Wednesday, 31 July 2019

#फ्लॅशबॅक श्रावण

श्रावण ... नाही रे बाबांनो, प्रत्येकवेळी श्रावण पाळा - पळू नका वगैरे नाही सांगत मी. जे जमेल ते करा. पण श्रावण सुरु झाल्यावर मराठमोळ्या सणासुदीची जी सुरुवात होते त्याबद्दल हे थोडंसं. काल इगतपूरीहून परतताना नाशिक च्या रस्यावर त्या बायका बसतात ना ताजी भाजी, करटुली आणि काकड्या विकत, त्यातल्या एकीकडे मी मोठ्या काकड्या नाहीत का असं विचारलं. 'आता कुठे दादा, येळ हाय अजून - त्या स्रावनात नायतर गंपतीला मिलनार'  या उत्तराने खरंतर तिथेच माझ्या मनातला श्रावण सुरु झाला.

दिव्यांची अमावस्या संपून उजाडणारा दुसरा दिवसच श्रावणाचे शेकडो रंग घेऊनच उगवतो. आसपासच्या शेवाळानी हिरव्यागार झालेल्या भिंतींवरच्या तेरड्याला हळूहळू बहर येत असतो.  पहिल्या दिवसाचा वार कुठलाही असो आपोआपच सोमवारच्या केळीच्या पानावरच्या जेवणाची ओढ सुरु होते. माहित नाही आता किती जण केळीची पाने आणून जेवतात, पण मला मात्र त्याच फार अप्रूप आहे. मराठी वर्षातला हा पाचवा महिना मला मराठी शाळेतल्या पाचवीपासून समजायला लागला. शाळेतले मुलींचे श्रावणी शुक्रवार आणि मुलांचे श्रावणी शनिवार आता साजरे होतात का याची कल्पना नाही पण मी मात्र त्यातला प्रत्येक दिवस मनमुराद साजरा केलाय. श्रावण म्हणजे आपल्या मराठी सणांची सुरुवात आणि सणवाराचं कौतुक असलेल्या सीकेपी घराघरात साजरा होणारा श्रावणातला एकेक सण म्हणजे खाण्याची चंगळच चंगळ.  पहिला शुक्रवार म्हणजे तर आमचा देव्हारा बघण्यासारखा. प्रिंटिंग चे तंत्र कितीही बदललं असलं तरी जिवतीचा फोटो तोच- अगदी तसाच पुठ्यावर चिकटवलेला. तिच्या जवळ मांडलेले आघाड्याच्या पानावर ठेवलेले ते सात खडे. तेच चणेगुळ आणि आरत्यांचं वाण. मग जेवायला ते भरलेलं ताट.
मग येते नागपंचमी.  नागपंचमीला आदल्या रात्री काळसर पाटावर चंदन-हळद ओली करून माचीस च्या काड्यांनी काढलेले नाग - नागिणी आणि कुळे. आम्ही त्यांना सापाची मुले म्हणायचो. दुसऱ्या दिवशी हळद, कुंकू, लाह्या, अक्षता,नागवेल,  केवडा, पत्री, चणे, दूध आणि फुलांनी सजलेला तोच पाट अजून डोळ्यासमोर आहे. या दिवशी घरात पालेभाजी किंवा फळभाजी चिरणे कापणे हा प्रकार नाही. काही दिवसात येणारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हणजे अक्षरशः धमाल दिवस.  हल्लीहल्ली हे रक्षाबंधन वेगळ्या दिवशी यायला लागलंय. पहिले हे दोन्ही एकत्रच असायचे. कळव्या च्या खाडीवरची जत्रा खारकर आळी पर्यंत पसरलेली असायची. रंगीबेरंगी टोप्या - पिपाण्याचे आवाज- लाकडी पाळणे - शेकडो खेळण्याच्या आणि खाण्याच्या दुकानांमुळे परिसर दुमदुमलेला. अंबाड्यावर टिपिकल वेणी घालून सोन्यानं नटलेल्या असंख्य कोळी स्त्रिया, मुलांना खांद्यावर बसवलेले आईबाबा, टवाळक्या करायला आलेली मवाली कार्टी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला कितीतरी पोलीस. इथे घरात झाडून सर्व चुलत -आते - मामे भावंडं आणि देवाला वरण पुरणाचा नैवद्य त्याबरोबर वर्षातून  एकदाच मिळणारा नारळी भात. केवळ अविस्मरणीय. मग मधेच पंधरा ऑगस्ट येऊन जायचा. यानंतरचा  मोठा सण म्हणजे गोकुळ अष्टमी. आमच्या घरात जरी कृष्णजन्म वगैरे नसला तरी आजूबाजूला असलेल्या सिकेपी घराघरात भरली केळी, घुगऱ्या, वाटाण्याची खिचडी, बोटव्याची खीर असा नैवेद्य असायचा.
गटारी अमावस्येपासून पिठोरी अमावस्येपर्यंतचा हा काळ म्हणजे जणू कायस्थांचा शाकाहारी महोत्सवच. काही आसपास उगवणाऱ्या तर काही बाजारातून आणलेल्या वेगवेगळ्या भाज्या, तऱ्हेतऱ्हेच्या आमट्या आणि गोड पदार्थांची रेलचेल असणारा,  मटण - मच्छीची आठवणही येऊ नये इतका हॅपनिंग असा हा श्रावण महिना आता फक्त पाळणार की नाही पाळणार यावरच येऊन थांबलाय. जवळपास चार ते पाच श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार - शनिवार आणि हे इतर मोठे सण असलेला भरगच्च श्रावण महिना येऊ घातलेल्या गणपतीला काय काय करायचं याच्या गप्पांनीही फुलायचा. अवघ्या चराचरालाच नवं रूपडं देणाऱ्या या श्रावणातल्या सणांच्या माझ्या स्मृतींतील या श्रावणसरी अशाच वर्षांनुवर्षे मनात रुंजी घालतच राहतील आणि त्या सुखावणाऱ्या आठवणीनी बहरून जाईल आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक श्रावणातला प्रत्येक दिवस... हिरवागार ! 

तुम्हा सर्वाना या आनंददायी श्रावणाच्या शुभेच्छा !
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
 

सीकेपी फूड फेस्ट झाला पंचतारांकित

बडोद्याच्या फाईव्ह स्टार ग्रँड मर्क्युरी सूर्या पॅलेसमध्ये  साजरा होतोय सीकेपी खाद्य जल्लोष
सीकेपी पदार्थ आता पंचतारांकित मेनूवर विराजमान 🦀🦐🐟

१४ फेब्रुवारी २०१४ ...  मागे वळून पाहताना आज हा दिवस ऐतिहासिक वाटतो. खरतर हा दिवस प्रेम दर्शविण्याचा आणि याच दिवशी ज्याच्यावर माझं तुफान प्रेम आहे असा पहिला सीकेपी फूड फेस्ट संपन्न होत असताना तिथे लोकं येतील कि नाही हा विचार मनाला स्पर्शलाही  नव्हता. पण मला या फेस्ट ला ज्या उंचीवर न्यायचं आहे तिथे नेऊ शकेन कि नाही हे  त्यानंतर अनेक दिवस अनेक महिने मनात येतंच राहीलं. यानंतर अनेक ठिकाणी अनेक ज्ञातिबांधवानी असेच फेस्ट केले - यशस्वी सुद्धा झाले. तरीही काहीतरी राहिलच होतं. मात्र आज ते पूर्ण झालं - माझ्या आवडत्या खाद्यपदार्थांची  - माझ्या समाजातील लाखो माता भगिनींच्या रुचकर हाताची चव सीकेपी घराघरातून लोकांपर्यंत पोचू लागली अगदी काही धडाडीच्या मंडळींनी रेस्टोरेंट्स सुद्धा सुरु केली पण आज खऱ्या अर्थाने आपल्या या सुग्रणींच्या रुचकर वारशाला लोकमान्यता मिळाली .. तुम्हा सर्वांचं अभिनंदन भगिनींनो, मातांनो आणि मैत्रिणींनो सुद्धा ! आज इतिहासात प्रथमच सीकेपी फूड फेस्ट बडोद्याच्या शानदार अशा 'ग्रँड मर्क्युरी वडोदरा सूर्या पॅलेस' या 'पंचतारांकित हॉटेल' मध्ये संपन्न होत आहे ...आणि तोही सलग दहा दिवसांसाठी. जगभरातून बडोद्याला येणाऱ्या हजारो पर्यटकांना हे २६ जुलै ते ४ ऑगस्ट असे सलग दहा  दिवस सीकेपी भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. आणि या फेस्टची जबाबदारी आपल्या समर्थ खांद्यावर पेलली आहे माझे मित्र बडोद्याचेच रेस्टोरेंट / केटरिंग व्यावसायिक आपले ज्ञातिबांधव श्री नरेंद्र गडकरी, त्यांच्या अर्धांगिनी सौ. सुहासिनी गडकरी आणि त्यांच्या भगिनी सौ. अरुंधती गाएकवाड यांनी - संपूर्ण घरच इथे उभे असल्याने यश हमखास यात वाद नाही. गेल्या वर्षीच्या पावसाळी भाज्यांच्या सीकेपी महोत्सवात श्री गडकरी यांचा सीकेपी हॉटेल उद्योजक  म्हणून सत्कारही केला गेला होता.

आतापर्यंत पंजाबी,  साऊथ इंडियन, गुजराती, चायनीज, थाय अशा प्रकारचे फेस्टिवल या पंचतारांकित हॉटेल्स मध्ये होतंच असतात. परंतु गेल्या पाच वर्षातील सीकेपी पदार्थांना मिळणारी प्रसिद्धी, शेकडो वर्षांच्या पाक कौशल्याचा वसा आणि त्या चवीने लाखोंना घातलेली भुरळ यामुळेच आज असे नामांकित पंचतारांकित हॉटेल्स सीकेपी फूड ला पसंती देऊ लागले आहेत. हळू हळू का होईना त्यांच्या मेनूवर सीकेपी पदार्थ दिसू लागले आहेत.  हल्ली हल्ली अनेक इंग्रजी नियतकालिके सुद्धा सीकेपी पदार्थांना मुबलक प्रसिद्धी आणि सन्मान देऊ  लागले आहे.

कितीही लोकप्रिय असलं तरी एखाद्या पंचतारांकित हॉटेल ने असा सीकेपी फूड फेस्ट आयोजित करणे हे 'खायचं' काम नाही. मला नरेंद्र गडकरी यांचं कौतुक करावस वाटतं की त्यांनी या हॉटेलच्या व्यवस्थापनाला सीकेपी पदार्थांची योग्य ती माहिती पुरवून तंतोतंत तीच चव खवय्यांना देण्याची हमी सुद्धा दिली. आणि इतकच नाही तर रोज वैविध्यपूर्ण मेनू, त्यामध्ये लागणारे कमर्शिअल प्रेझेन्टेशन आणि कुतूहलाने चौकशी करणाऱ्या अनेक खवय्यांना सीकेपी म्हणजे काय हे समजावणे तेही गुजरातेत ..सोप्प नाही हो. सीकेपी घरातल्या कांदा टोमॅटो च्या  कोशिंबीरीला, काळ्या वाटाण्याच्या आमटीला आणि बेसन लाडूला सुद्धा आज मानाच्या खुर्चीवर नाही तर सन्मानाच्या पंचतारांकित टेबलावर स्थानापन्न होण्याचं मान मिळाला तो या गडकरी साहेबांच्या प्रयत्नांमुळे आणि सूर्या पॅलेस च्या व्यवस्थापनाने सीकेपी पदार्थांवर दाखवलेल्या विश्वासामुळेच. मसाले भात,  भरल्या मिरच्या, भरली केळी, निनावं, पुरणपोळी, भरली वांगी, कोथिंबीर वडी, वांग्याचे काप, मच्छीचं भुजणं,लिप्ती कोलंबी, सुरमईचं कालवण (फिश मसाला नाही) एकाहून एक सीकेपी पदार्थ तेही अस्सल सीकेपी नावांसहित. यातला जवळा पाव ही डिश पाहिलीत तर आपल्याला इतक्या राजेशाही पद्धतीने सादर केलं जाईल हे त्या जवळयांच्या जमातीने स्वप्नातही पाहिलं नसेल.  फेस्टिवलला गेल्या दोन दिवसातला मिळणार प्रतिसाद बघून 'अपना दिल खुश हो गया !' .. अगदी तिकडच्या भाषेत बोलायचं तर  ''बहुच ऐटले, बहुच सरस ...मजा आवि गयी भाय !" 

मित्रांनो .. आज खरंच काहीतरी केल्याचं समाधान आहे. आपल्या या स्वर्गीय चवीच्या सीकेपी खाद्यसंस्कृतीचा झेंडा आंतरराष्ट्रीय क्षितिजावर फडकावा या स्वप्नाची सुरुवात तर झाली. जे अन्न खाऊन मोठा झालो त्या अन्नाला खऱ्या अर्थाने जागलो आणि त्याला त्याचे योग्य स्थान मिळवून देण्याचे  प्रयत्न सफल झाले हे वाक्य आज मी अधिकाराने म्हणू शकतो. अर्थात यात मोठा वाटा नरेंद्र गडकरी यांच्या बरोबर तुम्हा सर्व सुग्रणींचा आणि चोखंदळ खवय्यांचाच.आज याच हॉटेल मधील एक व्हिडीओ पहिला त्यात नरेंद्र गडकरी यांनी माझा सीकेपी फूड फेस्ट चा संस्थापक म्हणून केलेला उल्लेख खरंच खूप काही देऊन गेला. मनस्वी आभार !

सीकेपी म्हणजे रविवारचा मटण, सीकेपी म्हणजे बोम्बलाच कालवण, सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा रस्सा आणि सीकेपी म्हणजे रुचकर हातांचा चवदार वारसा या ओळी जगमान्यतेकडे जायला आता फार वेळ लागणार नाही. व्यवसायाच्या संधी शोधणाऱ्या सीकेपी गृहिणींना स्वतःकडच्या कौशल्याला व्यावसायिकतेकडे न्यायला बडोद्याच्या पंचतारांकित हॉटेलमधला हा सीकेपी फूड फेस्ट नक्कीच प्रवृत्त करेल. बडोद्यात असाल तर नक्कीच भेट द्या आणि बाहेर असाल तर या निमीत्ताने बडोद्याला जायचा एक प्रयत्न नक्की करा.. कदाचित मी सुद्धा तिथेच असेन माझ्या लाडक्या पदार्थांना पंचतारांकित झालेलं याची डोळा पाहायला.

समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट.