Saturday, 24 February 2018

सीकेपी म्हणजे, रविवारचं मटण


सीकेपी म्हणजे बोम्बलाचं कालवण,
सीकेपी म्हणजे रविवारचं मटण,
सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा रस्सा,
सीकेपी म्हणजे रुचकर हातांचा चवदार वारसा ...
या ओळींमधला महत्वाचा भाग म्हणजे रविवारचं मटण. सीकेपी म्हणजे मटण हे समीकरणच आहे आणि सीकेप्यांचा रविवार हा सहसा 'मटण भात'  या आठवडाभराची शक्ती देणाऱ्या संपूर्ण आहाराशिवाय साजराच होऊ शकत नाही या वाक्यावर मी ठाम आहे.  एखाद्या रविवारी जर का चतुर्थी वगैरे येऊन घात झाला तर अनेक कायस्थांचा आठवडा खूप अशक्तपणा आल्यासारखा जातो ही वस्तुस्थिती आहे ..अगदी माझ्या बाबतीतही हे असच घडतं. जर का माझा एखादा रविवार हुकला तर सोमवारचा सत्यानाश झालाच म्हणून समजा..एक तर कारण नसताना उगीच चिडचिड सुरु होते, कामात लक्ष लागत नाही, आपण उगीचच सोमवार पाळतो - आपल्याला कुठे चांगला नवरा शोधायचाय वगैरे विचार मनात येऊ लागतात. अलीकडे मी हे दिवस आणि वार पाळणे सोडून दिलंय .. देवाने नाही फरक केला वारांमध्ये, च्यायला आपण कोण मोठे लागून गेलोय?

हं, तर आपलं मटण.  मटण हा सीकेप्यांच्या घरातला एक न ठरवलेला पण यथाशक्ती यथाभक्ती साजरा होणारा इव्हेंट असतो. शनिवार संपत आला की रविवारच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होते. एरव्ही बायकोला काडीचीही मदत न करणारे सीकेपी पुरुष रविवारी मात्र मस्त तयार होऊन, हाफ पॅन्ट - टीशर्ट घालून, चांगलीशी पिशवी घेऊन बाजाराकडे कूच करतात. (या वाक्यावर शिव्या खायला मी तयार आहे, पण सत्य आहे ते सत्य आहे). यातच सीकेपी बालकांवर खाद्यसंस्कार चांगले व्हावेत म्हणून घरातल्या ५ वर्षाच्या मुलाला पण बाईकवर बसवून बाजार दाखवण्याची पद्धत रूढ आहे. 'बाबा, आपण कुठे जातोय' हे विचारल्यावर त्या छोट्याला, डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताने काहीतरी ठोकून कापल्यासारखे दाखवून, आपण मटण आणायला जातोय हे सांगितलं जातं. ते मूल पण बिच्चारं नळीबाऊ च्या लालसेने टुणकन तयार होऊन बाईकवर बसतं.  आता मटण आणायला हे उत्साही लोक कुठे जातील याचा कोणी विचारपण  करू शकणारं नाही. ठाण्याच्या चरईतला एखादा सीकेपी आता घोडबंदरला हिरानंदानी मध्ये शिफ्ट झाला असेल तरीदेखील मटणासाठी हा ठाण्याच्या गर्दीच्या मार्केटमधल्या अनिल गाढवे कडेच येणार. पोखरण रोडवरचा एखादा लोढा मध्ये शिफ्ट झाला असेल तरी तो त्या उपवनच्या अश्फाककडेच जाणार. मखमलीच्या शोएबचा पण तितकाच बोलबाला. खूप वर्षांपूर्वी ठाण्याचे अनेक लोक कळवा आणि मुंब्रा येथे मटण आणायला जायचे.. ताजं ही मिळायचं आणि स्वस्तही. गुडलक, जॉली, वेलकम, महाराष्ट्र, दिलखुष ही सर्वसाधारण पणे या  मटणाच्या दुकानांची नावं. एरव्ही अतिशय घाईत जगणारे अनेक मोठे लोक मटणाच्या लाईनमध्ये अतिशय शांत आणि मनापासून उभे असतात. इथे एक किलो मटण घेणारा फुल वट दाखवत जरा सीना टाक, चाप टाक, गर्दन टाक वगैरे ऑर्डर देत असतो. त्याच्या मागे उभा असलेला एखादा पाव किलो मटण  घेणारा निमूटपणे, मटणवाला जे काही देईल ते घेऊन समाधान मानतो. पण जर कधी याने मांडीचा भाग वगैरे मागितला तर ' पाव किलोत तुझ्या काकानी ठेवलीये का रे मांडी' असा अपमान झालाच समजा. मटण वाला हा एकमात्र माणूस असा असावा की जो जाहिररीत्या तुमची इज्जत काढू शकतो .. तुम्ही कोणीही असा.  मटणाबरोबर कलेजी, खिमा, भेजा वगैरे पाहिजे असल्यास थांबायची तयारी ठेऊन आलेली मंडळी फार पूर्वी त्या मटण वाल्याकडे असलेले नयी दुनिया, इन्कलाब, अपना मसल्लक  किंवा नवाकाळ असले १ रुपयात मिळणारे पेपर वाचायचे, आता  मात्र मोबाईलवर चेक इन टाकत असतात. मटण घेताना मटण वाला आपल्याला चहा पाजतो हे म्हणजे तुम्ही त्याला खूप जवळ असल्याचं सूचक. मटणाला गेलं की गल्लीतले अनेक जुने मित्र पण भेटतात. तरुणपणी बाजारात न जाता रविवारी क्रिकेट खेळून महिलावर्गात लोकप्रिय झालेले हे मित्र आता मात्र घर गृहस्थीमध्ये आणि विशेषकरून घरच्या महिलेमध्ये रमल्याचे दिसतात.  "कायरे आज मटण का ?" हा मूर्ख वाटणारा प्रश्न पण १० मिनिटे गप्पा मारायला पुरेसा असतो. मटण ते मटण, मटणाची सर चिकनला नाही पासून देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा त्या निसरड्या लादीवर उभे राहूनच केला जातो.

मटणबरोबर घ्यायच्या इतर अनेक महत्वाच्या वस्तूं मध्ये दोन चिल्ड बिअर किंवा एखादी चपटी घेणे हेही क्रमप्राप्तच. एकदा का मटणाची पिशवी हॅण्डलला लावली के तुमचे पाय आपोआप स्वर्गलोकिच्या सुखाला गवसणी घालणाऱ्या ब्लू हेवन वाईन्स, शंकर वाईन्स वगैरे दुकानाकडे वळतात. मित्र तिथेही भेटतात  पण काळ्या पिशवीतल्या मटनामुळे घरची ओढ आज जरा जास्तच असल्याने ही मंडळी किक मारून घर गाठतात. इतक्या गर्दीत कसा नंबर लागला, वजन झाल्यावर कशी वरून जास्त चरबी टाकून घेतली अश्या विजयी सूरात पिशवी अर्धांगिनीकडे सोपवली जाते आणि नंतर  मटणाबरोबर आणलेल्या आनंददायी पेयाचा आस्वाद घेणं सुरु होतं. या कार्यक्रमामुळे पिशवी दिल्यापासून  ते शिजलेले ताट पुढे येईपर्यंत वेळ कसा जातो ते कळतच नाही..

स्वयंपाक खोलीच्या ओट्यापासून ते बाहेरच्या खोलीत दरवळणाऱ्या, तुमच्या नकळत नाकात शिरलेल्या त्या तिखट वासापाठोपाठ (सुगंध वगैरे काही नाही, वासच म्हणतो आम्ही) तुमच्या समोर हसऱ्या चेहेऱ्याने, आटपला का कार्यक्रम, कितीहो तुम्हाला घाई वगैरे शब्दांच्या सजावटीत ते सजलेलं ताट अवतरतं. मटणासाठीच राखीव असलेल्या भांड्यातलं रटरटणारं गरमागरम मटण वाटीत येऊन स्थिरावतं. एखाद्या खुर्चीत बसून टेबलावर ताणून पाय ठेवल्यासारखी वाटीतून फुशारकी मारणारी ती नळी, ताटात उजव्या बाजूला ती काळपट हिरवट छटा असलेली तव्यावरची कलेजी, सुगरणीचा मूड असेल तर एखादा अंड लेपून तळलेला चॉप, साधा सोप्पा कापलेला लाल कांदा, लिंबाची फोड, एखादी चपाती आणि ताटभर पसरलेला वाफाळलेला पांढरा शुभ्र भात .. यालाच म्हणतात सीकेप्यांचा रविवार.

असा रविवार साजरा झाला तर पुढचा आठवडा कडक गेलाच म्हणून समजा.

काही दिवसांपूर्वी एक गमतीदार पण पटणारी पोस्ट पहिली होती. 'सीकेपी समाज एकमात्र आहे की तो फक्त श्रद्धा पाळतो आणि मनमुराद जेवतो. पेन्शन हातात आल्यावर तो पहिला रविवार मासे आणि मटण, दुसरा रविवार फक्त मटण, तिसरा रविवार मटणात  बटाटे, चौथा रविवार बटाट्यात मटण आणि नंतर पेन्शनची वाट पाहतो' अशी,रविवार साजरा करायला मटण पाहिजेच हे सांगणारी ही पोस्ट होती.

सीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं 'स्टेपल फूड' आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट 

Thursday, 22 February 2018

फेस ऑफ्फ ऑन फेसबुक


सध्या फेसबुकवर जे काही सुरु आहे ना ते पाहता लोक कामधंदे सोडून या ना त्या ऍप वर क्लिक करत बसतील असं वाटतंय.

म्हणजे, कोणती आहे तुमच्या मरणाची तारीख आणि कारण? ... की लागले सगळे बघायला..किती ते कुतूहल आपल्या मरणाची तारीख बघायचं. उत्तर - तुमचे मरण २०६४ साली मोटार अपघातात.. अरे वा ..इतका जगणार मी ? आणि आजपासून ४६ वर्षांनी जेव्हा मी ९८ वर्षांचा असेन तेव्हा डोळयांच्या खाचा झाल्याने मोटारखाली येऊन मेलो तरच.... पहा बॉलीवूडची कोणती हिरोईन तुम्हाला साजेशी आहे? .. डोंबल..इथे गल्लीतल्या लेंगा टेलर ची पोरगी पटवताना जीव मेटाकुटीस आला होता आणि इथे काय दिसत तर उघड्या पाठीचा डिझायनर टॉप घातलेली कॅटरिना कैफ आपल्याला साजेशी .. उगीच क्लिक करून जीवाला त्रास करून घेणे दुसरं काय..अज्जीबात झोप नाही लागली त्या रात्री काय सांगू....  'तुम्ही स्त्री असतात तर कसे दिसला असतात?' .. अरे हे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे. काही वर्षांपूर्वी त्या फडकेच्या वाढदिवसाला सगळ्या प्रिंटिंग इंडस्ट्री नी पाह्यलंय मला स्त्रीरूपात .. कडक माल दिसत होतो असे पण काही मित्र म्हणाले...ते जाधव आणि पाटील तर अतिशय बोचऱ्या आणि वाईट नजरेने बघत होते माझ्याकडे. शप्पथ कुठून शोधतात या ऍप्स काही कळत नाही....  जाणून घ्या कोणती महान व्यक्ती होतात तुम्ही गेल्या जन्मी ??  उत्तर येतं जीजस क्राईस्ट ... बापरे ..फाईलला लावलेल्या कागदावरची टाचणी टोचली बोटाला तरी जीव जातो इथे आणि मागच्या जन्मी मी खिळे ठोकलेला जीजस क्राईस्ट.. काहीही...तसं एकदा माझा वाढदिवस ईस्टर संडे ला आला होता.....जाऊदे    दुसरं काय तर ' सांगा बरं ई.स.२०२४ साली तुम्ही काय करत असाल?' ... वेडे रे वेडे ... २०२४ साली आम्ही २०२९ ला कोणत्या युतीचं सरकार येणार याच्यावर नेहेमीप्रमाणे काथ्याकूट करत भांडत असू आणि तुम्ही काय दाखवता की मी चार आंग्ल बायकांबरोबर सोफ्यावर .. छे छे .. म्हणजे मनातून कितीही आवडलं असलं तरी शक्य नाही.. अति होतंय हे सगळं.  मी परवाच दुसरं कोणीतरी केलं म्हणून एका लिंकवर  क्लिक केलं .. 'लोक तुम्हाला पाहून काय विचार करत असतील?'  साधारणपणे .. हा खूप फुगलाय ना पिऊन, हल्ली कामधंदा करतो की फेसबुकवरच असतो, हा आता पहिल्यासारखा नाही राहिला वगैरे उत्तरं अपेक्षित होती पण उत्तर काय आलं की ' ही इज व्हेरी हँडसम, आय वूड ब्रोक विथ माय बॉयफ्रेंड फॉर हिम'.. आयला वाचून  काय लाजलो सांगू मी.  चारही बाजूने वाहणाऱ्या माझ्या सारख्या सुटलेल्या देहाच्या पुरुषासाठी ही तिचा सिक्स पॅक बॉय फ्रेंड सोडणार ..वा वा वा ..डोळ्याचं पारणं फिटलं, मोबाईलकडे लक्ष गेलं, बायकोचा फोन खणखणत होता, फेस बूक बंद केलं, साला आपलं बरं चाललंय.. ते उगीच ब्रोक व्हायचं, नकोच ते. पण चुकून, म्हणजे तितकं ही चुकून नाही पण ते फेस बुक वर पोस्ट झालं. तसा मी सुखरूप आहे अजून म्हणा.  बरं अजून एक गमतीदार लिंक, कोणत्या राजकीय व्यक्तिमत्वाचा चेहेरा तुमच्या चेहेऱ्याशी साम्य ठेवतो? हे ऍप तर शहाण्याने कधीही क्लिक करू नये .. दोनच पर्याय येतात .. दुसऱ्यांच्या वाटेला नेहेरू आणि माझ्या नशिबी राहुल गांधी. अरे आमचे बाळासाहेब, राज ठाकरे, ज्योतिरादित्य सिंदिया, शशी थरूर, राजीव गांधी वगैरे देखणे पर्याय पण ठेवा की, पण नाही.

भविष्यात हे फेसबुक वाले,  उद्या सकाळी तुमच्या दारात वसुली साठी कोण येणार ? उद्या तुमची बायको तुमच्यापुढे काय विषय काढणार? येत्या दिवाळसणाला सासुरवाडीहून कोणती भेट मिळणार ? २०१९ मध्ये तुमच्या वाढलेल्या पोटाचा घेर किती असेल ? २०२४ मध्ये तुमच्या बिल्डिंगच्या नळाला २४ तास पाणी (महिन्याला) येईल का? अशा ऍप्स आणि लिंक्स ही काढतील.असो.

एक मात्र नक्की, वातानुकूलित ऑफिसमधल्या गुबगुबीत खुर्चीवर कामाच्या वेळांत व्यतीत होणाऱ्या अतिशय खडतर आयुष्यात, कुठेतरी जीव रमवण्याच्या प्रयत्नात केलेल्या  एका क्लिकवर क्षणिक सुखाचा आनंद देणाऱ्या या ऍप्स आणि लिंक्स तुम्हाला स्वप्नांच्या जादुई दुनियेत नेऊन ठेवतात .. फक्त ते राहुल गांधी सोडून बरका.

Saturday, 13 January 2018

दारू..म्हटलं तर नशा, म्हटलं तर मैत्रीची वाहती भाषा


सॅम, यार तू नेहेमी खाण्यावर लिहितोस कधी आपल्या पिण्यावर पण लिहून काढ ना.. माझ्या दोन व्हाट्सअप ग्रुप च्या मित्रांनी मला केलेली  विनंती ऐकून घसा कासावीस झाला. तसं पाहता मी काही सलीम दुराणी काका सारखा पब्लिक डिमांड वर सिक्सर मारणारा गडी नाही तरीही मी हे चॅलेंज घेतलंय.(बाय द वे, सलीम दुराणी काकांना पण बिअरचा ग्लास भरून देणारा भाग्यवान आहे मी)  तर काय म्हणत होतो मी, घसा कासावीस झाला.  सर्व साधारण अशा मागणीने मन  भरून येतं.  पण या ग्रुप ची नावं ऐकलीत तर तुम्हालाही कळेल मनामध्ये काय काय भरून येतं ते. एका ग्रुपचं नाव आहे 'चिअर्स' आणि दुसरा ग्रुप आहे 'गोवा चलो'. काय कल्पकतेनी नाव ठेवतात ही मंडळी.  नावातच फसफसणारी बिअर आणि समुद्रावरच्या धुंदीचा आनंद दडलाय. बरं तसं पाहिलं तर मी पण पितो, नाही असं नाही, पण म्हणून डायरेक्ट पिण्यावर लिहायचं म्हणजे थोडं जोखमीचं काम. म्हणजे एक तर मी लिहिलेलं त्या मद्यरसिक मित्रांना आवडलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे मी  लिहिलेलं बऱ्याच जणांच्या पचनी पडणार नाही, ते बोंबाबोंब करतीलच याची भीती. खरं पाहता ते पण पितात पण गपचूप, लपून, दुसऱ्याच्या पार्टीत, बाहेरगावी, बायको  गेली की वगैरे. पण आम्हा पट्टीच्या पिणाऱ्यांचं तस नाही. प्यायची तर राजरोस पण दररोज नव्हे.  प्यायची तर आपल्या मित्रांबरोबर, कुटुंबीयांबरोबर,  मर्जीने आणि मनापासून आणि अर्थातच जबाबदारीने. प्यायची तर आनंदाच्या मूडमध्ये, रागात आणि दुःखात नाही.  जसं उत्तम खाण्यासारख सुख नाही तसच उंची दारू पिण्यासारखा आनंद नाही. दारू,जरी स्कॉच किंवा सिंगल माल्ट जरी असली तरी तिचा उल्लेख पिताना दारू म्हणूनच जे करतात तेच खरे मद्यपी. मला तर हा मद्यपी शब्द पण खूप आवडतो .. त्या शब्दातच 'मद्य पी' असा आग्रह आहे. चल ड्रिंक घेऊ या असे बोलून घेतलेल्या द्रव्यात ती मजा नाही..नुसतं औपचारिक वाटतं. असो.

दारू पिताना माणूस नको इतका प्रामाणिक, प्रांजळ, प्रेमळ आणि दिलदार असतो. एक दोन पेग नंतर तर जगातली कोणतीही गोष्ट तो आपल्या मित्रांसाठी देऊ शकतो, नव्हे, उद्याच्या उद्याच द्यायची त्याची तयारी असते. जगाच्या पाठीवर चाललेल्या सर्व घडामोडींवर येथे साधकबाधक चर्चा होते इतकंच नव्हे तर त्याची सोल्युशन्स पण त्या टेबलवर तयार असतात .. दुर्दैवाने ट्रम्प, पुतीन वगैरे मंडळी वेळेअभावी या गुत्त्यांवर येऊ ना शकल्यामुळे जग फार चांगल्या चांगल्या सूचनांना मुकत असावं. इथे कोणी शत्रुत्व घेऊन प्यायला बसत नाही, इथे मिळत फक्त आणि फक्त प्रेम. आणि आग्रह ?, तो तर विचारूच नका राव. तुमच्या सासुरवाडीच्या लोकांनी पहिल्या सणाला पण केला नसेल असा आग्रह तुम्हाला फक्त दारूच्या टेबलवरच केला जातो.. आणि खरं सांगायचं तर हा आग्रह नुसता फॉर्मॅलिटी असतो..आग्रहाच्या आधीच ग्लास भरलेला असतो. बिअर ही दारू नसते, वाईन चढत नाही, वोडका बटाट्यापासून बनते आणि ते म्हणजे रशियाचं राष्ट्रीय पेय आहे, जीन फक्त लेडीज पितात, सिंगल माल्ट मध्ये सोडा घालणारे महामूर्ख हे सर्व ज्ञान तुम्हाला इथेच मिळते. इथे दिल्या जाणाऱ्या शिव्या कोणालाही कुठेही लागत नाहीत.. प्रत्येक घोटा बरोबर शिव्यांचा चाखणा नसेल तर काय मजा.

दारू पिताना अनेक विषयांचे,अनुभवलेल्या घटनांचे आणि नको असलेल्या  ज्ञानाचे पाट वाहात असतात. शेजारच्या बिल्डिंगमधल्या भाभीपासून ते सनी लिओनी पर्यंत, एखाद्या नगरसेवकापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल, टुकार टेलिव्हिजन शो पासून ते अमिताभच्या मानधनाबद्दल  तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळतात. त्यातच, आपण कसे सगळ्यांना क्लोज आहोत, आपण त्या त्या  प्रसंगी कसे वागलो, नाकाबंदी वाल्या पोलिसांना कसे पटवले, एखाद्या मित्राला घरी सोडायला गेलो असता त्याच्या बायकोने काय राडा घातला याच्या सुरस कथा तुम्हाला फक्त आणि फक्त दारूच्या टेबलावरच ऐकायला मिळतात. रामजी, कृष्णा, मीरा, शंकर, गणेश, भक्तिमंदिर, हृषीकेश, गंगा, अमृत अशा पावन नावांनी चालणाऱ्या या बार्स मध्ये पापी माणसाला पण शुद्ध करण्याची क्षमता असते.  ढसाढसा ढोसल्यानंतर ढसाढसा रडून आपल्या चुकांची कबुली देणारे अनेक मित्र आणि मोठ्या मनाने त्यांना माफ करणारे त्यांचे खरे मित्र तुम्हाला येथेच मिळतात. दर ग्रुपमध्ये एकजण तरी असा असतो की त्याची एखाद्या वेटरशी किंवा बार मालकाशी चांगली ओळख असते (किंवा असे भासवले जाते) साधारणपणे इथे सर्व ऑर्डर हाच देत असतो. याच ग्रुपमधला एक जण न पिता नुसता थम्सअप वगैरे पीत इतरांची मजा बघत असतो. नंतर इक्वल काँट्रीब्युशन करताना याची मजा बघण्यासारखी असते ..बघा तुम्ही. यातलाच  एखादा सगळ्या पिणाऱ्यांची जबाबदारी घेणारा असतोच असतो.. बस्स कर रे, तुला जास्त झालीय, त्रास होईल वगैरे हाच माणूस फुल्ल तऱ्हाट मोड मध्ये बोलत असतो. एखादा मित्र दारू पिऊन आऊट झाल्यानंतर त्याला परत शुद्धीत आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात पाहायला मिळणार नाहीत. लिंबू काय, पाव काय, डोक्यावर सोडा ओतणे काय किंवा त्याचे केस ओढणे काय सगळं कस शास्रोक्तपणे करतात. मुख्य म्हणजे या प्रसंगी बारमधले सर्व च्या सर्व तुमच्या मदतीला येऊन अजून काही उपाय करता येईल या याचापण विचार करतात. तो मित्र ओकला तरी त्याला फार गिल्टी वाटून न देण्याचं कसब इतरांकडे आपोआप येतं. एकूण काय, तर जगातल्या सर्व कटकटींपासून दूर नेणारी ही दारू म्हणजे तमाम मित्रमंडळांना सुखदुःख वाटायची एक छान संधी देते...खरं पाहता दारूच्या नशेपेक्षा मैत्रीचा बहर जास्त चढलेला असतो.

ठाण्याच्या एका बारमध्ये मी आणि एका मोठ्या कंपनीच्या उच्च पदावर असलेला माझा मित्र आपल्या देशाच्या एव्हिएशन इंडस्ट्री साठी इम्पोर्ट पॉलिसिज वर गहन चर्चा करत असता आमच्याच टेबलवर बसलेल्या दोन मित्रांचे बोलणे ऐकले.( हो,हो. काही बारमध्ये तुमच्या बाजूला दुसरे पण येऊन बसू शकतात, त्यांचं बिल आणि विषय वेगळे असतात तरीही पहिल्या आलेल्या ग्राहकाला त्रास होत नाही, ही आपलेपणाची भावना फक्त बारमध्येच पाहायला मिळते) हं तर आम्ही काही कोटीच्या गप्पा मारत असताना त्या दोघांमध्ये रिक्षाचा सायलेन्सर फाटल्यावर गण्या मेकॅनिक बेस्ट आहे कि सुलेमान बेस्ट आहे या विषयावर वर गंभीर चर्चा सुरु होती.ते ऐकून आम्ही धन्य झालो.  त्या दोन्ही रिक्षावाल्यानी नकळत आमचं विमान जमिनीवर आणून ठेवलं होतं. एक ना दोन अशा अनेक घटना तुम्हाला फक्त बार मधेच पाहायला आणि ऐकायला मिळतात.

माझा हा लेख दारू ला लोकप्रिय करणे किंवा दारूचे उदात्तीकरण करणे या उद्देशाने लिहिलेला नसून,माझी बोली भाषा समृद्ध करणाऱ्या त्याच टेबलावरच्या माझ्या मित्रांच्या विनंतीला मान देऊन लिहिण्यात आलेला आहे याची टीकाकारांनी नोंद घ्यावी. जास्त जहरी टीका केल्यास, तुमच्या टीकेला उत्तर द्यायला वरीलपैकी कुठेही तुम्हाला आमंत्रित केले जाईल याचीही तयारी ठेवा.  

शेवटची दोन वाक्य माझ्या आणि एकूणच दारू या विषयाचा आनंद घेणाऱ्या मंडळींसाठी.
दूर गेलेल्या नात्यांना जोडते ती दारू, मात्र जोडलेली नाती दुरावण्यास ती कारणीभूत होऊन देऊ नका आणि जेव्हा कधी प्यायला बसाल  तेव्हा या पीण्याशिवाय, "घरची ओढ" नावाची एक जगावेगळी नशा आहे हे विसरू नका. 

Wednesday, 3 January 2018

प्रिय प्रसाद,



प्रिय प्रसाद,
तुझ्या जगण्यात आणि वागण्यात प्रचंड विरोधाभास आहे.
तू प्रचंड हुशार आहेस तरीपण विनम्र आहेस.
तू मोठ्या हुद्द्यावर काम करतोस तरी पण लहानांची काळजी घेतोस.
तुझं आयुष्य अतिशय नीटनेटके चालू असतानाही तुला समाजाप्रती नको तितकं देणंघेणं आहे.
तू आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मानमर्तब मिळवलेला एक उच्चशिक्षित विख्यात माणूस आहेस तरी देखील माझ्यासारख्या जेमतेम ग्रॅज्युएट झालेल्या मित्रांना जवळ बाळगून आहेस. एका आंतरराष्ट्रीय बँकेच्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत माझ्यासारख्या मित्राच्या ध्येयाला स्वतःच स्वप्न समजून त्याचा पाठपुरावा करण्यास तू कसा काय वेळ काढतोस हे तुझं तुलाच माहित.
 एरव्ही सुटाबुटात फिरणारा आणि कचकचून बांधलेला टाय मिरवणारा तू गणपतीच्या पूजेला मात्र सोवळं आणि उपरणं ही तितक्याच सहजतेने कॅरी करतोस हे पाहूनसुद्धा विश्वास बसायला काही मिनिटे लागतात. एखाद्या बँकिंग फायनान्स च्या कॉन्फेरंस मधले तुझे प्रेझेंटेशन तू जितक्या सहजतेने हाताळत असशील तितक्याच सहजतेने एकदाही पुस्तकात न पाहता कधीही न ऐकलेल्या ३०/३५ आरत्या तू कशा काय बोलू शकतोस हे पण एक कोडं आहे. एरव्ही स्वतःसाठी पण वेळ नसलेला तू गणपतीसाठी चक्क ७ दिवस सुट्टी घेतोस हे गणपतीशिवाय कोणाला पटणार नाही. कामानिमित्त अर्धे आयुष्य विमानात घालवणाऱ्या, पंचतारांकित आयुष्य जगणाऱ्या तुझ्यासारख्या हायफ्लायर माणसाला आजही ऑफिसला जाताना घरून आईने दिलेला भाजी चपातीचा डबा ताज च्या जेवणापेक्षा प्रिय वाटतो हे मी याची डोळा पाहिलंय...नुसतं पाहिलं नाही तर तुझ्या डब्यातलं जेवलोय सुद्धा.
प्रसाद, तू माझा मित्र आहे हे तुझ्यासाठी फार मोठं नाही ..पण कोणत्याही क्षणाला तू आपल्या मैत्रीला जागतोस हे माझ्यासाठी खूप काही आहे. आईच्या ७५ व्या वाढदिवसाच्या वर्षी तिला भेट म्हणून ओलीन बिसिनेस स्कुल मधून मिळवलेली असाध्य अशी ग्लोबल एक्झिक्युटिव्ह एमबीए या भल्यामोठ्या पदवीची भेट देतोस, किती कृतकृत्य वाटत असेल तिला. मुंबईतली अनेक मोठी प्रस्थ, अनेक नामांकित उद्योजक आणि हिंदी चित्रपट सृष्टीत चार पिढ्या गाजवणारे एक दिग्गज घराणे तुझ्या मैत्रीच्या घट्ट नात्यात आहेत .. तरीदेखील तूझा पाय जमिनीवर आहे. मित्रा तू खूप मोठा आहेस पण दाखवत नाहीस ..तू उत्तुंग जगतोस पण साधा वागतोस ..
खरंच तुझ्या जगण्यात आणि वागण्यात मोठा विरोधाभास आहे.
तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! तुला नववर्षाच्याही अनेक शुभेच्छा !! आज तू परदेशात आहेस, येशील तेव्हा दोन्ही एकत्र साजरे करूच !!
Cheers Bro..! Proud to be your close friend !

Bhima Koregaon War

चला थोडा इतिहास उकरूयात 
महाराष्ट्राला २०० वर्ष मागे नेऊयात !

#dirtypolitics #shame
  

रंग भगवा,
हिरवा अन निळा
आम्ही गर्वे  मिरवला,
उरला रंग काळा 
हृदयी घट्ट रुजवला !

Tuesday, 2 January 2018

ठाण्याच्या तहसीलदार कचेरी कँटीन ची मामलेदार मिसळ

हे असं मोठ्ठ टायटल लिहिण्याचं कारण म्हणजे मामलेदारवरचं प्रेम, दुसरं काही नाही. आम्ही ठाणेकर मिसळ खायला जायचं असल्यास , येतो का मामलेदारला'  इतकंच बोलतो. आज अनेक ठिकाणी सुप्रसिद्ध मामलेदार मिसळ असे  बोर्ड लावलेले पाहतो. पण ज्या जागेवर मनापासून प्रेम केले त्या गर्दीच्या आणि कायम गजबजलेल्या ठाण्याच्या तहसीलदार कचेरीच्या कँटीन मध्ये, जे आता फक्त मामलेदार मिसळ म्हणून ओळखले जाते, तिथे आणि फक्त तिथेच जाऊन मिसळ नव्हे तर कमीतकमी दोन मिसळीवर ताव मारतो. तसं पाहिलं तर थोड्याशा एलिट क्राउड साठी यांनी आमंत्रण नावाचे एक छान हॉटेल देखील बाजूलाच सुरु केलंय. पण इतकी सोफिस्टिकेटेड मिसळ खाण्याची सवय नाही अजून जडली मला .. गर्दी गचडीतली, खिशात पैसे आहेत कि नाही हे चाचपत लाईनीत उभं राहून जागा मिळवलेली आणि प्लॅस्टिकच्या करड्या रंगाच्या बशीतली तीच मिसळआजही  छान वाटते.

तसं पाहता आजवर हजारो लोकांनी या मामलेदार मिसळीची रम्यकथा किंवा महती तुम्हाला सांगितलीच असेल त्यात मी नवीन ते काय सांगणार. पण तरी देखील 'खाल्ल्या मिसळीला जागायलाचं हवं' म्हणून हा एक प्रयत्न. तर या मामलेदार मिसळ अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या मिसळ सम्राटाकडे एक भलं मोठं मेनू कार्ड म्हणजे मेनू फलक पण आहे. एकूण ५२ पदार्थ असलेल्या या मेनूबोर्ड वरचे दोनच पदार्थ इथे चालतात ..एक मिसळ आणि दुसरा त्यावरचा उतारा म्हणजे ताक. उताराच म्हणूया.. कारण एकदा लालेलाल मिसळ खाल्यानंतर तुमच्या आत्म्याला शांत करणारं या जगात काही असेल तर ते थंडगार ताकच  असतं.

मामलेदारची मिसळ जरी बोर्डावर एकच असली तरी वेगवेगळ्या तिखटाच्या मापात मोजली जाते.. म्हणजे  लाईट, मिडीयम, मिडीयम बिगर बटाटा, रेग्युलर मिसळ आणि तिखट. यातली लाईट मिसळ म्हणजे  ज्यांच्यात (दुसऱ्या दिवशी त्रास सहन करण्याची) डेरिंग नसते पण मामलेदारची मिसळ खाल्ली आहे असं गावभर मिरवायचं असतं त्यांच्यासाठी. मिडीयम मिसळ म्हणजे, खातो पण उद्या ऑफिसला जाताना लफडा नको अशा मंडळींसाठी योग्य असलेली मिसळ.  मिडीयम बिगरबटाटा म्हणजे, आम्ही येथे नेहेमीच येतो आम्हाला मिसळमधलं कळतं अस दाखवणाऱ्यांसाठी बटाटा नसल्यामुळे थोडी अधिक तिखट झालेली मिसळ.  रेग्युलर मिसळ म्हणजे, मेनू बोर्डवर मिसळपाव या सदरात मोडणारी आणि इथे पहिल्यांदाच आलेले, लाईट मिडीयम असले प्रकार माहित नसलेले आणि दुसऱ्यांच्या टेबलावर बघून ऑर्डर देणाऱ्या मंडळींची लाडकी मिसळ.  आणि सर्वात शेवटी तिखट मिसळ .. हे खाणारे लोक म्हणजे टॉप क्लास मिसळ नव्हे तिखट खवय्ये. विषही दिले तरी पचवतील अशा दिसणाऱ्या या मंडळींच्या एकूण अवताराकडे पाहूनच त्यांची तिखट खाण्याची कपॅसिटी कळते. इथे आपला टिकाव लागणं शक्यच नाही, भलते साहस नकोच.

साधारणपणे रेग्युलर मिसळ खाणाऱ्या माणसाची काय अवस्था होते ते सांगतो. हा माणूस आल्याआल्या 'दोन मिसळ घे रे' अशी एकदम कडक ऑर्डर देतो. मग मिसळ येईपर्यंत इथे तिथे बघत बसतो तोच टेबलावर दोन काचेच्या बशा आपटून त्यात दोन दोन पाव ठेवले जातात. मिनिटा दोन मिनिटात  लालबुंद तवंग असलेला खतरनाक रंग पांघरलेली, मधूनच डोकावणारी शेव दिसणारी आणि वर मस्त कांदा लेऊन नटलेली आणि कोणत्याही ट्रे शिवाय फक्त बोटांच्या साहाय्याने आणलेली एक खोलगट डिश तुमच्या टेबलावर अवतरते. नाही नाही.. लगेच खाऊच शकत नाही तुम्ही राव. त्यातले दोन रुतवलेले चमचे काढणं पण दिव्य असतं ..मिसळ सांडण्याची हमखास शक्यता. नंतर 'काय मस्त ना' अशा एक्प्रेशन नी मिसळपाव ग्रहण सोहळा सुरु होतो. पहिल्या दोन चार घासापर्यन्त आयुष्य अतिशय सुंदर असतं, नंतर मिसळ तुमच्या सर्व शरीराचा ताबा घ्यायला सुरुवात करते. तुम्ही वर बघता.. पंखा सुरूच असतो. 'जमतंय ना रे हे तिखट तुला' असं बरोबर च्या मित्राला विचारलं जातं.  घासागणिक मिसळ कोरडी होत जाते. समोर बसलेल्या गिऱ्हाइकाने ऑर्डर दिली म्हणून ' दोन रस्सा घे रे' ही तुमची ऑर्डर तुमचा जवळजवळ सत्यानाश करते. रस्सा तर मिसळीपेक्षा तिखट. खा लेको. कपाळावर घाम साचलेला, नाकातलं पाणी टेबलावर पडण्याच्या तयारीत, डोळे तर ऑलरेडी वाहायला लागलेले, जिभेला चरचर आणि थोबाडाला आग लागलेल्या परिस्थितीत तुम्ही रुमाल काढता. पांढराशुभ्र रुमाल क्षणात रंग बदलतो.. एव्हाना तुमच्याकडून ताकाची ऑर्डर नकळत गेलेली असते. ताक तुम्हाला क्षणिक शांती देत खरं पण खाल्लेली मिसळ पुढच्या २४ तासात तुमचं  अंतर्बाह्य शुद्धीकरण करण्याच्या तयारीला लागलेली असते. बिल फार मोठं येत नाही हाच काय तो मोठा आनंद. हॉटेलच्या गल्ल्यावर सर्व ऋतूत,सर्व हवामानात, सर्व परिस्थितीत, सकाळ संध्याकाळ कधीही शून्य एक्स्प्रेशन घेऊन लेंगा शर्ट घालून बसलेले लक्ष्मणशेट एकही शब्द न बोलता उरलेले पैसे परत देतात. त्यांच्या बाजूला नेहेमीच कोणी ना कोणी कायम उभा असतो,
त्यांना बरंच काहीतरी सांगत असतो आणि त्यालाही लक्ष्मणशेटची उत्तरे तशीच हावभावशून्य. पण अतिशय सज्जन माणूस. खरं सांगतो मी हजार दीडहजार वेळा त्यांच्याकडे गेलो असेन पण त्यांची माझी साधी ओळखही नाही .. किती जणांशी ओळख ठेवणार हो ते. ज्या नव्या पिढीला मामलेदार म्हणजे काय हे माहित नाही ते बहुदा यांनाच मामलेदार नावाचे कोणीतरी समजत असावेत.

मामलेदार मिसळीचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे ही  मिसळ तुम्ही कधीही खाऊ शकता. तुमचा कोणी ठाणे नगर पोलीस चौकीत लॉकअप मध्ये असताना, तहसिदार कचेरीत डोमेसाइल सर्टिफिकेट काढायला जाताना, स्टेशनरोड वर खरेदीला जाताना इतकंच नव्हे तर मागच्या रस्त्याला असलेल्या स्मशानात एखाद्याला पोचवल्यानंतर पण मिसळ खायला जायची प्रथा सध्या जोरात आहे.. मी तर आजच माझे जेष्ठ मित्र सुधाकर वैद्यांना स्मशानातून डायरेक्ट तिथे घेऊन गेलो होतो. पाहतो तर काय, स्मशानतला सगळा माणूस तिथेच. अहो आमच्या मामलेदार मिसळची लोकप्रियता दुसरं काय.

मला अजूनही प्रश्न पडतो की ते मेनू बोर्डवरचे उरलेले ५० पदार्थ कोण खात असेल. गेलात तर बोर्ड वाचून पहा.. पण जा नक्की. मामलेदार मिसळीच्या तिखटपणातला गोडवा तुम्हाला परत परत बोलावल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी देतो, बघा तुम्ही.

-समीर गुप्ते

Image Source - Google 

Wednesday, 13 December 2017

नाव नसलेलं, तरीही नाव कमावलेलं - सीकेप्यांचं 'निनावं'


''ए तुम्ही सीकेपी व्हेज खाता का रे ?'' या खोचक (तरीही आम्हाला अभिमानास्पद) प्रश्नाला होकारार्थी उत्तर मिळाल्यानंतर समोरचा माणूस कसला चमकतो सांगू. इतकंच नाही तर आम्ही सीकेपी व्हेज बरोबर गोडधोड पण चवीने खातो हे सांगितल्यावर ही धक्का बसलेली मंडळी सावरण्याआधीच परत कोसळतात. ''हं, ते गोड म्हणजे श्रीखंड वगैरे ना ?'' उगीचच आपल्याला कळतं हे सांगण्याचा अट्टाहास करत परत उभं राहायचा प्रयत्न होतो. पण यालापण निरुत्तर करणारं उत्तर आहेच आपल्याकडे - अहो 'आम्हा सीकेप्यांचं निनावं'. 'निनावं ? हे काय नाव आहे ?' या प्रश्नानंतर आपली सटकते आणि मग सुरु होतं निनावं महात्म्य.
निनावं - सीकेपी सुगरणीच्या पाक कौशल्याला दाद मिळवणाऱ्या ज्या हजारो पदार्थांचा जन्म झालाय त्याच्यात सर्वोच्च शिखरावर असणारा जो 'नावा'जलेला पदार्थ तो म्हणजे निनावं. इतके पदार्थ, इतक्या पाककृती, इतके खाण्यापिण्याचे लाड करत करत हा बिननावाचा पण नामचीन पदार्थ या पृथ्वीतलावर कसा अवतरला याचे मात्र आमच्याकडे उत्तर नाही. कदाचित प्रयोगशील गृहिणीमुळे किंवा कदाचित स्वयंपाकघरातील एखाद्या अपघातामुळे तयार झालेला हा पदार्थ असावा. अनेक पदार्थांचे नामकरण होऊन आता काय नाव ठेवायचे या विवंचनेत असलेल्या त्या भांबावलेल्या गृहिणीने 'निनावं' हे नाव मात्र कल्पकतेनेच ठेवलंय. नुसतच खाण्यात नाही तर खाताना जाणवणाऱ्या एका प्रेमाच्या गोडव्याने निनावं हा गोड पदार्थांमधलं एक अव्वल स्थान प्राप्त करतो. तसं पाहिलं तर फक्त गव्हाच्या आणि चण्याच्या पिठात तूप, गूळ. वेलची, जायफळ आणि त्यावर नारळाचं दूध या साध्याश्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण पदार्थ. कृती पण अतिशय सोप्पी. लहानपणी कोळशाच्या शेगडीवर केला जाणारा आहे पदार्थ आता मात्र गॅस च्या चुलीवर बनतो. पण त्यावेळच्या तव्यावर ठेवलेल्या भांड्याच्या झाकणावर असलेल्या निखाऱ्याच्या धुराचा 'स्मोकी फ्लेवर' अजूनही मनात रुजलाय. दर पाच मिनिटांनी स्वयंपाक खोलीत जाऊन 'झालं का गं निनावं, झालं का गं निनावं' अशी गोड भुणभुण आईच्या मागे लावण्यातला आनंद काय असतो हे कदाचित आजच्या पिढीला कळणार नाही. कदाचित श्रावणात पुजलेल्या जिवतीच्या चित्राजवळ ठेवलेल्या नारळाच्या दूधामुळेच या निनाव्यात आईच्या ममतेचा गोडवा येत असावा. श्रावणाच्या शेवटी दाटा या सणाला पाहिजेच असलेले हे निनावं आणि त्याबरोबर खमंगअळू वडी हे भन्नाट कॉम्बिनेशन करून घरच्यांना देणे हा प्रत्येक सीकेपी गृहिणीचा एक आनंदोत्सव असतो. निनावे बनताना घरात जो सुगंध दरवळत असतो त्याला कोणत्याही सुगंधाची उपमा देणं शक्यच नाही.
निनावं बनल्यानंतर ज्यांच्याकडे खूप म्हणजे खूपच संयम आहे ते त्याच्या लोभस रुपाकडे पहात त्याच्या वड्या वगैरे व्हायची वाट पाहतात. आमच्यासारखे आचरट खादाड निनावंप्रेमी 'जरा बघू थोडंसं' म्हणून भांड खाली उतारताक्षणीच सुरुवात करतात.
काही पदार्थांबद्दल जास्त न बोलता ते फक्त आणि फक्त खाऊन तृप्त होणे या पेक्षा सुख ते काय... निनाव्याचं पण असंच आहे. तुम्ही जितके बोलाल तितकी आठवण येऊन स्वतःलाच त्रास होईल .. त्यापेक्षा आज निनाव्याचा बेतचं करून बघायला काय हरकत आहे. नव्या पिढीला निनावं आवडावं यासाठी 'निनावं मूस केक' यासारखा नाविन्यपूर्ण पदार्थ सीकेपी फूड फेस्ट मध्ये शेफ यशोधन देशमुख ने साकार केल्याचं तुम्ही ऐकलं असेलच. आपण कौतुकाने एखाद्याला निनावे खायला दिल्यानंतर 'हे थोडं मोहनथाळा सारखा लागतं नं' अस जर कोणी बोलला तर त्याच्या हातात उरलेलं निनावं परत घ्यायला क्षणभर पण कचरू नका .. ज्याने आपल्या अस्तित्वासाठी स्वतःच्या नावाचाही कधी हट्ट धरला नाही त्या मोठ्या मनाच्या 'सीकेपी' निनाव्याला मान द्यायला इतकं तर करूच शकतो आपण.. गम्मत म्हणून लिहतोय हो.. नाहीतर खरंच हिसकावून घ्याल. अहो निनावं म्हणजे फक्त सीकेप्यांच्या स्वयंपाक घरातला गोड पदार्थ नाहीये, निनावं म्हणजे आपल्या पाककलेचा आणि पाहुणचाराचा गोडवाच जणू. खाऊ द्या त्यांना निनावं.
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट