Monday, 7 January 2019

सिकेपी फूड फेस्ट - सिकेपी खाद्य पदार्थांव्यतिरिक्त खूप काही

दरवर्षी सीकेपी फूड फेस्ट आला की मी त्याच्यावर काहीतरी लिहायलाच पाहिजे असा काही नियम नाही. वर्षागणिक फेस्ट ला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता तशी गरजही नसते पण तरीही 'सॅम, तुझा एखादा लेख येउदे रे' असे मेसेज  यायला सुरुवात होते आणि मग नकळत तो लेख मनात तयार होतो. नाही म्हटलं तरी प्रश्न पडतोच की आता काय नवीन सांगायचं तुम्हाला..जागा तीच..महिना तोच.. पदार्थ तेच ...पन्नास टक्के स्टॉधारकाही तेच ..आयोजकही तेच आणि दर्दी खवय्येसुद्धा तेच...  सांगा वेगळं लिहू तर काय लिहू. पण तरीही अनेक गोष्टी आहेत ज्या वेगळ्या असतात - ज्यातून या फेस्ट चे महत्वसुद्धा वाढते आणि ओढसुद्धा.

आम्हा स्वयंसेवकांचं म्हटलं - म्हणजे सीएफएफ व्हॉलेंटीअर्सचं - तर तारीख जाहीर झाल्यापासून दर दिवसाचे प्लॅन ठरतात. कपडे, रंग आणि थीम सगळं ठरवायचं - आणि कितीही आधी ठरलं तरी ऋग्वेद कारखानीस कडून ते  टी शर्ट्स येणार उदघाटनाच्या  दिवशीच ..यात वर्षानुवर्षे काही बदल नाही. पण आलेले टी शर्ट्स कधी एकदा अंगावर चढवतोय आणि त्या व्हॉलेंटीअर आर्मी मध्ये कधी उभे राहतोय हे प्रत्येकाला वाटतं ..त्यासाठीच तर वर्षभर वाट पाहिलेली असते. मग दर वर्षी नवीन व्हॉलेंटीअर्स जॉईन होत असतात - त्यांचे इंटरव्यू, थोडीशी थट्टा, जमल्यास दोस्ती खात्यातले रॅगिंग असे  मैत्र-संस्कार करून त्याला बऱ्यापैकी माणसात आणलं जातं आणि तासादोन तासातच तो पण आता अजून नवीन कोणी येतंय का याची वाट बघतो. आपल्या नोकऱ्या, धंदे, प्रसंगी अभ्यास सोडून ही मंडळी फेस्टला जणू वाहून घेतल्यासारखीच. काहींच्या आईवडिलांचे स्टॉलही असतात पण त्यांना मदत करायचे सोडून ही मंडळी ज्ञातिसेवेत रमलेली असतात.  फेस्ट संपल्यावर माझ्या घरातील श्रमपरिहाराच्या कार्यक्रमात मला फेस्ट मध्ये न समजलेल्या अनेक गोष्टी सविस्तर सांगितल्या जातात. कोण कोणाची किती काळजी घेत होतं, कोण कोणास घरी सोडण्यास तयार होतं, कोण नुसतंच काम केल्यासारखं दाखवत लक्ष भलतीकडेच ठेऊन होतं वगैरे वगैरे आणि बरंच काही. का कोणास ठाऊक पण त्या वेळेस माझ्यात आणि त्यांच्यात वयाच जराही अंतर नसतं.
 
नंतर येतात स्टॉल धारक, त्यांच्या सूचना आणि शंका.  काही जुने स्टॉल धारकानी काही वैयक्तिक कारणास्तव , मुलांच्या परीक्षेमुळे, सासूबाईंच्या आजारपणामुळे (हे कारण सांगायला - तिथे घरात कशावरूनतरी वाजलेलं असतं ) भाग न घेतल्याने नवीन स्टॉलधारकांची एंट्री ही पण एक मजेदार बाब असते. दोन अडीच किलो चे भाजाणी चे वडे संपतील ना कि अर्धा किलो वाढवू, भाऊच्या धक्क्यावरून मिस्टरांना पाच किलो कोलंबी आणायला सांगते अशा भाबड्या तयारीने आलेल्या या उत्साही सुगरणी - त्यांना समजवायला - त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायला आम्ही आणि जुने स्टॉल धारक तयारच असतो. त्यात उगीचच कारण नसताना एखादा व्हॉलेंटीअर .''ताई काळजी नका करू -आपला समीर दादा आहे मदतीला'' वगैरे सांगून तिला वडे, खिमा पॅटिस वगैरे तळायला आपल्याकडे हमखास एक सीकेपी माणूस असल्याची खात्री देऊन टाकतो.

तुम्हाला माहित आहे का काही स्त्रिया - म्हणजे मध्यवयीन स्त्रिया रोज, म्हणजे तिन्ही दिवस या फेस्ट ला भेट देतात. म्हणजे या फेस्ट ची आवड, कुतूहल, उत्सुकता, ओढ, आपली माणसं वगैरे सगळं ठीक आहे हो पण रोज , तेही मुलुंड, डोंबिवली,  ठाण्याच्या घोडबंदर रोडच्या टोकावरून वरून ?  मलाही गंमत वाटायची. मग नंतर हळूहळू कळायला लागलं. एखादी स्त्री , साधारण माझ्याच वयाची, मला विचाराते  'काय रे ती तुझ्याबरोबर स्टेजवर होती ती कर्णिकांची मुलगी ना ? छान निवेदन करते हं माईकवर !' तेव्हा मला समजतं की या बाईंचा मुलगा लग्नाचा आहे - त्याच्यासाठीच  हे सगळं. मग त्यातून निघणारी अनेक नाती - ते नाहीका आपल्या सीकेप्यांमध्ये ते टिपिकल 'जावेच्या मावसबहीणीची मुलगी', ' नणंदेच्या दिराचा मुलगा; अशा कायम चर्चा. खरंच  सांगतो आपल्यात सरळ ओळख सांगण्याची सोयच नाही - नाहुरच्या प्रधानांची मुलगी इतकंच सांगितलं तरी कळतं, पण नाही... ते नाहूर चे प्रधान - चरईतल्या दीक्षितांचे मेव्हणे, आपल्या कसे नात्यात आहेत ते सांगून त्यांच्या घरातलं एक न जमणारे  लग्न कस मीच जमवून दिल हे सांगण्याचा उत्साह आपल्यातल्या काहींमध्ये पुरेपूर आणि ठासून भरलेला. (ही आडनावं प्रातिनिधिक आहेत, नाहीतर तुम्ही पण प्रधानांना शोधत बसाल नाहुरच्या प्रधानांना) पण याबरोबरच  सीकेपी फूड फेस्ट मध्ये सीकेपी तरुण तरुणींच्या मैत्रीचे रूपांतर नात्यात होते हे देखील पाहायला मिळतंय. समाजातल्या समंजस मुली समाजतल्या समजदार मुलांबरोबर संसाराची स्वप्न पाहू लागल्या तर सीकेपी फेस्ट चे यश अजून ते काय. 

२०१४ ला ज्यांनी पहिल्या फेस्ट ला भेट दिली त्यांना एक गोष्ट नक्कीच पटेल. त्यावेळी अनेक मंडळीं एकमेकांना पहिल्यांदा भेटली - ओळखू लागली - फेसबुकच्या सीकेपी खवय्ये, सीकेपी फूड. सीकेपी यंग वर्ल्ड, आम्ही कायस्थ प्रभू या अनेक ग्रुपवरील व्हर्चुअल मैत्रीचे परिवर्तन खऱ्या मैत्रीच्या दृढ नात्यात झालं होतं - अनेक हरवलेले नातेवाईक नव्याने मिळाले होते.   २०१४ पूर्वीचा तरुणांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आजचा दृष्टिकोन यात जमीनअस्मानाचा फरक आहे. आज हजारो तरुण एकमेकांच्या संपर्कात आहेत - एकमेकांसाठी कधीही उभे राहतात - समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड करतात. सीकेपी फूड फेस्ट ने अनेकांना उद्योगाची उमेद  दिली - यशस्वी होण्याची स्वप्नं दिली यात समाधान आहेच परंतु याच सीकेपीफूड फेस्ट ने समस्त सीकेपी ज्ञातीला एका दिशेने जाण्याची, एकसंघ राहण्याची आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची संधी दिली हेसुद्धा स्वीकारायलाच लागेल. आता सीकेपी फूड फेस्ट हा फक्त खाद्यसोहळा न राहता जणू सीकेपी संस्कृती आणि परंपरा जपणारा सीकेप्यांचा आधुनिक सण असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आजपर्यंत झालेल्या सर्व सीकेपी फूड फेस्ट ला दिलेल्या उदंड प्रतिसाद, प्रेम आणि सदिच्छांसाठी आपले मनस्वी आभार आणि येत्या म्हणजेच ११, १२, १३ जानेवारी रोजी ठाणे येथील सीकेपी हॉल मध्ये  आणि २५,२६,२७ जानेवारी रोजी पुणे येथील मजेत लॉन्स वरच्या सीकेपी फूडफेस्टला येण्याचे माझे हे आग्रहाचे निमंत्रण .... आपल्याच नेहेमीच्या सीकेपी ठसक्यात ....नक्की या !

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट

Thursday, 27 December 2018

मुद्रणकला - पारंपरिक व आधुनिक

जे मी लिहितोय आणि जे तुम्ही वाचताय ते केवळ दोन गोष्टीमुळे शक्य झालय. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे मुद्रण. मुद्रण हा शब्द नव्या पिढीला फारसा जवळचा किंवा वापरातला नसला तरी आताच्या या घडीला या मुद्रणाशिवाय त्यांचं पानही हालत नसावं... अगदी पेपरलेसच्या जमान्यात सुद्धा. आज तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या पण कदाचित तुम्हाला फारसं परिचित नसलेल्या या मुद्र्णक्षेत्रविषयी म्हणजेच प्रिंटिंग (आता कसं ओळखीचं वाटलं ना  ) या विषयाची थोडी ओळख करून देतो. बालपणी जेव्हा पहिल्यांदा पुस्तक हातात आलं तिथूनच तुमचं आणि प्रिंटिंग च नातं जुळलंय. तुम्हाला शिकवायला, तुम्हाला प्रगत व्हायला आणि नंतर तुम्हाला प्रशस्तिपत्रकाद्वारे शाबासकी द्यायला सुद्धा प्रिंटिंगच लागतं. 

जोहान्स गुटेनबर्ग या जर्मनीमधल्या लोहाराने (हा सोनार होता असेही बोलले जाते)  या आधुनिक प्रिंटिंगचा शोध लावलाय हे सांगूनही खरं वाटणार नाही. तत्पूर्वी चीन मध्ये लाकडाचे ठसे बनवून छपाई चालत असे. परंतु शिसे वापरून बनवलेले टाईप, ज्याला फार पूर्वी मुद्रणातील खिळे ही म्हटले जायचे ते बनवून प्रथम बायबल छापण्याचे काम करून आधुनिक मुद्रणाचा जनक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला तो जोहान्स गुटेनबर्ग. साधारण १०० ते १५० वर्षे याच तंत्राने छपाई केल्यानंतर, जगभरातून येत असलेल्या वाढत्या मागणीला अनुसरून पुढे यातलेच लिथो ऑफसेट सुरु झाले. लिथोप्रेस म्हणजे अक्षरशः एका मोठ्या लादीवर प्रकाशाच्या व रसायनांच्या साहाय्याने उमटवलेल्या भल्यामोठ्या ठश्यातून निर्माण होणारी छपाई. त्यानंतर च्या काळात तलम कापड ताणून बसवलेल्या लाकडी चौकटीच्या साहाय्याने करता येणारी स्क्रीन प्रिंटिंग हे अनेकांना उपयोगी सिद्ध होऊ लागले. आजकाल वेगवेगळे मेसेज लिहिलेले टी शर्ट्स जे आपण पाहतो ते या स्क्रीन प्रिंटिंगमुळेच.  त्यानंतर  एका दिवसात लाखो कागद छापून तयार करणाऱ्या ऑफसेट मशीनचा अविष्कार झाला. मोठमोठाली पुस्तके, कादंबऱ्या काही दिवसात तयार होऊ लागली ती केवळ या तंत्रज्ञानामुळेच. वर्तमान पत्र छापणाऱ्या भल्या मोठ्या रोटरी मशिन्सही ठिकठिकाणी आपले रूप बदलत होत्या. एका बाजूने कागदाचा रोल लावल्यावर दुसऱ्या बाजूने संपूर्णपाने छापून ५०/६० पानांचा अगदी सुरेख घडी घातलेलं वर्तमानपत्र मिनिटाला हजार या वेगाने बाहेर येणारे तंत्रज्ञान आज जुने झाले आहे. आज डिजिटल प्रिंटिंग चा जमाना आहे. संगणक तर घरोघरी आले आहेत. तुमच्या संगणकावरून केली जाणारी कामे, डिझाईन तात्काळ छापायची असलेया आज आपल्याला प्रिंटरकडे म्हणजेच मुद्रकाकडेसुद्ध जायला नको. एक क्लिकवर सुंदर रंगीबेरंगी छपाई ची सोय आता आपल्या  घरातच उपलब्ध झाली आहे. आज बाहेर पडताच दिसणारे शेकडो जाहिरात फलक सुद्धा काही मिनिटातच फ्लेक्स मशीनद्वारे तयार होतात.  तुमचे स्वतःचे चित्र तुमच्या टी शर्ट वर छापण्यासाठी एका कागदावरून तुमच्या टी शर्टवर घेता येते याला सबलीमेशन प्रिंटिंग तंत्रज्ञान असे नाव आहे. भविष्यातच कशाला तर आज अनेक देशात थ्री डी प्रिंटिंग म्हणजेच दिलेल्या डिझाइननुसार वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या प्रकारात कोणताही साचा न वापरता अनेक वस्तू बनवता येतात  नव्हे छापता येतील अशीही सोय आहे ..अगदी तुमच्या पायातले बूट सुद्धा. देशाच्या चलनी नोटा, स्टॅम्प पेपर आणि इतर शासकीय मुद्रण सामुग्री छापण्यासाठी आपल्या देशाची सिक्युरिटी प्रेस आहे. वेगळ्या कागदावर खास तयार केलेल्या शाईने या सर्व गोष्टी छापल्या जातात. सध्याच एक नवीन ट्रेंड आपण पहिला असेलच ... वाढदिवसाच्या केक वरती एखादे छान चित्र किंवा ज्याचा वाढदिवस असतो त्याचेच चित्र असते. म्हणजे खाण्यायोग्य शाईने ही छपाईदेखील आता शक्य झाली आहे. 


 वेळ  बदलली, गरज बदलल्या. कागदच नव्हेतर इतर अनेक माध्यमांवर उतरलेल्या मुद्रणाच्या अनेक कलाविष्कारामधें आपल्या ओळखीच्या हजारो वस्तू मिळू लागल्या.  प्रथमतः फक्त शैक्षणिक आणि माहिती पुरवणे या उपयोगासाठी प्रचलित असलेले प्रिंटिंग आज आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनले आहे.
तुमच्या घराला लावलेला जो आकर्षक वॉलपेपर असतो तो तर या मुद्रणातूनच निर्माण झालेला आहे.  तुमचा संगणक, त्याचा की बोर्ड,   तुमचा टीवी, तुमचे घड्याळ तुमचा मोबाईल सुद्धा प्रिंटिंगमुळेच तयार होतो हे सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही. प्रिय व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्यांवर, तुमच्या दातांवर, तुमच्या नखांवर तुमच्या शरीरावरसुद्धा छपाई होऊ शकते. दागिन्यासारखे मिरवत येईल अशा डोळ्यावर लावण्याच्या छापील सोनेरी लेन्सेस काही दिवसांपूर्वीच पहिल्या. 

अन्न, हवा व पाणी याबरोबरच आजच्या युगातील जीवन  जगण्यासाठी छपाईची गरज आहे हे म्हणणे सुद्धा गैर ठरणार नाही. मुद्रण हे शास्त्र आहे आणि कलासुद्धा. अनेकदा याचा उपयोग द्वेष पसरवणारे संदेश पाठविण्यासाठी केला जातो. परंतु हीच कला, हेच शास्त्र आनंददायी आणि विधायक कार्यासाठी वापरले तर जगाच्या प्रगतीचा वेग अजूनही वाढेल यात शंका नाही.

समीर गुप्ते
कीर्ती प्रिण्टलिंक्स - ठाणे
अध्यक्ष - इम्पॅक्ट प्रिंटर्स असोसिएशन, ठाणे


( DNS Bank  डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या २०१९ च्या कॅलेंडर्स वरील माहितीपर लेखांमध्ये प्रकाशित झालेला आधुनिक प्रिंटिंग या विषयावर मी लिहिलेला हा लेख)


Wednesday, 26 December 2018

से नो टू ड्रग्स - बाईक रॅली By Wake Up Thane Foundation


वेक अप ठाणे फाउंडेशन तर्फे ठाणेकरांना खडखडून जाग आणणारी से नो टू ड्रग्स बाईक रविवार दिनांक २३ डिसेम्बर २०१८ रोजी ठाणे येथे पार पडली. ठाण्याच्या घोडबंदर रोड वरील कासारवडवली येथील ट्रॉपिकल लगून येथून सकाळी १० वाजत सुरु झालेली ही बाईक रॅली हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, मानपाडा, टिकुजिनी वाडी जवळील कोठारी कंपाउंड, ग्लाडीस अल्वारीस रोड वरून काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, लोक उपवन, वसंत विहार, देवदया नगर, शात्री नगर, वर्तक नगर, समता नगर - सिंघानिया स्कुल, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, ठाणे महानगर पालिका, अल्मेडा रोड, चरई नाका, गजानन महाराज चौक, राममारुती रॊड, गडकरी रंगायतन, जांभळी नाका, टेम्बी नाका, कोर्ट नाका या मुख्य रस्त्यांवर फिरून ठीक १२ वाजता सीकेपी हॉल ठाणे येथे संपन्न झाली. ठाण्यातील व बाहेरून आलेल्या सुमारे ३५० बायकर्स व त्याचे बरोबर असलेल्या तितक्याच नागरिकांनी या रॅलीत सुरुवातीपासूनच सहभाग घेतला. जशी जशी रॅली पुढे जात होती तसे तसे अधिकाधिक बायकर्स दुचाकीधारक या रॅलीत सहभागी होत होते.

या रॅलीची का गरज पडली असा प्रश मला जेव्हा काही मंडळींनी विचारला तेव्हा 'ठाणेकरांचे डोळे उघडण्यासाठी' असे उत्तर सारखे मनात येत होते. आज ठाण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात तरुणांना आणि भावी पिढीला चुकीच्या दिशेला नेणारी अनेक व्यसन देखील फोफावत आहेत. ठाण्याच्या उच्चभ्रू वस्तीत तर ड्रग्स सारख्या नशेच्या आहारी जाणारी युवापिढी कधी कधी तर जस्ट फन या नावाखाली या नशेच्या आहारी जातात आणि सुरु होते त्या कुटुंबाची वाताहात.नुसती नशा नाही तर त्या नशेसाठी घरातून सुरु होणाऱ्या छोट्या चोऱ्या आणि हळूहळू त्या नशेच्या अमलाखाली स्वभावात भिनणारी गुन्हेगारी या मुलांना एका विध्वंसक मार्गावर नेऊन ठेवते. अशा वेळेला आपण पोलीस आणि प्रशासनावर टीका करून मोकळे होतो. कुठेतरी आपली चूक असते, दुर्लक्ष असते, आपल्या मुलांबरोबर घडणार संवाद हा अपुरा असतो म्हणूनच इथे आपल्यातच जागरूकता निर्माण करणे गरजेचे होते. ही रॅली पोलीस आणि गुन्हेगार याच्याविरुद्ध नसून आपल्या स्वतःच्या जागृकतेविषयीची होती - सम्जम्हणून आपण या क्षाराचे काही देणे लागतो ही जाणीव निर्माण करणारी  होती.

आणि अशा एखाद्या हाकेला प्रतिसाद देणारी शेकडो माणसे पहिली की आपण योग्य विषयाला हात घातला आहे याचे समाधान होते. ही रॅली संपूर्णपणे वेक अप ठाणे फाउंडेशनच्या माध्यमातूनच आयोजित केली होती आणि कोणत्याही राजकीय सहभाग आणि हस्तक्षेपही नव्हता. असे असूनसुद्धा आपली राजकीय पदे बाजूला ठेऊन नगरसेवक मित्र सुहास देसाई, नगरसेविका परीषा सरनाईक,नगरसेविका सौ. आमरे, शिवसेना युवा नेते श्री केदार दिघे सहभागी झाले. याबरोबरच शौर्य फाउंडेशन, हालाई लोहाणा फाउंडेशन ट्रस्ट, इम्पॅक्ट प्रिंटर्स असोसिएशन, सीकेपी चेम्बर ऑफ कॉमर्स,  अभिनय कट्टाचे सर्वेसर्वा श्री किरण नाकती, ठाणे एन्फिल्ड क्लब आणि ऑल इंडिया विंटेज ग्रुप चे अनेक सदस्य बायकर्स, प्रिय मित्र श्री अमोल मथुरे, अम्बर जोशी, श्रीलाल माधवन, निलेश धवन यांच्यासारखे शेकडो मित्र या रॅलीत सहभागी झाले. श्री कमलेश सतीश प्रधान यांच्या ज्ञानसाधना महाविद्यालयातून जवळपास ३० मोटारसायकलस्वार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन या उपक्रमास साथ दिली. जितो या सेवाभावी संस्थेचे पियुष शहा आणि त्यांच्या सहकार्यांनी सुद्धा शेवटपर्यत साथ देत रॅलीचे व्यवस्थापनास मदत केली.  अनेक तरुणी सुद्धा मोठ्या हिरहिरीने त्यांच्या स्कुटी घेऊन या रॅलीत सहभागी झालेल्या पहिल्या. या रॅलीसाठी पोलीस प्रशासनाने संपूर्ण सहकार्य दिले. ट्रॅफिक उपायुक्त श्री अमित काळे साहेबांपासून सुरूझालेले सहकार्य ठाणे शहराच्या प्रत्येक पोलीस स्टेशनकडून मिळाले.  यात माझे मित्र व पोलीस अधिकारी श्री स्वप्नील प्रधान यांचा उल्लेख करणे गरजेचे आहे कारण नुसतीच परवानगी साठी मदत नाही तर प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होऊन या विषयावर त्यांचा अनुभव कथन करून त्यांनी उपस्थितांचे मने जिंकली.
रॅली समाप्तीनंतर एक मोठ्या फलकावर सर्व बायकर्स नी आपली स्वाक्षरी करून *से नो टू ड्रग्स* या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली.

वेक अप ठाणे फाउंडेशन तर्फे या रॅलीच्या आयोजनात फाउंडेशन च्या अनेक सदस्यांनी आणि मित्रांनी मोलाची मदत केली. यात चेतन चिटणीस,केतन ठक्कर, अमोघ मथुरे, दिलीप सत्रा, बिसलेरी चे विभागीय विक्री व्यवस्थापक राहुल लिखिते,  मुबीन खान, कौशिक प्रधान, सलील होशिंग, निलेश गुप्ते, विनीत ठक्कर, रेडिओ सिटी चे अभिजित मोकाशी, सुबोध वैद्य, शशांक गडकरी, अस्मिता वढावकर, योगिनी चौबळ, विनय चौबळ, स्नेहा भोपटकर आणि महेंद्र वाघमारे या सर्वांचा मोलाचा वाटा होता. वेक अप ठाणे फाउंडेशन तर्फे एका संवेदनशील विषयावर आयोजित या रॅलीला आणि या फाउंडेशनच्या पहिल्याच उपक्रमाला मिळालेला भव्य प्रतिसाद बघून ठाणेकर नक्कीच जागरूक होतील अशी आशा आहे. भविष्यात नागरिकांचा सहभाग असलेले आणि शहराच्या प्रश्नांवर तोडगा शोधणारे अनेक कार्यक्रम करताना ठाण्यातील सुजाण नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे नम्र आवाहन देखील आम्ही करत आहोत. अधिक माहितीसाठी वेक अप ठाणे फेसबुक ग्रुप वर जॉईन व्हा आणि आमचे पेज https://www.facebook.com/Wake-Up-Thane-485941875226291/?modal=admin_todo_tour नक्कीच लाईक करा.

Thursday, 6 December 2018

सीकेपी बँक बचाव - गरज सीकेपी समाजाने मैदानात उतरण्याची.



गेली ४ वर्षे सीकेपी बँक पुन्हा सुरु करण्यासाठी बँकेचे संचालक श्री राजेंद्र फणसे यांची लढत आपणापैकी अनेकांच्या कानावर आली असेलच. जुन्या संचालक मंडळातील काही भ्रष्ट सदस्यांनी या बँकेला अक्षरशः ओरबाडलंय. त्यांचे पराक्रम पाहिलेत तर 'बँकेला लुटण्याचे शास्त्र' त्यांना किती अवगत आहे याची आपल्याला कल्पना येते. परतफेडीची सुतराम शक्यता नसलेल्या लोकांच्या नावे दिलेली भरमसाठ थकलेली कर्ज  आणि त्यांचे तितकेच फसवे जामीनदार यांच्या सुरस कथा फणसे यांच्या तोंडूनच ऐकाव्यात. अतिशय निगरगट्ट आणि राजकीय लागेबांधे असलेले ही मंडळी अनेक नोटिसा बजावूनसुद्धा जेव्हा दाद देईनात तेव्हा पोलिसांत तक्रार करून त्यांना वठणीवर आणण्याखेरीज काही पर्याय नाही हे फणसे यांनी जाणले आणि अक्षरशः भल्याभल्यानां वठणीवर आणले.

तसं पाहता राजेंद्र फणसे यांचे सीकेपी बँकेत कोणतेही फिक्स डिपॉजिट नाही किंवा त्यांनी कोणतेही कर्जदेखील घेतले नाही. परंतु जेव्हा आयुष्याची सर्व पुंजी बँकेत ठेवून आज अक्षरशः रडकुंडीला आलेल्या  हजारो हतबल जेष्ठ नागरिकांना बँकेचे दार ठोठावताना पहिले तेव्हा मात्र न राहवून फणसे यांनी या लढ्यात उडी घेतली. जवळपास २०० कोटींच्यावर असलेली थकीत कर्जे वसूल करण्यासाठी त्यांनी, सद्य संचालक मंडळाने आणि कर्मचारी वर्गाने जीवाचे रान केले आणि जी कधीच बंद होणार होती त्या बँकेला रिजर्व बँकेकडून आजवर जीवदान मिळवत आणले. सीकेपी बँक आजही सुरूआहे ती केवळ फणसे आणि त्यांच्या धडाडीच्या सहकाऱ्यांच्या  प्रयत्नांमुळेच. सीकेपी बँक डिपॉजिटर्स फोरम सुरु करून त्यांनी हजारो ठेवीदारांच्या मनात एक आशा पल्लवित केली आहे आहे ते सर्व ठेवीदार विशेष करून जेष्ठ नागरिक त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने लक्ष ठेऊन आहेत.

सीकेपी बँक बंद होणे म्हणजे नुसतीच एखादी वित्तसंस्था बंद होणे नाही तर आपल्या सीकेपी समाजाच्या नावाला कायमचा कलंक लागेल हे मनात ठेऊन राजेंद्र फणसे यांनी आता सीकेपी समाजाकडे मदतीची साद घातली आहे. आज सीकेपी बँकेच्या संचालक मंडळात श्री राजेंद्र फणसे हे एकमात्र सीकेपी  संचालक आहेत आणि त्यांच्या मदतीला चार्टर्ड अकाउंटंट श्री सागर जयवंत हे तज्न्य  संचालक म्हणून कारभार पाहत आहेत. आज बँकेला वाचवण्यासाठी प्रत्येक  सीकेपी समाजबांधवाने  शेअर्स घेऊन या लढ्यात सहभागी होणे ही केवळ गरजच नाही तर प्रत्येक सीकेपी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कदाचित आपल्याला डिव्हिडंड मिळण्यास काही अवधी जरूर लागेल परंतु यानिमित्ताने सीकेपी समाजाचा जास्तीत जास्त सहभाग हा भविष्यात या बँकेला तारक ठरेल आणि सीकेपी या नावाची प्रतिष्ठा उंचावण्यास मदतच करेल.

रुपये एक हजार किंवा त्या पटीत शेअर्स घेऊन आपण आपला सहभाग आणि अर्थातच भविष्यात मतदानाचा हक्क प्राप्त करू शकता. चला एकत्र येऊन आपल्या बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ... सीकेपी म्हणजे निष्ठा - सीकेपी म्हणजे विश्वास हे पुन्हा एकदा सिद्ध करू.

समीर जयंत गुप्ते
विश्वस्त - सिकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट, ठाणे.
अध्यक्ष - सीकेपी चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ठाणे - मुंबई -पुणे
अध्यक्ष - सीकेपी बिजनेस डेव्हलपमेंट फोरम, ठाणे.
अध्यक्ष - इम्पॅक्ट प्रिंटर्स असोसिएशन ठाणे
उपाध्यक्ष - सौ. मंगला कर्णिक एज्युकेशन सोसायटी, पुणे.
संस्थापक - द सीकेपी फूड फेस्ट.
संस्थापक - द स्पेशल वुमन एक्स्पो.
संस्थापक - वेकअप ठाणे फाउंडेशन
फोन - ९८२०४९२९०५
ई-मेल - sameer6949@gmail.com
कार्यालय -
रामकृष्ण अपार्टमेंट्स,
सीकेपी हॉल समोर,
खारकर आळी, ठाणे (प) ४००६०१.

Sunday, 28 October 2018

कानवले पुराण !


सीकेपी सुगरणीच्या पाककौशल्याचे आणि खाद्यसंस्कृतीचे वर्णन एकही शब्द न उच्चारता करण्यासाठी जो एकच पदार्थ पुरेसा आहे तो म्हणजे कानवला. तो नाजूकपणा, तो आकार, ती रंगसंगती, ती लयबद्ध मांडणी आणि ज्या साठीच दिवाळी याविषयी जास्त प्रेम वाटते तो मोहक पदार्थ म्हणजेच आपले कानवले - सीकेप्यांचे खाजाचे कानवले.
चकली, चिवडा, बेसन लाडू, रवा लाडू, अनारसे, शंकरपाळे, शेव, कडबोळ्या अशा एकसोएक पदार्थांनी नटलेल्या तरीही रंगाच्या उधळणीची कमी असल्यासारखे वाटणाऱ्या फराळाच्या ताटाचे रूप एका क्षणात पालटण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती सीकेप्यांच्या कानवल्यात. मी आत्ताच 'फराळाचे ताट' म्हणून जो उल्लेख केला ती प्रथा काहींनी जपली असली तरी आता जवळपास संपली. पण अगदी काही वर्षांपूर्वी आमच्या वाडा - आळी संस्कृतीमध्ये दिवाळीत आजूबाजूच्या घरातून फराळाचे ताट आपल्या घरात यायचे आणि आपलेही त्यांच्याकडे जायचे. आलेल्या ताटाकडे ( कधी मिळेल ते ) बघण्याची एक पद्धत असायची. म्हणजे एकतर ज्यानी ते ताट आपल्या घरात आणले ती जाईपर्यन्त त्या ताटावरचे गोलाकार विणकाम केलेले कापड न काढण्याची आणि टक लावून त्या ताटाकडे न बघण्याची ताकीद आधीच दिलेली असायची. 'उगीच हावरटासारखा बघू आणि वागू नकोस हे वाक्य' साधारणपणे आईच्या डोळ्यातूनच ऐकायला यायचे. त्यामुळे ताट घेऊन आलेल्या त्या काकीशी - मावशीशी आपली आई उगीच काहीतरी बोलत बसून आपला फराळाचा वेळ फुकट घालवू नये असे मनोमन वाटायचे - पण शेजारणीच त्या, बोलतच बसायच्या. आमची चकली कशी नरम पडत होती, वाण्याकडून आणलेले पोहे कसे आकसले, रेशनची साखर किती बारीक, वाण्याची साखर किती महाग, तुझ्याकडे रांगोळीचं पुस्तक आणि ठिपक्यांचा कागद आहे का? झाला का साहेबांचा बोनस - मग पाडव्याला पटोला कि कांजीवरम इतक्या नको नको त्या गप्पा करत बसायच्या. मधेच उगीचच माझ्याकडे बघून 'फटाके आणलेस का रे ?' असं बोलायच्या. 'अग बाई, मला जे हवंय ते तू घेऊन आली आहेस ना - मग ठेव ते आणि निघ' हे तोंडावर आलेलं वाक्य हजारदा गिळलंय मी. खरं सांगतो, कधी कधी तर त्या बायकांबरोबर येणारं त्यांचं लहान मूल तर हातात चकली घेऊनच खात खातच यायचं.. पण शिस्तीचे नियम मात्र आपल्यालाच लागू. मात्र एकदा का ती काकी घरातुन गेली रे गेली कि त्या ताटातल्या ठराविक जिनसांचा फडशा पडला म्हणून समजा. त्यात अग्रक्रमाने कानवले, मागोमाग अनारसा, मग एखादी चकली वगैरे वगैरे. कानवले करणाऱ्या, म्हणजे कानवले सुबकतेने करणाऱ्या बायकांचा खूप बोलबाला असायचा, आजही आहे. तेव्हा वाड्याच्या ओसरीवर - ओटीवर बसलेल्या गप्पांमध्ये असायचा आता फेसबुकच्या ग्रुपवरती असतो इतकाच काय तो फरक. माझी मुलुंडची सुमन काकी जे काही कानवले बनवायची त्याला आजही तोड नाही. आमच्याकडे माझी आई नोकरी करत असल्यामुळे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी फराळ बनवण्याचा धडाका असायचा पण कानवले बनलेले मात्र फारसे आठवत नाहीत .. कदाचित न मिळालेल्या पदार्थाचं जास्त कौतुक असतं तसं काहीतरी माझ असावं. आज जसा दिवाळीचा फराळ सर्रासपणे विकत मिळतो ती सोय तेव्हा नव्हती, कदाचीत असल्यास आमच्या पर्यंत पोचणारी किंवा झेपणारीही नव्हती. दिवाळीत फराळाची देवाण घेवाण करताना आलेल्या काही पाकिटात चिवड्याबरोबर कानवला ठेवलेला दिसला कि मात्र राग यायचा.. एकतर त्याचे सगळे पापुद्रे तुटून सगळे सौन्दर्य गेलेला नुसता पंधरा कपडा गुंडाळल्यासारखा तो केविलवाणा कानवला चिवड्यात दडलेला दिसायचा त्यामळे त्याची मजा नाही आणि कानवल्याचा चुरा होऊन तो चिवड्यात मिसळलेला म्हणून त्या तिखट चिवड्याचीही वाट लागलेली असायची. कोण खाणार ते.
पण एकूणच कानवले बनवणे ही एक अनन्यसाधारण कला आहे आणि ती अगदी काहींनाच आत्मसात आहे. नेहेमीचे कानवले, चटईचे कानवले अशा वेगवेगळ्या प्रकारात मोडणाऱ्या त्या कानोल्याचा प्रवास छानशा तयारीने सुरु होतो, त्यातल्या एक एक पदार्थाची खरेदी आणि तयारी इतकी मनापासून होते की काय सांगा. 'या रविवारी आमच्या कडे कानवले' हे वाक्य दिवाळीसणाच्या तयारीची नांदी देणारं असतं. परवा एका कार्यक्रमात, म्हणजे कानवल्याचे प्रात्यक्षिक सुरु होते त्या कार्यक्रमात मी तिथे उपस्थित महिलांशी संवाद साधला तेव्हा त्यांना पाककृती आणि पाककला यांच्यातला फरक सांगितला. सर्व पदार्थ त्या त्या प्रमाणात घेऊन, ठरलेल्या पद्धतीने शिजवून, त्यानंतर त्यावर इतर सोपस्कार करत ठरल्या वेळेत बनवून सादर करणे म्हणजे 'पाककृती'. आणि ही 'पाककृती' करताना तो पदार्थ बनवणार म्हणून मनात निर्माण झालेला आनंद, नंतर त्या पदार्थांची हाताळणी, ती नजाकत, ती शैली, ते लालित्य, तो कमालीचा आत्मविश्वास, तो चेहेऱ्यावरचा प्रसन्न भाव आणि शेवटी त्याची सुंदर व मोहक मांडणी याला म्हणतात 'पाककला'. कानवले बनताना या पाककृतीचा आणि पाककलेचा कस लागतो आणि मग समोर येतो तो तुमच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवणारा खाजाचा -पिठीचा कानवला. बऱ्याचदा एखाद्या खाद्य पदार्थाने एखादा समाज ओळखला जातो. पण सीकेपी घरातल्या अनेक पदार्थानी आणि संपन्न खाद्यसंस्कृतीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यातच गप्पा गप्पांमध्ये कधीतरी कोणा रसिक खव्य्यांकडून 'अरे तुमचे सीकेप्यांचे कानवले फार सुंदर रे' असे शब्द कानावर आले का आपणसुद्धा आनंदाने मनोमन अगदी खुलून जातो - फुलून जातो ... त्या नाजूक रंगीत कानावल्यांच्याच पापुद्रयांसारखे.
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
फोटो सौजन्य - मरूधन स्टोर्स