Tuesday, 27 February 2018
Monday, 26 February 2018
Dare and You are there !
Whenever you see hard work, passion and belief go hand in hand, be sure they are on their journey to Success. A small sized business of dry fish four years back has converted into a big sized fast growing business of fresh fish...just with a strong wish. I am extremely happy and proud to see my friend and a dynamic associate of CKP Chamber of Commerce and Industry Sai Kulkarni who now owns a Fishing Boat named Jai Malhar and which has got a permission to sail in the waters of Mumbai. With a team of nearly 15 hard working and wonderful fishermen Sai is creating a new history. 'Dare and you are there' seems the winning formula of Sai.
Today I was the first fortunate from his friends list to be on his boat and it was a special occasion too...it was his Birthday and we celebrated it by sailing around... an amazing experience of piloting the boat.
Cheers Sai..you made us proud ! God Bless You in Abundance !!
श्रीदेवी आणि मी
श्रीदेवी आणि मी.
लेखाचं टायटल संपूर्णपणे मिसलिडिंग आहे असं तुम्हाला क्षणभर वाटेलही परंतु माझ्या आयुष्यातल्या १० अविस्मरणीय मिनिटांसाठी 'रूप की रानी' श्रीदेवी, होय खुद्द श्रीदेवी माझ्या बाजूला उभी होती. आज हे माझ्या चित्रपटातल्या टीम शिवाय कोणालाही खरं वाटणार नाही. तशी ती मला ओळखतही नव्हती. मी मात्र तिच्या लाखो करोडो चाहत्यांमधला एक. तिचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहिलेला. 'लम्हे' पाहायला तर बायको आणि आईला घेऊन मेट्रो पर्यंत गेलो. तेव्हा नीता लुल्लाने त्या चित्रपटातल्या मोरनी गाण्यासाठी बनवलेली घागरा चोळी एका काचेच्या बॉक्स मध्ये प्रदर्शनार्थ ठेवली होती. 'श्री' इतकी स्लिम आहे ? हा प्रश्न तो ड्रेस पाहणाऱ्या सर्वांनाच पडला असेल. खूप वर्षांपूर्वी माझ्या ऑफिसला श्रीदेवीचा जपानी गेशा च्या वेशभूषेत असलेला व्हिडीओकॉन च्या कॅलेंडर वरचा फोटो होता. युट्युब नसलेल्या जमान्यात 'चांदनी' आणि 'लम्हे' ची शिवहरी ने संगीतबद्ध केलेली गाणी कॅसेट प्लेअर वर ऐकताना डोळ्यासमोर तिचा प्रत्येक हावभाव आपसूकच यायचा. सदमा चित्रपटातील तिचं लाडीकपणे कुत्र्याला 'हलीप्रशाद' हाक मारणं, चांदनी मधलं तिच्या आवाजतलं, चांदनी, मै तेरी चांदनी हे गाणं, लम्हे चित्रपटातलं 'मेरी बिंदिया तेरी निंदिया ' या गाण्यातलं तीच नटणं सवरणं, चालबाज मधलं 'ना जाने वो कहांसे आता है', इंग्लिश विंग्लिश मधल्या नवराई गाण्यातलं 'आखोंमे इसके, इशारे' या तीन चार ओळीत ओतलेला जीव सगळं कसं हजारवेळा पाहावंसं. अभिनय, नृत्य, संवादाची फेक, टायमिंग आणि न लपवता येणारं तिचं दाक्षिणात्य शैलीतलं लाजणं आणि रडणं हे केवळ लाजवाब. लम्हे या चित्रपटात वहिदा रहेमान आणि श्रीदेवी या दोघीही माझ्या लाडक्या अभिनेत्री, हा चित्रपट युट्युब वर मी अनेकदा पाहतो.
२०१० साली मकरंद अनासपुरे, ज्योती जोशी, शीतल शुक्ल, प्रकाश धोत्रे आणि भूषण कडू यांना घेऊन मी, माझा मित्र महेंद्र वाघमारेच्या साथीने 'बत्ती गुल पॉवरफुल' या आमच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचा प्रीव्ह्यू अंधेरीच्या फन रिपब्लिक च्या सातव्या मजल्यावरच्या मिनी थिएटर मध्ये ठेवला होता. संध्याकाळी ७ चा शो होता. अनेक मित्र,तंत्रज्ञ्, कलाकार आणि काही डिस्ट्रिब्युटर यांच्यासाठी हा शो आयोजित केला होता. मी गोरेगावच्या फिल्म लॅब मधून प्रिंट घेऊन तिथे पोचलो तेव्हा तिथे सलमान खान च्या 'वॉन्टेड' या चित्रपटाचा खासगी शो सुरु होता. तसा वॉन्टेड रिलीज होऊन १५ दिवस झाले होते. माझ्या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक दिलबर चौहान काका, त्यांची सहकारी शारदा जगताप, नितल वढावकर, अभिनेत्री शीतल शुक्ल हे बाहेरच उभे होते. ''समीर सर, आतमध्ये श्रीदेवी आहे, तिच्या मुली आणि मैत्रिणींना घेऊन वॉन्टेड बघते आहे" असं शारदा म्हणाली. 'तू पाहिलंस तिला ?' मी विचारलं. ''पाहिलं काय, ती आम्हा सर्वांशी गप्पा मारून गेली.'' शारदा खूप कौतुकाने सांगत होती आणि तिथे असेलेले माझे सहकारी श्रीदेवीशी बोलल्यामुळे मोठ्या आनंदात होते. मी एकदा स्वतःकडे बघितलं. प्रिंट्स आणताना माझ्या कपड्यांवर खूप डाग पडले होते, चेहेरा घामाने डबडबलेला होता, केस नेहेमीप्रमाणे विस्कटलेले होते. चित्रपट संपल्यावर ती बाहेर आली कि एखादा फोटो काढू, तो पर्यंत जरा रेडी होऊ असा विचार करतोय तोच थिएटर चा दरवाजा उघडून साक्षात श्रीदेवी बाहेर आली. दिसायला अतिशय सडपातळ, हलकासा मेकअप, पांढराशुभ्र असा एम्ब्रॉयडर्ड फ्रॉक, उंच टाचेच्या सँडल्स, अतिशय स्लिम पट्ट्याच घड्याळ, बोटात एकदोन अंगठ्या आणि लक्ष मोबाईलकडे. क्षणभर विश्वास बसत नव्हता. आज देव पावला होता आणि साक्षात देवी दर्शन देत होती. जिच्या रूपावर, अभिनयावर आणि चित्रपटांवर जीवापाड प्रेम केलं ती देवी, श्रीदेवी माझ्या रोखाने चालत येत होती. लॉबी च्या ज्या भिंतीला टेकून मी उभा होतो तिथे येऊन ती माझ्या बाजूला उभी राहिली आणि अतिशय हळू आवाजात 'टेन मिनिट्स स्टील' असं काहीतरी म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं खरं पण तिचं ते साधेपणातलं सौन्दर्य पाहून मी स्तब्ध झालो. तिच्या चित्रपटातलं लूक आणि प्रत्यक्षातली तफावत मला जाणवत होती. कसलाही बडेजाव नाही, आपण कोणीतरी आहोत हे सांगणारी देहबोली नाही, आपल्या मुलांना पिक्चर दाखवायला घेऊन आलेली आई इतकंच. काही वेळात त्याच थिएटर मधून सुधीर मिश्रा बाहेर पडला, बहुदा बॉनी कपूरच्या निमंत्रणावरून आला असावा, पण निघताना श्रीदेवीकडे न पाहताच सरळ लिफ्ट मध्ये गेला. दहा मिनिटात चित्रपट संपला, तिच्या मुली आणि त्यांच्या सात आठ मैत्रिणी बाहेर आल्या आणि श्रीदेवी त्यां
ना घेऊन लिफ्टमधून निघून गेली. श्रीदेवी आणि मी जवळपास दहा मिनिटं बाजूबाजूला उभे होतो. या सगळ्यात तिच्याबरोबर फोटो काढणं हे मला सुचलंही नाही. श्रीदेवी दिसताच एरव्ही हुशारी मारणाऱ्याची बोलती कशी बंद झाली याची चर्चा मात्र आमच्या टीम मध्ये सुरु होती.
श्रीदेवी पुन्हा एकदा गेली, कायमचीच. आज श्रीदेवी परत कधीही दिसणार नाही याचे दुःख जास्त आहे. मी ट्विटरवर तिला आणि गौरी शिंदेला फॉलो करत होतो. उत्तर मिळणं सोडा, पण ती माझे शब्द कदापि वाचुही शकणार नाही हे माहीत असून देखील काल ती गेल्यावर मी तिला एक शेवटचं ट्विट केलं.
"@श्रीदेवी, आतापर्यंत तू कोणताही चित्रपट अर्धवट सोडल्याचं ऐकलं नाही .. मग आयुष्य का !'
"@श्रीदेवी, आतापर्यंत तू कोणताही चित्रपट अर्धवट सोडल्याचं ऐकलं नाही .. मग आयुष्य का !'
Saturday, 24 February 2018
सीकेपी म्हणजे, रविवारचं मटण
सीकेपी म्हणजे बोम्बलाचं कालवण,
सीकेपी म्हणजे रविवारचं मटण,
सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा रस्सा,
सीकेपी म्हणजे रुचकर हातांचा चवदार वारसा ...
या ओळींमधला महत्वाचा भाग म्हणजे रविवारचं मटण. सीकेपी म्हणजे मटण हे समीकरणच आहे आणि सीकेप्यांचा रविवार हा सहसा 'मटण भात' या आठवडाभराची शक्ती देणाऱ्या संपूर्ण आहाराशिवाय साजराच होऊ शकत नाही या वाक्यावर मी ठाम आहे. एखाद्या रविवारी जर का चतुर्थी वगैरे येऊन घात झाला तर अनेक कायस्थांचा आठवडा खूप अशक्तपणा आल्यासारखा जातो ही वस्तुस्थिती आहे ..अगदी माझ्या बाबतीतही हे असच घडतं. जर का माझा एखादा रविवार हुकला तर सोमवारचा सत्यानाश झालाच म्हणून समजा..एक तर कारण नसताना उगीच चिडचिड सुरु होते, कामात लक्ष लागत नाही, आपण उगीचच सोमवार पाळतो - आपल्याला कुठे चांगला नवरा शोधायचाय वगैरे विचार मनात येऊ लागतात. अलीकडे मी हे दिवस आणि वार पाळणे सोडून दिलंय .. देवाने नाही फरक केला वारांमध्ये, च्यायला आपण कोण मोठे लागून गेलोय?
हं, तर आपलं मटण. मटण हा सीकेप्यांच्या घरातला एक न ठरवलेला पण यथाशक्ती यथाभक्ती साजरा होणारा इव्हेंट असतो. शनिवार संपत आला की रविवारच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होते. एरव्ही बायकोला काडीचीही मदत न करणारे सीकेपी पुरुष रविवारी मात्र मस्त तयार होऊन, हाफ पॅन्ट - टीशर्ट घालून, चांगलीशी पिशवी घेऊन बाजाराकडे कूच करतात. (या वाक्यावर शिव्या खायला मी तयार आहे, पण सत्य आहे ते सत्य आहे). यातच सीकेपी बालकांवर खाद्यसंस्कार चांगले व्हावेत म्हणून घरातल्या ५ वर्षाच्या मुलाला पण बाईकवर बसवून बाजार दाखवण्याची पद्धत रूढ आहे. 'बाबा, आपण कुठे जातोय' हे विचारल्यावर त्या छोट्याला, डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताने काहीतरी ठोकून कापल्यासारखे दाखवून, आपण मटण आणायला जातोय हे सांगितलं जातं. ते मूल पण बिच्चारं नळीबाऊ च्या लालसेने टुणकन तयार होऊन बाईकवर बसतं. आता मटण आणायला हे उत्साही लोक कुठे जातील याचा कोणी विचारपण करू शकणारं नाही. ठाण्याच्या चरईतला एखादा सीकेपी आता घोडबंदरला हिरानंदानी मध्ये शिफ्ट झाला असेल तरीदेखील मटणासाठी हा ठाण्याच्या गर्दीच्या मार्केटमधल्या अनिल गाढवे कडेच येणार. पोखरण रोडवरचा एखादा लोढा मध्ये शिफ्ट झाला असेल तरी तो त्या उपवनच्या अश्फाककडेच जाणार. मखमलीच्या शोएबचा पण तितकाच बोलबाला. खूप वर्षांपूर्वी ठाण्याचे अनेक लोक कळवा आणि मुंब्रा येथे मटण आणायला जायचे.. ताजं ही मिळायचं आणि स्वस्तही. गुडलक, जॉली, वेलकम, महाराष्ट्र, दिलखुष ही सर्वसाधारण पणे या मटणाच्या दुकानांची नावं. एरव्ही अतिशय घाईत जगणारे अनेक मोठे लोक मटणाच्या लाईनमध्ये अतिशय शांत आणि मनापासून उभे असतात. इथे एक किलो मटण घेणारा फुल वट दाखवत जरा सीना टाक, चाप टाक, गर्दन टाक वगैरे ऑर्डर देत असतो. त्याच्या मागे उभा असलेला एखादा पाव किलो मटण घेणारा निमूटपणे, मटणवाला जे काही देईल ते घेऊन समाधान मानतो. पण जर कधी याने मांडीचा भाग वगैरे मागितला तर ' पाव किलोत तुझ्या काकानी ठेवलीये का रे मांडी' असा अपमान झालाच समजा. मटण वाला हा एकमात्र माणूस असा असावा की जो जाहिररीत्या तुमची इज्जत काढू शकतो .. तुम्ही कोणीही असा. मटणाबरोबर कलेजी, खिमा, भेजा वगैरे पाहिजे असल्यास थांबायची तयारी ठेऊन आलेली मंडळी फार पूर्वी त्या मटण वाल्याकडे असलेले नयी दुनिया, इन्कलाब, अपना मसल्लक किंवा नवाकाळ असले १ रुपयात मिळणारे पेपर वाचायचे, आता मात्र मोबाईलवर चेक इन टाकत असतात. मटण घेताना मटण वाला आपल्याला चहा पाजतो हे म्हणजे तुम्ही त्याला खूप जवळ असल्याचं सूचक. मटणाला गेलं की गल्लीतले अनेक जुने मित्र पण भेटतात. तरुणपणी बाजारात न जाता रविवारी क्रिकेट खेळून महिलावर्गात लोकप्रिय झालेले हे मित्र आता मात्र घर गृहस्थीमध्ये आणि विशेषकरून घरच्या महिलेमध्ये रमल्याचे दिसतात. "कायरे आज मटण का ?" हा मूर्ख वाटणारा प्रश्न पण १० मिनिटे गप्पा मारायला पुरेसा असतो. मटण ते मटण, मटणाची सर चिकनला नाही पासून देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा त्या निसरड्या लादीवर उभे राहूनच केला जातो.
मटणबरोबर घ्यायच्या इतर अनेक महत्वाच्या वस्तूं मध्ये दोन चिल्ड बिअर किंवा एखादी चपटी घेणे हेही क्रमप्राप्तच. एकदा का मटणाची पिशवी हॅण्डलला लावली के तुमचे पाय आपोआप स्वर्गलोकिच्या सुखाला गवसणी घालणाऱ्या ब्लू हेवन वाईन्स, शंकर वाईन्स वगैरे दुकानाकडे वळतात. मित्र तिथेही भेटतात पण काळ्या पिशवीतल्या मटनामुळे घरची ओढ आज जरा जास्तच असल्याने ही मंडळी किक मारून घर गाठतात. इतक्या गर्दीत कसा नंबर लागला, वजन झाल्यावर कशी वरून जास्त चरबी टाकून घेतली अश्या विजयी सूरात पिशवी अर्धांगिनीकडे सोपवली जाते आणि नंतर मटणाबरोबर आणलेल्या आनंददायी पेयाचा आस्वाद घेणं सुरु होतं. या कार्यक्रमामुळे पिशवी दिल्यापासून ते शिजलेले ताट पुढे येईपर्यंत वेळ कसा जातो ते कळतच नाही..
स्वयंपाक खोलीच्या ओट्यापासून ते बाहेरच्या खोलीत दरवळणाऱ्या, तुमच्या नकळत नाकात शिरलेल्या त्या तिखट वासापाठोपाठ (सुगंध वगैरे काही नाही, वासच म्हणतो आम्ही) तुमच्या समोर हसऱ्या चेहेऱ्याने, आटपला का कार्यक्रम, कितीहो तुम्हाला घाई वगैरे शब्दांच्या सजावटीत ते सजलेलं ताट अवतरतं. मटणासाठीच राखीव असलेल्या भांड्यातलं रटरटणारं गरमागरम मटण वाटीत येऊन स्थिरावतं. एखाद्या खुर्चीत बसून टेबलावर ताणून पाय ठेवल्यासारखी वाटीतून फुशारकी मारणारी ती नळी, ताटात उजव्या बाजूला ती काळपट हिरवट छटा असलेली तव्यावरची कलेजी, सुगरणीचा मूड असेल तर एखादा अंड लेपून तळलेला चॉप, साधा सोप्पा कापलेला लाल कांदा, लिंबाची फोड, एखादी चपाती आणि ताटभर पसरलेला वाफाळलेला पांढरा शुभ्र भात .. यालाच म्हणतात सीकेप्यांचा रविवार.
असा रविवार साजरा झाला तर पुढचा आठवडा कडक गेलाच म्हणून समजा.
काही दिवसांपूर्वी एक गमतीदार पण पटणारी पोस्ट पहिली होती. 'सीकेपी समाज एकमात्र आहे की तो फक्त श्रद्धा पाळतो आणि मनमुराद जेवतो. पेन्शन हातात आल्यावर तो पहिला रविवार मासे आणि मटण, दुसरा रविवार फक्त मटण, तिसरा रविवार मटणात बटाटे, चौथा रविवार बटाट्यात मटण आणि नंतर पेन्शनची वाट पाहतो' अशी,रविवार साजरा करायला मटण पाहिजेच हे सांगणारी ही पोस्ट होती.
सीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं 'स्टेपल फूड' आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता.
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
Thursday, 22 February 2018
फेस ऑफ्फ ऑन फेसबुक

सध्या फेसबुकवर जे काही सुरु आहे ना ते पाहता लोक कामधंदे सोडून या ना त्या ऍप वर क्लिक करत बसतील असं वाटतंय.
म्हणजे, कोणती आहे तुमच्या मरणाची तारीख आणि कारण? ... की लागले सगळे बघायला..किती ते कुतूहल आपल्या मरणाची तारीख बघायचं. उत्तर - तुमचे मरण २०६४ साली मोटार अपघातात.. अरे वा ..इतका जगणार मी ? आणि आजपासून ४६ वर्षांनी जेव्हा मी ९८ वर्षांचा असेन तेव्हा डोळयांच्या खाचा झाल्याने मोटारखाली येऊन मेलो तरच.... पहा बॉलीवूडची कोणती हिरोईन तुम्हाला साजेशी आहे? .. डोंबल..इथे गल्लीतल्या लेंगा टेलर ची पोरगी पटवताना जीव मेटाकुटीस आला होता आणि इथे काय दिसत तर उघड्या पाठीचा डिझायनर टॉप घातलेली कॅटरिना कैफ आपल्याला साजेशी .. उगीच क्लिक करून जीवाला त्रास करून घेणे दुसरं काय..अज्जीबात झोप नाही लागली त्या रात्री काय सांगू.... 'तुम्ही स्त्री असतात तर कसे दिसला असतात?' .. अरे हे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे. काही वर्षांपूर्वी त्या फडकेच्या वाढदिवसाला सगळ्या प्रिंटिंग इंडस्ट्री नी पाह्यलंय मला स्त्रीरूपात .. कडक माल दिसत होतो असे पण काही मित्र म्हणाले...ते जाधव आणि पाटील तर अतिशय बोचऱ्या आणि वाईट नजरेने बघत होते माझ्याकडे. शप्पथ कुठून शोधतात या ऍप्स काही कळत नाही.... जाणून घ्या कोणती महान व्यक्ती होतात तुम्ही गेल्या जन्मी ?? उत्तर येतं जीजस क्राईस्ट ... बापरे ..फाईलला लावलेल्या कागदावरची टाचणी टोचली बोटाला तरी जीव जातो इथे आणि मागच्या जन्मी मी खिळे ठोकलेला जीजस क्राईस्ट.. काहीही...तसं एकदा माझा वाढदिवस ईस्टर संडे ला आला होता.....जाऊदे दुसरं काय तर ' सांगा बरं ई.स.२०२४ साली तुम्ही काय करत असाल?' ... वेडे रे वेडे ... २०२४ साली आम्ही २०२९ ला कोणत्या युतीचं सरकार येणार याच्यावर नेहेमीप्रमाणे काथ्याकूट करत भांडत असू आणि तुम्ही काय दाखवता की मी चार आंग्ल बायकांबरोबर सोफ्यावर .. छे छे .. म्हणजे मनातून कितीही आवडलं असलं तरी शक्य नाही.. अति होतंय हे सगळं. मी परवाच दुसरं कोणीतरी केलं म्हणून एका लिंकवर क्लिक केलं .. 'लोक तुम्हाला पाहून काय विचार करत असतील?' साधारणपणे .. हा खूप फुगलाय ना पिऊन, हल्ली कामधंदा करतो की फेसबुकवरच असतो, हा आता पहिल्यासारखा नाही राहिला वगैरे उत्तरं अपेक्षित होती पण उत्तर काय आलं की ' ही इज व्हेरी हँडसम, आय वूड ब्रोक विथ माय बॉयफ्रेंड फॉर हिम'.. आयला वाचून काय लाजलो सांगू मी. चारही बाजूने वाहणाऱ्या माझ्या सारख्या सुटलेल्या देहाच्या पुरुषासाठी ही तिचा सिक्स पॅक बॉय फ्रेंड सोडणार ..वा वा वा ..डोळ्याचं पारणं फिटलं, मोबाईलकडे लक्ष गेलं, बायकोचा फोन खणखणत होता, फेस बूक बंद केलं, साला आपलं बरं चाललंय.. ते उगीच ब्रोक व्हायचं, नकोच ते. पण चुकून, म्हणजे तितकं ही चुकून नाही पण ते फेस बुक वर पोस्ट झालं. तसा मी सुखरूप आहे अजून म्हणा. बरं अजून एक गमतीदार लिंक, कोणत्या राजकीय व्यक्तिमत्वाचा चेहेरा तुमच्या चेहेऱ्याशी साम्य ठेवतो? हे ऍप तर शहाण्याने कधीही क्लिक करू नये .. दोनच पर्याय येतात .. दुसऱ्यांच्या वाटेला नेहेरू आणि माझ्या नशिबी राहुल गांधी. अरे आमचे बाळासाहेब, राज ठाकरे, ज्योतिरादित्य सिंदिया, शशी थरूर, राजीव गांधी वगैरे देखणे पर्याय पण ठेवा की, पण नाही.
भविष्यात हे फेसबुक वाले, उद्या सकाळी तुमच्या दारात वसुली साठी कोण येणार ? उद्या तुमची बायको तुमच्यापुढे काय विषय काढणार? येत्या दिवाळसणाला सासुरवाडीहून कोणती भेट मिळणार ? २०१९ मध्ये तुमच्या वाढलेल्या पोटाचा घेर किती असेल ? २०२४ मध्ये तुमच्या बिल्डिंगच्या नळाला २४ तास पाणी (महिन्याला) येईल का? अशा ऍप्स आणि लिंक्स ही काढतील.असो.
एक मात्र नक्की, वातानुकूलित ऑफिसमधल्या गुबगुबीत खुर्चीवर कामाच्या वेळांत व्यतीत होणाऱ्या अतिशय खडतर आयुष्यात, कुठेतरी जीव रमवण्याच्या प्रयत्नात केलेल्या एका क्लिकवर क्षणिक सुखाचा आनंद देणाऱ्या या ऍप्स आणि लिंक्स तुम्हाला स्वप्नांच्या जादुई दुनियेत नेऊन ठेवतात .. फक्त ते राहुल गांधी सोडून बरका.
Subscribe to:
Comments (Atom)







