श्रावण ... नाही रे बाबांनो, प्रत्येकवेळी श्रावण पाळा - पळू नका वगैरे नाही सांगत मी. जे जमेल ते करा. पण श्रावण सुरु झाल्यावर मराठमोळ्या सणासुदीची जी सुरुवात होते त्याबद्दल हे थोडंसं. काल इगतपूरीहून परतताना नाशिक च्या रस्यावर त्या बायका बसतात ना ताजी भाजी, करटुली आणि काकड्या विकत, त्यातल्या एकीकडे मी मोठ्या काकड्या नाहीत का असं विचारलं. 'आता कुठे दादा, येळ हाय अजून - त्या स्रावनात नायतर गंपतीला मिलनार' या उत्तराने खरंतर तिथेच माझ्या मनातला श्रावण सुरु झाला.
दिव्यांची अमावस्या संपून उजाडणारा दुसरा दिवसच श्रावणाचे शेकडो रंग घेऊनच उगवतो. आसपासच्या शेवाळानी हिरव्यागार झालेल्या भिंतींवरच्या तेरड्याला हळूहळू बहर येत असतो. पहिल्या दिवसाचा वार कुठलाही असो आपोआपच सोमवारच्या केळीच्या पानावरच्या जेवणाची ओढ सुरु होते. माहित नाही आता किती जण केळीची पाने आणून जेवतात, पण मला मात्र त्याच फार अप्रूप आहे. मराठी वर्षातला हा पाचवा महिना मला मराठी शाळेतल्या पाचवीपासून समजायला लागला. शाळेतले मुलींचे श्रावणी शुक्रवार आणि मुलांचे श्रावणी शनिवार आता साजरे होतात का याची कल्पना नाही पण मी मात्र त्यातला प्रत्येक दिवस मनमुराद साजरा केलाय. श्रावण म्हणजे आपल्या मराठी सणांची सुरुवात आणि सणवाराचं कौतुक असलेल्या सीकेपी घराघरात साजरा होणारा श्रावणातला एकेक सण म्हणजे खाण्याची चंगळच चंगळ. पहिला शुक्रवार म्हणजे तर आमचा देव्हारा बघण्यासारखा. प्रिंटिंग चे तंत्र कितीही बदललं असलं तरी जिवतीचा फोटो तोच- अगदी तसाच पुठ्यावर चिकटवलेला. तिच्या जवळ मांडलेले आघाड्याच्या पानावर ठेवलेले ते सात खडे. तेच चणेगुळ आणि आरत्यांचं वाण. मग जेवायला ते भरलेलं ताट.
मग येते नागपंचमी. नागपंचमीला आदल्या रात्री काळसर पाटावर चंदन-हळद ओली करून माचीस च्या काड्यांनी काढलेले नाग - नागिणी आणि कुळे. आम्ही त्यांना सापाची मुले म्हणायचो. दुसऱ्या दिवशी हळद, कुंकू, लाह्या, अक्षता,नागवेल, केवडा, पत्री, चणे, दूध आणि फुलांनी सजलेला तोच पाट अजून डोळ्यासमोर आहे. या दिवशी घरात पालेभाजी किंवा फळभाजी चिरणे कापणे हा प्रकार नाही. काही दिवसात येणारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हणजे अक्षरशः धमाल दिवस. हल्लीहल्ली हे रक्षाबंधन वेगळ्या दिवशी यायला लागलंय. पहिले हे दोन्ही एकत्रच असायचे. कळव्या च्या खाडीवरची जत्रा खारकर आळी पर्यंत पसरलेली असायची. रंगीबेरंगी टोप्या - पिपाण्याचे आवाज- लाकडी पाळणे - शेकडो खेळण्याच्या आणि खाण्याच्या दुकानांमुळे परिसर दुमदुमलेला. अंबाड्यावर टिपिकल वेणी घालून सोन्यानं नटलेल्या असंख्य कोळी स्त्रिया, मुलांना खांद्यावर बसवलेले आईबाबा, टवाळक्या करायला आलेली मवाली कार्टी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला कितीतरी पोलीस. इथे घरात झाडून सर्व चुलत -आते - मामे भावंडं आणि देवाला वरण पुरणाचा नैवद्य त्याबरोबर वर्षातून एकदाच मिळणारा नारळी भात. केवळ अविस्मरणीय. मग मधेच पंधरा ऑगस्ट येऊन जायचा. यानंतरचा मोठा सण म्हणजे गोकुळ अष्टमी. आमच्या घरात जरी कृष्णजन्म वगैरे नसला तरी आजूबाजूला असलेल्या सिकेपी घराघरात भरली केळी, घुगऱ्या, वाटाण्याची खिचडी, बोटव्याची खीर असा नैवेद्य असायचा.
गटारी अमावस्येपासून पिठोरी अमावस्येपर्यंतचा हा काळ म्हणजे जणू कायस्थांचा शाकाहारी महोत्सवच. काही आसपास उगवणाऱ्या तर काही बाजारातून आणलेल्या वेगवेगळ्या भाज्या, तऱ्हेतऱ्हेच्या आमट्या आणि गोड पदार्थांची रेलचेल असणारा, मटण - मच्छीची आठवणही येऊ नये इतका हॅपनिंग असा हा श्रावण महिना आता फक्त पाळणार की नाही पाळणार यावरच येऊन थांबलाय. जवळपास चार ते पाच श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार - शनिवार आणि हे इतर मोठे सण असलेला भरगच्च श्रावण महिना येऊ घातलेल्या गणपतीला काय काय करायचं याच्या गप्पांनीही फुलायचा. अवघ्या चराचरालाच नवं रूपडं देणाऱ्या या श्रावणातल्या सणांच्या माझ्या स्मृतींतील या श्रावणसरी अशाच वर्षांनुवर्षे मनात रुंजी घालतच राहतील आणि त्या सुखावणाऱ्या आठवणीनी बहरून जाईल आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक श्रावणातला प्रत्येक दिवस... हिरवागार !
तुम्हा सर्वाना या आनंददायी श्रावणाच्या शुभेच्छा !
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट

अतिशय सुंदर वर्णन लिखाण
ReplyDelete