्रकाश उर्फ साई. अहो खरं सांगतोय मी. तुम्हाला डोळे बांधून याच्या घरी नेले तर हा साई कुळकर्णी कोळीवाड्यात राहत असावा असे तुम्हाला वाटेल.
ठाण्याच्या २०१४ साली पहिल्या सीकेपी फूड फेस्ट मध्ये मी त्या वेळच्या १०-१२ स्टॉल धारकांना सूचना देत असताना एक पाच फूट उंचीचा बोंबीलसदृष्य माणूस माझ्या जवळ आला आणि तुमच्या मामाने तुम्हाला भेटायला सांगितलंय असे म्हणाला. कशासाठी ? असे विचारताच .. "सर आय सप्लाय फ्रेश फिश - आय एम साई कुळकर्णी" त्याची उंची, त्याचे वजन, त्याची देहबोली आणि त्यावर त्याचे फाडफाड इंग्लिश बोलणे ऐकून क्षणभर काही न सुचल्याने मी त्याला माझ्या बाजूला बसायला सांगितले आणि विचारले या सर्वाना मच्छी सप्लाय करशील का ? ओह येस्स ऑफ कोर्स ..बाय ऑल मीन्स .. आय मीन व्हॉट एव्हर दे वॉन्ट...फ्रेश फिश फ्रॉम वॉटर्स ऑफ श्रीवर्धन ! च्यामारी... हे पोरगं मराठी बोलायलाच तयार नव्हतं. मिटिंग संपताच याने त्याच्या मच्छीचे भाव सांगितले आणि जवळपास सर्वानी या साई कडून मच्छी खरेदी केली.
२०१२ मध्ये एक सुप्रसिद्ध मीडिया हाऊस मध्ये काम करणाऱ्या साईने त्या क्षेत्रातील अनिश्चितता पाहून त्या नोकरीला राम राम ठोकला. काही तरी व्यवसाय करावा या विचाराने पछाडलेल्या साईला कशी कोणासठाऊक पण मच्छी विकण्याची इच्छा झाली. असं म्हणतात कि त्याच्या बायकोला म्हणजे वैशालीला त्याने ही भन्नाट कल्पना सांगताच तिला त्याच्या उंचीपेक्षा मोठे असे प्रश्नचिन्ह पडले. पण साई वर असलेल्या अगाध श्रद्धेमुळे तिने याला मान्यता दिली आणि तत्क्षणी एक कायस्थांचे कोळ्यात रूपांतर झाले. सुरुवातीच्या काळात घरोघरी जाऊन ताजी मच्छी पोचवणारा साई आता सीकेपी घरात एक हवाहवासा माणूस वाटू लागला होता. हा माणूस जर तुमच्याशी फोनवर बोलून तुमच्या घरी आला तर कदाचित तुम्ही हाच तो आहे यावर विश्वास ठेवणार नाहीत इतका अस्खलित इंग्रजी बोलून हा ऑर्डर घेतो. सीकेपी फूड फेस्ट करताना मी ज्या माशांची नावे ही ऐकली नसतील इतके मासे तो फोनवर एका दमात विकतो.
ओल्या मच्छीला गजाली , तुंगा यासारख्या हॉटेलमध्ये पुरवठा करण्याच्या संधीचे त्याने सोने केले. ओली मच्छी विकत नावारूपाला आलेल्या साइने काही दिवसातच आपला मोर्चा आता अस्सल सीकेप्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोडे व इतर सुकी मच्छीकडे वळवला होता. मधल्या काळात माझ्याबरोबर सीकेपी फूड फेस्ट निमित्त ठाणे, नागपूर, पुणे , मुंबई आणि नाशिककरांनी देखील त्याच्या ताज्या मच्छीला प्रथम पसंती दिली. नागपूर च्या सीकेपी फेस्टिवलला साई ने सतरा लाख रुपयांची मच्छी दिली होती. ज्या ट्रेन मधून ही मच्छी गेली त्या ट्रेन मध्ये मी स्वतः होतो. प्लॅटफॉर्म वर माल उतरावल्यानंर नागपूरकरांनी त्या खोक्यांना गराडा घातलेले मी पाह्यलंय. आज चार वर्षे या व्यवसायात स्थिरसावर होऊन साईने श्रीवर्धन येथे जवळपास २७ बोटी घेऊन कोळी बांधवांच्या मदतीने आपल्या व्यवसायात जम बसवत अनेक एक्स्पोर्ट हाऊसेस आणि क्रॉफर्ड मार्केट मधील होलसेलर्स यांनाही पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
हे करताना अनेक कठीण प्रसंगांना पण त्याला तोंड द्यावे लागले. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसलेल्या उदयोन्मुख व्यावसायिकाला ज्या अडचणी येतात त्याला साई पण अपवाद नव्हता. पण खरोखरीच अर्धांगिनी या शब्दाला सार्थ ठरवत त्याच्या व्यवसायाला लागणाऱ्या भांडवलासाठी पत्नी वैशालीने स्वतःचे दागिने गहाण ठेऊन साईच्या यशाला हातभार लावला. बऱ्याच मंडळींना माहित नसेल पण साईची आई ही आता अमेरिकन नागरिक आहे. साईच्या वडिलांच्या जाण्यानंतर दोन्ही मुलांचे संगोपन करून, त्यांना स्थिरसावर करून ती गेली ७ वर्षे तिच्या डल्लास -अमेरिका येथील बहिणीकडे राहून तिला तिच्या केटरिंग व्यवसायात मदत करत आहे. आईच्या ओळखीने आणि स्वतःच्या मित्रपरिवारामुळे साईच्या व्यवसायात अमेरिकेतील ग्राहकांची यादी खूप मोठी आहे. साईच्या व्यवसायाचे नाव पण आईच्या नावाने म्हणजेच 'शोभना फिशरीज' म्हणून ठेवले आहे.
सीकेपी फूड फेस्ट मध्ये येऊन आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा आलेख आपल्या अफाट जिद्दीने आणि मेहेनतीने वाढविणारा हा साईप्रकाश कुळकर्णी म्हणजे माझ्यासाठी अजून एक विलक्षण यशोगाथा आहे. त्याची शारीरिक उंची जरी नगण्य असली तरी त्याची व्यावसायिक उंची आता आकाशाला गवसणी घातल्याशिवाय थांबणार नाही हे मात्र नक्की.
माझ्याकडून आणि सीकेपी फूड फेस्ट कडून साई ला भरभरून शुभेच्छा