बडोद्याच्या फाईव्ह स्टार ग्रँड मर्क्युरी सूर्या पॅलेसमध्ये साजरा होतोय सीकेपी खाद्य जल्लोष
सीकेपी पदार्थ आता पंचतारांकित मेनूवर विराजमान 🦀🦐🐟
१४ फेब्रुवारी २०१४ ... मागे वळून पाहताना आज हा दिवस ऐतिहासिक वाटतो. खरतर हा दिवस प्रेम दर्शविण्याचा आणि याच दिवशी ज्याच्यावर माझं तुफान प्रेम आहे असा पहिला सीकेपी फूड फेस्ट संपन्न होत असताना तिथे लोकं येतील कि नाही हा विचार मनाला स्पर्शलाही नव्हता. पण मला या फेस्ट ला ज्या उंचीवर न्यायचं आहे तिथे नेऊ शकेन कि नाही हे त्यानंतर अनेक दिवस अनेक महिने मनात येतंच राहीलं. यानंतर अनेक ठिकाणी अनेक ज्ञातिबांधवानी असेच फेस्ट केले - यशस्वी सुद्धा झाले. तरीही काहीतरी राहिलच होतं. मात्र आज ते पूर्ण झालं - माझ्या आवडत्या खाद्यपदार्थांची - माझ्या समाजातील लाखो माता भगिनींच्या रुचकर हाताची चव सीकेपी घराघरातून लोकांपर्यंत पोचू लागली अगदी काही धडाडीच्या मंडळींनी रेस्टोरेंट्स सुद्धा सुरु केली पण आज खऱ्या अर्थाने आपल्या या सुग्रणींच्या रुचकर वारशाला लोकमान्यता मिळाली .. तुम्हा सर्वांचं अभिनंदन भगिनींनो, मातांनो आणि मैत्रिणींनो सुद्धा ! आज इतिहासात प्रथमच सीकेपी फूड फेस्ट बडोद्याच्या शानदार अशा 'ग्रँड मर्क्युरी वडोदरा सूर्या पॅलेस' या 'पंचतारांकित हॉटेल' मध्ये संपन्न होत आहे ...आणि तोही सलग दहा दिवसांसाठी. जगभरातून बडोद्याला येणाऱ्या हजारो पर्यटकांना हे २६ जुलै ते ४ ऑगस्ट असे सलग दहा दिवस सीकेपी भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. आणि या फेस्टची जबाबदारी आपल्या समर्थ खांद्यावर पेलली आहे माझे मित्र बडोद्याचेच रेस्टोरेंट / केटरिंग व्यावसायिक आपले ज्ञातिबांधव श्री नरेंद्र गडकरी, त्यांच्या अर्धांगिनी सौ. सुहासिनी गडकरी आणि त्यांच्या भगिनी सौ. अरुंधती गाएकवाड यांनी - संपूर्ण घरच इथे उभे असल्याने यश हमखास यात वाद नाही. गेल्या वर्षीच्या पावसाळी भाज्यांच्या सीकेपी महोत्सवात श्री गडकरी यांचा सीकेपी हॉटेल उद्योजक म्हणून सत्कारही केला गेला होता.
आतापर्यंत पंजाबी, साऊथ इंडियन, गुजराती, चायनीज, थाय अशा प्रकारचे फेस्टिवल या पंचतारांकित हॉटेल्स मध्ये होतंच असतात. परंतु गेल्या पाच वर्षातील सीकेपी पदार्थांना मिळणारी प्रसिद्धी, शेकडो वर्षांच्या पाक कौशल्याचा वसा आणि त्या चवीने लाखोंना घातलेली भुरळ यामुळेच आज असे नामांकित पंचतारांकित हॉटेल्स सीकेपी फूड ला पसंती देऊ लागले आहेत. हळू हळू का होईना त्यांच्या मेनूवर सीकेपी पदार्थ दिसू लागले आहेत. हल्ली हल्ली अनेक इंग्रजी नियतकालिके सुद्धा सीकेपी पदार्थांना मुबलक प्रसिद्धी आणि सन्मान देऊ लागले आहे.
कितीही लोकप्रिय असलं तरी एखाद्या पंचतारांकित हॉटेल ने असा सीकेपी फूड फेस्ट आयोजित करणे हे 'खायचं' काम नाही. मला नरेंद्र गडकरी यांचं कौतुक करावस वाटतं की त्यांनी या हॉटेलच्या व्यवस्थापनाला सीकेपी पदार्थांची योग्य ती माहिती पुरवून तंतोतंत तीच चव खवय्यांना देण्याची हमी सुद्धा दिली. आणि इतकच नाही तर रोज वैविध्यपूर्ण मेनू, त्यामध्ये लागणारे कमर्शिअल प्रेझेन्टेशन आणि कुतूहलाने चौकशी करणाऱ्या अनेक खवय्यांना सीकेपी म्हणजे काय हे समजावणे तेही गुजरातेत ..सोप्प नाही हो. सीकेपी घरातल्या कांदा टोमॅटो च्या कोशिंबीरीला, काळ्या वाटाण्याच्या आमटीला आणि बेसन लाडूला सुद्धा आज मानाच्या खुर्चीवर नाही तर सन्मानाच्या पंचतारांकित टेबलावर स्थानापन्न होण्याचं मान मिळाला तो या गडकरी साहेबांच्या प्रयत्नांमुळे आणि सूर्या पॅलेस च्या व्यवस्थापनाने सीकेपी पदार्थांवर दाखवलेल्या विश्वासामुळेच. मसाले भात, भरल्या मिरच्या, भरली केळी, निनावं, पुरणपोळी, भरली वांगी, कोथिंबीर वडी, वांग्याचे काप, मच्छीचं भुजणं,लिप्ती कोलंबी, सुरमईचं कालवण (फिश मसाला नाही) एकाहून एक सीकेपी पदार्थ तेही अस्सल सीकेपी नावांसहित. यातला जवळा पाव ही डिश पाहिलीत तर आपल्याला इतक्या राजेशाही पद्धतीने सादर केलं जाईल हे त्या जवळयांच्या जमातीने स्वप्नातही पाहिलं नसेल. फेस्टिवलला गेल्या दोन दिवसातला मिळणार प्रतिसाद बघून 'अपना दिल खुश हो गया !' .. अगदी तिकडच्या भाषेत बोलायचं तर ''बहुच ऐटले, बहुच सरस ...मजा आवि गयी भाय !"
मित्रांनो .. आज खरंच काहीतरी केल्याचं समाधान आहे. आपल्या या स्वर्गीय चवीच्या सीकेपी खाद्यसंस्कृतीचा झेंडा आंतरराष्ट्रीय क्षितिजावर फडकावा या स्वप्नाची सुरुवात तर झाली. जे अन्न खाऊन मोठा झालो त्या अन्नाला खऱ्या अर्थाने जागलो आणि त्याला त्याचे योग्य स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न सफल झाले हे वाक्य आज मी अधिकाराने म्हणू शकतो. अर्थात यात मोठा वाटा नरेंद्र गडकरी यांच्या बरोबर तुम्हा सर्व सुग्रणींचा आणि चोखंदळ खवय्यांचाच.आज याच हॉटेल मधील एक व्हिडीओ पहिला त्यात नरेंद्र गडकरी यांनी माझा सीकेपी फूड फेस्ट चा संस्थापक म्हणून केलेला उल्लेख खरंच खूप काही देऊन गेला. मनस्वी आभार !
सीकेपी म्हणजे रविवारचा मटण, सीकेपी म्हणजे बोम्बलाच कालवण, सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा रस्सा आणि सीकेपी म्हणजे रुचकर हातांचा चवदार वारसा या ओळी जगमान्यतेकडे जायला आता फार वेळ लागणार नाही. व्यवसायाच्या संधी शोधणाऱ्या सीकेपी गृहिणींना स्वतःकडच्या कौशल्याला व्यावसायिकतेकडे न्यायला बडोद्याच्या पंचतारांकित हॉटेलमधला हा सीकेपी फूड फेस्ट नक्कीच प्रवृत्त करेल. बडोद्यात असाल तर नक्कीच भेट द्या आणि बाहेर असाल तर या निमीत्ताने बडोद्याला जायचा एक प्रयत्न नक्की करा.. कदाचित मी सुद्धा तिथेच असेन माझ्या लाडक्या पदार्थांना पंचतारांकित झालेलं याची डोळा पाहायला.
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट.
Wednesday, 31 July 2019
सीकेपी फूड फेस्ट झाला पंचतारांकित
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment