सॅम, यार तू नेहेमी खाण्यावर लिहितोस कधी आपल्या पिण्यावर पण लिहून काढ ना.. माझ्या दोन व्हाट्सअप ग्रुप च्या मित्रांनी मला केलेली विनंती ऐकून घसा कासावीस झाला. तसं पाहता मी काही सलीम दुराणी काका सारखा पब्लिक डिमांड वर सिक्सर मारणारा गडी नाही तरीही मी हे चॅलेंज घेतलंय.(बाय द वे, सलीम दुराणी काकांना पण बिअरचा ग्लास भरून देणारा भाग्यवान आहे मी) तर काय म्हणत होतो मी, घसा कासावीस झाला. सर्व साधारण अशा मागणीने मन भरून येतं. पण या ग्रुप ची नावं ऐकलीत तर तुम्हालाही कळेल मनामध्ये काय काय भरून येतं ते. एका ग्रुपचं नाव आहे 'चिअर्स' आणि दुसरा ग्रुप आहे 'गोवा चलो'. काय कल्पकतेनी नाव ठेवतात ही मंडळी. नावातच फसफसणारी बिअर आणि समुद्रावरच्या धुंदीचा आनंद दडलाय. बरं तसं पाहिलं तर मी पण पितो, नाही असं नाही, पण म्हणून डायरेक्ट पिण्यावर लिहायचं म्हणजे थोडं जोखमीचं काम. म्हणजे एक तर मी लिहिलेलं त्या मद्यरसिक मित्रांना आवडलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे मी लिहिलेलं बऱ्याच जणांच्या पचनी पडणार नाही, ते बोंबाबोंब करतीलच याची भीती. खरं पाहता ते पण पितात पण गपचूप, लपून, दुसऱ्याच्या पार्टीत, बाहेरगावी, बायको गेली की वगैरे. पण आम्हा पट्टीच्या पिणाऱ्यांचं तस नाही. प्यायची तर राजरोस पण दररोज नव्हे. प्यायची तर आपल्या मित्रांबरोबर, कुटुंबीयांबरोबर, मर्जीने आणि मनापासून आणि अर्थातच जबाबदारीने. प्यायची तर आनंदाच्या मूडमध्ये, रागात आणि दुःखात नाही. जसं उत्तम खाण्यासारख सुख नाही तसच उंची दारू पिण्यासारखा आनंद नाही. दारू,जरी स्कॉच किंवा सिंगल माल्ट जरी असली तरी तिचा उल्लेख पिताना दारू म्हणूनच जे करतात तेच खरे मद्यपी. मला तर हा मद्यपी शब्द पण खूप आवडतो .. त्या शब्दातच 'मद्य पी' असा आग्रह आहे. चल ड्रिंक घेऊ या असे बोलून घेतलेल्या द्रव्यात ती मजा नाही..नुसतं औपचारिक वाटतं. असो.
दारू पिताना माणूस नको इतका प्रामाणिक, प्रांजळ, प्रेमळ आणि दिलदार असतो. एक दोन पेग नंतर तर जगातली कोणतीही गोष्ट तो आपल्या मित्रांसाठी देऊ शकतो, नव्हे, उद्याच्या उद्याच द्यायची त्याची तयारी असते. जगाच्या पाठीवर चाललेल्या सर्व घडामोडींवर येथे साधकबाधक चर्चा होते इतकंच नव्हे तर त्याची सोल्युशन्स पण त्या टेबलवर तयार असतात .. दुर्दैवाने ट्रम्प, पुतीन वगैरे मंडळी वेळेअभावी या गुत्त्यांवर येऊ ना शकल्यामुळे जग फार चांगल्या चांगल्या सूचनांना मुकत असावं. इथे कोणी शत्रुत्व घेऊन प्यायला बसत नाही, इथे मिळत फक्त आणि फक्त प्रेम. आणि आग्रह ?, तो तर विचारूच नका राव. तुमच्या सासुरवाडीच्या लोकांनी पहिल्या सणाला पण केला नसेल असा आग्रह तुम्हाला फक्त दारूच्या टेबलवरच केला जातो.. आणि खरं सांगायचं तर हा आग्रह नुसता फॉर्मॅलिटी असतो..आग्रहाच्या आधीच ग्लास भरलेला असतो. बिअर ही दारू नसते, वाईन चढत नाही, वोडका बटाट्यापासून बनते आणि ते म्हणजे रशियाचं राष्ट्रीय पेय आहे, जीन फक्त लेडीज पितात, सिंगल माल्ट मध्ये सोडा घालणारे महामूर्ख हे सर्व ज्ञान तुम्हाला इथेच मिळते. इथे दिल्या जाणाऱ्या शिव्या कोणालाही कुठेही लागत नाहीत.. प्रत्येक घोटा बरोबर शिव्यांचा चाखणा नसेल तर काय मजा.
दारू पिताना अनेक विषयांचे,अनुभवलेल्या घटनांचे आणि नको असलेल्या ज्ञानाचे पाट वाहात असतात. शेजारच्या बिल्डिंगमधल्या भाभीपासून ते सनी लिओनी पर्यंत, एखाद्या नगरसेवकापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल, टुकार टेलिव्हिजन शो पासून ते अमिताभच्या मानधनाबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळतात. त्यातच, आपण कसे सगळ्यांना क्लोज आहोत, आपण त्या त्या प्रसंगी कसे वागलो, नाकाबंदी वाल्या पोलिसांना कसे पटवले, एखाद्या मित्राला घरी सोडायला गेलो असता त्याच्या बायकोने काय राडा घातला याच्या सुरस कथा तुम्हाला फक्त आणि फक्त दारूच्या टेबलावरच ऐकायला मिळतात. रामजी, कृष्णा, मीरा, शंकर, गणेश, भक्तिमंदिर, हृषीकेश, गंगा, अमृत अशा पावन नावांनी चालणाऱ्या या बार्स मध्ये पापी माणसाला पण शुद्ध करण्याची क्षमता असते. ढसाढसा ढोसल्यानंतर ढसाढसा रडून आपल्या चुकांची कबुली देणारे अनेक मित्र आणि मोठ्या मनाने त्यांना माफ करणारे त्यांचे खरे मित्र तुम्हाला येथेच मिळतात. दर ग्रुपमध्ये एकजण तरी असा असतो की त्याची एखाद्या वेटरशी किंवा बार मालकाशी चांगली ओळख असते (किंवा असे भासवले जाते) साधारणपणे इथे सर्व ऑर्डर हाच देत असतो. याच ग्रुपमधला एक जण न पिता नुसता थम्सअप वगैरे पीत इतरांची मजा बघत असतो. नंतर इक्वल काँट्रीब्युशन करताना याची मजा बघण्यासारखी असते ..बघा तुम्ही. यातलाच एखादा सगळ्या पिणाऱ्यांची जबाबदारी घेणारा असतोच असतो.. बस्स कर रे, तुला जास्त झालीय, त्रास होईल वगैरे हाच माणूस फुल्ल तऱ्हाट मोड मध्ये बोलत असतो. एखादा मित्र दारू पिऊन आऊट झाल्यानंतर त्याला परत शुद्धीत आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात पाहायला मिळणार नाहीत. लिंबू काय, पाव काय, डोक्यावर सोडा ओतणे काय किंवा त्याचे केस ओढणे काय सगळं कस शास्रोक्तपणे करतात. मुख्य म्हणजे या प्रसंगी बारमधले सर्व च्या सर्व तुमच्या मदतीला येऊन अजून काही उपाय करता येईल या याचापण विचार करतात. तो मित्र ओकला तरी त्याला फार गिल्टी वाटून न देण्याचं कसब इतरांकडे आपोआप येतं. एकूण काय, तर जगातल्या सर्व कटकटींपासून दूर नेणारी ही दारू म्हणजे तमाम मित्रमंडळांना सुखदुःख वाटायची एक छान संधी देते...खरं पाहता दारूच्या नशेपेक्षा मैत्रीचा बहर जास्त चढलेला असतो.
ठाण्याच्या एका बारमध्ये मी आणि एका मोठ्या कंपनीच्या उच्च पदावर असलेला माझा मित्र आपल्या देशाच्या एव्हिएशन इंडस्ट्री साठी इम्पोर्ट पॉलिसिज वर गहन चर्चा करत असता आमच्याच टेबलवर बसलेल्या दोन मित्रांचे बोलणे ऐकले.( हो,हो. काही बारमध्ये तुमच्या बाजूला दुसरे पण येऊन बसू शकतात, त्यांचं बिल आणि विषय वेगळे असतात तरीही पहिल्या आलेल्या ग्राहकाला त्रास होत नाही, ही आपलेपणाची भावना फक्त बारमध्येच पाहायला मिळते) हं तर आम्ही काही कोटीच्या गप्पा मारत असताना त्या दोघांमध्ये रिक्षाचा सायलेन्सर फाटल्यावर गण्या मेकॅनिक बेस्ट आहे कि सुलेमान बेस्ट आहे या विषयावर वर गंभीर चर्चा सुरु होती.ते ऐकून आम्ही धन्य झालो. त्या दोन्ही रिक्षावाल्यानी नकळत आमचं विमान जमिनीवर आणून ठेवलं होतं. एक ना दोन अशा अनेक घटना तुम्हाला फक्त बार मधेच पाहायला आणि ऐकायला मिळतात.
माझा हा लेख दारू ला लोकप्रिय करणे किंवा दारूचे उदात्तीकरण करणे या उद्देशाने लिहिलेला नसून,माझी बोली भाषा समृद्ध करणाऱ्या त्याच टेबलावरच्या माझ्या मित्रांच्या विनंतीला मान देऊन लिहिण्यात आलेला आहे याची टीकाकारांनी नोंद घ्यावी. जास्त जहरी टीका केल्यास, तुमच्या टीकेला उत्तर द्यायला वरीलपैकी कुठेही तुम्हाला आमंत्रित केले जाईल याचीही तयारी ठेवा.
शेवटची दोन वाक्य माझ्या आणि एकूणच दारू या विषयाचा आनंद घेणाऱ्या मंडळींसाठी.
दूर गेलेल्या नात्यांना जोडते ती दारू, मात्र जोडलेली नाती दुरावण्यास ती कारणीभूत होऊन देऊ नका आणि जेव्हा कधी प्यायला बसाल तेव्हा या पीण्याशिवाय, "घरची ओढ" नावाची एक जगावेगळी नशा आहे हे विसरू नका.



