Monday 19 August 2019

दिलखुष 'बरोडीअन' डिलाइट्स by Vishakha Chitnis



कधी कधी मी असा बिनकामाचा बसलेला असतो ना तेव्हा (बेकार बसलेला असतो बोलणे सॉलिड बेकार वाटतं) जवळच्या शेल्फ मधून एखाद पुस्तक घेऊन चाळतो .. दोन चार पानं वाचायची आणि सोडून द्यायची असा विचार करून हातात घेतलेले पुस्तक मात्र कधी कधी खाली ठेववत नाही. साधारणपणे कादंबरी किंवा कथासंग्रह टाईप च्या पुस्तकांमध्ये हे घडतं पण पाककृतींचे पुस्तक घेतलं आणि वाचून काढलं असं कधी होतं का हो ? नाही म्हणजे ते लिहिणारा ते हजारदा वाचत असेल असं पण ज्याला जे शिजवायचंय त्यानी ते वाचून पुस्तक परत जागेवर ठेवणे  हा साधा नियम आहे. बरं मी  ऐतखाऊ खवय्या, मला ना काही बनवता येत ना मला काही बनवायला शिकायचंय - कशाला उगीच शिकायचं ? हे सगळे शेफ, या जगातल्या सुगरणी कशासाठी जन्माला आल्यात. आपण फक्त मनसोक्त खायचं, कमीजास्त असेल ते सांगायचं, चांगल्याच तोंडभर कौतुक करायचं आणि चांगलं नसेल तर ' यावेळी थोडं वेगळ्या पद्धतीने केलंस का गं' असं विचारून गप्प बसायचं. उगीच तुला माझ्या हातचं आवडतच नाही, बाहेरचंच आवडतं वगैरे लफडी नकोत. असो. माझा विषय चाललाय माझ्या संग्रही असलेल्या ( फुकट मिळालेल्या ) एक पाककृतींच्या पुस्तकाचा. या पुस्तकाच्या नावातच वेगळेपण - पाककृतींचे पुस्तक कोणी घराच्या नावावरून ठेवतं का हो ?  म्हणजे 'नारायण निवास रेसिपीज' किंवा 'रख्माछाया पाककृती' असे कधी वाचलंय का तुम्ही.नाही ना ?  पण इथे वेगळेपण या घराच्या नावातही आहे. मी बोलतोय
एका घराच्या उबदार आणि चवदार आठवणीतून ठेवलेल्या  'दिलखुष' डिलाइट्स या पुस्तकाबाबद्दल.

पहिल्या पावसाळी सीकेपी फूड फेस्ट मध्ये अनेक पाककृती लिहिणाऱ्या जवळपास २७ लेखिकांचा आम्ही सत्कार केला होता. त्यातल्या एक होत्या गुरगाव येथे राहणाऱ्या विशाखा चिटणीस. तेव्हा त्यांनी मला भेट म्हणून दिलेलं पुस्तक मी वरवर पाहून ठेवलं होतं पण काल पुन्हा एकदा पाहिलं आणि दिलखूष झालं. एकतर माझा धंदा प्रिंटिंगचा - त्यामुळे काहीही छापील हातात आलं की आपल्यापेक्षा चांगलं किंवा आपल्यापेक्षा वाईट या दोन विभागातच त्या छपाईची मोजदाद होते. तर हे पुस्तक माझ्यापेक्षा चांगलं या कॅटेगरीतलं म्हणून समजा. म्हणजे आमचं प्रिंटिंग वाईट नाही बरं - नाहीतर खायच्या पुस्तकावर लेख लिहून आमचे खायचे वांदे व्हायचे. अतिशय लोभस मुखपृष्ठ - त्यावर दिलखुष या बडोद्यातल्या दिघ्यांच्या घराचा फोटो आणि सभोवताली सीकेपी पदार्थांचे वेधक फोटो, ट्रॅडीशनल बरोडीअन सीकेपी रेसिपीज अशा टॅगलाईनसह बऱ्यापैकी मोठ्या आकाराचं पुस्तक  - आतला उत्कृष्ट कागद आणि तितकीच नाजूक छपाई.  आजी मनोरमाबाई दिघे या सुग्रणीला समर्पित केलेलं आणि ज्या घरात या सगळ्या पाककृती नांदल्या त्या घराचं नाव  अभिमानाने मिरवणारं हे अप्रतिम पुस्तक तुम्हाला सीकेपी स्वयंपाकाची एक अनोखी सफर घडवतं.  या पुस्तकातील शेफ आशिष भसीन यांच्या प्रस्तावनेतील एक वाक्य मला खूप आवडलं - ते लिहितात ' The variety in their (CKP) non vegetarian dishes is truly fascinating  as are the vegetarian ones. The dishes are delicately flavored - light on the tongue and easy on stomach.  हे पुस्तक इंग्रजी मध्ये आहे पण प्रत्येक पाककृतींचे नाव मात्र अस्सल सीकेपी पद्धतीनेच लिहिलेलं - इंग्रजीबरोबर ठसठशीत मराठीत.

मला हे पुस्तक आवडलं याच मुख्य कारण म्हणजे त्यांनी पदार्थांना दिलेला क्रम - ज्या पुस्तकाची सुरुवातच 'सोडे घालून भरली वांगी, सोड्याचे कालवण , सुक्या बोंबलाचे कालवण आणि जवळ्याची चटणी' या स्वर्गलोकीच्या पदार्थांनी होते त्या पुस्तकावर माझ्यासारखा सीकेपी जीव ओवाळून न टाकेल तर काय.  'खारे केशरी मटण' हा मी न ऐकलेला प्रकार यात आहे. 'खिम्याच्या गोळ्याची आमटी' हाही जरा वेगळंपण असणारा पदार्थ,  'मेंदूची मिरवणी' हा पण एक वेगळाच शब्द - साधारणपणे आपण महाराष्ट्रात 'भेजाची' असं बोलतो पण बरोडीअन या शीर्षकाखाली असल्याने गुजरातेतील बोली भाषेचा प्रभाव या मिरवणीच्या नावावर झाला असावा.  शाकाहारी पदार्थांमध्ये सुद्धा मसुऱ्याची आमटी, मुगाचे बिरडे, वालाचे बिरडे आणि अगदी वरण सुद्धा. वरणाची रेसिपी तर वरण करण्याइतकी सूटूसुटीत. 

बाकी सीकेप्यांचे श्रद्धास्थान असलेले  कानवले, उकडीचे मोदक, निनावं, नारळाचे लाडू,  भरली केळी यांचा समावेश सुद्धा या पुस्तकात आहे. सीकेपी सुगरण म्हटलं की ती सीकेपी पदार्थांवर थोडीच थांबणार - म्हणूनच जोडीला म्हणजे पुस्तकाच्या शेवटल्या भागात थोड्या इतर प्रांतातल्या पदार्थाना आदर देत 'आदर्स' (Others) या सदराखाली बदामी मुर्ग, कबरगा, भूना गोश्त, मुलतानी मासा वगैरे डिशेश सुद्धा दिल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे पुस्तकाच्या सुरुवातीला 'टिप्स फॉर वर्किंग वूमन' या शीर्षकाखाली धावपळीच्या जीवनात काय सोप्प पडेल ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मी चारवेळा वाचलं तरी यातलं काही स्वतः बनवीन असं वाटत नाही पण येणारा एखादा रविवार त्याच लाल विटांच्या अस्सल सीकेपी घरातला दिलखुष माहोल आपल्या घरात आणण्याचा प्रयत्न घरातल्या महिला आघाडीला सांगून तरी नक्कीच करीन.

आणि महत्वाचं .. केशरी मटणाची रेसिपी सांगा - विशाखाताईंचा फोन नंबर द्या - पुस्तक कुठे मिळेल वगैरे कॉमेन्टमध्ये टाकण्याच्या आतच सांगतो - ताई, हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे, ही घे लिंक.
https://www.amazon.in/Dilkhush-Delights-Presents-Traditional-Barodian/dp/1945688637

Sameer Gupte
Founder - CKP Food Fest
#samhere #sameer6949@gmail.com
#CKPfood #recipe #book #dilkhus_delights

Wednesday 31 July 2019

#फ्लॅशबॅक श्रावण

श्रावण ... नाही रे बाबांनो, प्रत्येकवेळी श्रावण पाळा - पळू नका वगैरे नाही सांगत मी. जे जमेल ते करा. पण श्रावण सुरु झाल्यावर मराठमोळ्या सणासुदीची जी सुरुवात होते त्याबद्दल हे थोडंसं. काल इगतपूरीहून परतताना नाशिक च्या रस्यावर त्या बायका बसतात ना ताजी भाजी, करटुली आणि काकड्या विकत, त्यातल्या एकीकडे मी मोठ्या काकड्या नाहीत का असं विचारलं. 'आता कुठे दादा, येळ हाय अजून - त्या स्रावनात नायतर गंपतीला मिलनार'  या उत्तराने खरंतर तिथेच माझ्या मनातला श्रावण सुरु झाला.

दिव्यांची अमावस्या संपून उजाडणारा दुसरा दिवसच श्रावणाचे शेकडो रंग घेऊनच उगवतो. आसपासच्या शेवाळानी हिरव्यागार झालेल्या भिंतींवरच्या तेरड्याला हळूहळू बहर येत असतो.  पहिल्या दिवसाचा वार कुठलाही असो आपोआपच सोमवारच्या केळीच्या पानावरच्या जेवणाची ओढ सुरु होते. माहित नाही आता किती जण केळीची पाने आणून जेवतात, पण मला मात्र त्याच फार अप्रूप आहे. मराठी वर्षातला हा पाचवा महिना मला मराठी शाळेतल्या पाचवीपासून समजायला लागला. शाळेतले मुलींचे श्रावणी शुक्रवार आणि मुलांचे श्रावणी शनिवार आता साजरे होतात का याची कल्पना नाही पण मी मात्र त्यातला प्रत्येक दिवस मनमुराद साजरा केलाय. श्रावण म्हणजे आपल्या मराठी सणांची सुरुवात आणि सणवाराचं कौतुक असलेल्या सीकेपी घराघरात साजरा होणारा श्रावणातला एकेक सण म्हणजे खाण्याची चंगळच चंगळ.  पहिला शुक्रवार म्हणजे तर आमचा देव्हारा बघण्यासारखा. प्रिंटिंग चे तंत्र कितीही बदललं असलं तरी जिवतीचा फोटो तोच- अगदी तसाच पुठ्यावर चिकटवलेला. तिच्या जवळ मांडलेले आघाड्याच्या पानावर ठेवलेले ते सात खडे. तेच चणेगुळ आणि आरत्यांचं वाण. मग जेवायला ते भरलेलं ताट.
मग येते नागपंचमी.  नागपंचमीला आदल्या रात्री काळसर पाटावर चंदन-हळद ओली करून माचीस च्या काड्यांनी काढलेले नाग - नागिणी आणि कुळे. आम्ही त्यांना सापाची मुले म्हणायचो. दुसऱ्या दिवशी हळद, कुंकू, लाह्या, अक्षता,नागवेल,  केवडा, पत्री, चणे, दूध आणि फुलांनी सजलेला तोच पाट अजून डोळ्यासमोर आहे. या दिवशी घरात पालेभाजी किंवा फळभाजी चिरणे कापणे हा प्रकार नाही. काही दिवसात येणारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हणजे अक्षरशः धमाल दिवस.  हल्लीहल्ली हे रक्षाबंधन वेगळ्या दिवशी यायला लागलंय. पहिले हे दोन्ही एकत्रच असायचे. कळव्या च्या खाडीवरची जत्रा खारकर आळी पर्यंत पसरलेली असायची. रंगीबेरंगी टोप्या - पिपाण्याचे आवाज- लाकडी पाळणे - शेकडो खेळण्याच्या आणि खाण्याच्या दुकानांमुळे परिसर दुमदुमलेला. अंबाड्यावर टिपिकल वेणी घालून सोन्यानं नटलेल्या असंख्य कोळी स्त्रिया, मुलांना खांद्यावर बसवलेले आईबाबा, टवाळक्या करायला आलेली मवाली कार्टी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला कितीतरी पोलीस. इथे घरात झाडून सर्व चुलत -आते - मामे भावंडं आणि देवाला वरण पुरणाचा नैवद्य त्याबरोबर वर्षातून  एकदाच मिळणारा नारळी भात. केवळ अविस्मरणीय. मग मधेच पंधरा ऑगस्ट येऊन जायचा. यानंतरचा  मोठा सण म्हणजे गोकुळ अष्टमी. आमच्या घरात जरी कृष्णजन्म वगैरे नसला तरी आजूबाजूला असलेल्या सिकेपी घराघरात भरली केळी, घुगऱ्या, वाटाण्याची खिचडी, बोटव्याची खीर असा नैवेद्य असायचा.
गटारी अमावस्येपासून पिठोरी अमावस्येपर्यंतचा हा काळ म्हणजे जणू कायस्थांचा शाकाहारी महोत्सवच. काही आसपास उगवणाऱ्या तर काही बाजारातून आणलेल्या वेगवेगळ्या भाज्या, तऱ्हेतऱ्हेच्या आमट्या आणि गोड पदार्थांची रेलचेल असणारा,  मटण - मच्छीची आठवणही येऊ नये इतका हॅपनिंग असा हा श्रावण महिना आता फक्त पाळणार की नाही पाळणार यावरच येऊन थांबलाय. जवळपास चार ते पाच श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार - शनिवार आणि हे इतर मोठे सण असलेला भरगच्च श्रावण महिना येऊ घातलेल्या गणपतीला काय काय करायचं याच्या गप्पांनीही फुलायचा. अवघ्या चराचरालाच नवं रूपडं देणाऱ्या या श्रावणातल्या सणांच्या माझ्या स्मृतींतील या श्रावणसरी अशाच वर्षांनुवर्षे मनात रुंजी घालतच राहतील आणि त्या सुखावणाऱ्या आठवणीनी बहरून जाईल आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक श्रावणातला प्रत्येक दिवस... हिरवागार ! 

तुम्हा सर्वाना या आनंददायी श्रावणाच्या शुभेच्छा !
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
 

सीकेपी फूड फेस्ट झाला पंचतारांकित

बडोद्याच्या फाईव्ह स्टार ग्रँड मर्क्युरी सूर्या पॅलेसमध्ये  साजरा होतोय सीकेपी खाद्य जल्लोष
सीकेपी पदार्थ आता पंचतारांकित मेनूवर विराजमान 🦀🦐🐟

१४ फेब्रुवारी २०१४ ...  मागे वळून पाहताना आज हा दिवस ऐतिहासिक वाटतो. खरतर हा दिवस प्रेम दर्शविण्याचा आणि याच दिवशी ज्याच्यावर माझं तुफान प्रेम आहे असा पहिला सीकेपी फूड फेस्ट संपन्न होत असताना तिथे लोकं येतील कि नाही हा विचार मनाला स्पर्शलाही  नव्हता. पण मला या फेस्ट ला ज्या उंचीवर न्यायचं आहे तिथे नेऊ शकेन कि नाही हे  त्यानंतर अनेक दिवस अनेक महिने मनात येतंच राहीलं. यानंतर अनेक ठिकाणी अनेक ज्ञातिबांधवानी असेच फेस्ट केले - यशस्वी सुद्धा झाले. तरीही काहीतरी राहिलच होतं. मात्र आज ते पूर्ण झालं - माझ्या आवडत्या खाद्यपदार्थांची  - माझ्या समाजातील लाखो माता भगिनींच्या रुचकर हाताची चव सीकेपी घराघरातून लोकांपर्यंत पोचू लागली अगदी काही धडाडीच्या मंडळींनी रेस्टोरेंट्स सुद्धा सुरु केली पण आज खऱ्या अर्थाने आपल्या या सुग्रणींच्या रुचकर वारशाला लोकमान्यता मिळाली .. तुम्हा सर्वांचं अभिनंदन भगिनींनो, मातांनो आणि मैत्रिणींनो सुद्धा ! आज इतिहासात प्रथमच सीकेपी फूड फेस्ट बडोद्याच्या शानदार अशा 'ग्रँड मर्क्युरी वडोदरा सूर्या पॅलेस' या 'पंचतारांकित हॉटेल' मध्ये संपन्न होत आहे ...आणि तोही सलग दहा दिवसांसाठी. जगभरातून बडोद्याला येणाऱ्या हजारो पर्यटकांना हे २६ जुलै ते ४ ऑगस्ट असे सलग दहा  दिवस सीकेपी भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. आणि या फेस्टची जबाबदारी आपल्या समर्थ खांद्यावर पेलली आहे माझे मित्र बडोद्याचेच रेस्टोरेंट / केटरिंग व्यावसायिक आपले ज्ञातिबांधव श्री नरेंद्र गडकरी, त्यांच्या अर्धांगिनी सौ. सुहासिनी गडकरी आणि त्यांच्या भगिनी सौ. अरुंधती गाएकवाड यांनी - संपूर्ण घरच इथे उभे असल्याने यश हमखास यात वाद नाही. गेल्या वर्षीच्या पावसाळी भाज्यांच्या सीकेपी महोत्सवात श्री गडकरी यांचा सीकेपी हॉटेल उद्योजक  म्हणून सत्कारही केला गेला होता.

आतापर्यंत पंजाबी,  साऊथ इंडियन, गुजराती, चायनीज, थाय अशा प्रकारचे फेस्टिवल या पंचतारांकित हॉटेल्स मध्ये होतंच असतात. परंतु गेल्या पाच वर्षातील सीकेपी पदार्थांना मिळणारी प्रसिद्धी, शेकडो वर्षांच्या पाक कौशल्याचा वसा आणि त्या चवीने लाखोंना घातलेली भुरळ यामुळेच आज असे नामांकित पंचतारांकित हॉटेल्स सीकेपी फूड ला पसंती देऊ लागले आहेत. हळू हळू का होईना त्यांच्या मेनूवर सीकेपी पदार्थ दिसू लागले आहेत.  हल्ली हल्ली अनेक इंग्रजी नियतकालिके सुद्धा सीकेपी पदार्थांना मुबलक प्रसिद्धी आणि सन्मान देऊ  लागले आहे.

कितीही लोकप्रिय असलं तरी एखाद्या पंचतारांकित हॉटेल ने असा सीकेपी फूड फेस्ट आयोजित करणे हे 'खायचं' काम नाही. मला नरेंद्र गडकरी यांचं कौतुक करावस वाटतं की त्यांनी या हॉटेलच्या व्यवस्थापनाला सीकेपी पदार्थांची योग्य ती माहिती पुरवून तंतोतंत तीच चव खवय्यांना देण्याची हमी सुद्धा दिली. आणि इतकच नाही तर रोज वैविध्यपूर्ण मेनू, त्यामध्ये लागणारे कमर्शिअल प्रेझेन्टेशन आणि कुतूहलाने चौकशी करणाऱ्या अनेक खवय्यांना सीकेपी म्हणजे काय हे समजावणे तेही गुजरातेत ..सोप्प नाही हो. सीकेपी घरातल्या कांदा टोमॅटो च्या  कोशिंबीरीला, काळ्या वाटाण्याच्या आमटीला आणि बेसन लाडूला सुद्धा आज मानाच्या खुर्चीवर नाही तर सन्मानाच्या पंचतारांकित टेबलावर स्थानापन्न होण्याचं मान मिळाला तो या गडकरी साहेबांच्या प्रयत्नांमुळे आणि सूर्या पॅलेस च्या व्यवस्थापनाने सीकेपी पदार्थांवर दाखवलेल्या विश्वासामुळेच. मसाले भात,  भरल्या मिरच्या, भरली केळी, निनावं, पुरणपोळी, भरली वांगी, कोथिंबीर वडी, वांग्याचे काप, मच्छीचं भुजणं,लिप्ती कोलंबी, सुरमईचं कालवण (फिश मसाला नाही) एकाहून एक सीकेपी पदार्थ तेही अस्सल सीकेपी नावांसहित. यातला जवळा पाव ही डिश पाहिलीत तर आपल्याला इतक्या राजेशाही पद्धतीने सादर केलं जाईल हे त्या जवळयांच्या जमातीने स्वप्नातही पाहिलं नसेल.  फेस्टिवलला गेल्या दोन दिवसातला मिळणार प्रतिसाद बघून 'अपना दिल खुश हो गया !' .. अगदी तिकडच्या भाषेत बोलायचं तर  ''बहुच ऐटले, बहुच सरस ...मजा आवि गयी भाय !" 

मित्रांनो .. आज खरंच काहीतरी केल्याचं समाधान आहे. आपल्या या स्वर्गीय चवीच्या सीकेपी खाद्यसंस्कृतीचा झेंडा आंतरराष्ट्रीय क्षितिजावर फडकावा या स्वप्नाची सुरुवात तर झाली. जे अन्न खाऊन मोठा झालो त्या अन्नाला खऱ्या अर्थाने जागलो आणि त्याला त्याचे योग्य स्थान मिळवून देण्याचे  प्रयत्न सफल झाले हे वाक्य आज मी अधिकाराने म्हणू शकतो. अर्थात यात मोठा वाटा नरेंद्र गडकरी यांच्या बरोबर तुम्हा सर्व सुग्रणींचा आणि चोखंदळ खवय्यांचाच.आज याच हॉटेल मधील एक व्हिडीओ पहिला त्यात नरेंद्र गडकरी यांनी माझा सीकेपी फूड फेस्ट चा संस्थापक म्हणून केलेला उल्लेख खरंच खूप काही देऊन गेला. मनस्वी आभार !

सीकेपी म्हणजे रविवारचा मटण, सीकेपी म्हणजे बोम्बलाच कालवण, सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा रस्सा आणि सीकेपी म्हणजे रुचकर हातांचा चवदार वारसा या ओळी जगमान्यतेकडे जायला आता फार वेळ लागणार नाही. व्यवसायाच्या संधी शोधणाऱ्या सीकेपी गृहिणींना स्वतःकडच्या कौशल्याला व्यावसायिकतेकडे न्यायला बडोद्याच्या पंचतारांकित हॉटेलमधला हा सीकेपी फूड फेस्ट नक्कीच प्रवृत्त करेल. बडोद्यात असाल तर नक्कीच भेट द्या आणि बाहेर असाल तर या निमीत्ताने बडोद्याला जायचा एक प्रयत्न नक्की करा.. कदाचित मी सुद्धा तिथेच असेन माझ्या लाडक्या पदार्थांना पंचतारांकित झालेलं याची डोळा पाहायला.

समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट.

Wednesday 20 March 2019

२० मार्च, पाणी आणि सीकेपी समाज

गेल्या वर्षी पुणे येथे सीकेपी फूड फेस्ट आयोजित करताना मिनरल वॉटर च्या स्टॉलसाठी फोनवरून एका कंपनीशी चर्चा सुरु होती. त्या कंपनीतर्फे फोन करणाऱ्या माणसाचे नाव एल्विस वूल्गर असे होते आणि अतिशय नम्रतापूर्वक हा माणूस माझ्याशी बोलत होता. त्याने मला त्यांच्या डेक्कन येथील कार्यालयात बोलणी करण्यास बोलवले. मोबाईलवर त्याने जेव्हा पत्ता पाठवला तेव्हा 'ट्वेंटीएथ मार्च वॉटर्स' नावाने ही कंपनी असल्याचे कळले. का बरं हे नाव असेल या ब्रॅन्डचं? असे कुतूहल मनात ठेऊनच मी त्यांच्या कार्यालयात गेलो. त्या कंपनीचे प्रमुख संचालक श्री अविचल धीवर दरवाजातच माझ्या स्वागतास उभे होते. आणि भेटताक्षणीच मी माझा पहिलाच प्रश्न त्यांना विचारला की  '२० मार्चला तुमचा वाढदिवस वगैरे असतो का ?'. त्यांच्याच कंपनीच्या  पाण्याची छोटी बाटली माझ्या हातात देऊन म्हणले घ्या साहेब पाणी प्या, बघा कसं वाटतंय. पाणी हे पाण्यासारखंच होतं म्हटलं छान आहे पण माझ्या प्रश्नाचं काय ? तर म्हणाले अहो गुप्ते तुमच्यामुळेच तर हे शक्य झालंय. माझी या माणसाबरोबर ओळख नाही, कधी भेटलो नाही, कुठं नाव ऐकले नाही मग माझ्यामुळे कसं बरं- पण त्यांनी लगेच सांगीतले - गुप्ते साहेब तुमच्या सीकेपी समाजामुळेच २० मार्च हा दिवस आम्ही पाहू शकलो. तुमचा समाजातील पुरोगामी विचारांचे नेते आमच्या पाठी उभे राहिले म्हणून २० मार्च या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  महाड येथे चवदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह यशस्वी केला. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला होता. डोळ्यासमोर इतिहासाच्या पुस्तकातील बाबासाहेबांचे हातात पाणी घेतलेले चित्र डोळ्यासमोर आले.  क्षणभर आपल्या ज्ञातीतील समाजसुधारकांचा मलाच विसर पडला की काय या भावनेने मला स्वतःची लाजही वाटली होती. आपल्या समाजाबद्दल इतक्या जिव्हाळ्याने आणि आदराने बोलणारी अविचल धीवर ही व्यक्ती मात्र मला मनातूनच भावली होती. गप्पा झाल्या - कामाच्या गोष्टी झाल्या. नंतर आमच्यात कोणताही व्यवहार जरी होऊ शकला नसला तरी त्यांच्या पाण्याच्या बाटलीवरील 'रिस्पेक्ट एव्हरी ड्रॉप' ही टॅगलाईन मनात ठसली होती आणि नकळतच  २० मार्च ही तारीख मनात कायमची रुजली होती.
       
मित्रानो, २० मार्च -  चवदार तळ्यातून अस्पृश्यांना पाणी देण्याचा हक्क मिळवून देणारा हाच तो ऐतिहासिक दिवस. या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या डॉ भीमराव आंबेडकर  यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेल्या, सुधारणावादी सीकेपी समाजाच्या नावलौकिकाची  महती वाढवणारे  महाड नगरपालिकेचे तत्कालीन प्रमुख, समाजभूषण कै. सुरबानाना टिपणीस आणि सामाजिक कार्यकर्ते  कै. अ. व. चित्रे यांची माहिती आजच्या आपल्या तरुण  पिढीला नाही. पण ज्यांच्यासाठी हा सत्याग्रह केला त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी मात्र आपल्या समाजाविषयी आपुलकी व आदर आजही जपलाय. आज पाण्याच्या प्रश्नांवर निवडणुका जिंकल्या जातात परंतु जेव्हा समाजातील एका वर्गाला या मूलभूत गरजेपासून वंचित ठेवले जात होते तेव्हा सीकेपी समाजातील या असामान्य नेतृत्वानी आपली संपूर्ण ताकद यांच्यामागे लावत एक इतिहास घडवला. या लढ्यामुळेच आजचा दिवस भारतामध्ये सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा होतो.

जातिव्यवस्थेमुळे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभे राहून समान हक्कांसाठी लढणाऱ्या पुरोगामी विचारांच्या सीकेपी समाजात माझा जन्म झाला यापेक्षा मोठं ते काय. १९२७ च्या सुमारास देशाच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यानच माणुसकीच्या या स्वातंत्रलढ्यात सुरेंद्रनाथ टिपणीस म्हणजेच सुरबानाना आणि अ. व. चित्रे यांनी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा यथार्थ अभिमान बाळगून त्यांच्या कर्तृवाचा एक अंश तरी आपल्या अंगी असावा हीच देवाकडे प्रार्थना.

आजच्या या ऐतिहासिक दिवशी महामानव भारतरत्न डॉ आंबेडकर आणि सीकेपी समाजरत्न सुरबानाना आणि अ.व.चित्रे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !   

समीर जयंत गुप्ते
विश्वस्त - सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट ठाणे
अध्यक्ष - सीकेपी चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
९८२०४ ९२९०५



Tuesday 12 February 2019

राजसाहेबच का ?


'काय रे, राज ठाकरेच का ?' मनसे पक्षाचा ठाणे शहरातील पदाधिकारी झाल्यानंतर मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांमध्ये जास्तीत जात विचारला गेलेला प्रश्न कोणता असेल तर हाच . 'राज ठाकरे नाही ..राजसाहेबच का असे विचारा' असं बोलून माझ्या उत्तराला सुरुवात होते.
'राजसाहेबच का?' या प्रश्नाला खरंतर हजारो उत्तरं आहेत. म्हणजे महाराष्ट्रापुढे जी संकटं आ वासून उभी आहेत,अनेक महानगरांचे - विशेषकरून पुणे मुंबईकरांचे जितके नागरी प्रश्न आहेत, ठाणे मुंबईत खासगी व सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या चाकरमान्यांच्या न्यायहक्कासाठी आणि तमाम मराठी माणसांच्या मानत ठाण मांडून बसलेल्या हजारो प्रश्नांना जर राजसाहेब हेच एकमात्र उत्तर आणि पर्याय म्हणून लोकांना दिसत असतील तर माझ्यासारख्या त्यांच्या निस्सीम चाहत्यांचे सांगणे वेगळे काय असेल. सन्माननीय राजसाहेबांच्या व्यक्तित्वाविषयी, त्यांच्या स्वभावधर्माविषयी हजारो लेख लिहिले गेले असतील. जसा ज्यांचा अनुभव तसे त्यांचे लिखाण असेल. माझ्याबाबतीत सांगायचं तर २००६ हे साल मला राजसाहेबांकडे घेऊन जाणार ठरलं. राजसाहेब हे खऱ्या अर्थाने माझ्या मनात भरले ते त्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतरच्या पहिल्यावहिल्या भाषणातच. 'आज मी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतो' हे वाक्य ऐकूनच महाराष्ट्राच्या करोडो लोकांना जे वाटलं ते शब्दात सांगणे अशक्य. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबानंतर जर कोणत्या नेत्याने माझ्या हृदयात हात घातला असेल तर तो नेता म्हणजे फक्त आणि फक्त मा. राजसाहेब ठाकरे.
२००९ साली मी पाहिल्यान्दा साहेबाना भेटलो ते माझ्या पहिल्या चित्रपटासाठी. थिएटरचा प्रश्न नव्हता कारण माझा चित्रपट पुणे ते कोल्हापूर या पट्ट्यात प्रदर्शित होत होता तिथे मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध असे. साहेबांविषयी असलेल्या प्रेमामुळे मला माझ्या या चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन मा. राजसाहेबांच्या हस्तेच आणि तेही ७ जानेवारीलाच करावयाचे होते. परंतु त्यांच्या वेळेअभावी ते ठाण्याला येऊ शकत नव्हते हे त्यांच्याकडूनच कळले. थोडासा हिरमोड झाला पण अगदी क्षणिक. 'आपण ऑडिओ रिलीज इथे करूयात' या साहेबांच्या वाक्याने मी अवाक झालो. आजही कोणाला सांगितल्यावर विश्वास बसणार नाही की माझ्या चित्रपटाचे ऑडिओ रिलीज समारंभ कृष्णकुंज येथे झाला आणि अगदी थाटामाटात, सर्व कलाकार. मित्रपरिवार आणि मीडियाच्या उपस्थितीत. आमच्या चित्रपटातील सर्व कलाकार - दिग्दर्शक, मा राजसाहेबाना भेटून अक्षरशः भारावून गेले होते.राजसाहेबांच्या या दिलदारीमुळे माझ्या मित्रपरिवारात त्यांच्याबद्द्दलचा आदर कमालीचा वाढला हे मात्र सत्य. यानंतर काही ना काही कामासाठी किंवा निमंत्रणासाठी साहेबांकडे अनेकदा जाणे झाले. २०१७ मध्ये माझ्या आयोजनात होत असलेल्या सीकेपी फूड फेस्ट चे निमंत्रण साहेबानी स्वीकारल्यानंतर जो काही जल्लोष आम्हा मंडळींमध्ये झाला त्याचे वर्णन करणे अशक्य. साहेब पाच मिनिटसाठीच येणार होते आणि ठरल्याप्रमाणे आलेही. पण पाच मिनिटे नव्हे..तब्बल ४० मिनिटे साहेब आमच्यात होते. प्रत्येक स्टॉलवर जाऊन, विचारपूस करत प्रत्येक स्टॉलवरील भगिनींकडून खरेदी करत साहेबांनी संपूर्ण फेस्ट जिंकला होता. त्यावेळेला स्टेजवर प्रमुख उदघाटक सुप्रसिद्ध हॉटेल उद्योजक मा श्री विठ्ठल कामत साहेब होते. पण त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने 'जा, तू राजसाहेबांच्या बरोबरच राहा'असे सांगून मला स्टेजवरून मोकळे केले.
मध्ये एकदा सहजच साहेबांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मित्रपरिवारबरोबर त्यांच्या निवासस्थानी जाण्याचा योग्य आला. साहेब अतिशय छान मूडमध्ये होते. राजकारणाचा आणि सामान्य माणसाचा दैनंदिन जीवनात कसा आणि कितीवेळा संबंध येतो हे त्यांनी इतक्या सहजतेने सांगितले की तिथे उपस्थित प्रत्येकाला साहेबांचा शब्द न शब्द पटला होता. जवळपास तासभर चाललेल्या गप्पांमध्ये तरुणांनी राजकारणात यावे हे त्या सर्व तरुणांना सांगताना एकदाही त्यांनी त्यांच्याच पक्षात यावे असे सांगितलं नाही पण खेळीमेळीत सुरु असलेल्या या बैठकीत क्षणभर थोडे सिरीयस होत आम्हा मंडळींकडे बघून 'तुम्ही लवकरात लवकर सक्रिय राजकारणात आलं पाहिजे' हे सांगितल्याने आमच्यात एक वेगळेच चैतन्य आले.
राजसाहेबांच्या सभा म्हणजे सांगायलाच नको. भाषणाची सुरुवातच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात होते. मा राजसाहेबांचे विचार ऐकताना, त्यांचे भाषण ऐकताना भारावून जायला होतं. त्यांची शैली, त्यांची लकब, त्यांची देहबोली आपोआपच आपली व्हावीशी वाटते. ते बोलत असलेला शब्द नि शब्द आपल्या मनातला वाटतो. एखाद्या विरोधकावर भाष्य करताना साधलेला ह्युमर आणि टायमिंग याला तोड नाही. त्यांच्या पॉज मध्ये दडलेला एक सस्पेन्स केवळ लाजबाब.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न पाहणारा हा नेता, एका असामान्य वलय घेऊन फिरणारा तरीही सर्वसामान्यांना ऍप्रोचेबल वाटणारा आणि खरोखरीच ऍप्रोचेबल असणारा हा जबरदस्त ताकदीचा नेता, मा. बाळासाहेबांच्या नेतृत्वाची आणि दृष्टिकोनाची क्षणोक्षणी आठवण देणारा, कधी गंभीर तर कधी मिश्किल प्रतिक्रिया देणारा, लाखोंच्या सभेतही तुमच्याशीच बोलतोय असे वाटणारा आणि खऱ्या अर्थाने मराठी मनाचा मानबिंदू असणारा हा असामान्य नेता आज महाराष्ट्राला लाभलाय हे माझे आणि माझ्या राज्याचे भाग्य समजतो.
आताच काही दिवसांपूर्वी प्रिय मित्र मनसे नेते श्री अभिजित पानसे साहेब आणि जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव साहेब यांच्या पुढाकाराने कृष्णकुंज या निवासस्थानी साहेबांची पुन्हा भेट झाली - तिथेच माझी ठाणे शहर सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी जाताजाता माझ्या पाठीवर मारलेली थाप मला खूप काही देऊन गेली, खूप काही सांगून गेली. समाजभानाची जाणीव असलेल्या, एका अनन्यसाधारण विचारांच्या, सर्वसामान्यांविषयी कळकळ असलेल्या, राज्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या आणि त्या प्रश्नांना सोडविण्याची धम्मक असलेल्या या प्रचंड उंचीच्या नेत्यासाठी - त्यांच्या स्वप्नासाठी आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या हितासाठी मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.
'राजसाहेबच का?' याचे उत्तर 'राजसाहेबांशिवाय आहेच कोण?' या प्रतिप्रश्नात आहे. 'तुमच्या राजाला साथ द्या' या शब्दात ' आपल्या राज्याला हात द्या' हाही अर्थ सामावलेला आहे. स्वाभिमानाने जगणाऱ्या आणि जगू इच्छिणाऱ्या मराठी मातीत जन्माला आलेल्या प्रत्येकाला हवं असलेलं खंबीर नेतृत्व ज्याच्या ठायी ओतप्रोत भरलेलं आहे तोच माझा नेता का आहे हे येणारे दिवस नक्कीच सांगतील .. नावातच असलेला 'राज'योग प्रत्यक्षात यायला आता मात्र काहीच काळ बाकी आहे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय मनसे !!!
समीर गुप्ते
ठाणे शहर सचिव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Monday 7 January 2019

सिकेपी फूड फेस्ट - सिकेपी खाद्य पदार्थांव्यतिरिक्त खूप काही

दरवर्षी सीकेपी फूड फेस्ट आला की मी त्याच्यावर काहीतरी लिहायलाच पाहिजे असा काही नियम नाही. वर्षागणिक फेस्ट ला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता तशी गरजही नसते पण तरीही 'सॅम, तुझा एखादा लेख येउदे रे' असे मेसेज  यायला सुरुवात होते आणि मग नकळत तो लेख मनात तयार होतो. नाही म्हटलं तरी प्रश्न पडतोच की आता काय नवीन सांगायचं तुम्हाला..जागा तीच..महिना तोच.. पदार्थ तेच ...पन्नास टक्के स्टॉधारकाही तेच ..आयोजकही तेच आणि दर्दी खवय्येसुद्धा तेच...  सांगा वेगळं लिहू तर काय लिहू. पण तरीही अनेक गोष्टी आहेत ज्या वेगळ्या असतात - ज्यातून या फेस्ट चे महत्वसुद्धा वाढते आणि ओढसुद्धा.

आम्हा स्वयंसेवकांचं म्हटलं - म्हणजे सीएफएफ व्हॉलेंटीअर्सचं - तर तारीख जाहीर झाल्यापासून दर दिवसाचे प्लॅन ठरतात. कपडे, रंग आणि थीम सगळं ठरवायचं - आणि कितीही आधी ठरलं तरी ऋग्वेद कारखानीस कडून ते  टी शर्ट्स येणार उदघाटनाच्या  दिवशीच ..यात वर्षानुवर्षे काही बदल नाही. पण आलेले टी शर्ट्स कधी एकदा अंगावर चढवतोय आणि त्या व्हॉलेंटीअर आर्मी मध्ये कधी उभे राहतोय हे प्रत्येकाला वाटतं ..त्यासाठीच तर वर्षभर वाट पाहिलेली असते. मग दर वर्षी नवीन व्हॉलेंटीअर्स जॉईन होत असतात - त्यांचे इंटरव्यू, थोडीशी थट्टा, जमल्यास दोस्ती खात्यातले रॅगिंग असे  मैत्र-संस्कार करून त्याला बऱ्यापैकी माणसात आणलं जातं आणि तासादोन तासातच तो पण आता अजून नवीन कोणी येतंय का याची वाट बघतो. आपल्या नोकऱ्या, धंदे, प्रसंगी अभ्यास सोडून ही मंडळी फेस्टला जणू वाहून घेतल्यासारखीच. काहींच्या आईवडिलांचे स्टॉलही असतात पण त्यांना मदत करायचे सोडून ही मंडळी ज्ञातिसेवेत रमलेली असतात.  फेस्ट संपल्यावर माझ्या घरातील श्रमपरिहाराच्या कार्यक्रमात मला फेस्ट मध्ये न समजलेल्या अनेक गोष्टी सविस्तर सांगितल्या जातात. कोण कोणाची किती काळजी घेत होतं, कोण कोणास घरी सोडण्यास तयार होतं, कोण नुसतंच काम केल्यासारखं दाखवत लक्ष भलतीकडेच ठेऊन होतं वगैरे वगैरे आणि बरंच काही. का कोणास ठाऊक पण त्या वेळेस माझ्यात आणि त्यांच्यात वयाच जराही अंतर नसतं.
 
नंतर येतात स्टॉल धारक, त्यांच्या सूचना आणि शंका.  काही जुने स्टॉल धारकानी काही वैयक्तिक कारणास्तव , मुलांच्या परीक्षेमुळे, सासूबाईंच्या आजारपणामुळे (हे कारण सांगायला - तिथे घरात कशावरूनतरी वाजलेलं असतं ) भाग न घेतल्याने नवीन स्टॉलधारकांची एंट्री ही पण एक मजेदार बाब असते. दोन अडीच किलो चे भाजाणी चे वडे संपतील ना कि अर्धा किलो वाढवू, भाऊच्या धक्क्यावरून मिस्टरांना पाच किलो कोलंबी आणायला सांगते अशा भाबड्या तयारीने आलेल्या या उत्साही सुगरणी - त्यांना समजवायला - त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायला आम्ही आणि जुने स्टॉल धारक तयारच असतो. त्यात उगीचच कारण नसताना एखादा व्हॉलेंटीअर .''ताई काळजी नका करू -आपला समीर दादा आहे मदतीला'' वगैरे सांगून तिला वडे, खिमा पॅटिस वगैरे तळायला आपल्याकडे हमखास एक सीकेपी माणूस असल्याची खात्री देऊन टाकतो.

तुम्हाला माहित आहे का काही स्त्रिया - म्हणजे मध्यवयीन स्त्रिया रोज, म्हणजे तिन्ही दिवस या फेस्ट ला भेट देतात. म्हणजे या फेस्ट ची आवड, कुतूहल, उत्सुकता, ओढ, आपली माणसं वगैरे सगळं ठीक आहे हो पण रोज , तेही मुलुंड, डोंबिवली,  ठाण्याच्या घोडबंदर रोडच्या टोकावरून वरून ?  मलाही गंमत वाटायची. मग नंतर हळूहळू कळायला लागलं. एखादी स्त्री , साधारण माझ्याच वयाची, मला विचाराते  'काय रे ती तुझ्याबरोबर स्टेजवर होती ती कर्णिकांची मुलगी ना ? छान निवेदन करते हं माईकवर !' तेव्हा मला समजतं की या बाईंचा मुलगा लग्नाचा आहे - त्याच्यासाठीच  हे सगळं. मग त्यातून निघणारी अनेक नाती - ते नाहीका आपल्या सीकेप्यांमध्ये ते टिपिकल 'जावेच्या मावसबहीणीची मुलगी', ' नणंदेच्या दिराचा मुलगा; अशा कायम चर्चा. खरंच  सांगतो आपल्यात सरळ ओळख सांगण्याची सोयच नाही - नाहुरच्या प्रधानांची मुलगी इतकंच सांगितलं तरी कळतं, पण नाही... ते नाहूर चे प्रधान - चरईतल्या दीक्षितांचे मेव्हणे, आपल्या कसे नात्यात आहेत ते सांगून त्यांच्या घरातलं एक न जमणारे  लग्न कस मीच जमवून दिल हे सांगण्याचा उत्साह आपल्यातल्या काहींमध्ये पुरेपूर आणि ठासून भरलेला. (ही आडनावं प्रातिनिधिक आहेत, नाहीतर तुम्ही पण प्रधानांना शोधत बसाल नाहुरच्या प्रधानांना) पण याबरोबरच  सीकेपी फूड फेस्ट मध्ये सीकेपी तरुण तरुणींच्या मैत्रीचे रूपांतर नात्यात होते हे देखील पाहायला मिळतंय. समाजातल्या समंजस मुली समाजतल्या समजदार मुलांबरोबर संसाराची स्वप्न पाहू लागल्या तर सीकेपी फेस्ट चे यश अजून ते काय. 

२०१४ ला ज्यांनी पहिल्या फेस्ट ला भेट दिली त्यांना एक गोष्ट नक्कीच पटेल. त्यावेळी अनेक मंडळीं एकमेकांना पहिल्यांदा भेटली - ओळखू लागली - फेसबुकच्या सीकेपी खवय्ये, सीकेपी फूड. सीकेपी यंग वर्ल्ड, आम्ही कायस्थ प्रभू या अनेक ग्रुपवरील व्हर्चुअल मैत्रीचे परिवर्तन खऱ्या मैत्रीच्या दृढ नात्यात झालं होतं - अनेक हरवलेले नातेवाईक नव्याने मिळाले होते.   २०१४ पूर्वीचा तरुणांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आजचा दृष्टिकोन यात जमीनअस्मानाचा फरक आहे. आज हजारो तरुण एकमेकांच्या संपर्कात आहेत - एकमेकांसाठी कधीही उभे राहतात - समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड करतात. सीकेपी फूड फेस्ट ने अनेकांना उद्योगाची उमेद  दिली - यशस्वी होण्याची स्वप्नं दिली यात समाधान आहेच परंतु याच सीकेपीफूड फेस्ट ने समस्त सीकेपी ज्ञातीला एका दिशेने जाण्याची, एकसंघ राहण्याची आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची संधी दिली हेसुद्धा स्वीकारायलाच लागेल. आता सीकेपी फूड फेस्ट हा फक्त खाद्यसोहळा न राहता जणू सीकेपी संस्कृती आणि परंपरा जपणारा सीकेप्यांचा आधुनिक सण असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आजपर्यंत झालेल्या सर्व सीकेपी फूड फेस्ट ला दिलेल्या उदंड प्रतिसाद, प्रेम आणि सदिच्छांसाठी आपले मनस्वी आभार आणि येत्या म्हणजेच ११, १२, १३ जानेवारी रोजी ठाणे येथील सीकेपी हॉल मध्ये  आणि २५,२६,२७ जानेवारी रोजी पुणे येथील मजेत लॉन्स वरच्या सीकेपी फूडफेस्टला येण्याचे माझे हे आग्रहाचे निमंत्रण .... आपल्याच नेहेमीच्या सीकेपी ठसक्यात ....नक्की या !

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट

Thursday 27 December 2018

मुद्रणकला - पारंपरिक व आधुनिक

जे मी लिहितोय आणि जे तुम्ही वाचताय ते केवळ दोन गोष्टीमुळे शक्य झालय. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे मुद्रण. मुद्रण हा शब्द नव्या पिढीला फारसा जवळचा किंवा वापरातला नसला तरी आताच्या या घडीला या मुद्रणाशिवाय त्यांचं पानही हालत नसावं... अगदी पेपरलेसच्या जमान्यात सुद्धा. आज तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या पण कदाचित तुम्हाला फारसं परिचित नसलेल्या या मुद्र्णक्षेत्रविषयी म्हणजेच प्रिंटिंग (आता कसं ओळखीचं वाटलं ना  ) या विषयाची थोडी ओळख करून देतो. बालपणी जेव्हा पहिल्यांदा पुस्तक हातात आलं तिथूनच तुमचं आणि प्रिंटिंग च नातं जुळलंय. तुम्हाला शिकवायला, तुम्हाला प्रगत व्हायला आणि नंतर तुम्हाला प्रशस्तिपत्रकाद्वारे शाबासकी द्यायला सुद्धा प्रिंटिंगच लागतं. 

जोहान्स गुटेनबर्ग या जर्मनीमधल्या लोहाराने (हा सोनार होता असेही बोलले जाते)  या आधुनिक प्रिंटिंगचा शोध लावलाय हे सांगूनही खरं वाटणार नाही. तत्पूर्वी चीन मध्ये लाकडाचे ठसे बनवून छपाई चालत असे. परंतु शिसे वापरून बनवलेले टाईप, ज्याला फार पूर्वी मुद्रणातील खिळे ही म्हटले जायचे ते बनवून प्रथम बायबल छापण्याचे काम करून आधुनिक मुद्रणाचा जनक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला तो जोहान्स गुटेनबर्ग. साधारण १०० ते १५० वर्षे याच तंत्राने छपाई केल्यानंतर, जगभरातून येत असलेल्या वाढत्या मागणीला अनुसरून पुढे यातलेच लिथो ऑफसेट सुरु झाले. लिथोप्रेस म्हणजे अक्षरशः एका मोठ्या लादीवर प्रकाशाच्या व रसायनांच्या साहाय्याने उमटवलेल्या भल्यामोठ्या ठश्यातून निर्माण होणारी छपाई. त्यानंतर च्या काळात तलम कापड ताणून बसवलेल्या लाकडी चौकटीच्या साहाय्याने करता येणारी स्क्रीन प्रिंटिंग हे अनेकांना उपयोगी सिद्ध होऊ लागले. आजकाल वेगवेगळे मेसेज लिहिलेले टी शर्ट्स जे आपण पाहतो ते या स्क्रीन प्रिंटिंगमुळेच.  त्यानंतर  एका दिवसात लाखो कागद छापून तयार करणाऱ्या ऑफसेट मशीनचा अविष्कार झाला. मोठमोठाली पुस्तके, कादंबऱ्या काही दिवसात तयार होऊ लागली ती केवळ या तंत्रज्ञानामुळेच. वर्तमान पत्र छापणाऱ्या भल्या मोठ्या रोटरी मशिन्सही ठिकठिकाणी आपले रूप बदलत होत्या. एका बाजूने कागदाचा रोल लावल्यावर दुसऱ्या बाजूने संपूर्णपाने छापून ५०/६० पानांचा अगदी सुरेख घडी घातलेलं वर्तमानपत्र मिनिटाला हजार या वेगाने बाहेर येणारे तंत्रज्ञान आज जुने झाले आहे. आज डिजिटल प्रिंटिंग चा जमाना आहे. संगणक तर घरोघरी आले आहेत. तुमच्या संगणकावरून केली जाणारी कामे, डिझाईन तात्काळ छापायची असलेया आज आपल्याला प्रिंटरकडे म्हणजेच मुद्रकाकडेसुद्ध जायला नको. एक क्लिकवर सुंदर रंगीबेरंगी छपाई ची सोय आता आपल्या  घरातच उपलब्ध झाली आहे. आज बाहेर पडताच दिसणारे शेकडो जाहिरात फलक सुद्धा काही मिनिटातच फ्लेक्स मशीनद्वारे तयार होतात.  तुमचे स्वतःचे चित्र तुमच्या टी शर्ट वर छापण्यासाठी एका कागदावरून तुमच्या टी शर्टवर घेता येते याला सबलीमेशन प्रिंटिंग तंत्रज्ञान असे नाव आहे. भविष्यातच कशाला तर आज अनेक देशात थ्री डी प्रिंटिंग म्हणजेच दिलेल्या डिझाइननुसार वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या प्रकारात कोणताही साचा न वापरता अनेक वस्तू बनवता येतात  नव्हे छापता येतील अशीही सोय आहे ..अगदी तुमच्या पायातले बूट सुद्धा. देशाच्या चलनी नोटा, स्टॅम्प पेपर आणि इतर शासकीय मुद्रण सामुग्री छापण्यासाठी आपल्या देशाची सिक्युरिटी प्रेस आहे. वेगळ्या कागदावर खास तयार केलेल्या शाईने या सर्व गोष्टी छापल्या जातात. सध्याच एक नवीन ट्रेंड आपण पहिला असेलच ... वाढदिवसाच्या केक वरती एखादे छान चित्र किंवा ज्याचा वाढदिवस असतो त्याचेच चित्र असते. म्हणजे खाण्यायोग्य शाईने ही छपाईदेखील आता शक्य झाली आहे. 


 वेळ  बदलली, गरज बदलल्या. कागदच नव्हेतर इतर अनेक माध्यमांवर उतरलेल्या मुद्रणाच्या अनेक कलाविष्कारामधें आपल्या ओळखीच्या हजारो वस्तू मिळू लागल्या.  प्रथमतः फक्त शैक्षणिक आणि माहिती पुरवणे या उपयोगासाठी प्रचलित असलेले प्रिंटिंग आज आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनले आहे.
तुमच्या घराला लावलेला जो आकर्षक वॉलपेपर असतो तो तर या मुद्रणातूनच निर्माण झालेला आहे.  तुमचा संगणक, त्याचा की बोर्ड,   तुमचा टीवी, तुमचे घड्याळ तुमचा मोबाईल सुद्धा प्रिंटिंगमुळेच तयार होतो हे सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही. प्रिय व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्यांवर, तुमच्या दातांवर, तुमच्या नखांवर तुमच्या शरीरावरसुद्धा छपाई होऊ शकते. दागिन्यासारखे मिरवत येईल अशा डोळ्यावर लावण्याच्या छापील सोनेरी लेन्सेस काही दिवसांपूर्वीच पहिल्या. 

अन्न, हवा व पाणी याबरोबरच आजच्या युगातील जीवन  जगण्यासाठी छपाईची गरज आहे हे म्हणणे सुद्धा गैर ठरणार नाही. मुद्रण हे शास्त्र आहे आणि कलासुद्धा. अनेकदा याचा उपयोग द्वेष पसरवणारे संदेश पाठविण्यासाठी केला जातो. परंतु हीच कला, हेच शास्त्र आनंददायी आणि विधायक कार्यासाठी वापरले तर जगाच्या प्रगतीचा वेग अजूनही वाढेल यात शंका नाही.

समीर गुप्ते
कीर्ती प्रिण्टलिंक्स - ठाणे
अध्यक्ष - इम्पॅक्ट प्रिंटर्स असोसिएशन, ठाणे


( DNS Bank  डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या २०१९ च्या कॅलेंडर्स वरील माहितीपर लेखांमध्ये प्रकाशित झालेला आधुनिक प्रिंटिंग या विषयावर मी लिहिलेला हा लेख)